आणीबाणी लादणे ही इंदिरा गांधींची घोडचूक होती. ती चूक सुधारून त्यांनी लोकशाहीचा
मार्ग प्रशस्त केला. पण पक्षा अंतर्गत लोकशाही संपवून पक्षाला एका नेत्याच्या
हातातील खेळणे बनवून लोकशाहीवर दुसरे संकट आणले. आणीबाणीवर टीका करणारे नेते या
संकटावर मात्र तोंड उघडत नाहीत. कारण त्यानाही पक्ष आपल्या हातातील खेळणे म्हणूनच
पाहिजे. त्या आणीबाणीचा आता धोका नाही. धोका आहे तो पक्षोपक्षातील अघोषित
आणीबाणीचा !
------------------------------------------------------------------------
तत्कालीन प्रधानमंत्री
इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला गेल्या आठवड्यात ४३ वर्षे पूर्ण
झालीत. त्या निमित्ताने सत्ताधारी भाजपने आणीबाणी लादलेला दिवस काळा दिवस म्हणून
पाळला. देशात ४ वर्षापासून भाजपची सत्ता आहे. पण तो काळा दिवस म्हणून पाळायचे
त्यांना यावर्षीच सुचले. अर्थात आणीबाणी हे देशातील एक काळे पर्व होतेच. जगातील
सर्वात मोठ्या लोकशाहीवर लागलेला कधीही न मिटणारा डाग आहे. त्यामुळे भाजपने काळा
दिवस पाळण्यावर आक्षेप घेता येणार नाहीच. अशा प्रसंगाची आणि पर्वाची पुनरावृत्ती
होवू नये यासाठी अशा प्रसंगाचे स्मरण करत लोकशाहीशी प्रतिबद्धता व्यक्त करणे
गरजेचे आहे. तरीही मागच्या ४० वर्षापेक्षा अधिक तीव्रतेने, अधिक गाजावाजा करीत आणि
अधिक कठोर शब्दांचा वापर करीत भाजपने आपला आणीबाणी विरोध प्रकट करणे संशयास्पद
वाटावे असेच आहे. निवडणूक वर्षात या निमित्ताने कॉंग्रेसची कोंडी करण्याचा आणि
कॉंग्रेसवर प्रखर हल्ला चढविण्यासाठीच यावर्षी भाजपने आणीबाणीचा गाजावाजा केला असा
निष्कर्ष निघावा अशीच भाजप नेत्यांची वक्तव्ये राहिली आहेत. यात आणीबाणी संबंधी
प्रबोधन कमी आणि कॉंग्रेस विरोध प्रखर होता. कॉंग्रेस विरोध म्हणण्यापेक्षा गांधी
घराण्याचा विरोध आणि इंदिरा गांधी यांचे प्रतिमा भंजन हा हेतू लपून राहिला नाही.
या प्रतिमा भंजनाच्या खेळात प्रधानमंत्री मोदी आघाडीवर होते. सुरुवात तर
मंत्रीमंडळातील त्यांचा उजवा हात असलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
आणीबाणी लादली म्हणून जेटली यांनी इंदिरा गांधीची तुलना थेट हिटलरशी केली. आणीबाणी
ही इंदिरा गांधींची घोडचूक होती आणि त्यांच्यातील एकाधिकारशाही प्रवृत्ती प्रबळ
असल्याने त्यांच्या हातून ही घोडचूक झाली हे मान्य करावेच लागेल. स्वत:ची सत्ता
वाचविण्यासाठी त्यांनी आणीबाणी लादली हा तर इतिहासच आहे. दुर्दैवाने हा इतिहास
विस्मरणात गेला आहे. जे घडले जसे घडले त्याचे स्मरण करून देण्याऐवजी आणीबाणीवर भडक
आणि सवंग वक्तव्ये करणे ही भाजपच्या नेत्यांची खासियत राहिली आहे. आमच्या देशात
आमच्यावर लादलेल्या आणीबाणीच्या इतिहासाचे आम्हाला स्मरण नाही तर हिटलरच्या
कारकिर्दीचे स्मरण आणि माहिती कोठून असणार ! तेव्हाच्या काही घटनात आणीबाणीत
घडलेल्या काही घटनांशी वरकरणी साम्य भासत असले तरी हिटलर आणि इंदिरा गांधीची तुलना
ही बौद्धिक दिवाळखोरी ठरते. जेटली यांनी केलेल्या तुलनेला प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनीही दुजोरा दिल्याने या तुलनेला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ही
तुलना कितपत बरोबर आहे हे तपासण्याची गरज आहे.
या तुलनेमुळे एक गोष्ट तर
स्पष्ट झाली की हिटलर हा काही आदर्श राज्यकर्ता नव्हता. जेटलीच्या मुखातून हे स्पष्ट
व्हायला विशेष महत्व आहे आणि प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेल्या दुजोऱ्यालाही. कारण
मोदी आणि जेटली यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाली आहे. आणि आरेसेसच्या
संस्थापका पासून ते साध्या स्वयंसेवका पर्यंत हिटलर विषयी किती प्रेम आहे ही गोष्ट
लपून राहिली नाही. जर्मनीत झालेला हिटलरचा उदय आणि भारतात झालेला मोदींचा उदय याचा
जर आपण अभ्यास केला तर मोदींवर हिटलरचा किती प्रभाव आहे आणि हिटलरच्या बारीकसारीक
लकबी आत्मसात करून लोकशाहीतील सर्वोच्च पद मिळविण्यात कसा वापर केला आहे हे लक्षात
येईल. त्याचमुळे इंदिरा गांधीवर टीका करण्याच्या हेतूने का होईना हिटलरचे खरे रूप
लोकांसमोर ठेवण्याला महत्व आहे. कारण खुद्द जर्मनीत आणि जगात हिटलरचा धिक्कार होत
असताना भारतात मात्र त्याचे कौतुक होत होते आणि संघजन असे कौतुक करण्यात आघाडीवर
होते आणि आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेना बनविण्यात नेताजी
सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची मदत घेतली असली तरी हिटलरचे कौतुक जसे संघजन करतात
तसे कधीच केले नाही. गांधीशी तीव्र मतभेद असतानाही नेताजींनी कायम गांधी-नेहरूचेच
कौतुक केले. संघाचे तसे नाही. संघाला हिटलर बद्दल प्रेम आहे आणि ते कधी लपविलेही
नाही. आणीबाणीच्या निमित्ताने इंदिरा गांधीवर टीका करण्यासाठी हिटलर हा लोकशाहीचा
कर्दनकाळ होता हे संघाच्या मुशीतून तयार झालेले मोदी आणि जेटली म्हणत असतील तर
त्याचे स्वागतच केले पाहिजे. इंदिरा गांधीनी सत्ता टिकविण्यासाठी लोकशाहीची तोडमोड
केली हे खरे पण त्यांनी हिटलर सारखी कृती केली असती तर इंदिरा गांधी आणि हिटलर
यांची तुलना करायला या जगात त्याकाळी इंदिरा गांधीना विरोध करणारे जिवंत राहिलेच
नसते.
जगात हिटलर कशासाठी ओळखल्या
जातो आणि संघा सारखे थोडे अपवाद वगळले तर जगात सर्व थरातून हिटलरचा धिक्कार का
होतो हे समजून घेतले तर इंदिरा गांधी – हिटलर तुलना कशी चुकीची आहे हे लक्षात
येईल. अशी तुलना करताना जेटली यांनी एक संदर्भ घटनादुरुस्तीचा दिला आहे. इथे एक
लक्षात घेतले पाहिजे कि एकहाती सत्ता ताब्यात घेण्यासाठी हिटलरने घटना दुरुस्तीचा घाट
घातला होता. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक बहुमत असावे या हेतूने त्याने विरोधकांना
तुरुंगातच डांबले नाही तर अनेकांना यमसदनी पाठविले. इंदिरा गांधीच्या हाती आधीच
सत्ता एकवटली होती. सत्तेवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना घटनादुरुस्तीची
आवश्यकता नव्हती. मुख्य म्हणजे घटनादुरुस्ती करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात
डांबण्याची इंदिरा गांधीना हिटलर सारखी गरजच नव्हती. ज्या ४२ व्या घटनादुरुस्तीचा
जेटली संदर्भ देत आहेत ती आणीबाणीत ५ व्या लोकसभेत झाली. ५ व्या लोकसभेतील पक्षीय
बलाबल लक्षात घेतले तर लोकसभेत घटनादुरुस्ती करण्याइतके समर्थन इंदिरा गांधीना
होते. ५ व्या लोकसभेत कॉंग्रेसचे ३५२ सदस्य होते आणि इंदिरा गांधी व आणीबाणीचे
हिरीरीने सक्रीय समर्थन करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षा(सीपीआय)चे २३ सदस्य
होते. हे संख्याबळ कोणत्याही घटनादुरुस्तीसाठी पुरेसे होते. इंदिरा गांधी व
आणीबाणीला विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक, जनसंघ आणि संघटना
कॉंग्रेस याच पक्षांकडे अनुक्रमे २५,२३,२२ आणि १६ अशी दोन आकडी सदस्यसंख्या होती.
हे पक्ष पूर्ण संख्येने संसदेत हजर राहिले असते तरी त्यांना घटनादुरुस्ती हाणून पाडता
आली नसती. इंदिरा गांधीनी या पक्षातील अनेक संसद सदस्यांना तुरुंगात टाकले ही तर
वस्तुस्थिती आहे . पण त्यांना तुरुंगात टाकून सोयीची घटनादुरुस्ती करून घेतली या
आरोपात तथ्य नाही. अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधीची लोकसभेवरील निवड तांत्रिक
कारणाने अवैध ठरविली होती म्हणून इंदिरा गांधीनी राजीनामा दिला पाहिजे ही
विरोधकांची मागणी होती. २५ जून रोजी रामलीला मैदानात झालेल्या सभेत जयप्रकाश
नारायण यांनी इंदिरा गांधीच्या राजीनाम्यासाठी २६ जून पासून प्रत्येक जिल्हा
मुख्यालयात आंदोलन करण्याची घोषणा केली होती. हे आंदोलन होवू नये यासाठी २५
जूनच्या रात्रीच इंदिरा गांधीनी आणीबाणी जाहीर करत जयप्रकाश नारायण यांच्यासहित विरोधी
पक्ष नेत्यांची, विरोधी संसद सदस्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. या धरपकडीचा
कोणत्याही अर्थाने घटनादुरुस्ती करण्याशी संबंध जोडता येत नाही. आणीबाणीत स्व-संरक्षणासाठी
जी ४२ वी घटनादुरुस्ती इंदिराजींनी केली तीचा अंमलच जानेवारी १९७७ पासून सुरु झाला
आणि तेव्हाच इंदिरा गांधीनी निवडणुका घेण्याची घोषणा केली आणि त्या निवडणुकीत
पराभूत झाल्याने त्यांनी सत्ता सोडली. सत्तेत राहण्यासाठी त्यांना ४२ व्या
घटनादुरुस्तीचा उपयोग झाला नाही हे लक्षात घेतले तर घटनादुरुस्ती संदर्भात हिटलरशी
केलेली तुलना पूर्णपणे गैरलागू ठरते. मुळात हिटलरला त्याने केलेल्या घटनादुरुस्ती
संदर्भात फारसे कोणी ओळखत नाही. सत्ता ताब्यात घेतल्या नंतर त्याने केलेल्या
कृतीमुळे जग त्याला ओळखते. ज्या कारणासाठी जग हिटलरला ओळखते ती कारणे लक्षात घेतली
तर इंदिरा गांधी आणि हिटलर यांची तुलना किती गैर आहे हे लक्षात येईल.
हिटलरने विरोधकांना तुरुंगात डांबून तुरुंगातील
नियमाप्रमाणे वागविले नाही तर तुरुंगाचे रुपांतर यातना शिबिरात केले. यातना देवून
विरोधकांचे जीव घेतले. आर्यवंशीय प्रभुत्वाच्या वेडगळ कल्पनेने झपाटलेल्या हिटलरला
अन्य वंशीय लोक जगण्याच्या लायकीचे वाटत नव्हते म्हणून मारून टाकण्यात आले. जिवंत
राहिले त्यांना दुय्यम माणूस आणि नागरिक म्हणून हीन वागणूक मिळाली. हिटलरने ५.५
दशलक्ष ज्यू लोकांचा छळ करून मारले. आर्यवंशीय नसलेल्या लाखोंना कंठस्नान घातले.
या कामी त्याला अधिकृत पोलीस नाही तर त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांची मदत झाली. हिटलरने
सत्ता बळकाविण्यासाठी संविधानाचा वापर केला. सत्ता बळकावल्या नंतर संविधान , कायदे
, नियम सगळे काही धाब्यावर बसवून काम केले. आणीबाणीत इंदिराजींनी जे केले ते
पूर्णत: चुकीचे होते पण जे केले ते कायद्याच्या चौकटीत राहून केले. पोलीस यंत्रणे
बाहेरच्या लोकांनी – इंदिरा समर्थकांनी – इंदिरा आणि आणीबाणीच्या विरोधकांच्या
केसालाही धक्का लावला नाही. पोलिसांनी इंदिरा व आणीबाणीचा विरोध करणाऱ्यांना तुरुंगात
टाकले पण कोणाचा छळ केला नाही. आणीबाणीत आणीबाणीचा विरोधक म्हणून मलाही तुरुंगात
जावे लागले. अटक झाल्या नंतर एक महिना पोलीस कोठडीत होतो. पोलिसांना जी चौकशी
करायची होती ती सौजन्याने केली. कुठेही पोलिसी खाक्या दाखविण्यात आला नाही. अपवादात्मक
छळाच्या घटना घडल्या असतील . पण छळ करण्याचे पोलिसांचे व सरकारचे धोरण नव्हते.
अनेक लोकांना विशेषत: संघाच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांना जे कधीच आणीबाणी विरुद्ध
बोलले नाही कि कोणतीही कृती केली नाही त्यांना अटक करून तुरुंगात डांबून
त्यांच्यावर अन्यायच केला मात्र इंदिराजींनी कोणत्याही राजकीय विरोधकाला संपविले
नाही. जॉर्ज फर्नांडीस यांचा अपवाद वगळता तुरुंगात राजकीय कैद्यांना वाईट वागणूक
देण्यात आली नाही. सुरुवातीच्या २-३ महिन्यात तुरुंगातील नियमांच्या काटेकोर
पालनाने थोडा त्रास सहन करावा लागला हे खरे. पण त्रास सर्वसाधारण कैद्यांसाठी जे
नियम आहेत त्याचा होता. राजकीय कैदी नावाचा प्रकार तुरुंग नियमावलीत नाही. तरीही
सुरुवातीच्या २-३ महिन्या नंतर नियमांचा बडेजाव न करता सगळ्या राजकीय कैद्यांना
चांगली आणि सन्मानाची वागणूक सुटका होई पर्यंत मिळाली. चार भिंतीच्या बाहेर
जाण्यास बंदी वगळता कोणताच जाच आणि त्रास कोणाला सहन करावा लागला नाही. अर्थात चार
भिंतीच्या बाहेर जाण्यास बंदी असणे हेच जाचक आणि त्रासाचे होतेच. पण म्हणून
कोणत्याही अंगाने इंदिरा गांधीची तुलना हिटलरशी होवू शकत नाही. आणीबाणीसाठी इंदिरा
गांधी नक्कीच टीकेस पात्र आहेत पण टीका ज्या चुका केल्यात त्यावरच व्हायला हवी.
इंदिरा गांधीनी आणीबाणीची
जशी चूक केली तशी ती चूक सुधारली देखील. घटना दुरुस्ती करून संसदेची मुदत वाढवून
घेतली असतानाही वेळेत निवडणुका घेतल्या आणि पराभूत झाल्यावर कोणतीही खळखळ न करता
त्यांनी सत्ता सोडली. जनतेने त्यांच्या चुकीची त्यांना शिक्षाही दिली आणि माफही
केले. असा प्रसंग राष्ट्र जीवनात पुन्हा येवू नये यासाठी आणीबाणीचे स्मरण आणि
टीकाही व्हावीच, पण जी आणखी एक मोठी चूक इंदिरा गांधीनी केली आणि शेवट पर्यंत
सुधारली नाही त्यावर अधिक मंथन व्हायला हवे. पण तसे होत नाही. इंदिराजींची ही चूक
सगळेच पक्ष अंगिकारू लागल्याने लोकशाहीला आणीबाणी पेक्षाही मोठा धोका निर्माण झाला
आहे. कॉंग्रेस पक्षाला बटिक बनविण्याची मोठी चूक इंदिरा गांधीनी केली. पक्षाचे
स्वतंत्र अस्तित्व, पक्षनेते आणि कार्यकर्ते यांचा सन्मान धुळीला मिळविला.
त्यामुळे जी राजकीय व्यवस्था तयार झाली त्या व्यवस्थेत एक बलदंड सर्वोच्च नेता आणि
त्याच्या मागे जाणारी जनता एवढेच उरले. लोकशाहीसाठी अशी राजकीय व्यवस्था घातक आहे
आणि अशा घातक व्यवस्थेची सुरुवात इंदिराजी पासून झाली. कॉंग्रेसची आज जी अवस्था
झाली याची बीजे इंदिराजीच्या कृतीत दडली आहेत. एका पक्षाची अशी अवस्था झाली तर फार
बिघडण्या सारखे नव्हते. पण इंदिराजींनी कॉंग्रेसचे जे केले तेच इतर नेते आपापल्या
पक्षात करू लागल्याने लोकशाही बद्दल चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. काही काळ
भारतीय जनता पक्षाने या रोगापासून स्वत:ला दूर ठेवले होते. सत्ता हाती असताना
बाजपेयी यांना प्रत्येक गोष्ट मनासारखी करता आली नाही. पक्षातील इतर नेत्यांचे
म्हणणे ऐकणे त्यांना भाग पडले होते. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपद सोडावे हे मत
त्यांना इतर नेत्यांनी विरोध केल्यामुळे सोडावे लागले होते. तसेच काश्मीर प्रश्न
सोडविण्यासाठी मुशर्रफ यांच्या सोबत करावयाच्या करारातून पक्षनेत्यांनी विरोध
केल्याने ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. पण आज त्याच भारतीय जनता पक्षाची स्थिती
कॉंग्रेस सारखी झाली आहे. कॉंग्रेस मध्ये नेतृत्वाविरुद्ध तोंड उघडता येत नाही तीच
स्थिती बीजेपीत आहे. ज्या पक्षात आणीबाणी आहे तो पक्ष लोकशाही संवर्धनासाठी समर्थ
असू शकत नाही. ती आणीबाणी आली आणि गेली . पक्षोपक्षांची अंतर्गत आणीबाणी मात्र
सुरूच आहे. आज लोकशाहीला धोका त्या आणीबाणी पासून नसून या आणीबाणी पासून आहे.
--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment