Monday, August 30, 2010

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने --शेतकरी समुदयाचा दुस्वास!

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्या नंतर ज्याना प्रतिभेचा स्पर्श नाही किंवा साहित्याची जाण नाही अशा झोपड़पट्टी वासियांचा साहित्य संमेलनाशी सम्बन्धच काय असा सवाल उपस्थित करून प्रसिद्ध आणि ज्येष्ठ साहित्यिक गिरिजा कीर यानी मोठा वाद निर्माण केला आहे.या विधानाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याने वादाने गंभीर रूप धारण केले आहे.कीर यांचे वर उमेदवारी मागे घेन्या साठी दडपण आणले जात असल्याचा ,धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कीर यानी जाहिरपणे केला आहे.विधानात नसलेला अर्थ शोधण्याची संधी गिरिजा बाईनी स्वत: देवून हे बालंट ओढ़वून घेतले हे उघड आहे.त्यानी उत्तरादाखल दिन-दलिता साठी आपण काय केले याचे तुनतुने वाजविन्या ऐवजी सारस्वतान्पेक्षा(जाती वाचक अर्थाने नव्हे) दलित साहित्य अधिक सकस आणि प्रतिभाशाली आहे हे खुल्या दिलाने मान्य करून टाकले असते तर या वादा वर पडदा पडला असता। दलित साहित्याच श्रेष्ठत्व गिरिजा कीर याना मान्य असो वा नसों ,प्रत्येक साहित्य प्रेमी ला याची चांगलीच जाण व जाणीव आहे.गिरिजा कीर यांच्या मनात काय होते किंवा आहे हे त्यानाच माहीत,पण त्यांच्या उपरोक्त विधानाचा दलिताशी दुरान्वयानेही सम्बन्ध असू शकत नाही हे दलित साहित्या कड़े पाहून ठाम पणे म्हणता येइल.जे दलित नेते हे विधान दलिताना हिनविन्यासाठी केले असे समजुन त्यावर गहजब माजवीत आहेत ते एक तर न्यूनगंडाने पछाड़लेले असले पाहिजेत किंवा दलितांचे प्रतिभा संपन्न लेखन समजन्याची कुवत त्यांच्यात नसली पाहिजे.गिरिजा कीर यांचे विधान दलिताशी जोडून दलित प्रतिभेचा आपण अपमान करीत आहोत याचे भान दलित नेतृत्वाला राहिले नाही.मुंबईच्या झोपड़पट्टीत दलित समाज मोठ्या संख्येने राहात असल्याने त्याचा सम्बद्ध दलिताशी जोड़ने हां उथळपणा आहे हे दलित साहित्याच्या आधारे नक्कीच म्हणता येइल.या झोपड़पट्टीत दलिता सोबतच आणखी एक समाज मोठ्या संख्येने राहतो आणि त्या समाजाला कीर-विधान तंतोतंत लागू होते याचा विचारच कोणी केला नाही.ज्याला साहित्य प्रतिभेचा स्पर्शही होवू शकला नाही,साहित्याची जाण ज्याला झाली नाही असा एक आणि एकमेव दुर्दैवी समाज या भूतलावर अस्तित्वात आहे आणि हां समाज म्हणजे शेतकरी समाज होय.विधान करताना गिरिजा कीर याना याची जाणीव होती की नाही हे माहित नाही ,पण त्यांच्या या विधानाने शेतकरी समाजाच दुर्लक्षित दुःख समोर आले आहे।
सातत्याने तोट्यात जाणारी शेती वाढण्याची शक्यता तर कधी नव्हतीच,पण आहे ती टिकवून ठेवणेही अशक्यप्राय होते.हिस्से-वाटण्या आणि गरजा भागविन्यासाठी विकावे लागणारे शेतीचे तुकडे लक्षात घेतले तर शेतकरयाला भूमीहीन होवून देशोधडीला लागायला किती वेळ लागणार? असा हां देशोधडीला लागलेला शेतकरी कामाच्या शोधात शहरात येवून झोपड़पट्टीत मोठ्या संख्येने राहतो आहे.गावात असतानाही साहित्य-संस्कृतीचा त्याला कधी स्पर्श झाला नव्हता ,नव्हे साहित्य-संस्कृती साठी तो कायमच अस्पृश्य राहिला आहे.गावाशी घट्ट नाळ बांधली असताना आणि शेतजमिनीचा मालक असताना जे जमले नाही ते गावातून परागंदा होवून झोपड़पट्टीतील सतत कामाच्या शोधातील उपरे जीवन जगणारा हां लाचार शेतकरी साहित्याचा विचार तरी करू शकेल का? गिरिजा ताई ,तुमच्या विधानात दडलेले हे सत्य एवढ क्रूर आणि कुरूप आहे।
दलित समाजही गावातून शहरात आला आणि झोपड़पट्टीत स्थिरावला .पण तरीही या समाजाने साहित्याच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली.कारण हां समाज लाचार बनून नव्हे तर स्व-निर्णय व निर्धाराने शहरात आला.शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतुन मुक्त होण्याच स्वप्न उराशी बाळगुन तो शहरात आला.पराभूत मानसिकतेतून नव्हे तर जिंकन्याच्या जिद्दीने आणि ओढीने दलित समाज शहरात आला होता.आणि तसेही त्याच्या जवळ गमावन्यासाठी बेड्या शिवाय दुसरे काहीच नव्हते!या उलट मोठ्या संख्येने शेतकरी शहरात आला तो सर्वस्व गमावून.पराभवान खचून आणि लाचार होवून.आपल्या स्वप्नाना(?) गावाकडील जमिनीत मुठ माती देवुनच तो शहरात आला ते मरता येत नाही म्हणून जगायला.स्वप्नांची राखरांगोली झालेला,स्वप्न पाहण्याची इच्छा आणि शक्ती गमावलेला माणूस साहित्याच्या प्रांतात काय आणि कशी भरारी घेणार?
गावात राहून जमिनीचा मालक म्हणून मिरवत असतानाही याला कधी साहित्य सुचू शकले नाही.कारण शेतीच्या आणि पोरा-बालाच्या भेसूर भवितव्याच्या चिन्तेतुन मुक्त करणारा क्षण त्याला कधी अनुभवताच आला नाही.शेतीच्या रहाटगाडग्यात याचे स्थान शेती- कामात जुम्पलेल्या जनावरा पेक्षा वेगळ कधी नव्हतेच.दोहोंचेही राहणीमान आणि काम करने सारखेच.जनावराला स्वत:ची चिंता वाहता येत नाही म्हणून त्याच्या चिंतेचा अतिरिक्त भार यानेच वाहायाचा!पाउस आला तर बी-बियानांची ,खताची चिंता.पाउस आला नाही तर गुरान्च्या वैरनी सोबत स्वत:च्या कुटुम्बाच्या वैरनीची चिंता! नापिकी झाली तरी चिंता आणि पिकले तर विकण्याची चिंता.निसर्गाच्या कोपाचे भय ,सरकारच्या जुलुमाची भीती आणि बैंक व सावकाराचे भय तर कधीच पाठ सोडीत नाही.सदैव भय आणि चिंता याने ग्रासलेला शेतकरी कधी आणि कसे साहित्य निर्माण करणार?
इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात प्रत्यक्ष शेतीत राबणारा एखादा तरी शेतकरी साहित्यीक झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे.अर्थात याला स्त्री साहित्यीकांचा सन्माननीय अपवाद आहे.पण त्यांच्या साहित्य निर्मितीचा उगम हां माहेर तुटल्याच्या दू:खातुन,विरहातुन झालेला असावा.शेतीने शेतकरी समाजाच्या जीवनातील सर्व रस शोषून त्याचे जीवन नीरस बनविले आहे हे सत्य समजून घेतले तर शेतकरी समाजातून नाव घेण्या सारखा एकही साहित्यीक का निर्माण झाला नाही या प्रश्नाचे उत्तर मिळते. आश्चर्यकरक बाब अशी आहे की शेतकरी समाजाच्या भिक्षेवर जगणारे थोर साहित्यीक झाले आहेत.संत द्न्यानेश्वर याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.तुकोबारायाचा शेतीशी सम्बद्ध असला तरी ते शेतकरी नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे.याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे -शेती उत्पादनाचा उपभोग जे घेवु शकतात ते साहित्यच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी मारू शकतात.त्यांच्या उपभोगाचे साधन असणारा शेतकरी मात्र उपभोगा ऐवजी शेतीतले भोग भोगत बसतो!
ज्यांचा उदरनिर्वाह निव्वळ शेतीवर अवलंबून नाही असे बांधा वर बसून किंवा विधान भवना सारख्या वातानुकुलीत इमारतीत बसून उत्तम साहित्य निर्माण करणारे ना.धो.महानोरा सारखे शेतकरी साहित्यीक असू शकतात.ग्रामीण साहित्याची किंवा शेतकरी साहित्याची लाट निर्माण करणारे बहुसंख्य अध्यापक-प्राध्यापक ही शेतकरी समाजातील असली तरी त्यांचा शेतीशी सम्बद्ध तुटून अनेक वर्ष उलटून गेली आहेत.त्यांच साहित्य हेच दर्शवित् की शेतकरी समाजातून उत्तम साहित्यीक निर्माण होवू शकतात पण त्या साठी आधी शेतीतुन बाहर पड़ने आवश्यक आहे!
गिरिजा कीर यानी केलेल्या विधानाच्या निमित्ताने शेतीतील शोषनाचा साहित्य निर्मिती वर होणारया परिणामाचा कधीही विचारात न घेतलेला पैलू साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर जाहिरपणे चर्चिला गेला पाहिजे। एवढेच नव्हे तर साहित्यात शेतकरी समुदाया बाबत केलेले अवास्तव चित्रण व स्वत:च्या मनोविकृतीच्या प्रगटीकारणासाठी गावाचे विकृत चित्र उभे करून केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्या साठी साहित्य संमेलनात शेतकरी समुदायाला सन्मानाने शेतीतुन बाहेर पडन्या साठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले गेले पाहिजे.विशेषत: शेतीतुन बाहर पडन्याची संधी शेतकरी समाजाला मिळते तेव्हा त्यात कोणताही अड़थला निर्माण न करण्याची सुबुद्धी सर्व गांधीवादी,सर्वोदयवादी,पर्यावरणवादी ,डावे , उजवे आणि सर्व स्वयंसेवी संस्थाना होवो या साठी साहित्य संमेलनात जाहीर प्रार्थना करण्याची गरज आहे.शेतकरी बाहर पडता कामा नये या साठी कायम रखवालदारी करणारी ममता -मेधा सारख्या भगिनी साठी तर विशेष प्रार्थना घेण्याची गरज आहे.साहित्याच्या समृद्धी साठी शेतीतुन शेतकरी समुदयाची सुटका व्हावी म्हणून कृती करता येत नसेल तर साहित्य जगताने किमान प्रार्थना करायला काय हरकत आहे?

सुधाकर जाधव
भ्रमणध्वनी-9422168158

6 comments:

 1. शेतकरी समाजातून उत्तम साहित्यीक निर्माण होवू शकतात पण त्या साठी आधी शेतीतुन बाहर पड़ने आवश्यक आहे!
  uttam lekh.kharokhar khup mast lekh

  ReplyDelete
 2. Another false logic, as false as the statement of Gir.

  Difficulties in life whether to farmers or in any other profession cannot stop the growth of literature. There are many examples of great literary work coming from the persons full of sorrows in personal life. This has happened in history and also happening today. This has happened in India and also has happened in every place on earth. In fact hardship, disappointments, threats, at times help in developig great work of literature. So try to understand this point and dont help any one in the motive to devide the society.

  ReplyDelete
 3. प्रतिसादा बद्दल आभार. रंजल्या-गान्जल्याकडून ,दू:खी आणि पीडिता कडून तुम्ही म्हणता त्या प्रमाणे कसदार साहित्याची निर्मिती
  नक्कीच झाली आहे.दलित-साहित्य याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.ते मी लिहिले आहेच.शेतकरी समाजातून नाव घेन्या सारखा
  साहित्यिक का निर्माण झाला नाही हां माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला तुम्ही बगल दिली आहे!दू:ख ,हाल-अपेस्टा,अन्याय याच्या
  मोजमापाचे जे मानदंड आहेत त्यात मापन्या सारखे शेतकरी समाजाचे दू:ख नाही.दू:खा पलिकडचे ते दू:ख आहे! तुमच्या-आमच्या
  सारखे पेलेल एवढेच दू:ख त्याच्या वाट्याला येइल तेव्हा शेती-उत्पादनाच्या राशी सारख्याच साहित्याच्याही राशी निर्माण होतील.पण तुमच्या -आमच्या
  सारखे दू:ख तो शेतीतुं बाहर पडत नाही तो पर्यंत त्याच्या वाट्याला येणार नाही आणि त्याच्याकडून साहित्य निर्मिती होणार नाही हां माझा मुद्दा आहे.
  वास्तविक द्न्यात इतिहासात शेतीच्या रहाटगाडग्यात सदैव अड़कलेला असूनही उत्तम साहित्यकार झाल्याचे एक जरी उदाहरण दिले असते तर माझ्या
  प्रतिपादनात तथ्य नसल्याचे आनंदाने मान्य करून हात वर केले असते! शेतकरी समाजाचे दू:ख समजन्या पलिकडचेच असल्याने ते तुम्हाला समजले नाही तर
  त्याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही.

  ReplyDelete
 4. केवळ शेतीत अडकल्यामुळे त्या समाजाला साहित्य निर्मितीला वेळ देता येत नाही हा निष्कर्ष थोडा अर्धामुर्धा आहे. आपल्यासारख्या अत्यंत मागासल्या शेतीत अडकल्यामुळे असे झाले हे स्पष्ट म्हणायला हवे. आलं वरीस राबून मी मरू किती... अशी परिस्थिती आहे म्हणून मनात आलेल्या गोष्टींना आविष्काराचा प्रकाश दिसू शकत नाही. ही शेतीची परिस्थिती सुधारावी म्हणून, त्यात आधुनिकता, तंत्रज्ञान आणण्यासाठी आपल्या हलकट बॅंकिंग व्यवस्था आपली जबाबदारी पार पाडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी आपली जबाबदारी भ्रष्टाचार न करता निभावली, आधुनिकीकरणासाठी वित्तपुरवठा करून दिला तर त्यातून समृध्दी- पर्यायाने वेळेची उपलब्धता, स्वास्थ्य वाढेल.
  मरो ते तथाकथित शारदीय चर्वितचर्वण. ज्या गोष्टी माणसाच्या आयुष्याला भौतिकदृष्टया सुखकर बनवतात त्याच अखेर त्याच्या बौध्दिक उद्धाराचा मार्ग तयार करतात.
  दुःखोद्भव साहित्यनिर्मितीची- मग ती दलित असो वा उच्चवर्णी- एक महत्त्वाची भूमिका असली तरीही ती अखेर मर्यादितच आहे.त्यापेक्षा विज्ञानविचार मांडणारी, विवेकनिष्ठा जागवणारी साहित्यनिर्मिती मला केव्हाही अधिक श्रेष्ठ वाटते.
  कीरबाई किंवा त्यांचे विरोधक-समर्थक एका मर्यादित वर्तुळाच्या आत आपले नाचकाम करतात. सुधाकर जाधवांनी त्यावर लिहिण्याची काय गरज...
  शेतीला सरंजामी, बुरसटलेल्या चाकोरीतून बाहेर काढण्यासाठी, ममत-मेधांच्या भावनिक गोंधळामधून सावरण्यासाठी, पर्यावरण रक्षणाच्या खोट्या कल्पनांना खोडून काढण्यासाठी जे विवेकी मुद्दे गरजेचे आहेत त्यावर आपण लिहित रहावे.

  ReplyDelete
 5. Creating literature is the issue here. Why is the farmers community not appearing to have contributed significantly to literature? This is the question raised by Shri Sudhakar Jadhav, and he has put forth a certain point of view, biased it may be. But, the issue raised by him is certainly worth discussing at large. Is it that the farmers have always remained tied with the daily struggle of existence? He says: yes, by and large.

  We are talking of the written literature here. But, we need to explore the ``spoken literature'' and not the ``written literature'' of these communities (before we reach conclusions). It may be quite rich!

  Mamata-Medha. They do not appear to have any ``reasonable and achievable'' goals. They want to justifiably replace the existing system, but replace with what? They have no answers, have they?

  शेतीतुन बाहर पडन्याची संधी शेतकरी समाजाला मिळते तेव्हा त्यात कोणताही अड़थला निर्माण न करण्याची सुबुद्धी सर्व गांधीवादी,सर्वोदयवादी,पर्यावरणवादी ,डावे , उजवे आणि सर्व स्वयंसेवी संस्थाना होवो या साठी साहित्य संमेलनात जाहीर प्रार्थना करण्याची गरज आहे.

  साहित्याच्या समृद्धी साठी शेतीतुन शेतकरी समुदयाची सुटका व्हावी म्हणून कृती करता येत नसेल तर साहित्य जगताने किमान प्रार्थना करायला काय हरकत आहे?

  I like these statements! Keep up the debate.

  ReplyDelete