Thursday, May 10, 2018

राजकारणाची मैली गंगा !


चांगले लोक राजकारणात आले की राजकारण स्वच्छ होईल ही भारतीय जनतेची भाबडी समजूत राहात आली आहे. स्वच्छ राजकारणासाठी संस्थात्मक बदल आणि संस्थात्मक संरचनेची गरज असते हे आमच्या ध्यानीमनी नसते. बदल आणि संरचने अभावी राजकारण आणि निवडणूक यंत्रात चांगला माणूस शिरला की तो वाईट बनूनच बाहेर पडतो. माणसापेक्षा यंत्रात बदल करण्याची गरज आहे. निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या तरच राजकारणाची मैली गंगा स्वच्छ होईल.
---------------------------------------------------------------------------

राज्यशास्त्राचे विद्यार्थी राजकारणाच्या अनेक व्याख्या सांगतील. त्यात लोकसेवेपासून ते लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे साधन म्हणजे राजकारण अशा अनेक व्याख्या असतील. भारतातील सध्याच्या राजकारणाकडे पाहिले की सत्ता मिळविण्या शिवाय राजकारणाचा काही उद्देश्य , काही वेगळी व्याख्या असू शकते यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. राजकारण म्हणजे सत्ता मिळविणे हे एकदा ठरले की राजकारणाचा सगळा अर्थ संपून एनकेनमार्गाने सत्ता मिळविणे एवढेच उरते. महात्मा गांधीनी फार पूर्वी २२ ऑक्टोबर १९२५ च्या  ‘यंग इंडिया’ या साप्ताहिकात ७ सामाजिक पापांची यादी दिली होती. त्या सात पापात परिश्रम रहित धनोपार्जन, सदाचार रहित व्यापार, विवेक रहित सुख, चरित्र शून्य ज्ञान, वैराग्यविहीन उपासना, संवेदना रहित विज्ञान या सहा पापांसह सिद्धांत रहित राजकारण या पापाला त्यांनी आपल्या यादीत अग्रस्थान दिले होते. भारतातील आजचे राजकारण पाहिले की गांधीनी सिद्धांत रहित राजकारणाला पापाच्या यादीत सर्वात वरचे स्थान का दिले असेल याचा बोध होतो. राजकारणातील घसरण समाजातील सर्वच क्षेत्रातील घसरणीला कशी चालना देते हे आजची परिस्थिती पाहून लक्षात येते. राजकारणावरील सत्कारणाचा पडदा बाजूला होवून त्याचे खरेखुरे स्वरूप कुठे प्रकट होत असेल तर ते निवडणुकीत. निवडणुका हा राजकारणाचा आरसा आहे. निवडणुका संदर्भातील २-४ ताज्या बातम्यावर प्रकाश टाकला तर राजकारणातील सिद्धांत शुन्यता, मूल्यविहिनता कोणत्याही संवेदनशील, विचारशील व्यक्तीला अस्वस्थ करील.

पहिली बातमी महाराष्ट्रातील. राज्यात काही ठिकाणी लोकसभा – विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत त्यात पालघर लोकसभाही आहे. या ठिकाणी भाजप खासदाराच्या निधनामुळे निवडणूक घ्यावी लागत आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता असलेल्या दिवंगत खासदाराच्या मुलास शिवसेनेने आपला उमेदवार घोषित केला. शिवसेनेने भाजपचा उमेदवार पळविला मग भाजपनेही कॉंग्रेसचा पदाधिकारी – मंत्री राहिलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याला आपला उमेदवार म्हणून घोषित केले. पालघर क्षेत्रात शिवसेना-भाजपचे संघटन चांगले आहे. अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते त्यांचेकडे आहेत. भाजप तर स्वत:ला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून गौरवीत असतो. जगातील या सर्वात मोठ्या पक्षाला केवळ पालघरच नाही तर महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऐनवेळी पक्षात घेवून उमेदवारी दिली आहे. 

दुसरी बातमी आहे प.बंगालची. तिथे पंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकात सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचा मुकाबला करण्यासाठी एकमेकांचे कट्टर दुश्मन म्हणून ओळखले जाणारे भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले आहेत. तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध आपापले झेंडे घेवून हे दोन्ही पक्ष एकत्र रस्त्यावरही उतरले आहेत. असे घडत असल्याची कबुली दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे पण मर्यादित क्षेत्रात स्थानिक पातळीवरच्या तडजोडी असल्याचे सांगत जे घडतंय त्याची गंभीरता कमी करण्याचा या नेत्यांनी प्रयत्न केला आहे. राजकारणात विरोध असला पाहिजे. दुष्मनी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र येत असतील तर त्याचे स्वागत करायला हरकत नव्हती. पण निवडणुकीतील तडजोडीची बातमी प्रसिद्ध झाली त्याच्याच बाजूला दुसरीही बातमी प्रसिद्ध झाली आहे. केरळात संघ-भाजपच्या कार्यकर्त्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यास जीवे मारले आणि काही तासातच भाजपच्या एका कार्यकर्त्याचा खून करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याचा बदला घेतला. या दोन्ही पक्षाची रक्तरंजित होळी केरळात व अन्यही काही ठिकाणी सुरूच आहे. ही टोकाची दुष्मनी निवडणुकीपुरती विसरून हे दोन्ही पक्ष प.बंगालमध्ये जागावाटपाचा समझौता करून पंचायत निवडणुका लढवीत आहे. २ महिन्यापूर्वी त्रिपुरात झालेल्या निवडणुकीत या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यात असंख्य चकमकी घडल्या होत्या. त्रिपुरातील भाजप विजयानंतर निर्माण झालेल्या उन्मादात भाजप समर्थकांनी लेनिनचा पुतळा उखडून टाकल्याची घटना ताजीच आहे आणि त्याहीपेक्षा ताजा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनातील भाजपचा सर्वत्र पराभव करण्यासाठी इतर पक्षाशी हातमिळवणी करून लढण्याचा करण्यात आलेला संकल्प. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भाजप हे दोन्ही पक्ष तत्वाशी बांधिलकी सांगतात. हैदराबाद अधिवेशनातील ठरावाची शाई वाळण्याच्या आतच ज्याला संपवायचे आहे त्याच्याशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हातमिळवणी केली आहे. दुसरीकडे संघ कार्यकर्ते हे भाजपचे केडर म्हणून ओळखले जाते. या संघाचे एकच तत्वद्न्य आहेत ते म्हणजे गोळवलकर गुरुजी. यांच्या तत्वज्ञानावर संघ चालतो. त्यांनी संघाचे शत्रू म्हणून मार्क्सवादी विचारधारा आणि पक्षाचा उल्लेख केला आहे. संघाचे आपल्या विचारधारेवर आणि आपल्या वैचारिक गुरु गोळवलकर यांच्यावर असीम श्रद्धा आणि प्रेम. अगदी मार्क्सवाद्याचे कार्ल मार्क्स आणि लेनिनवर आहे तसे. निवडणूक जिंकण्यासाठी सगळे तत्वज्ञान खुंटीला टांगून या दोन पक्षांनी एकत्र येणे हा देशात प्रभावी होत चाललेल्या सिद्धांत व मूल्यविहीन राजकारणाचा कळस मानावा लागेल. केडर आधारित या दोन पक्षाची ही स्थिती असेल तर बाकी पक्षांच्या कोलांटउड्या बद्दल न बोललेलेच बरे.

तिसरी बातमी आहे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-भाजपने दिलेल्या उमेदवारांविषयी. उमेदवारांचे करोडपती असणे किंवा करोडपतीच उमेदवार असणे या गोष्टीला आता बातमीचे मूल्य राहिलेले नाही. ती परिपाठी बनली आहे आणि तीचे पालन सर्वच पक्ष इमानेइतबारे करीत असतात तसे ते कॉंग्रेस-भाजप या प्रमुख पक्षांनी बहुतांशी करोडोपती उमेदवार देवून केले आहे. याहीपेक्षा दुसरी महत्वाची बातमी आहे ती उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची. गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर एक वर्षात गुन्हेगार लोकप्रतिनिधीना तुरुंगात पाठवून राजकारण गुन्हेगार मुक्त करण्याचा संकल्प सोडला होता. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पण गुन्हेगार लोकप्रतिनिधीची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. दुसरे पक्ष कोणते आणि कसे उमेदवार देतात हे नरेंद्र मोदी ठरवू शकत नाही हे खरे. पण स्वत:च्या पक्षातील उमेदवार कसे द्यायचे हे ते निश्चितपणे ठरवू शकतात. आज भाजप मध्ये त्यांच्या शब्दाला आणि कृतीला आव्हान देईल असा एकही नेता नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकालाही निवडणुकीचे तिकीट द्यायचे नाही असा आदेश त्यांनी दिला असता तर त्याला विरोध करण्याची कोणाची प्राज्ञा झाली नसती. दुर्दैवाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत. भाजपच्या २२४ उमेदवारात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तब्बल ८३ उमेदवार आहेत. या ८३ उमेदवारा पैकी ५२ उमेदवारांवर तर खून , अपहरण , बलात्कार आणि खंडणी वसुली असे गंभीर आरोप आहेत आणि या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जीवाचे रान करीत आहेत. असे गुन्हेगार उमेदवार काँग्रेसच्याही यादीत आहेत पण भाजप पेक्षा संख्येने बरेच कमी आहेत. भाजपने तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच भ्रष्टाचाराचे आरोप असणारा दिला आहे. आजच्या सारखे सीबीआयचा वापर करून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांना आरोपी करण्यात आले नव्हते. अण्णा आंदोलनात आघाडीवर असलेले न्यायमूर्ती हेगडे हे कर्नाटकचे लोकायुक्त असताना त्यांनी चौकशी करून येडीयुरप्पा यांचेवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला होता. भ्रष्टाचाराच्या या ठपक्यामुळे भाजपने येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले होते. त्या प्रकरणातून येडीयुरप्पा दोषमुक्त झालेले नसताना भारतीय जनता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केले आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या देखरेखी खाली चौकशी होवून खाण माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या रेड्डी बंधूना महाभ्रष्टाचारासाठी अटक झाली होती आणि अजूनही ते तडीपार आहेत त्या रेड्डी बंधूंची मदत भाजप निवडणूक जिंकण्यासाठी घेत आहे. सुप्रीम कोर्टाने खाण क्षेत्रातून तडीपार केलेले रेड्डी बंधू प्रधानमंत्र्या सोबत व्यासपीठावर बसून निवडणूक प्रचार करीत असल्याचे दृश्य दिसले. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्या स्तरावर उतरत आहे याचे हे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे.

वरील तिन्ही उदाहरणे नासत चाललेल्या भारतीय राजकारणाचे अंतर्बाह्य स्वरूप स्पष्ट करणारे आहे. राजकारणासाठी सिद्धांत, मूल्य या गोष्टी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी बनली आहे. सिद्धांत आणि मूल्याचा बळी देवून निवडणूक जिंकण्यात कोणालाच काही गैर वाटेनासे झाले आहे. हरलो तरी चालेल पण तत्वाशी , मूल्याशी तडजोड करणार नाही असे सांगणारा एकही पक्ष आणि एकही नेता समोर येत नाही. विस्कटत चाललेली घडी नीट बसवायची असेल तर चांगला आणि कणखर नेता हवा या लोकसमजुतीपायी परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याच समजुतीतून लोकांनी नरेंद्र मोदी यांना निवडून दिले. येडीयुरप्पा सारखा भ्रष्ट नेता आणि गंभीर गुन्ह्याचे आरोपी असलेले उमेदवार यांचे पाठबळ असल्याशिवाय नरेंद्र मोदींना देखील निवडणुका जिंकता येत नाहीत हे सत्य आहे. देशाला लाभलेला सर्वाधिक खंबीर प्रधानमंत्री तर इंदिरा गांधी होत्या आणि त्या दीर्घकाळ सत्तेत होत्या. त्यानाही परिस्थिती बदलता आली नाही. उलट त्यांच्या काळात राजकारणातील नितीमत्तेला ओहोटी लागायला सुरुवात झाली ती मोदींच्या काळातही सुरु आहे. नितीमत्ता राखायची असेल तर त्याला व्यक्ती पुरेसा पडत नाही , त्यासाठी व्यवस्था आणि संस्थागत संरचना पूरक असावी लागते. म्हणजे काय तर नरेंद्र मोदींना निवडून दिले ते सगळे चांगले करतील असे होत नसते. संपत्ती आणि गुन्ह्याची माहिती उमेदवाराने देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती समोर आली तर लोक आपला विवेक वापरतील आणि अशा लोकांना मतदान करणार नाहीत अशा समजुतीतून हा नियम बनविण्यात आला. यामुळे काहीच फरक पडलेला नाही. कारण इथे पुन्हा लोकांच्या सदाशयतेवर अवलंबून राहावे लागते.

व्यक्तींना उपदेश देवून नैतिकपणे वागण्याचा सल्ला देवून राजकारण स्वच्छ होणार नाही. नियम, कायदे यांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या तरच आजची राजकीय घसरण थांबू शकेल. आधी स्वत:ला निर्दोष सिद्ध करून घ्या आणि मग निवडणुकीचा फॉर्म भरा असा नियम असला तर गुन्हेगार निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उतरूच शकणार नाही. आपल्यावरील खटले दीर्घकाळ लाम्बविणारे राजकीय पुढारी ते खटले लवकर निकाली निघण्यासाठी धड्पडतील. ते काही वाल्याचा वाल्मिकी झालेले नसतात. संस्थागत नियम आणि संरचनेचा तो परिणाम असतो. पक्षांचे नियम – कायदे यांचेवर निवडणूक आयोगाची नजर असते. जर प्रत्येक पक्षाला किमान ३ वर्षे पक्षाचा सक्रीय सभासद असेल त्यालाच निवडणुकीत तिकीट देण्याचा नियम बंधनकारक करण्यात आला तर निवडणुकीच्या तोंडावर सत्तालालसेने पक्ष बदलण्याला आळा बसेल आणि पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. ही गोष्ट पक्षश्रेष्ठीच्या मर्जीवर न सोडता तसा नियम करायला भाग पाडले पाहिजे. असा नियम जे पक्ष करतील त्यांनाच मान्यता देण्याचे निवडणूक आयोगाचे धोरण पाहिजे. आपला मात्र नियम आणि संस्थागत संरचना बदलण्या ऐवजी लोकांना चांगले-वाईट ठरवून निवडण्यावर आपला जोर असतो. पण राजकारण आणि निवडणुका हे असे यंत्र बनले आहे ज्याच्यात एका बाजूने चांगला माणूस टाकला कि दुसऱ्या बाजूने तो वाईट होवूनच बाहेर पडतो. तेव्हा आपला जोर माणसे नाही तर हे यंत्र बदलण्यावर असला पाहिजे ज्यातून चांगला माणूस अधिक चांगला बनून बाहेर पडेल. व्यापक निवडणूक सुधारणा राबवूनच हा बदल घडवून आणता येईल. राजकारणाची मैली गंगा कोणी व्यक्ती नाही तर निवडणूक सुधारणाच साफ करू शकेल. जो पर्यंत राजकीय गंगा मैली आहे तो पर्यंत खरीखुरी गंगा साफ आणि स्वच्छ होणे हा जुमलाच ठरेल आणि घाण सर्व क्षेत्रात पसरण्याचा वेग वाढेल.

---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment