Wednesday, July 20, 2011

राज ठाकरे उत्तर द्या ! या अभागी शेतकऱ्यानी जायचे कोठे ?

"परप्रांतातून येणारे लोक हे शेती शोषनाच्या चरकातुन बाहेर फेकले गेलेले अभागी शेतकरी आहेत हे लक्षात घेतले तर राज ठाकरे यांच्या उदगारातील क्रूरता लक्षात येइल. ज्यानी नेहमी संपत्तीचा गुणाकार होतानाच पाहिला त्या राज ठाकरेना शेतीत फ़क्त वजावाकी व भागाकार होतो याचे द्न्यान नसणे स्वाभाविक आहे"
---------------------------------------------------------

जॉर्ज ऑरवेल नावाच्या लेखकाच 'अॅनिमल फार्म'(Animal Farm ) नावाच एक छोटेखानी वाचनीय पुस्तक आहे. या पुस्तकात उपरोधिक पद्धतीने त्याने साम्यवादी सरकारच्या हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराची यथेच्छ खिल्ली उडविली आहे. या पुस्तकातील एक लक्षवेधी वाक्य आहे- 'सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी अधिक समान आहेत!'. हे वाक्य वाचल्यावर आपल्याकडे सर्रास वापरले जाणारे वाक्य आठवेल- 'कायद्या पुढे सर्व समान आहेत'. पण ऑरवेलने म्हन्टल्या प्रमाणे आपल्या देशातही कायद्या पुढे काही लोक विशेष समान आहेत , काही तर परिवारच्या परिवार विशेष समान आहेत! . काही परिवारांचा देशाच्या सत्तेवर जन्मजात हक्क असतो. तर काही परिवारान्च्या मुठीत देशाचा कायदा आणि कायदा व सुव्यवस्था असते. ज्यांच्या हाती सत्ता किंवा ज्यांच्या मुठीत कायदा व सुव्यवस्था त्या परिवारान्च्या घरात एखाद वेळेस सरस्वती जाण्यासाठी आढेवेढे घेइल पण लक्ष्मी मात्र कोणतीही कुचराई न करता पैसा भरीत असते हा सार्वत्रिक अनुभव आहे. अशाच भाग्यशाली परिवारातुन म न से चे सर्वेसर्वा राज ठाकरे पुढे आलेले आहेत. परम्परागत सत्तेने त्याना दगा दिल्याने त्यांची गिनती पहिल्या प्रकारच्या परिवारात करता येत नसली तरी दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे कायदा व सुव्यवस्था मुठीत ठेवण्याचा वारसा चालाविण्यात पुढे असणारात नक्कीच करता येइल. हा वारसा ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पेक्षाही अधिक सक्षम पणे चालवित आहेत यावर कोणाचेच दुमत असणार नाही.

या देशात एखाद्या सामान्य माणसाच्या हातून कायदेभंग झाला किंवा दुर्लक्षित करण्याजोगा क्षुल्लक गुन्हा घडला तरी पोलिसासाठी त्याच्यावर हुकूमत गाजविन्याची,त्याच्यावर अत्याचार करण्याची पर्वणीच असते. अशा व्यक्तीला ते बिनदिक्कत मध्य रात्री त्याच्या घराचा दरवाजा तोडून ताब्यात घेतात. पण काही व्यक्तींच्या बाबतीत पोलीस कमालीचे असहाय्य असतात. त्यानी कायद्याला व देशाच्या संविधानाला आव्हान दिले तरी पोलीस त्यांच्याशी किती अदबीने आणि नम्रतेने वागतात याची अनेक उदाहरणे देता येतील. आता राज ठाकरे यांचेच उदहारण घ्या. परवानगी शिवाय सभा घेणे किंवा सभा बन्दीचा आदेश मोडून सभा घेणे किंवा सभेत चिथावनीखोर भाषण देवून भावना भडकाविण्याचा प्रकार एका पेक्षा अधिक वेळा राज ठाकरे यानी केला आहे. त्यांच्या अपराधा बद्दल जबाब घेण्या साठी पोलीस त्यांच्या महाला समोर राजसाहेबानी आत बोलाविन्याची वाट बघत ताटकळत उभे राहिल्याचे चित्र वृत्तवाहिन्या वरून सर्वानीच पाहिले आहे.

संविधान आणि कायद्या समोर सर्व समान असले तरी काही जास्त समान आहेत हे फ़क्त पोलीसच समजतात अशी समजूत करून घेण्याचे कारण नाही. संविधानाची प्रतिपालक असलेली न्यायालय सुद्धा कधी कधी हे दाखवून देतात. मुंबई दंगली संदर्भात चौकशी आयोगाचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात राज्य सरकार ने साफ़ दुर्लक्ष केले. खुप दबाव आल्यावर एका प्रकरणात थोरल्या ठाकरे विरुद्ध सरकारने खटला चालविन्याचे अवसान आणले. पण नंतर दस्तुरखुद्द न्यायालयाने कच खाल्ली. घटना घडून गेल्याच्या इतक्या दिवसानंतर आता हा खटला चालविला तर ते जुन्या जखमा वरची खपली काढण्या सारखे होइल व त्यातून सामाजिक सदभावाला तडा जावू शकतो या सबबी खाली उच्च न्यायालयाने खटलाच रद्दबातल केला होता! याच घराण्यातील राजबिन्ड्या राज ठाकरेनी आधी नाशिक मुक्कामी व नंतर मुंबईत पर प्रांतातून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यान्ची जहाल शब्दात निर्भत्सना केली. आपल्या हाती सत्ता आली तर आपण हे लोंढे रोखून दाखवू अशी गर्जना करून भारतीय संविधानाला वाकुल्या दाखविल्या.

भारतीय संविधानाने या देशातील जनतेला देशातील कोणत्याही गावात,शहरात आणि प्रांतात जावून काम करण्याचा आणि राहण्याचा मुलभुत हक्क दिला आहे . पण राज साहेब सध्या महाराष्ट्राचे नंदनवन बनाविण्याचा आराखडा तयार करण्यात व्यस्त आहेत. अर्थातच त्यांच्या कड़े भारताच्या संविधानाचा अभ्यास करण्या साठी वेळ नसणार हे उघड आहे. हा आराखडा तयार करण्या साठी त्यानी अनेक विचारवंताना आणि प्रतिभावंताना दावनीला बांधल्याची चर्चा आहे. यांच्या मदतीने तयार होणाऱ्या महाराष्ट्राच्या नंदनवनात पर प्रान्तीयाना काया प्रवेश असणार नाही ही बाब न सांगताही कळण्या सारखी आहे. म्हणजे त्यांच्या दिमतीला असणाऱ्या विद्वानांची संविधाना प्रति असणारी प्रतिबद्धता व आदर राजसाहेबा सारखाच असणार हे उघड आहे. पण संविधानाचे द्न्यान नसले किंवा संविधाना प्रती आदर नसला तरी या विद्वानांच्या मदतीने परकियांचा(भारतातील) महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबई प्रवेश रोखण्याची योजना बनत असेल तर या समस्याचा त्यानी किमान आर्थिक-सामाजिक अंगाने विचार केला असेल अशी अपेक्षा तरी करता येते का?

मुंबई बॉम्ब स्फोटाचे खापर पर प्रान्तीयांच्या डोक्यावर फोडून राज ठाकरे यानी आपल्याला सामाजिक आर्थिक अंगाने तर्कसंगत विचार करता येत नसल्याचे दाखवून दिले आहे. याचा अर्थ त्यानी महाराष्ट्राचे नंदनवन बनविण्यासाठी जे विद्वान सल्लागार निवडलेत ते कुचकामी आहेत. मुंबईत हा लोंढा का येतो व तो रोखण्यासाठी कायदा हातात न घेता काय उपाय योजना करता येतील त्याचे ज्ञान या विद्वानानाही नाही. तसे असते तर ते राज ठाकरेच्या वक्तव्यातुन प्रकट झाले असते. पर प्रान्तीयांचा मुद्दा हा मुंबई महापालिकेची निवडणुक जिंकण्याची क्लुप्ती नसेल आणि राज याना खरोखरीच यातून मुंबई वर पडणाऱ्या ताणाची, निर्माण होणाऱ्या अव्यवस्थेची, बजबजपुरीची चिंता असेल तर आधी लोंढा मुंबई कड़े का येतो हे समजुन घेतले पाहिजे. त्यानी जवळ केलेल्या विद्वानापेक्षा मुंबई बाहेरच्या अडाणी शेतकऱ्याकडून त्याना हे समजुन घेता येइल.


मुंबई बॉम्ब स्फोटानंतरचे राज ठाकरे यांचे वक्तव्य ऐकून कोणालाही मुंबईत गुन्हेगाराचे लोंढे येत आहेत असेच वाटेल . अवैध रित्या पाकिस्तानातून किंवा बांगला देशातून मुंबईत आलेल्या नागारिकाना त्यानी या स्फोटा बद्दल जबाबदार न धरता सरळ मुंबईत येणारे परप्रान्तीय यासाठी जबाबदार असल्याचे अतिशय बेजबाबदार, द्वेष मूलक व खोडसाळ विधान त्यानी केले आहे. परप्रांतातून येणारे लोक हे शेती शोषनाच्या चरकातुन बाहेर फेकले गेलेले अभागी शेतकरी आहेत हे लक्षात घेतले तर राज ठाकरे यांच्या उदगारातील क्रूरता लक्षात येइल. ज्यानी नेहमी संपत्तीचा गुणाकार होतानाच पाहिला त्या राज ठाकरेना शेतीत फ़क्त वजावाकी व भागाकार होतो याचे ज्ञान नसणे स्वाभाविक आहे . जनगणनेची ताजी आकडेवारी पाहिली तर लक्षात येइल की १२१ कोटी लोक संख्येपैकी आज ही सुमारे ८० कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३० टक्के उत्पन्न शेतीक्षेत्राचे आहे आणि या उत्पन्नावर ७० टक्के लोक जगत आहेत. ७० टक्के उत्पन्न मोठ्या शहरात केन्द्रित आहे आणि त्यातही मुंबईत हे केन्द्रीकरण इतर शहराच्या तुलनेत अधिक आहे. शहरात वाढते उद्योग वाढत्या सेवा या कारणाने रोजगार ही वाढताच राहातो . या उलट ग्रामीण भागात विशेषत: शेती क्षेत्रात दिवसागणिक उत्पन्नाचे साधन गमाविनारे हजारो हात आहेत. कथित मोठया शेतकऱ्याची दूसरी पीढी भूमिहीन बनते ही गरीब व गरीबी वृद्धीची गती आहे. एकुण शेतकरी कुटुम्बा पैकी ७५ टक्के कुटुंब हे अल्प आणि अत्यल्प भुधारक आहेत आणि तोटयातील शेतीने अल्प व अत्यल्प भुधारक आपल्या हयातीतच भुमीहीन होवून दुसऱ्या कामाच्या शोधात त्याची भटकंती सुरु होते. गावात शेती व्यतिरिक्त दूसरा कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने शहराकडे धाव घेण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे दूसरा कोणताही पर्याय नसतो. शहर जितके मोठे व संपन्न तितक्या रोजगाराच्या संधी जास्त .देशातील गरीब अभाग्याचा ओढा मुंबईकड़े असण्यामागे आणि मुंबईत दर रोज लोकांचे लोंढे येण्या मागे हे कारण आहे.

उत्तर प्रदेश व बिहार मधून जास्त संख्येने लोक येत आहेत हे खरे. त्याचे कारण या प्रदेशात इतर प्रांताच्या तुलनेत शेतकरी कुटुम्बाची संख्या जास्त असल्याने शेतीतुन बाहेर फेकले गेलेल्यांची संख्या तेथे जास्त आहे. इतर राज्याच्या तुलनेत या दोन प्रदेशात शहरीकरणाचा वेग कमी आहे. जिथे शहरीकरण अधिक आहे किंवा शहरीकरणाचा वेग जास्त आहे तिथे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत असल्याने तेथील लोक जास्त संख्येने मुंबई सारख्या शहराकडे धाव घेत नाहीत. पण बिहार- उ.प्र.मधील अभागी शेतकऱ्याना तसा पर्याय उपलब्ध नाही. मात्र हे लोंढे सगळे परप्रांतीय आहे ही निव्वळ कोल्हेकुई आहे. महाराष्ट्रातील खेडयापाडयातुन शेतीच्या बाहेर फेकल्या गेलेले असंख्य शेतकरी कामाच्या शोधात मुंबई,पुणे,नाशिक अशा शहराकडे धाव घेत आहेत. महाराष्ट्राचा जप करणारे राज ठाकरे अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत.

शेतीत भरडून निघालेल्या , पिचुन गेलेल्या या लोंढ्यात बॉम्ब स्फोट घडविण्या इतकी ताकद असती तर अगतिक आणि लाचार बनून आपल्या पोरा-बाला पासून शेकडो मैल दूर नरकीय जीवन जगायला मुंबईत नक्कीच आले नसते. आपल्या परिवारापासुन दूर राहणे कोणालाच आवडत नाही. पण शेतीतुन बाहेर फेकल्या गेलेल्या या अभागी जीवाना आपल्या कुटुम्बियाना उपासमारी पासून वाचविन्यासाठी ताटातुट सहन करुन मुंबई सारख्या शहराचा रस्ता पकडावा लागतो. मुंबई शहरात येणारा कोणीही आणि कधीही उपाशी राहात नाही ही मुंबईची ख्याती आणि सामर्थ्य . याचा खरे तर मुंबईकराना अभिमान आणि गौरव वाटायला हवा. याच कारणासाठी मुंबई महाराष्ट्रात आहे याचा प्रत्येक महाराष्ट्रीयाना अभिमान वाटायला हवा. अशी मुंबई घडविण्यात देशातील सर्व भाषिक , सर्व जाती व धर्माच्या लोकांचा हातभार लागला आहे. आपल्या इतकीच मुंबई त्यांची आहे याचा विसर पडला तर राष्ट्राप्रती ती कृतघ्नता ठरेल. अभागी जीवांच्या पाठीवर मायेचा हात फिरविन्या ऐवजी त्याच्या पाठीत डंडूके घालून आत्मह्त्या करण्यासाठी गावाकडे हाकलून देत असेल तर तो समस्त शेतकरी व कष्टकरी जनतेवरिल हल्ला समजुन त्याचा मुकाबला केला पाहिजे.
-----------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव
मोबाइल-९४२२१६८१५८
पांढरकवडा
जि. यवतमाळ

7 comments:

 1. कोणत्याही गुन्हेगाराचा इतिहास हा बहुदा हृदयद्रवकच असतो. त्याच्यावर व्यवस्थेतून किंवा नियतीकडून अन्याय झाला असेल तरीही याचा अर्थ त्याने अवैध मार्ग अवलंबावा हे काही बरे नाही. सर्व "बाहेर फेकल्या गेलेल्यांना" मुंबई आवडते याचे कारण आपले भाबडे आतिथ्य आणि असा आंधळा कळवळा आहे. सगळे गरीब निरपराध आणि सगळे श्रीमंत चोर या फिल्मी मानसिकतेतून आपण आता बाहेर यायला हवे.

  ReplyDelete
 2. namskar jadhav saheb.. apan jesth ahat. apla amhi adar karto, mhanuntumhalach kahi prashn ahet amche tyala kay uttar dyal?

  saglyanach mumbaich ka disavi?

  atithi devo bhav apali sanskruti ahe pan salindar ani saapachi gosht aplyala mahit ahe.. jevha salindar pavsat sapadte tenvha saap tyala nivara deto pan jevha salindarachi thandi nighun jate tenvha te apale pankh phulavate ani saapala apalech ghar sodave lagte.. apal tas jhal tar?

  me swata eka shetakaryacha mulga ahe, tumhi maharashtra baherchya shetakaryancha vichar kartay pan kadhi maharashtratlya shetkaryachi kay avastha ahe, ani jevha rojgarasathi tyachi mule baher padtat ani tith tyana baherche lokanmule kay prblm yetayt tyabaddal kadhi kuna shetkaryachya mulala vicharlay ka?

  jevha he baherche shetkari seniour mhanun bhetatat tenvha he maharashtrachya candidates na kay vagnuk detat yacha kadhi anubhav ghetalay ka apan?

  jenvha he lok punya-mumbait seniour padavarti kaam kartat tenvha he apali lok kashi ith ghusavta yetil te pahilyanda baghtat ani nantar amche 4-4 rounds hotata inerveiwche.. yabaddal aplyala kay mahit ahe?

  atithi devo bhav amchya raktat ahe pan to atithi mhanun ahe toparyantach.. nahitar atithi kab jaoge asa mhanaychi vel alyavar apan kay karal?

  ReplyDelete
 3. You have pointed out truth, a sizable part of the migrants to cities of India are indeed farmers who have lost their livelihood due to ``non-existence'' of policies of the Govt! Let us hope that the politicians realize this and take steps to alleviate this situation.

  ReplyDelete
 4. I entirely agree with your point of view. Frankly there can be no restriction on citizens' movement in their country, otherewise there may be no meaning to the concept that India is one nation! I do agree that there could be problems of such a flow of population, but there are problems with each & every thing we do. There are problems of living in a family, problems of living without a family, problems of being a particular national. The entire existence is problematic, the does not mean that common rights should be & can be denied to individuals.

  ReplyDelete
 5. शेतकरी आहेत म्हणून त्यांनी येथील संस्कृती उध्वस्त केली आणि समाजाला त्रास दिला तरी सहन करायचा का ?

  ReplyDelete
 6. mumbai madhe nai jau dila tar dusrikade jatil lok...

  pan problem sampat nahi na... sheti vachli tar shetkari sheti sodun aj jya sankhyene shaharankade jat ahet tya sankhyene janar nahit. sheti jar faydyachi keli tar prashnach sut-toy sagla.

  pan mag parat shetimalache bhav 5-10 rupayanni vadhle tar pahilyanda shahari lokach oradtat.. tyanna shant keraycha tar sheti totyat thevavi lagte..

  ReplyDelete
 7. tumhala Mumbaiche problems mahiti ahet ka ho? nasavet bahutek...mhaonoon he sagle lihilet...very one-sided and biased article against Raj

  ReplyDelete