भासविण्यात येते तसे आर्थिक कामगिरी हे मोदींना भाजपात महत्व देण्याचे कारण असू शकत नाही. कारण मोदींनी गुजरातेत राबविलेली आर्थिक धोरणे ही जागतिकीकरणाला अनुकूल आहेत. या धोरणांना संघ-भाजपचा असलेला विरोध सर्वश्रुत आहे. उलट मोदींना पुढे केल्याने भाजपात आर्थिक
धोरणा ऐवजी सांस्कृतिक आणि धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य मिळवून अयोध्या
प्रश्नावर झाले तसे ध्रुवीकरण होण्याचा धोका आहे. परिणामी भारतीय राजकारण आणि अर्थकारण यांची ९० च्या दशकात जी दुर्दशा झाली होती तिकडे देशाला भाजपतील घडामोडी घेवून जाण्याचीच अधिक शक्यता आहे.
---------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
भारतीय जनता पक्षातील ताज्या घडामोडीने भारतीय
जनता पक्षाला नव्या वळणावर आणून सोडले यावर राजकीय विश्लेषकांचे एकमत आहे. भाजप वर
त्याच्या स्थापनेपासून अटल-अडवाणी या जोडगोळीचा प्रभाव होता त्यातून भाजप मुक्त
झाल्याचे भाजपच्या गोवा बैठकीतून उघड झाल्याने नेतृत्व बदलाच्या अर्थाने भाजप
नव्या वळणावर उभा आहे , मात्र भाजपचे हे नवे वळण भाजप आणि भारतीय राजकारणालाही
जुन्या वळणाकडे घेवून जाणारे आहे इकडे विश्लेषकांचे दुर्लक्ष होत आहे. भाजप मध्ये
नेमके काय घडले हे नीट समजून घेतले तर भाजप मागे जायला आणि त्याच बरोबर भारतीय
राजकारणाला मागे न्यायला सज्ज झाल्याचे स्पष्ट होईल.
भाजपतील घडामोडीचा अर्थ
भारतीय जनता पक्षाची सूत्रे जुन्या पिढी कडून
नव्या पिढीकडे आलीत या घटनेने स्वत: भाजप आणि राजकीय पंडीत देखील हुरळून गेले
असल्याने या सत्ता संक्रमणाचा अर्थ त्यांना नीट समजला नाही. भाजपतील पंचविशीतील
नवी पिढी या संक्रमणाला भाजपचे धर्मवादा कडून अर्थवादाकडे झालेले संक्रमण समजत
असली तरी प्रत्यक्षात धर्मवादा कडून कट्टर धर्मवादाकडे झालेले हे संक्रमण आहे आणि
या अर्थाने भाजपचे पाउल पुढच्या दिशेने पडण्याऐवजी मागच्या दिशेने पडलेले आहे. ज्या
ज्या वेळी भाजपने स्वत:ची धर्मवादी ओळख बदलण्याचा प्रयत्न करून उदारवादी चेहरा
घेण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळी त्याला राजकीय अपयशाचा सामना करावा लागला हा
इतिहास आहे. जनता पार्टी पासून वेगळे होवून भाजपची निर्मिती झाली तेव्हा
वाजपेयींच्या नेतृत्वाखाली गांधीवादी दिशा भाजपने अधिकृतरित्या स्विकारली होती. पण
गांधीवाद हा भारतीय जनता पक्षाच्या संघ आणि जनसंघाच्या केडरसाठी उपरा आणि मते
मिळविण्यासाठी निरुपयोगी असल्याचा अनुभव घेतल्यावर भाजपने गांधीवादाला सोडचिट्ठी
दिली होती. वाजपेयींच्या उदारवादी चेहऱ्याचे एक चाक आणि अडवाणींच्या धर्मवादी राजकारणाचे
दुसरे चाक असलेल्या रथावर स्वार होवून मार्गक्रमण करण्याचा निर्णय भाजपला सत्ता
मिळविण्यासाठी उपयुक्त ठरला होता. कालांतराने वार्धक्य व आजारपणामुळे वाजपेयी
पडद्या आड गेल्यावर अडवाणी स्वत:हून भाजपचा उदारवादी चेहरा बनले. पण ज्या पक्षाचा
आधार आणि शक्ती संघ आहे त्या पक्षाला केवळ उदारवादी चेहरा मते मिळवून सत्ता मिळवून
देवू शकत नाही , सत्ता मिळविण्यासाठी विभाजनवाद आणि विभाजनवादी चेहराच लागतो याचा
विसर अडवाणी यांना सोयीस्करपणे पडला असला तरी तब्बल १० वर्षे सत्ते बाहेर काढावे
लागलेल्या भाजपातील पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांना पडणे शक्य नव्हते. खरे तर
अडवाणी आणि मोदी यांचेकडे ९० च्या दशकातील व त्यानंतरची वाजपेयी-अडवाणी या
जोडगोळीची उदारवादी-विभाजनवादी भूमिका देवून भाजपला आपला अंतर्गत संघर्ष आणि या
संघर्षातून झालेली शोभा टाळता आली असती. पण एवढेही शहाणपण भाजप नेतृत्वाला दाखविता
आले नाही आणि याचेच दूरगामी परिणाम भाजप व भारतीय राजकारणावर होणार आहे.
भाजपतील घडामोडीचे परिणाम
राजकीय पक्षाची स्थापना आणि बांधणी सत्ता
मिळविण्यासाठीच असते. त्यामुळे सत्ता मिळविण्याबाबत एखादा पक्ष आतुर झाला असेल तर
त्यात वावगे काही नाही. लोकांचे प्रश्न हाती घेवून ते सोडविण्यासाठी लोकांना
संघटीत व आंदोलित करून सत्तेचा मार्ग प्रशस्त करायचा असतो. यातून राजकीय पक्षाला
ताकदही मिळते आणि आत्मविश्वासही. पण गेल्या दशकातील सत्ते बाहेरच्या भाजपची वाटचाल
ज्या पद्धतीने झाली त्यातून भाजपला ना ताकद मिळाली ना आत्मविश्वास. कारण या काळात
भाजपने लोकांशी स्वत:ला जोडण्याचा , लोकांच्या समस्या हाती घेवून लढण्याचा ,
समस्या सोडविण्याचा आपला दृष्टीकोन राजकीय पटलावर मांडण्याचा कधीच प्रयत्न केला
नाही. संसदेत गदारोळ माजवून आणि संसद बंद पाडून नुसत्या प्रसिद्धीच्या झोतात
राहणेच भाजप नेतृत्वाने पसंत केले. सत्तेत असणारांचे वाभाडे काढलेत ते हे ज्यांचे
काम नाही त्या संवैधानिक संस्थांनी आणि अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने
. भाजपने त्यांची री ओढण्या पलीकडे काही केले नाही. मध्यंतरी भर बैठकीत
माध्यमांसमोर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी पक्ष नेतृत्वाचा लोकांशी
संबंध उरला नाही व अशा नेतृत्वाला अडवाणी संरक्षण देतात हा आरोप केला होता तो आरोप
मुळीच चुकीचा नसल्याचे सिद्ध करण्याचे तेवढे काम गोवा बैठकी पर्यंत आणि गोवा
बैठकीत पक्ष नेतृत्वाने केले.
ज्या पक्षाशी निवडणुकीत प्रामुख्याने सामना
करायचा आहे तो पक्ष अत्यंत खिळखिळा झालेला पक्ष आहे. त्या पक्षावर भ्रष्टाचाराच्या
एवढ्या फैरी झाडण्यात आल्या आहेत कि त्यामुळे त्याचे नैतिक खच्चीकरण तर झालेच आहे
पण पंगुत्वाने त्या पक्षाला ग्रासले आहे. नेहरू किंवा इंदिरा गांधीनी दगड उभा केला
तरी तो निवडून येईल असा महिमा असलेल्या या कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात दगड उभा
केला तरी निवडून येईल अशी स्थिती असल्याचे वातावरण आहे. प्रमुख विरोधी पक्ष
असलेल्या भाजपच्या आजच्या नेतृत्वाकडे एवढ्या दुबळ्या पक्षाशी लढून त्याला पराभूत
करण्या इतपत आत्मविश्वास नसल्याचे आणि या पक्षातील केडरचा आपल्याच नेतृत्वावर
विश्वास नसल्याचे गोवा बैठकीने सिद्ध केले आहे. आज पर्यंत मुख्यमंत्री पदाशिवाय
पक्षाच्या कोणत्याच महत्वाच्या पदावर ज्या व्यक्तीची कधी वर्णी लागली नव्हती किंवा
जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही त्याच व्यक्तीचा धावा ज्या पक्षाचा पराभव अटळ आहे
असे मानले जाते त्या पक्षाच्या पराभवासाठी भाजप नेतृत्वाला करावा लागला आहे. अटळ
पराभव असलेल्या पक्षाचा पराभव करण्यासाठी मोदींच्या हाती सूत्रे देण्यात आली हे
बुद्धीला न पटण्या सारखे आहे. पक्ष
कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना डावलूनच नव्हे तर अपमानीत करून त्यांच्या डोक्यावर
मोदींना बसविण्याची घाई झाली यामागे अर्थातच दुसरे कारण असले पाहिजे. मोदींना पुढे
आणण्यात संघाने दाखविलेला रस आणि बजावलेली मुख्य भूमिका यात या मागचे खरे कारण
शोधता येईल. पक्षात मोदी युग सुरु झाले असे जे समजले किंवा बोलले जाते ते तितकेसे
खरे नाही. प्रत्यक्षात पक्षात संघ युग सुरु झाले आहे. वाजपेयी-अडवाणी यांनी
संघाच्या शक्तीचा उपयोग केलाच , पण स्वत:च्या प्रतिभेचा आणि अंगभूत नेतृत्व
गुणांचा वापर करून जनमानसात संघ नेतृत्वापेक्षा वरचे स्थान प्राप्त केले. हे नेतृत्व
संघासाठी नाकापेक्षा मोती जड असे झाले होते. निसर्गाने वाजपेयींना दूर केले , पण
चिवट अडवाणीसाठी संघाला मोदी अस्त्र वापरावे लागले. मोदींनी गुजरातेत संघावरच हे
अस्त्र वापरल्याने संघाला या अस्त्राच्या शक्तीचा अनुभव होता. आपल्याला ज्यांनी वर
आणले त्या संघावर वार करायला मोदी कमी करीत नाहीत , त्याअर्थी त्यांचा त्राता
म्हणून भूमिका निभावलेल्या अडवाणी यांचेवर वार करायला त्यांना काहीच वाटणार नाही
हे हेरूनच संघाने मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवून अडवाणींची शिकार केली. अडवाणी
यांना दूर करून पक्षावर संपूर्ण ताबा मिळविण्यासाठी मोदी इतकी योग्य व्यक्ती भाजप किंवा
संघ परिवारात दुसरी नव्हती हे लक्षात घेतले तर मोदी उदयाचा व त्याच्या होणाऱ्या
परिणामाचा अर्थ लावता येईल.
मोदी उदयाचे परिणाम
मोदी यांना विकास पुरुष म्हणून कितीही
प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांची खरी ओळख धर्मवादी हीच आहे. अडवाणी
यांनी अयोध्या प्रश्नावर जनतेला विभाजित
करण्यात आणि मतदारांचे धर्माधारित विभाजन करण्यात जे यश मिळविले तशा प्रकारचे यश
मिळविण्याची भाजप मध्ये आणि एकूणच संघ परिवारात कोणाजवळ जादूची छडी असेल तर ती
नरेंद्र मोदी यांचे जवळ आहे. कॉंग्रेसची आजची अवस्था लक्षात घेतली तर या जादुई
छडीच्या बळावर कोणत्याही कुबड्या न घेता सत्ता काबीज करून आपले मुद्दे रेटण्याची
ही सुवर्णसंधी असल्याची संघाची भावना झाली आहे. हा क्षण दवडायचा नसल्याने
व्यक्तिवाद पसंत नसतानाही संघाने व्यक्तिवादी मोदींना पुढे केले आहे. संघाने आता
पर्यंत आपली सारी ताकद भाजपसाठी खर्च केली. भाजपला सत्ता मिळून तो वाढू लागला . पण
संघ शाखांना ओहोटी लागली. म्हणूनच संघाला संघ-भाजप आणि सत्ता यातील अंतर कमी
करण्यासाठी संघाने कोणतीही लपवा छपवी न करता उघडपणे भाजपच्या कारभारात हस्तक्षेप
करण्याचा निर्णय घेतला असावा. संघाची आजची उघड हस्तक्षेपाची भूमिका लक्षात घेतली
तर उद्या भाजप सत्तेत आला तर आज सरकारात नसून सोनिया गांधींचा जो प्रभाव आहे तोच
उद्या सरसंघचालकांचा असणार आहे . संघ स्वयंसेवकांची ओहोटी रोखण्यासाठी संघाच्या
राजकीय भूमिकेत बदल झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या नेत्यांना मोदींच्या खांद्यावर बसून
हमखास सत्ता उपभोगता येईल असे वाटू लागल्याने आपला आवडता सामुहिक नेतृत्वाचा आलाप
गळ्यातच गिळून मोदींचा उदो उदो करायला ते तयार झाले आहेत. शायनिंग इंडियाच्या
अनुभवानंतर आणि २००४च्या पराभवानंतर अडवाणीच्या घोड्यावर बसण्याची त्यांची
इच्छा नाही. संघ आणि भाजपच्या मोदी पसंतीची ही कारणे आहेत. त्यामुळे भाजपात आर्थिक
धोरणा ऐवजी सांस्कृतिक आणि धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य मिळवून अयोध्या
प्रश्नावर झाले तसे ध्रुवीकरण होण्याचा धोका आहे. उदारवादी चेहऱ्याला कोणताही
प्रश्रय न देण्याचे संघ भाजपचे उघड धोरण भाजपला त्याच्या मित्र पक्षा पासून दूर
घेवून जाईल. भाजपच्या ज्या मित्र पक्षांना कॉंग्रेस राजकीय शत्रू वाटतो त्यांची
वेगळी आघाडी बनेल. भाजप आणि कॉंग्रेस यांना समान शत्रू मानणाऱ्या तिसऱ्या आघाडीचा
जन्म होईल. पण ही तिसरी आघाडी कोणतेही राष्ट्रीय धोरण नसलेल्या प्रादेशिक पक्षांची
असणार आहे. आज भाजप किंवा कॉंग्रेस स्वबळावर सत्ता काबीज करण्याच्या स्थितीत
नसल्याने नवे देवेगौडा आणि नवे चरणसिंह सत्तेवर येवू शकतात. कॉंग्रेसने खिळखिळ्या
करून ठेवलेल्या दुबळ्या शासन व प्रशासनात असे देवेगौडा आणि चरणसिंह आले तर ते
सामाजिक,आर्थिक व राजकीयदृष्ट्या किती अनर्थकारी असणार आहे हे सांगायला कोण्या
ज्योतिष्याची गरज नाही. आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था याचा पहिला बळी ठरणार
आहे. भारतीय राजकारण आणि अर्थकारण यांची ९० च्या दशकात जी दुर्दशा झाली होती तिकडे देशाला भाजपतील घडामोडी घेवून जाणार आहेत.
भाजपातील घडामोडीने त्या पक्षाचा फायदा होवो कि तोटा देश मात्र मागेच जाणार आहे.
(समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाईल- ९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ
MODI PROMOTION AND ITS IMPACT ON NATIONAL POLITICS IS NOT RESTRICTED UPTO BJP ONLY, BUT TO SO CALLED THIRD FRONT OR FEDERAL FRONT'S EFFORTS TO HV ENTRY, IS DIRECTLY BENEFITING SONIA CONGRESS AND LEFT.
ReplyDeleteIF THIS CONTINUES, IT WILL LEAD TO LS POLLS IN NOVEMBER 2013 AND CONGRESS N LEFT WILL FROM GOVT AT CENTER AT PAR WITH UPA-1, BUT THIS TIME LEFTS WILL BE PART OF CENTRAL GOVT TO CURB THREAT MOIST N NEXULS.