पराभवाच्या छायेतून स्वत:ला आणि पक्षाला बाहेर काढण्यासाठी एकांतवासात नाही तर लोकात जाणे हाच मार्ग आहे. इंदिरा गांधीनी आपल्या दारूण पराभवानंतर हाच मार्ग पत्करला आणि पराभवावर मात केली. लोकांचे समर्थन हेच पराभूत मानसिकतेतून बाहेर येण्याचे जादुई औषध असल्याचे इंदिरा गांधीनी दाखवून दिले होते . राहुल गांधीनी हा धडा गिरवायला हवा होता.
--------------------------------------------------------------
एका पाठोपाठ एक मिळत असलेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरायला कॉंग्रेसला वेळ आणि आधार मिळालेला नसतानाच ज्याच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची ही दैना झाली त्या राहूल गांधीनी जीर्ण जर्जर कॉंग्रेसला रजेवर जावून आणखी एक धक्का दिला. राहुल गांधीना अज्ञातवासात जावून ५० दिवस झालेत तरी त्यांची परतण्याची चिन्हे नसल्याने सकल काँग्रेसजन चिंताक्रांत आहेत. कामाच्या धकाधकीतून वेळ काढून विश्रांती घेणे , पक्षाची जबाबदारी असली तरी स्वत:साठी वेळ काढणे यात गैर काही नाही. समोर कामांचा आणि आव्हानांचा डोंगर उभा असताना सहसा कोणी रजा मागत नाही आणि मागितली तरी ती मिळत नाही. राहुलला ती मिळाली. याचे कारण त्यांनी श्रमपरिहारासाठी रजा मागितली नव्हती तर चिंतन , मनन करून पक्षाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ही रजा मागितली होती. किमान तसे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले होते. याचा अर्थ कॉंग्रेस कार्यकर्त्या इतकेच पराभवाने कॉंग्रेस नेतृत्व संभ्रमित आणि सैरभैर झालेल्र आहे. पुढे कसे जायचे याबद्दल नेतृत्वा समोर अंधार आहे. स्वत:ला या अवस्थेतून बाहेर काढल्याशिवाय कॉंग्रेसचे नेतृत्व कॉंग्रेसला आधार आणि दिशा देवू शकणार नाही हे तर उघड आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सध्याचे उपाध्यक्ष आणि भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंतन , मनन करण्यासाठी अज्ञात ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांच्यासाठी आणि कॉंग्रेस पक्षासाठी चांगलाच आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेच त्यांनी असा निर्णय घेतला असता तर आज संसदेच्या महत्वपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात रजेवर जाण्याने मैदान सोडून पळालेल्या सेनापतीवर टीकेची झोड उठावी तशी उठली नसती. पण अशी टीका व्यर्थ आहे. राहुल गांधींचा सुटीवर जाण्याचा निर्णय हा ते संभ्रमात असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच आहे. असा संभ्रमित सेनापती लढाईच्या मैदानात सैनिकांना योग्य मार्गदर्शन करूच शकला नसता. उलट त्याच्यामुळे हानीच अधिक झाली असती. त्यांचा हा निर्णय टीकेला पात्र आहे पण दुसऱ्या दृष्टीकोनातून. त्यावर कोणीच बोलत नाही. एकांतवासात चिंतन-मनन करण्याची परंपरा आपल्या देशातच नाही तर परदेशातही आहे. ज्यू परंपरेत तर दर सात वर्षांनी चिंतन-मनन करण्यासाठी सुटी घेतली जाते. लोकांपासून दूर एकांतवासातील चिंतन - मननातून तत्वद्न्य आणि तत्वज्ञानाचा जन्म झाल्याचे आपण पाहिले आहे. बुद्ध ,तुकाराम यासारखी नावे आपल्या चटकन समोर येतील .पण अशा एकांतवासातून एखादा कुशल राजकारणी जन्मल्याचे उदाहरण सापडणे दुर्मिळ आहे. उलट अशा एकांतातील चिंतन-मननातून इह्लोकाबद्दलची आसक्ती कमी होवून माणूस परमार्थाकडे वळल्याची अनेक उदाहरणे आहेत. राहुलच्या बाबतीत हा धोका अधिक संभवतो . कारण त्याची आजवरची राजकीय कारकीर्द राजकीय अनासक्तीयोगाची राहिली आहे. सत्तेपासून दूर पळणे हा त्याचा स्वभाव लक्षात घेता त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले काँग्रेसजन त्याच्या एकांतवासाच्या फलीताने निराश होण्याची शक्यता अधिक आहे.
पुन्हा पक्षकार्यात झोकून देण्यासाठी ताजेतवाने होण्याची कल्पना या सुटीमागे असेल तर त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. 'चिंतन-मनना'साठी सुटी हा खरा आक्षेपार्ह मुद्दा आहे. निर्णयाबाबतीत संभ्रमावस्था असेल तर काय केले पाहिजे याची चांगली कसोटी महात्मा गांधीनी ठरवून दिली होती. त्यांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेस नेतृत्वाला याचा विसर पडला असेच राहुल गांधीच्या निर्णयावरून वाटते. तळागाळातल्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहा आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर कशी उमटेल याचा विचार केला तर संभ्रमावस्था दूर होईल असे गांधीनी सांगितले होते. तात्पर्य, राजकारणातील संभ्रमावस्था दूर करायची असेल तर लोकात जाणे , लोकांशी संवाद साधणे याला पर्याय नाही. तिकडे संसद चालू असताना राहुल गांधीनी लोकसंपर्क व लोकसंवादासाठी भारत यात्रा काढण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यावर टीका होण्या ऐवजी त्याचे स्वागत झाले असते. राजकारणात चूक किंवा बरोबर असणे हे लोकसापेक्ष असते. तुमच्या सोबत लोक असतील तर तुमचा प्रत्येक निर्णय बरोबर असतो आणि लोक सोबत नसतील तर तुमचा प्रत्येक निर्णय चुकीचा वाटायला लागतो. राहुल चुकीचा वाटतो त्याचे खरे कारण हे आहे. त्यासाठीच पराभवाच्या छायेतून स्वत:ला आणि पक्षाला बाहेर काढण्यासाठी लोकात जाणे हाच मार्ग आहे. इंदिरा गांधीनी आपल्या दारूण पराभवानंतर हाच मार्ग पत्करला आणि पराभवावर मात केली. लोकांचे समर्थन हेच पराभूत मानसिकतेतून बाहेर येण्याचे जादुई औषध असल्याचे इंदिरा गांधीनी दाखवून दिले. आजच्या परिस्थितीत राहुल गांधी समोर काही प्रश्न पडले असतील तर ते स्वाभाविक आहे . या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची त्यांची धडपड , तळमळ प्रामाणिक आहे असे मानले तरी प्रश्नाचे उत्तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाकडे पाठ फिरविली तर कधीच उत्तर मिळणार नाही. रूपक कथेत सांगितल्या प्रमाणे सुई ज्या ठिकाणी हरवली आहे त्या ठिकाणीच सापडेल. सुई एका ठिकाणी पडली आणि दुसऱ्या ठिकाणी उजेड आहे म्हणून तिथे शोधत बसले तर ती सुई कधीच सापडणार नाही. आजच्या राजकीय कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग जनतेतून जातो ही समज राहुल गांधीमध्ये जितक्या लवकर येईल तितके पक्षासाठी व त्यांच्यासाठी चांगले असेल.
चिंतन-मनन करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी राहुल गांधीनी ही सुटी आत्मपरीक्षणासाठी उपयोगात आणण्याची गरज आहे. एक राजकीय नेता म्हणून आपण कुठे कमी पडतो हे त्यांनी तपासण्याची नक्कीच गरज आहे. आपल्या मर्यादा आणि आपले शक्तिस्थान ज्या नेत्याला चांगले कळते तोच नेता यशस्वी होत असतो. कॉंग्रेसच्या 'होयबा' संस्कृतीतून मिळालेले समर्थन याला राहुल गांधी आपली ताकद समजत असतील तर ते चूक आहे. एखाद्या नेत्याच्या राजकीय शक्तीचा आवाका दोन गोष्टी वरून ठरत असतो. नेत्याची लोकांना आंदोलित करण्याची शक्ती आणि निवडणुकीत विजय मिळवून देण्याची क्षमता. या दोन पैकी एक शक्ती असल्याशिवाय यशस्वी राजकीय नेता होता येत नाही. या दोन्हीपैकी कोणतीही एक कला हस्तगत करायची असेल तर लोकांच्या मनाला , लोकभावनेला हात घालण्याचे सामर्थ्य तुमच्यात असावे लागते. या गोष्टींच्या अभावी राहुल गांधींचे नेतृत्व निष्प्रभ ठरले हे त्यांनी आणि कॉंग्रेसजनांनी समजून घेण्याची गरज आहे. कदाचित अनेक काँग्रेसजनांना याचे भान असेल . पण राहुलला हे सांगण्याची त्यांची हिम्मत नाही हा खरा कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनातील अडथळा आहे. राहुल आणि काँग्रेसजन यांच्यामध्ये खूप अंतर आहे. एखादा नेता स्व-पराक्रमाने उंची गाठत असेल आणि त्यामुळे त्याच्यात आणि अनुयायात अंतर निर्माण होत असेल तर ते समजण्यासारखे आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसजन यांच्यातील अंतर राहुलच्या पराक्रमातून नाही तर घराणेशाहीतून आले आहे. आज एकाही कॉंग्रेस नेत्याला राहुल गांधी कुठे आहेत आणि कधी परतणार आहेत हे माहित नसणे काँग्रेसजन आणि राहुल गांधी यांच्यातील अंतरावर प्रकाश टाकणारे आहे. अर्थात या बद्दल फक्त राहुलला दोष देणे चुकीचे आहे. आजवर स्वत:ला सिद्ध करण्यात सतत अपयशी ठरले असतानाही काँग्रेसजन त्यांच्या सुटीवर जाण्याने अगतिक बनले असतील आणि चातकासारखी राहुलच्या परतण्याची वाट पाहात असतील तर कॉंग्रेसमधील घराणेशाही टिकून राहण्यात काँग्रेसजन दोषी आहेत असेच म्हणावे लागेल. एक मात्र खरे आहे कि घराणेशाहीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कोणी केला असेल तर तो राहुल गांधी यांनीच केला आहे. अमेरिकेतील उमेदवार निवडीच्या पद्धती प्रमाणे पक्षाच्या सदस्याच्या मतानुसार उमेदवार निवडीचा मर्यादित स्वरूपातील प्रयोग राहुल गांधीनी केला आहे. विपरीत राजकीय परिस्थितीत हा प्रयोग अपयशी झाल्याने इकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नसले तरी या प्रयोगात घराणेशाहीतून कॉंग्रेसला बाहेर काढण्याची बीजे नक्कीच आहेत.
राहुलची खिल्ली उडविणारे जे काही बोलले जात आहे त्याचे कारण राहुलला लोकांशी नाते जोडता आले नाही हे आहे. अन्य पक्षातील नेत्या पेक्षा राहुल गांधी तरुण आहेत . युवक कॉंग्रेसमधून त्यांनी कामाला सुरुवात केली. पण त्यांना युवकाच्या भाषेत बोलता येत नाही. युवकांच्या आकांक्षा त्यांना कळत नाही. युवकांना तर राहुल गांधी परग्रहावरील प्राणी वाटतो. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांचे यश हे युवकांशी त्यांच्या असलेल्या नात्यात आहे. युवकांशी तुटलेली नाळ हेच राहुल गांधीच्या तरुण नेतृत्वाच्या आणि काँग्रेसच्याही अपयशाचे मुलभूत कारण आहे. आजवर राहुल गांधीना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळाल्यात . पण झोळीछाप राजकारण करून त्यांनी सर्व संधी गमावल्यात. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील नेत्रदीपक विजयानंतर राहुल गांधी आणि कॉंग्रेस कायमची विजनवासात जाते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आम आदमी पक्षाच्या आत्मघातकी नेतृत्वाने राहुल गांधीना पुन्हा एक संधी दिली आहे. नरेंद्र मोदीचे सरकार ज्या पद्धतीने चालले आहे त्यामुळेही कॉंग्रेससाठी अनुकुलता निर्माण होत आहे. याचा फायदा घ्यायचा असेल तर राहुल गांधीना सुद्धा संधी पासून दूर पळण्याचा स्वभाव बदलावा लागेल. पळपुटेपणाचा हा शिक्का पुसून टाकायचा असेल तर आजच्या विजनवासातून बाहेर येताना आव्हान स्विकारणारा आक्रमक नेता या रूपातच त्यांना देशासमोर यावे लागेल.
---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment