Wednesday, August 10, 2011

अण्णा , उपोषण कराच ! पण ...


"अण्णा हजारे यांच्या सिविल सोसायटीची अवस्था ' नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा' अशी झाली आहे. सिविल सोसायटीचे रूपान्तर हेट (द्वेष फैलावणारी) सोसायटीत झाले आहे. या हेट सोसायटीचे आज गांधीवादी अण्णा नेते बनले आहेत.स्वातंत्र्य आंदोलनात झाली होती तशी चौरीचारा सारखी स्फोटक परिस्थिती या आन्दोलनातुन निर्माण होत आहे. अण्णा खरेच गांधीवादी असतील तर गांधीनी चौरीचौराचा भड़का आवरण्यासाठी आन्दोलन मागे घेण्याचे जे धाडस केले होते तसे धाडस त्यानी आज दाखविले पाहिजे. लोकपाल साठी नव्हे तर परिस्थिती हाताबाहेर जावू नये याची काळजी घेण्यासाठी अण्णानी उपोषण करण्याची गरज आहे."





अण्णा , उपोषण कराच ! पण ...




आदरणीय अण्णा ,
तुमच्या एप्रिल महिन्यातील गाजलेल्या उपोषणाच्या वेळी मी तुम्हाला एक खुले पत्र लिहिले होते. त्या पत्रात ठाम पणे 'जन लोकपाल बिला'चा विरोध केला होता आणि उपोषनाने भारलेल्या वातावरणात त्या बिलाला देशभरातुन झालेला तो पहिला विरोध होता. पण त्या बिलाचा विरोध करीत असतानाच तुमच्या उपोषणाने व आन्दोलनाने देशाला जडलेल्या भ्रष्टाचाराच्या महारोगा विरुद्ध लढ़ण्याची "तुम्ही प्राणाची बाजी लावून निर्माण केलेली अन्धुकशी आशा ही भारतासाठी या दशकातील सर्वात मोठी संस्मरनीय घटना आहे.देशवासियांच्या डोळ्यात निर्माण झालेल्या किंचितशा चमकेचे चिन्गारीत रूपान्तर करण्याची आज खरी गरज आहे." असे प्रतिपादन केले होते. असंतोषाचे चिन्गारीत रूपान्तर करण्यासाठी तुम्ही उपोषण करीत बसण्या ऐवजी जनतेत असायला हवेत अशी भावना व्यक्त केली होती. पण नंतरच्या घटनाक्रमानी व निर्माण झालेल्या वातावरनाने माझा जन लोकपाल बिलाचा विरोध तर दृढ़ झालाच पण निर्माण झालेली आशा चिंता आणि निराशेत परिवर्तीत झाली , हे मला तुमच्या घोषित दुसऱ्या उपोषनाच्या आधी हे दुसरे खुले पत्र लिहिताना सांगावेसे वाटते. संवैधानिक पदावर बसलेला साधा केन्द्रीय हिशेब तपासनीस आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओलांडून पंतप्रधान कार्यालयाच्या धोरणात्मक निर्णयात नाक खुपसून पंतप्रधानाकडे बोट दाखविण्याचा आगाऊपणा करून पंतप्रधानाची खुर्ची अस्थिर करू शकतो या घटनेने खरे तर सर्वांचे डोळे उघडायला पाहिजे होते . अमर्याद अधिकाराचा लोकपाल ही कल्पनाच निकालात निघायला पाहिजे होती. पण सध्या देशाने विवेक आणि शहाणपण यापासून फारकत घेतली असल्याने लोकपाल साठीचा चिंताजनक थयथयाट सुरूच आहे . तुम्हीही ही बाब लक्षात न घेता तुम्ही उपोषनास बसणार असल्याने चिंतेत भर पडली आहे.

एप्रिल मध्ये लिहिलेल्या पहिल्या पत्रात मी लोकपाल संदर्भात लिहिले होते की, या देशात बोकाळलेला भ्रष्टाचार एखादा कठोर कायदा करून संपणारा नाही.कितीही परिपूर्ण कायदा केला तरी त्या कायद्या सोबत पळवाट असतेच.विद्न्यान आणि तंत्रद्न्यान क्षेत्रातील संशोधनात आम्ही कितीही मागे असलो तरी कायद्यात पळवाटा शोधण्यात आणि निर्माण करण्यात आमचा हातखंडा आहे. आपल्याच प्रयत्नातून निर्माण झालेल्या क्रांतीकारी माहिती अधिकाराच्या कायद्याच्या बाबतीत नोकरशाहीचा काय दृष्टीकोण आहे आणि त्या कायद्याची अमलबजावणी करण्यात किती कुचराई नोकरशाही करते हे जगजाहीर आहे.जन लोकपाल पूर्णत: नोकरशाहीवर अवलंबून असल्याने त्यातून काय साध्य होइल हे एखादा कुडमुडया ज्योतीषीही सांगू शकेल.सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की अशा निरर्थक कायद्यासाठी तुम्ही आमच्या साठी बहुमोल असलेले तुमचे प्राण अजिबात पणाला लावू नयेत असे माझे तेव्हाचे म्हनने होते. आजही मी त्यावर ठाम आहे आणि तरीही आपणास उपोषण करण्याचे आवाहन करीत आहे . उपोषणा साठीचा माझा आग्रह अर्थातच तुमचे जन लोकपाल बिल संसदेने मंजूर करावे म्हणून नसणार हे ओघाने आलेच! लोकपाल संदर्भातील माझे मत आपण बाजुला ठेवू. तसाही या विषयावरचा कोणताही विवेकी आवाज तुम्हाला आणि तुमच्या समर्थकाना ऐकुच येत नाही आहे. पण असे गृहीत धरले की लोकपाल शिवाय पर्याय आणि तरणोपाय नाही तरी देखील यासाठी उपोषण करण्याची कोणतीच निकड आणि गरज नाही कारण लोकपालला असो की नसों पण उपोषणाला भक्कम पर्याय आहेत आणि उपोषणा साठी तुम्ही पुढे करीत असलेली कारणे तर तद्दन तकलादू आहेत!

उपोषणाची तकलादू कारणे

सरकारचे विधेयक चार लोकानी बनविलेले विधेयक आहे आणि तुमचे मात्र जनतेचे विधेयक असल्याने तेच संसदेत मांडले गेले पाहिजेत हा तुमचा आग्रह आहे. एप्रिल महिन्यात ज्या जन लोकपाल बिलासाठी तुम्ही उपोषण केले होते ते बील किती लोकानी मिळून तयार केले होते हे आम्हाला सांगाल. तुम्ही आणि तुमच्या चौकडीनेच ते विधेयक तयार केले होते ऩा? ते विधेयक तयार करताना किती आणि कोणत्या लोकांना विश्वासात घेतले होते हे तुमच्याच तोंडून एकदा लोकांना ऐकवाना! ज्या देशात १ टक्क्या पेक्षाही फारच कमी लोक गंभीर आणि वैचारिक कारणासाठी इंटरनेट वापरतात त्या इन्टरनेट वर विधेयक टाकुन सूचना मागविल्या म्हणजे ते जनतेचे विधेयक होते हा दावा किती हास्यास्पद आहे हे लक्षात घ्यायचे ठरविले तर तुमच्याही लक्षात येइल. सरकारशी तुम्ही ज्या विधेयकावर चर्चा सुरु केली होती ते लोक सुचनांचा समावेशही नसलेल्या तुमच्या नेतृत्वा खालील चौकड़ीने बनविलेल्या विधेयकावर होती हे पुराव्यानिशी सिद्ध करता येण्या सारखे असल्याने तुम्ही नाकारू शकत नाही. सरकारशी महीना-दोन महीने चाललेली चर्चा फिसकटल्या नंतर तुम्ही दिल्लीहून पुणे येथे आल्यावर काय घोषणा केली होती ते आठवते? तुम्ही जाहीर पणे सांगितले होते की आम्ही सर्व भाषा मधे जन लोकपाल विधेयकाच्या लाखो प्रती छापून या विधेयकाची माहिती लोकांना करून देणार आहोत! सरकार प्रतिनिधीनी परस्पर तुमचे म्हनने मान्य केले असते तर लोका पर्यंत तुम्ही घोषित केलेल्या पद्धतीने विधेयक घेवुन जाण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नसता ! घोषित केल्या प्रमाणे सर्व भाषेत विधेयकाच्या लाखो प्रती छापून वाटल्या की नाहीत हे मला माहीत नाही. कारण तालुक्याचे ठिकान असलेल्या माझ्या गावी त्या प्रती अद्यापही पोचल्या नाहीत.ही झालेली चुक झाकन्यासाठी आणि लोक आपल्याच विधेयकाच्या पाठीशी आहेत हे दाखविण्यासाठी दिल्लीतील एका लोकसभा मतदार संघात लोकांचा कौल घेण्यात आला! हा कौल विधी संमत नसला तरी त्यावर किंवा तुम्ही घोषित केलेल्या आकड्यावर मला येथे चर्चा करायची नाही. ते सगळ खरे मानले तरी ते वराती मागुन घोड़े दामटण्या सारखेच आहे. सरकारचे विधेयक जसे चार लोकानी तयार केले तसेच तुमचे विधेयकही चार लोकानीच तयार केले होते हे सत्य यातून झाकल्या जात नाही. म्हणजे या कारणा वरुन उपोषण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुमच्याकड़े नाही.

तुमचे जन लोकपाल बील संसदे पुढे ठेवण्यात आले नाही हे तुमच्या उपोषनाचे मुख्य कारण. संसदे पुढे ते अदभुत आणि अभूतपूर्व बील यावे अशी तुमची इच्छा असताना ते केन्द्रीय मंत्रीमंडळा समोर देखील न ठेवल्या गेल्याने तुम्हाला राग येणे अगदी स्वाभाविक आहे. मंत्री गटाने किंवा सरकारच्या सम्बंधित विभागाने तयार केलेले लोकपाल बील आणि अन्ना हजारे यानी तयार केलेले जन लोकपाल बील अशी नोट लिहून दोन बिले केन्द्रीय मंत्रीमंडळा समोर ठेवण्यात आली नाहीत हे अगदी खरे आहे. पण एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा निर्णयाच्या मसुद्या सोबत त्या संबंधीचा आढावा घेणारी विस्तृत नोट सोबत असते. लोकपाल बिला संबंधी निर्णय घेताना तशी नोट मंत्रीमंडळा समोर होती व त्यात जन लोकपाल बिलातील तरतुदींचा उहापोह करण्यात आला होता हे सर्व सामान्याना नसले तरी तुम्हाला चांगलेच माहीत आहे. फ़क्त त्या निर्णयात श्री अन्ना हजारे यांचे जन लोकपाल जशाचे तसे स्विकारन्यास केन्द्रीय मंत्रीमंडळाने नकार दिला अशी ऐतिहासिक नोंद झाली नाही इतकेच. तांत्रिक दृष्ट्या तुमचे जन लोकपाल बील मंत्रीमंडळाने विचारात घेतले नाही हा आक्षेप मान्य केला तरी आता त्या साठी उपोषण करून काहीच उपयोग नाही हे तुम्हीही जाणता. म्हणजे उपोषणा साठी तुम्ही पुढे केलेले हे कारणही बाद होते !
आता आपण तुमच्या दुसऱ्या कारणा कड़े वळू. संसदे समोर जन लोकपाल बील विचारार्थ यावे या साठी उपोषण करण्याचा तुमचा इरादा आहे. पण त्यासाठी सुद्धा उपोषण करण्याची गरज नाही. संसदेत सादर करण्यात आलेले कोणतेही विधेयक आधी संसदेच्या स्थायी समितीकड़े जाते आणि तिथून दुरुस्त होवून आणखी दुरुस्त्या साठी व चर्चे साठी ते संसदेकड़े येते. तांत्रिक अर्थाने नव्हे पण खऱ्या अर्थाने संसदे पुढे जे बील मंजूरी साठी येते ते स्थायी समितीत त्यावर सोपस्कार आणि संस्कार होत असल्याने ते स्थायी समितीचे बील असते. सरकारला संसदेच्या मंजूरी व परवानगी शिवाय कधीच आपले विधेयक घेवुन सरळ स्थायी समितीकडे जाता येत नाही. पण आपल्या राज्यघटनेने संसदेच्या परवानगी शिवाय कोणत्याही नागरिकाला स्थायी समितीत जावून किंवा लिहुन विधेयकावर मत मांडण्याचे , दुरुस्त्या सुचविन्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हा घटनात्मक मार्ग तुमच्या कड़े उपलब्ध आहे. वास्तविक त्यासाठी स्थायी समितीच्या जाहिरातीची सामान्याना वाट पाहावी लागते आणि दिलेल्या वेळात सूचना सादर कराव्या लागतात. पण तुम्ही काही सामान्य असामी नाहीत. म्हनुनच तुम्हाला स्थायी समितीने नेहमीची प्रक्रिया बाजुला सारून तुम्हाला मागितल्या बरोबर पटकन वेळ दिला आहे. तिथे काही फ़क्त सरकारी पक्षावाले नसल्याने तुम्हाला तुमचे म्हनने मांडण्याची व पटविण्याची पुरेपुर संधी आहे.
संसदेच्या स्थायी समितीत सुद्धा तुमच्या मनासारखे घडले नाही तर आणखी एक हमख़ास मार्ग तुमच्या कड़े उपलब्ध आहे . डावे आणि उजवे पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.दोन ध्रुवावर असलेले हे पक्ष जेव्हा एखाद्या मुद्द्यावर एकत्र येतात तेव्हा तो मुद्दा चुकीचा असलाच पाहिजे हा 'थम्ब रुल' असला ('थम्ब रुल'काय असतो हे अरविंद तुमच्या कानात सांगेलच) तरी सध्या तो मुद्दा बाजुला ठेवू. इथे सांगायचा मुद्दा हा आहे की,संसदेत त्यांच्या खासदारांची संख्याही लक्षनीय आहे. तेव्हा त्यांच्या पैकी कोणीही एक खासदार 'सरकारी लोकपाल बिला ऐवजी जन लोकपाल बील संसद मंजूर करीत आहे ' अशी दुरुस्ती सुचवून त्यावर चर्चा घडवून आणू शकतात! इंदिरा गांधी घराण्यातले वरुण गांधी सारखे खासदार उपोषणासाठी तुम्हाला त्यांचा बंगला देवू शकतात तर आयते तयार विधेयक संसदेत मांडायलाही अनेक खासदार तयार होतील. तात्पर्य , जन लोकपाल बील संसदेत मांडण्यासाठी अनेक वैधानिक मार्ग उपलब्ध आहेत. त्या साठी उपोषण करण्याचा टोकाचा मार्ग अवलंबिन्याची गरजच नाही हे कोणत्याही विवेकी माणसाला पटेल! उपोषणाच्या माध्यमातून जन उन्माद निर्माण करून समाज , संसद आणि लोकनियुक्त सरकारला वेठीस धरून आपलेच म्हनने खरे करून दाखवायचे नसेल तर ते तुम्हालाही पटेल. या ऊपर ही जन लोकपाल विधेयकासाठी तुम्ही उपोषण केलेच तर तो दुराग्रह ठरेल. मात्र दुसऱ्या असाधारण महत्वाच्या कारणासाठी तुम्ही उपोषण केलेच पाहिजे . तुम्ही गांधीवादी असल्याने मी देत असलेले कारण तुम्हाला नक्कीच भावेल .


गांधींच्या घोड़चुकीची पुनरावृत्ती


गांधी विचाराच्या चळवळीत मी वाढलो असलो तरी तिथे गांधीवादी म्हणून तुमचा कधी उल्लेख झाल्याचे आठवत नाही. पण तुम्ही गांधीवादी आहात हे प्रसिद्धी माध्यमानी सर्वाच्या मनावर पक्के बिम्बविले आहे. अगदी बाहेरच्या देशाची बी बी सी सारखी माध्यमेही हेच सांगतात व मानतात. तेव्हा आता तुमची गांधीवादा पासून सुटका नाही एवढे नक्की. उपोषण करणे हे महत्वाचे साम्य तुमच्यात आणि गांधीत आहे.महात्मा गांधीनी आपल्या ३५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात तब्बल १७ वेळा जाहीर उपवास केलेत. तुमच्या १०-१५ वर्षाच्या आता पर्यंतच्या सार्वजनिक जीवनात तुम्हीही ६-७ वेळा उपोषण केले. म्हणजे उपोषणाचे प्रमाणही सारखेच! पण हे साम्य इथेच संपते. महात्मा गांधीनी एक अपवाद वगळता कोणतेही उपोषण सरकार विरुद्ध किंवा मागण्या पूर्ण करून घेण्या साठी केले नव्हते. तुमच्या सारखे कोणावर राग म्हणून किंवा कोणाला शिक्षा देण्या साठी तर कधीच त्यानी उपोषण केले नाही. समाजातील भेदभाव , दुही आणि कुप्रथा मिटविन्या साठी व जातीय आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्या साठी आत्मक्लेश म्हणून गांधींची उपोषणे झालीत. उपोषणाच्या माध्यमातून मागणी पूर्ण करून घेण्याचा अट्टाहास गांधीनी एकदाच केला होता. इन्ग्रजानी दलितासाठी वेगळ्या मतदार संघाची केलेली निर्मिती रद्द करण्या साठी येरवडा तुरुंगात त्यानी आमरण उपोषण केले होते. त्यात त्यांचा हेतु वाईट होता असेही म्हणता येणार नाही. पण डॉ.बाबासाहेब आम्बेडकराना गांधींचे प्राण वाचविन्यासाठी दलित समाजाच्या इच्छे विरुद्ध झुकावे लागले होते. उपोषणामागे गांधींचा हेतु अस्पृश्यता निर्मुलानाचा असला तरी गांधींच्या या कृतीने दलितान्मध्ये आपले राजकीय हक्क जातीयवादी हिन्दू लांडग्याच्या भरवशावर सोडावे लागल्याची स्वाभाविक भावना आणि खंत निर्माण झाली. बहुधा गान्धीजीना देखील आपल्या हातून घडलेल्या चुकीची तात्काल जाणीव झाली असावी. कारण या बहुचर्चित उपोषणा नंतर लगेच ८ दिवसानी गान्धीजीनी हिन्दू समाजा कडून दलितांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध २१ दिवसाचे उपोषण केले होते. पण हे प्रायश्चितही कामी आले नाही. गांधींच्या या उपोषनाने दलित समाज कायमचा गांधी पासून दूर गेला. एखादी राजकीय ,सामाजिक मागणी उपोषनाचे हत्यार वापरून किंवा उपोषनालाच हत्यार बनवून पूर्ण केली तर त्याचे किती दूरगामी वाईट परिणाम होवू शकतात हे या प्रकरणातुन सिद्ध झाले आहे. गांधींची बाकीची १६ आदर्शवत उपोषणे सोडून ज्या उपोषणाकड़े घोड़चुक म्हणून बघितल्या जाते तेच उपोषण तुमच्या (अण्णा हजारे) साठी आदर्शवत असल्याचे आज वरच्या तुमच्या उपोषनाच्या हडेलहप्पी वरून सिद्ध झाले आहे.


उपोषणाची गरज !

अण्णा, या उपोषणा पासून धडा घेण्याची तुम्हाला गरज आहे तशीच आन्दोलना संदर्भात गांधीनी कायम पाळलेल्या पथ्याकड़े विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आंदोलनातुन प्रतिस्पर्ध्या बद्दल तर सोडाच पण शोषक आणि लुटारू असलेल्या इंग्रजा विरुद्ध देखील विद्वेशाचे वातावरण निर्माण होणार नाही याची सातत्याने गांधीनी काळजी घेतली होती. आन्दोलन चुकीच्या दिशेने जात आहे , विद्वेष निर्माण करीत आहे असे दिसताच भरावर व जोरावर असलेले आन्दोलन कार्यकर्त्याना काय वाटेल याची पर्वा न करता गांधीनी एका पेक्षा अधिक वेळा मागे घेतले आहे. चौरीचौरा हे त्याचे ठळक व आदर्श उदाहरण आहे. तुमच्या आंदोलानातुन देशातील राजकीय व्यवस्थे बद्दल कमालीचे जहरी वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय व्यक्ती म्हणजे चोरच असली पाहिजे अशी चुकीची समजूत या आन्दोलनाने करून घेतली आहे आणि करून देत आहे. लोकशाही म्हणजे चरण्याचे कुरण, संसद म्हणजे चोर लुटारुन्चा अड्डा आणि सरकार म्हणजे पेंढारी अशी विक्षिप्त आणि सनकीपणाची भावना या आन्दोलनाने निर्माण केली आहे. स्वत:ला विचारवंत व शहाने समजणारे लोक असे सनकी वागन्या-बोलण्यात धन्यता मानु लागलेत यावरून परिस्थिती किती स्फोटक बनत आहे हे लक्षात येइल . असे काही वातावरण बनले आहे की कोणीही यावे आणि सरकारच्या डोक्यात टपली मारून जावे , संसदेला वाकुल्या दाखवाव्यात. अशी परिस्थिती निर्माण होण्यात सरकार आणि संसदेचा वाटा सिंहाचा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, पण त्याना वठणीवर आनन्याच्या नावाखाली अण्णा हजारे आणि त्यांचे समर्थक गरळ ओतून जो उत्पात निर्माण करीत आहेत त्यातून परिस्थिती सुधारण्या ऐवजी बिघडत चालली आहे.अण्णा, तुमच्या सिविल सोसायटीची अवस्था ' नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा' अशी झाली आहे. सिविल सोसायटी चे रूपान्तर हेट(द्वेष फैलावणारी) सोसायटीत झाले आहे. या हेट सोसायटीचे आज गांधीवादी अण्णा नेते बनले आहेत.स्वातंत्र्य आंदोलनात झाली होती तशी चौरीचारा सारखी स्फोटक परिस्थिती या आन्दोलनातुन निर्माण होत आहे. अण्णा तुम्ही खरेच गांधीवादी असाल तर गांधीनी चौरीचौराचा भड़का आवरण्यासाठी आन्दोलन मागे घेण्याचे जे धाडस केले होते तसे धाडस आज दाखविले पाहिजे. लोकपाल साठी नव्हे तर परिस्थिती हाताबाहेर जावू नये याची काळजी घेण्यासाठी अण्णानी उपोषण करण्याची गरज आहे. आज गरज लोकपाल साठी उपोषण करण्याची नाही. अण्णा, तुम्ही उपोषण केले पाहिजे ते स्वत:चे चीत्त शांत करण्यासाठी आणि अनुयायांचे डोके ठिकाणावर आनन्यासाठी ! या उदात्त हेतूने उपोषण केले तर शांत चित्ताने तुम्हाला भ्रष्टाचार निर्मुलनाची लढाई पुढे कशी नेता येइल याचा विचार करायला उसंत मिळेल . भ्रष्टाचाराचा प्रश्न हा व्यक्तीशी निगडित नसून व्यवस्थेशी निगडित असल्याचे लक्षात यायला वेळ लागणार नाही. आजचे व्यक्ती केन्द्रित आन्दोलन व्यवस्था केन्द्रित झाले की भ्रष्टाचारासह अनेक रोगा पासून समाज व देश मुक्त होइल. (समाप्त)

सुधाकर जाधव
मोबाइल- ९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ

3 comments:

  1. लोकशाही म्हणजे चरण्याचे कुरण, संसद म्हणजे चोर लुटारुन्चा अड्डा आणि सरकार म्हणजे पेंढारी अशी विक्षिप्त आणि सनकीपणाची भावना जर जनतेमध्ये निर्माण होत असेल तर त्याला जबाबदार स्वत: ही राजकीय मंडळी आणि त्यांचा स्वैराचार हेच आहे असे मला वाटते.

    ---------------------------------------------
    पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
    http://www.baliraja.com

    ReplyDelete
  2. MALA KALAT NAHI TUMHI AANANA ANDOLAN MAGE GHENYASATHI KA LKIHITA, HOUN JAU DYA EKADACHI CIVIL WAR. NANTARACH HYA SARKAR CHE DOKE THIKANYAVAR YENAR AAHE.
    AANI CHOURICHURA CHE ANDOLAN MAGE GHUN FAYADA HA ENGLAND CHA ZALA HOTA. AAPALE SWATANTRA SAINIKANCHA NAHI. TYANA SHALA, COLLEGE MADHE ADMISSION NHAVATE. HE VISARU NAYE.

    ReplyDelete