------------------------------------------------------------------------------------------------
कॉंग्रेस आणि भाजप बद्दल मतदारांनी जेवढी कठोर भूमिका घेतली त्या पेक्षा जास्त निर्दयी भूमिका टीम अण्णा आणि त्यांच्या आंदोलना बद्दल घेतली. कॉंग्रेस आणि भाजपच्या कामगिरीचा विचार करून त्यांचा निवाडा मतदारांनी केला पण देशातील यच्चावत जनतेचे स्वयंघोषित प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या या चमूकडे लक्ष देण्याची गरज सुद्धा मतदारांना वाटली नाही. दुधात पडलेली माशी काढून फेकावी त्या पद्धतीने मतदारांनी टीम अण्णाला या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकून दिले होते.
-----------------------------------------------------------------------------------------------
सर्व राजकीय पक्ष , राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक तसेच प्रसार माध्यमे यांचे लक्ष लागून असलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले आहेत. निकालावर धुमधडाक्यात चर्चा सुरु आहे. मतदारांनी जेवढे चातुर्य आणि परिपक्वता दाखविली आहे त्याच्या विपरीत या मंडळीच्या चर्चेत भोंगळपण,ठोकळेबाज ठोकताळे आणि त्या हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी प्रमाणे आपल्याला हाताला लागणारा भाग म्हणजे संपुर्ण हत्ती अशा प्रकाराचा भ्रम व्याप्त असल्याने सगळी चर्चा आणि विश्लेषण भ्रमनिरास करणारे आहे. या चर्चेतून जे ठोकताळे मांडण्यात येत आहेत त्यानुसार हा कौल कॉंग्रेस विरोधी आहे. गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या कॉंग्रेस विरोधी लाटेचा या निवडणुकीवर कितपत परिणाम झाला हे सांगणे कठीण असले तरी निवडणूक विश्लेषकावर मात्र त्या लाटेचा प्रभाव आहे असे अनुमान काढता येते. हे निवडणूक निकाल कॉंग्रेस च्या आशा आणि अपेक्षांवर पाणी फिरविणारे असले तरी गणिती पद्धतीने विचार केला तर पूर्वीच्या तुलनेत कॉंग्रेसचे नुकसान झाले ही वास्तविकता नाही. कॉंग्रेस शासित गोवा राज्य भाजप कडे गेले असले तरी भाजप शासित उत्तराखंडात कॉंग्रेसचे सरकार येणार हे उघड आहे. कारण निवडून आलेले अपक्ष हे कॉंग्रेसचे बंडखोर आहेत. आणि तसेही अपक्ष जो आधी सरकार बनविणार त्याचा बाजूचे असतात. भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसचे संख्याबळ एक ने अधिक असल्याने राज्यपालावर सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेसला आमंत्रित करण्याचे घटनात्मक बंधन आहे. भाजप आणि बीएसपी मिळूनही बहुमत होत नसल्याने भाजपने सरकार बनविण्याचे कितीही दावे आणि प्रयत्न केले तरी उत्तराखंडात त्यांचे सरकार पुन्हा बनणे अशक्य आहे. तेथे राष्ट्रपती राजवट येवू शकेल पण बीजेपी चे सरकार नाही! पंजाबात कॉंग्रेस पक्षाला स्वत:च्या स्थितीत सुधारणा करण्याची संधी असूनही सुधारणा करता आली नाही हे खरे असले तरी गेल्या निवडणुकीतील जनाधारात व जागांमध्ये घट झाली असेही नाही. मणीपुरात तर हा पक्ष अधिक शक्तिशाली बनला आहे. या निवडणुकी पूर्वी या पाच राज्याच्या विधानसभेत जेवढ्या जागा या पक्षाच्या नावावर होत्या त्यात नगण्य का होईना भरच पडली आहे. कॉंग्रेसचा पर्याय म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या भाजपची अवस्था कॉंग्रेस पेक्षाही वाईट झाली आहे इकडे विश्लेषकांचे होत असलेले दुर्लक्ष हा देखील प्रसार माध्यमातील कॉंग्रेस विरोधी लाटेचा परिणाम मानता येईल. कॉंग्रेस आणि भाजप यांच्या या निवडणुकीतील कामगिरीची तुलना केली तर गोवा वगळता बाकी चार राज्यात कॉंग्रेस च्या स्थितीत नगण्य सुधारणा झाली तर भाजपच्या कामगिरीत घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशा सारख्या महत्वाच्या राज्यात कॉंग्रेसच्या जागात नगण्य वाढ झाली असली तरी मताच्या टक्केवारीत ४ टक्क्याची वाढ झाली आहे. उलट भाजपच्या जागा ही घटल्या आणि मताच्या टक्केवारीतही घट झाली. बादल यांच्या शिरोमणी अकाली दला बरोबर भाजप पुन्हा पंजाबात सत्तेवर येणार असला तरी पंजाबातही भाजपच्या जागेत आणि मतातही घट झाली आहे. उत्तराखंड सारखे राज्य तर हातातून निसटले आहेच. म्हणूनच तटस्थपणे व काटेकोरपणे या निवडणूक निकालाचा निष्कर्ष मोजक्या शब्दात मांडायचा झाला तर मतदारांनी कॉंग्रेस बद्दलची निराशा आणि भाजप कडून कोणतीही आशा नसल्याचे मतदानातून सुस्पष्टपणे दाखवून दिले आहे. मतदारांनी आणखी एक महत्वाचा संदेश या मतदानातून दिला आहे. देशातील मतदारांना गृहीत धरण्याची चूक कोणी करू नये. अर्थात हा इशारा अण्णा आंदोलन आणि अण्णा टीम ला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेस आणि भाजप बद्दल मतदारांनी जेवढी कठोर भूमिका घेतली त्या पेक्षा जास्त निर्दयी भूमिका टीम अण्णा आणि त्यांच्या आंदोलना बद्दल घेतली. कॉंग्रेस आणि भाजपच्या कामगिरीचा विचार करून त्यांचा निवाडा मतदारांनी केला पण देशातील यच्चावत जनतेचे स्वयंघोषित प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या या चमूकडे लक्ष देण्याची गरज सुद्धा मतदारांना वाटली नाही. दुधात पडलेली माशी काढून फेकावी त्या पद्धतीने मतदारांनी टीम अण्णाला या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकून दिले होते. माध्यमांच्या कृपेने घरा -घरात नव्हे तर जगभरात ज्या आंदोलनाच्या प्रभावाची चर्चा होती त्याचा या निवडणुकीत अजिबात प्रभाव नव्हता. मतदारांनी या निवडणुकीत अण्णा आंदोलनाला पूर्णपणे अदखलपात्र ठरविले हा या निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक निष्कर्ष आहे. पण विश्लेषक व माध्यमे या मुद्द्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. माध्यमांनी उभ्या केलेल्या भूताला मतदारांनी मानगुटीवर बसू न देता त्याच्याकडे पाठ फिरविली हा खरे तर माध्यमे आणि माध्यमाचार्यांचा पराभव आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांच्या पेक्षाही हा केविलवाणा पराभव आहे. या पराभवाची चर्चा करायला माध्यमांना लाज वाटत असेल तर आश्चर्य वाटायला नको. सर्व सामान्य मतदार उन्मादात वाहून न जाता विवेकाने मतदान करतो हे या निवडणूक निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
शहामृगी प्रतिक्रिया
आपल्या अस्तित्वावर संकट येत असल्याची चाहूल लागताच शहामृग त्या संकटाचा मुकाबला करण्या ऐवजी वाळूत तोंड खुपसून बसतो. त्यामुळे संकट टळेल अशी त्याची गोड गैर समजूत असते. पाच राज्याच्या निवडणूक निकालाने कॉंग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आणि अण्णा आंदोलन यांचे अस्तित्व संकटात किंवा संदर्भहीन असल्याचे या निवडणूक निकालांनी दाखवून दिले. पण त्याचा तर्कसंगत व तथ्यसंगत विचार आणि विश्लेषण न करता या तिन्ही गोटातून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया शहामृगी थाटाच्या आहेत. मतदारांनी आपल्याला झिडकारले हे तथ्य स्वीकारून त्याची कारण मीमांसा करण्या ऐवजी 'मला नाही त्याला' असे एकमेकाकडे बोट दाखवून म्हणत आहे. निवडणुकीत संदर्भहीन ठरलेल्या अण्णा आंदोलनाची प्रतिक्रिया हस्यास्पद आणि म्हणून मजेशीर आहे. कॉंग्रेसने जन लोकपाल बिलाला विरोध केला म्हणून त्या पक्षाचा या निवडणुकीत लोकांनी पराभव केला अशी छापील प्रतिक्रिया अण्णा मंडळी व्यक्त करीत आहे. जन लोकपालचा लोकसभेत छातीठोकपणे विरोध करणाऱ्या मुलायमसिंह यांना मतदारांनी का डोक्यावर घेतले याचे उत्तर ही मंडळी देणार नाहीत. शिवाय जन लोकपाल बिलाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेणारा आणि अण्णा हजारे यांनी कितीही लाथा मारल्या तरी बेशरमपणे त्यांचे समर्थन करणाऱ्या भाजप चा पराभव का झाला याचेही उतर या मंडळीनी दिले पाहिजे. एवढेच नाही तर ज्या उत्तराखंडच्या लोकायुक्त कायद्याचे आदर्श कायदा म्हणून कौतुक आणि प्रचार करण्यात टीम अण्णाने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही त्या उत्तराखंडात भाजप पेक्षा कॉंग्रेसला अधिक मते आणि जागा देवून तो कायदा मतदारांनी अव्हेरला असा निष्कर्ष अधिक तर्क संगत ठरतो. निवडणूक आणि अण्णा हजारेंचा आशिर्वाद डोळ्या पुढे ठेवून तुलनेने स्वच्छ प्रतिमेच्या खंडुरी यांना भाजप ने मुख्यमंत्री बनवून त्यांच्या करवी हा कथित आदर्श कायदा आणण्यात आला त्या मुख्यमंत्री खंडुरीनाच मतदारांनी चारी मुंड्या चीत केले याचा अर्थ अण्णा मंडळीनी समजून घेण्याची गरज आहे. ज्यांना मागच्या दाराने सत्ता उपभोगायची लालसा आहे त्यांना लोकपाल सारख्या मुद्द्याचे महत्व आहे.पण जनतेचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते प्रश्न लोकपाल सारखा नोकरशाह नाही तर आपण निवडून दिलेला प्रतिनिधीच सोडवू शकेल हा त्यांचा विश्वास कायम आहे हेच या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आज निवडून दिलेला प्रतिनिधी बेजबाबदार वागला तर त्याच्या वरचा उपाय त्याला बदलने हा आहे त्याच्या डोक्यावर लोकपाल आणून बसविणे नाही हा धडा मतदारांनी अण्णा टीमला दिला आहे. पण सर्व सामान्य मतदाराकडून ते धडे घेवू लागले तर मग त्यांना सिव्हील कसे म्हणायचे ! भाजप ची प्रतिक्रिया देखील अशीच आहे. आपल्याला मतदारांनी नाकारले याचा विषाद न बाळगता हा पक्ष कॉंग्रेसचे कसे नाक कापले गेले म्हणून आनंदोत्सव साजरा करू लागला आहे. गेल्या वर्षभरात कॉंग्रेसचे बुडत्याचे पाय खोलात म्हणतात तसे खोल खोल चालले असताना त्याची जागा घेण्याचा गंभीर प्रयत्न करण्या ऐवजी तो बुडाला कि आपल्या शिवाय कोण या भ्रमात नाच गाण्यात हा पक्ष रमला आहे. पण मतदारांनी स्पष्टपणे बजावले आहे कि कॉंग्रेस नाही म्हणजे बीजेपी आपोआप सत्तेत येईल ही समजूत चुकीची आहे. पण गडकरींचा खोटा खोटा आनंदोत्सव पाहिला कि हा पक्ष पर्याय म्हणून उभा राहण्या बाबत गंभीर आहे असे दिसत नाही. या निवडणूक निकालाने मतदारांनी कॉंग्रेस पुढे उभे केलेले प्रश्न अधिक अवघड आणि नाजूक आहेत. सव्वाशे वर्षाची परंपरा सांगणाऱ्या या पक्षाचा नेतृत्वा बाबतचा भ्रम मतदारांनी दुर केला आहे. या पक्षाचे सरकारातील नेतृत्व अत्यंत दुबळेच नाही तर दुधखुळे आहे , सरकारातील लोकांची जनतेशी नाळ तुटली आहे याची जाणीव पक्ष कार्यकर्त्यांना गेल्या वर्षभरात झपाट्याने झाली. पण या परिस्थितीतून सोनिया आणि राहुल गांधी मार्ग काढू शकतील असा सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास होता. पण सोनिया गांधी आजारपणाने मागे पडल्या, पण त्याही पेक्षा त्या सल्लागार परिषदेतील स्वयंसेवी संस्थाच्या गराड्यात अडकल्याने लोकापासून दुर गेल्या. त्यामुळे पक्षाची सगळी भिस्त राहुल गांधी वर होती. उत्तर प्रदेशात राहुल गांधी चमत्कार करून दाखवतील आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढणे आणि जिंकणे सोपे जाईल हा कॉंग्रेसचा होरा होता. निष्क्रीय व निष्प्रभ सरकार असले तरी गांधी घराण्याचा राजपुत्र आपल्याला तारून नेईल हा विश्वास या निवडणुकीत मतदारांनी ढासळून लावला आहे. राहुल गांधीना नाकारून मतदारांनी जो संदेश कॉंग्रेसला दिला आहे त्याने कॉंग्रेसचे धाबे सर्वात जास्त दणाणले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांची या निवडणूक निकालावरील प्रतिक्रिया ते किती गोंधळले आणि सैरभैर झाले आहेत हे दर्शविणाऱ्या आहेत. स्वत:ची स्थिती विसरून बीजेपी ने जसा कॉंग्रेस च्या पराभवावर आनंदोत्सव साजरा केला ,तसाच प्रयत्न कॉंग्रेसनेही केला. बीजेपी च्या तुलनेत किंचित सरस कामगिरी होवूनही बीजेपी ची खिल्ली उडवीत असतानाही त्यांचे चेहरे पडलेलेच होते. राहुल ला मतदारांनी नाकारले हे सत्य पचत नसल्याचे त्यांचा चेहरा सांगत होता.मतदारांनी घराणेशाही नाकारली असा अर्थ काढणे सुद्धा खरे ठरणार नाही. तसे असते तर मतदारांनी मुलायम पुत्राला डोक्यावर घेतले नसते. म्हणूनच राहुल गांधीना का नाकारले याचा वेगळा विचार केला पाहिजे. कॉंग्रेस पक्षाचे सरकार एवढे निष्क्रीय व निष्प्रभ असूनही राहुल गांधी त्यात बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगत नसतील तर ते उत्तर प्रदेशात काय दिवे लावणार असे मतदारांना वाटत असेल तर त्यात त्यांचे चुकले कोठे? पण हे समजून न घेता हा राहुल गांधीचा पराभव नाही हे सांगण्यावर काँग्रेसजन शक्ती खर्च करीत आहेत . सरकार बदला नाही तर घरी बसा हाच मतदारांनी कॉंग्रेसला दिलेला संदेश आहे.
अस्थिरतेची चाहूल
केंद्र सरकारच्या जडणघडणीत उत्तर प्रदेशची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. आणि या निवडणुकीत इथल्या मतदारांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांना नाकारले आहे. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाची कामगिरी मतदारांनी नाकारावी अशीच राहिली आहे यात शंकाच नाही. कॉंग्रेसला लोकाच्या समस्याप्रती संवेदनशील , जबाबदार आणि पारदर्शी सरकार देण्यात अपयश आले आहे. आणि पक्ष श्रेष्ठी हे अपयश उघड्या डोळ्याने निष्क्रियपणे पाहात बसले आहेत ही बाब लोकांच्या सहनशक्तीचा अंत करणारी ठरली आहे. दुसरी कडे भारतीय जनता पक्ष समर्थ विरोधी पक्ष म्हणून कधीच लोकापुढे आला नाही. या पक्षाची भूमिका संसदेत नकारार्थी तर संसदे बाहेर संधीसाधूपणाची राहिली आहे. समर्थ विरोधी पक्षाची भूमिका भाजप पेक्षा अण्णा हजारे आणि बाबां रामदेव यांनीच प्रभावीपणे पार पाडल्याचे लोकांनी पाहिले आहे. अण्णा आणि बाबांच्या चरणी लीन होवून त्यांच्या कष्टाचे फळ गिळंकृत करण्याचा भाजपचा प्रयत्न मतदारांना पसंत पडला नाही हे उघड आहे. दुसरीकडे सत्तेशी आम्हाला काही देणे घेणे नाही असे म्हणत प्रत्यक्षात विरोधी पक्षा सारखे काम अण्णा आणि बाबा करीत आहेत हे सुद्धा मतदारांना न आवडल्याने मतदारांनी त्यांच्याकडेही पाठ फिरविली आहे. गेले वर्ष भर कॉंग्रेस,भाजप ,अण्णा आणि बाबा यांनी मिळून देशभर जे गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे त्यावर मतदारांनी आपल्या नापसंतीची मोहोर स्पष्टपणे उमटविली आहे. प्रत्येकानी आपल्या चुका दुरुस्त केल्या नाही तर मतदार त्यांच्यावर विसंबून न रहाता उपलब्ध पर्याय निवडतील याची चुणूक मतदारांनी दाखवून दिली आहे. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीला जवळपास २ वर्षाचा अवधी असल्याने कॉंग्रेस आणि भाजप कडे आपल्या चुका सुधारून प्रामाणिकपणे काम करून जनतेचा विश्वास प्राप्त करण्याची संधी आहे.त्यांच्या आजच्या भूमिका लक्षात घेतल्या तर त्यांना चुका समजूनच घ्यायच्या नाही आहेत असे दिसते. ताजा निवडणूक निकाल आणि कॉंग्रेस-भाजप ची त्यावरील प्रतिक्रिया लक्षात घेतली तर देशाला या दोहो पेक्षा वेगळ्या राष्ट्रीय पर्यायाची गरज आहे हे लक्षात येते. अण्णा हजारेच्या आंदोलनाने असा पर्याय उभा करण्याची संधी निर्माण झाली होती. पण आंदोलनाचे नेतृत्व फारच थिटे पडले आणि नेतृत्वाच्या अहंकाराच्या पुरात पर्याय निर्माण न करताच आंदोलन वाहून गेले. बाबा आणि अण्णांच्या प्रतिक्रिया पहिल्या तर त्यानाही कॉंग्रेसचे नाक कापले यातच आनंद आहे. पर्यायाची फिकीर नाही. भाजपवर त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरला नसला तरी अण्णा आणि बाबांचा अजून मोह्भंग झालेला दिसत नाही. जनतेचा मात्र मोह्भंग झाला आहे . कॉंग्रेस - भाजप सुधारली नाही किंवा नवीन पर्याय उभा राहिला नाही तर देशात पुन्हा प्रादेशिक सुभेदार बलवान होतील आणि केंद्रात प्रादेशिक पक्षांचे कडबोळे सरकार येईल. व्हि.पी.सिंह, चंद्रशेखर . चरणसिंग ,देवेगौडा यांनी अल्प काळ राज्य करून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धर्तीवर केंद्रात सरकार चालवून देशात जी अस्थिरता निर्माण केली होती त्या धर्तीवर मुलायम, ममता, जया, नितीश हे नव्या अस्थिरतेचे जनक ठरतील. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्या समर्थनावर मुलायम सरकार आले तर केंद्रात सणकी ममता ऐवजी मुलायमच्या समर्थनाने स्थिरता येईल ही शक्यता आता मावळली आहे. आता पर्यंत केंद्र सरकारचे बाहेरून समर्थन करणारे मुलायमसिंग पुढे तसेच करतील याची शक्यता नाही. कारण लोकसभेच्या लवकर निवडणुका होणे ही मुलायमसिंग साठी सर्वाधिक फायद्याची गोष्ट ठरणार आहे. स्वबळावर ५० च्या वर खासदार निवडून आणून मुलायमसिंग पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरणार असल्याने पुढचा कालखंड अस्थिरतेचा राहू शकतो आणि अस्थिरतेचा पाहिला बळी विकास ठरण्याची दांडगी शक्यता आहे. मतदारांनी नव्या राष्ट्रीय पर्यायाची निकड लक्षात आणून देण्याचे काम चोखपणे बजावले आहे. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या राजकीयदृष्ट्या जागृत आणि संवेदनशील नागरिकांनी आणि तरुणांनी भ्रष्टाचार , काळा पैसा अशा सवंग घोषणाबाजीच्या आहारी न जाता नवा राजकीय राष्ट्रीय पर्याय देण्यासाठी कंबर कसली पाहिजे.
(समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि.यवतमाळ
Good analysis. Hope that politicians pay attention to your thoughts!
ReplyDelete