Thursday, June 20, 2024

महाराष्ट्रातील मतदारांची राजकीय क्रांती

 महाराष्ट्रात हमखास निवडून येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी भाजप नेतृत्वाने केल्या त्याच त्यांचेवर उलटून त्यांना महाराष्ट्रात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मी केवळ परत आलो नाही तर दोन पक्ष फोडून परत आल्याची देवेंद्र फडणवीस यांची गर्वोक्ती भाजपला महागात पडली आणि पक्षाचे पुरते गर्वहरणच नाही तर वस्त्रहरणही झाले. 
---------------------------------------------------------------------------------------------


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांना कोणता पक्ष जिंकला कोणता पक्ष हरला, कोणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा अधिक व्यापक आणि खोल अर्थ आहे. लोकसभा निवडणूक निकालाला अनेक कंगोरे आहेत.  निकालाचा अर्थ व परिणाम समजून घेण्यासाठी प्रांतागणिक वेगवेगळी फुटपट्टी वापरावी लागली तरी या निवडणुकीने राष्ट्रीय पातळीवर एक संदेश दिला आहे. तो म्हणजे राजकीय पक्षांना मतदारांना गृहीत धरता येणार नाही. सत्ताधारी व राजकीय पक्षांना वेसण घालण्याची ताकद मतदारांमध्ये आहे. धार्मिक प्रश्नावर किंवा जाती-जातीत भांडणे लावून उन्माद निर्माण केला की आपसूक फायदा होतो हे गृहीतक मतदारांनी देशभर मोडीत काढल्याने ज्या गतीने विघटनाचे व दुहीचे राजकारण पुढे जात होते त्याला चाप बसला आहे. असा चाप बसविण्यात उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या मतदारांची विशेष भूमिका राहिली आहे. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी धर्माधारित राजकारणाला चाप लावला तर महाराष्ट्रातील मतदारांनी राजकारणात फोफावत चाललेल्या खोके संस्कृती , अनैतिकता आणि सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना सम्पाविणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कौल दिला. ई डी चा वापर करून पक्ष नेते आणि पक्ष फोडणे तसेच निवडणूक आयोगा मार्फत फोडलेल्या पक्षाला अधिकृत पक्ष घोषित करणे यामुळे जनमत विरोधात आणि क्रोधित असल्याची जाणीव शिवसेनेत फुट पाडल्यानंतर केंद्रातील सात्ताधारी नेत्यांना झाली होती. यावर त्यांनी उपाय शोधला तो उरलेसुरले पक्ष संपविण्याचा. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची शक्ती संपविली की मतदार आपल्याच मागे येणार हे त्यांनी गृहीत धरले. म्हणून शिवसेने नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली आणि कॉंग्रेसचे नेतेही पळविले. पण जनता स्वत:च पक्ष बनून समोर येईल किंवा कारस्थानातून कमजोर करण्यात आलेल्या पक्षांना ताकद देईल याची कल्पनाच केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली नाही. त्यामुळे हमखास निवडून येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी भाजप नेतृत्वाने केल्या त्याच त्यांचेवर उलटून त्यांना महाराष्ट्रात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मी केवळ परत आलो नाही तर दोन पक्ष फोडून परत आल्याची देवेंद्र फडणवीस यांची गर्वोक्ती भाजपला महागात पडली आणि पक्षाचे पुरते गर्वहरणच नाही तर वस्त्रहरणही झाले. 

जनतेने दिलेला कौल हा केवळ सत्ताधाऱ्यांच्या गर्वहरणाचा किंवा वस्त्रहरणाचा नाही. एक प्रकारची राजकीय क्रांतीच मतदारांनी घडवून आणली जीची तुलना १९७७ साली आणीबाणीत झालेल्या निवडणुकीशी करता येईल.  ही निवडणूक जशी लोकांनी आपल्या हाती घेतली होती तशीच १९७७ ची निवडणूक लोकांनी आपल्या हाती घेवून लढविली होती. त्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे नाममात्र अस्तित्व होते तशीच स्थिती या निवडणुकीत विरोधी पक्षांची होती. त्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव करून विरोधकांच्या हाती सत्ता दिली होती. यावेळी विरोधकांच्या हाती सत्ता येता येता राहिली हाच काय तो फरक. या निवडणूक निकालाने काय चमत्कार घडविला याचे आकलन ज्यांना नाही ते पक्ष,जात ,धर्म याच्या मर्यादेत विश्लेषण करून निष्कर्ष समोर ठेवतात. सत्ता मिळालेला पक्ष किंवा आघाडी निवडणूक निकालाने निराश झाली तर सत्ता न मिळालेले पक्ष किंवा आघाडी निवडणूक निकालाने आनंदी झाली यावरून या निवडणुकीत सत्तेपेक्षा अधिक महत्वाच्या मुद्द्यावर मतदारांनी हा कौल दिल्याचे स्पष्ट आहे. अनियंत्रित सत्ता की जबाबदार सत्ता यावर हा कौल होता. सत्ता मिळूनही दु:ख आणि सत्ता न मिळूनही आनंद होण्याचे कारण या कौलात दडले आहे. पारंपारिक निकष निवडणूक निकाल समजून घेण्यास अपुरे ठरतील.  त्यामुळे अमुक गटांनी तमुक अपप्रचार केला म्हणून असा निकाल लागला असे म्हणणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. मतदारांच्या विवेकबुद्धीवर विश्वास नसणारेच निवडणूक निकालावर असे भाष्य करू शकतात. अपप्रचाराचाच मुद्दा महत्वाचा असेल तर कोणी अपप्रचार केला हे सर्वांनी आपल्या कानांनी ऐकले आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधानाचे निवडणूक प्रचारातील असे एकही भाषण आढळणार नाही ज्यात त्यांनी विरोधकाबद्दल मतदारांचे चुकीचे समज होतील असा प्रचार केला नाही. कॉंग्रेस निवडून आली तर तुमची संपत्ती काढून घेतील आणि ती अल्पसंख्यांक समुदायाला देतील असा प्रचार त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा हवाला देवून केला. वास्तविक मनमोहनसिंग यांचे ते भाषण सर्वत्र उपलब्ध आहे ज्यात त्यांनी पंतप्रधान दावा करतात तसे काही म्हंटले नव्हते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले तर महिलांचे मंगळसूत्र काढून घेतील , दोन म्हशी असतील तर एक म्हैस काढून घेतील असा अपप्रचार पंतप्रधानांनी केला. पंतप्रधानांनी केलेल्या अपप्रचाराला व्यापक प्रसिद्धी मिळूनही मतदारावर त्याचा परिणाम झाला नाही हे निवडणूक निकालच सांगतात. विरोधकांनी घटना बदलण्याचा अपप्रचार केला असा भाजप आघाडीचा आरोप आहे. विरोधकांच्या प्रचारात हा मुद्दा होताच. विरोधकांना हा मुद्दा कोणी दिला असेल तर तो भाजपच्या नेत्यांनीच दिला. संविधान बदलाची गरज भाजप नेते बोलून दाखवीत होते आणि त्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागा हव्यात असेही ते बोलत होते. अयोध्येतील भाजपच्या पराभवाची देशभर चर्चा आहे त्या भाजपच्या उमेदवाराने घटना बदलण्यासाठी ४०० पार पाहिजे असे विधान केले होते. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा जनतेसमोर ठेवला तर तो अपप्रचार नक्कीच ठरत नाही. 


 या निवडणुकीवर प्रभाव पडणारे जे घटक होते त्यातील शेतकरी हा घटक महत्वाचा होता. ही पहिली निवडणूक असावी ज्यात शेतकऱ्यांनी शेतीच्या मुद्द्यावर मतदान केले. एरवी शेतकऱ्यांना देशातील इतर मुद्द्यांची फार चिंता असायची आणि या चिंतेत त्याची शेती विषयक मुख्य चिंता बाजूलाच राहून जायची. पण हा  निवडणूक निकाल शेती प्रश्नाने प्रभावित केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या निकालावर भाष्य करताना याची कबुली दिली आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावर निर्माण झालेला असंतोष भोवल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर बोलण्याची संधी पंतप्रधानांना मिळाली होती. भर सभेत एका मतदाराने कांद्याचा प्रश्न उपस्थित केला होता. पण पंतप्रधानाचे त्यावर उत्तर होते 'जय श्रीराम' ! लोकांच्या सर्व प्रश्नांवर त्यांचेकडे असलेले उत्तर हेच होते. जय श्रीराम घोषणेतून निर्माण होणाऱ्या उन्मादात लोकांचे खरे प्रश्न बाजूला पडतील आणि लोक आपले समर्थन करतील असा ठाम विश्वास बाळगून पंतप्रधान व त्यांचा पक्ष निवडणुकीला सामोरा गेला होता. 'जय श्रीराम'चा उत्तर प्रदेशात तर विशेष प्रभाव पडणार हे त्यांनी पक्के गृहीत धरले होते. तेवढा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही म्हणून इथे त्यांनी पक्षफोडीचे उद्योग केले. तशी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष फोडण्याची गरज त्यांना वाटली नाही. धार्मिक मुद्द्यावर निवडणूक जिंकण्याची खेळी आणि जिथे धार्मिक मुद्दा चालणार नाही तिथे सत्तेचा वापर करून विरोधक संपविण्याची खेळी करून निवडणूक जिंकण्याचाच नाही तर पाशवी बहुमत मिळविण्याचा डाव खेळला गेला. हा डावच मोदी आणि भारतीय जनता पक्षावर उलटला आहे. धार्मिक उन्माद निर्माण करून मतदारांना मूर्ख बनविता येणार नाही हा जसा संदेश उत्तर प्रदेशातील मतदारांनी दिला त्याच प्रमाणे सत्तेचा दुरुपयोग करून पैशाचा खेळ करून विरोधक संपविले तर मतदार स्वत: निवडणूक हातात घेवून चमत्कार घडवू शकतो हा संदेश महाराष्ट्रातील मतदारांनी सत्ताधाऱ्याना आणि देशाला दिला आहे. 

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment