Thursday, June 6, 2024

मोदी हरले लोकशाही जिंकली !

१० वर्षात मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने काय केले हे एका वाक्यात सांगायचे झाले तर सांगता येईल की,  कसलाच विधिनिषेध न बाळगणारी आणि  विधिनिषेधशून्यतेचा अभिमान बाळगणारी एक पिढी आणि संस्कृती  या दहा वर्षाच्या काळात तयार केली . याला विरोध करणारा एकही नेता सत्ताधारी पक्षात निघाला नाही. या सरकारवर वरदहस्त ठेवणाऱ्या व स्वत:ला संस्कृती रक्षक म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विरोधात चकार शब्द कधी काढला नाही.
---------------------------------------------------------------------------------


हा लेख वाचकांसमोर येईल तेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतलेली असेल. पण यावेळी 'अब की बार मोदी सरकार' ही घोषणा निवडणूक निकालापासून गायब झाली आहे. यापूर्वी भाजपचे नेते भाजपचे बहुमत असताना भाजप सरकार म्हणायला कचरत होते. केंद्रातील सरकारला भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार म्हणण्या ऐवजी मोदी सरकार म्हणण्याचा प्रघात पडला होता. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही नावे गेल्या १० वर्षापासून अडगळीत गेली होती. गेल्या अडीच महिन्यापासून मोदींची निवडणूक प्रचाराची भाषणे सुरु होती. यातील एकाही भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षात केंद्रातील भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने काय केले आणि निवडून आल्यावर काय करणार हे सांगितले नाही. त्यांची भाषा होती 'मैने ये किया और आगे भी ये मै करुंगा. आणि जोर देवून सांगत होते 'ये मोदी की गॅरंटी है' ! भाजप नेते सुद्धा पक्षाचे नाव घेवून बोलत नव्हते. मोदींनी हे केले ते केले आणि ही मोदींची गॅरंटी आहे असेच सांगत होते. मोदी तर जाहीरपणे स्वत:ची फुशारकी मारत होतेच शिवाय  सगळेजण सगळ्या गोष्टी मोदींनी केल्याचे सांगत होते. शेवटी शेवटी तर मोदींना हा भास व्हायला लागला की सरकार चालविण्यासाठी लोकांनी नव्हे तर ईश्वराने त्यांना भूतलावर पाठविले आहे.  मोदींनी भाषणात भाजपचे नाव सुद्धा घेतले नाही आणि घेतले असेल तर तो अपवाद असेल. पण त्यांनी आपल्या भाषणात मोदी-मोदी किमान ५-१० वेळा घेतल्याचे दिसेल. प्रचारातील मोदींच्या भाषणांचे सर्व व्हिडीओ उपलब्ध आहेत आणि ते ऐकून खात्री करून घेवू शकता. सरकारची सामुहिक जबाबदारी, पक्ष पद्धती, लोकशाही कार्यपद्धती हे सगळे बाजूला सारून गेली १० वर्षे मोदी कल्ट म्हणजे मोदींची प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न झाला. अशी प्रतिमा निर्मिती लोकशाहीला धरून नाही किंबहुना लोकशाही विरोधी आहे.                         

मोदी निवडून आलेत पण त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची जी प्रतिमा तयार केली होती त्या प्रतिमेचा पराभव झाला आहे. हा पराभव करून सुजाण मतदारांनी लोकशाहीवरचे गंडांतर टाळले आहे. ईश्वराने पाठविलेल्या या स्वघोषित प्रेषिताला आपल्या पक्षाला देखील विजयाप्रत नेता आले नाही त्यामुळे मोदींचे स्वत:बद्दलचे आणि इतरांचे मोदी बद्दलचे भ्रम आणि भास दूर व्हायला मदत होणार आहे. भ्रम आणि भास दूर होवू लागल्याची प्रचीती येवुही लागली आहे. आता निवडणूक निकालाचे वर्णन मोदींचा विजय म्हणून नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय म्हणून होवू लागला आहे आणि असा उल्लेख स्वत:मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करावा लागणे याला मी सैतानाच्या तोंडी बायबल असे म्हणणार नाही पण ज्ञानेश्वराने रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले म्हणतात तसे मतदाराने मोदी व त्यांच्या अति उत्साही समर्थकाच्या तोंडून लोकशाही वरील निष्ठा वदवून घेतली असे नक्कीच म्हणता येईल. 

अमर्याद सत्ता किती भ्रष्ट करू शकते हे केंद्रातील मागच्या १० वर्षाच्या राजवटीने दाखवून दिले आहे. भ्रष्टाचार फक्त आर्थिक असतो असे नाही तो अनेक प्रकारचा असतो त्यातही नैतिक घसरण आपल्याकडे मोठा भ्रष्टाचार समजला जातो. पण इथे अनैतिक आचरण ही अभिमानाने सांगायची गोष्ट बनली. बलात्कारी लोकांची पूजा होवू शकते , सत्कार होवू शकतो याची कधी कोणी कल्पना केली नसेल ते या १० वर्षाच्या काळात प्रत्यक्षात घडले. ज्या खेळाडूंनी पराक्रम गाजवून देशाचे नाव जगात उंच केले त्यांच्याशी शारीरिक गैरवर्तन करणारा आपल्या पक्षाचा खासदार आहे म्हणून त्याच्या विरुद्ध कारवाईत चालढकल केली जाते. पोक्सो कायद्याचे कलम निघावे म्हणून तक्रारदारावर दबाव आणण्यासाठी वेळ दिला जातो. अटक टाळण्यासाठी हे आवश्यक होते. न्याय मागणाऱ्या महिला खेळाडूंची सत्ताधारी पक्षातले गुंडपुंड जाहीर अवहेलना करीत होते पण कोणी त्यांना थांबविले नाही. पोलीसानीही न्याय मागणाऱ्या खेळाडूना झोडपून काढले. १० वर्षातील अशा घटनांची यादी करतो म्हंटले तर खूप मोठी होईल. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात ७०० लोक मेलेत. याबद्दल मोदी किंवा सत्ताधारी पक्षातील एकानेही खंत किंवा खेद व्यक्त केला नाही. शेतकरी आंदोलकांची संभावना खलिस्तानी म्हणून केली गेली. विरोधातील सगळ्या राजकीय पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा करता येईल तितका गैरवापर केला.   जो जो सरकार विरोधात बोलेल त्याला देशद्रोही ठरविणारी मोठी यंत्रणा या सरकारने कार्यान्वित केली. विरोध मोडून काढण्याचे सर्व मार्ग अवलंबिले गेले. सगळ्या सरकारी यंत्रणा आपण म्हणू तेच करतील इतक्या वाकविण्यात आल्या.                                                                                                                                                 

करोडो रुपये खर्च करून सरकार पाडणे, पक्ष फोडणे अशा अनैतिक आणि विकृत कामांना गेल्या १० वर्षात प्रतिष्ठा मिळाली. एवढी प्रतिष्ठा की देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री राहिलेला माणूस मी दोन पक्ष फोडून सत्तेत परत आलो हे अभिमानाने छाती फुगवून सांगतो. अतिशय बेशरमपणे वाहिन्या आणि वृत्तपत्रे ऑपरेशन कमळच्या ठळक बातम्या द्यायचे आणि सत्ताधारी नेते हसून त्याचा स्वीकार करायचे. ऑपरेशन कमळ म्हणजे आमदारांना खोके द्यायचे, मंत्रीपदाची लालूच दाखवायची आणि विरोधी पक्षाचे सरकार पाडून आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करायचे ! सरकार आणि पक्ष ज्यांच्या मुठीत त्या मोदी आणि शाह यांच्या संमतीने घडायचे ! या कामासाठीची सगळी रसद दिल्लीतून अमित शाह पुरवत होते हे लपून राहिलेले नव्हते. पण कसलाच विधिनिषेध बाळगायचा नाही आणि उलट विधिनिषेधशून्यतेचा अभिमान बाळगणारी एक संस्कृती आणि एक पिढी या दहा वर्षाच्या काळात तयार केली गेली.  अशा दुष्कर्माना विरोध करणारा एकही नेता सत्ताधारी पक्षात निघाला नाही. या सरकारवर वरदहस्त ठेवणाऱ्या व स्वत:ला संस्कृती रक्षक म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विरोधात चकार शब्द कधी काढला नाही. समाजात अशा विकृतींना धरबंद राहिला नाही तर ईश्वर अवतार घेवून त्याचे निर्दालन करतो असे आपण पुराण कथात वाचत आलो आहोत. मोदींनी स्वत:ला अवतार घोषित केले असले तरी हा अवतार या सर्व विकृतींना आशीर्वाद, आश्रय आणि पाठबळ देणारा आहे.  असे पाठबळ देण्यासाठी  यांना पाशवी बहुमत पाहिजे होते. ते मिळविण्यासाठी या निवडणुकीत सर्व प्रकारची हत्यारे त्यांनी वापरली. त्यांच्या हत्यारांपुढे त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या राजकीय पक्षांचा निभाव लागणार नाही अशी परिस्थिती होती. हे बघून  शेवटी मतदारांनाच अवतार घेवून समोर यावे लागले आणि निवडणूक आपल्या हाती घ्यावी लागली.  सरकारी आशीर्वादाने जे जे वाईट घडत आहे त्याला पायबंद बसेल असा निर्णय मतपेटीतून दिला आहे ! 

------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment