Friday, June 8, 2018

संघाच्या करणी आणि कथनीतील अंतर

न्यूज चैनेल्सच्या भाषेत बोलायचे झाले तर एवढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत दोन मोठे खुलासे आले आहेत. एक खुलासा तर स्वत: सरसंघचालक भागवत यांनी संघप्रशिक्षणवर्गाच्या समारोप कार्यक्रमात केला आहे. तर दुसरा खुलासा कोब्रापोस्टने माध्यमांच्या केलेल्या स्टिंग मधून झाला आहे. संघाने अंतर्मुख होवून गांभीर्याने विचार केला पाहिजे असे हे खुलासे आहेत.
-----------------------------------------------------


एवढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत दोन मोठे खुलासे झाले. एक खुलासा तर वाजत गाजत स्वत: संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे उपस्थितीत केला. निमित्त होते संघप्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे. या समारोपाला आजीवन काँग्रेसी राहिलेले आणि गांधी-नेहरू विचारावर निष्ठा असणारे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असल्याने या कार्यक्रमाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. मोदी सरकार आल्यानंतर संघाला देखील अच्छे दिन आलेत आणि संघाची कुठली बातमी चुकता कामा नये याबाबत माध्यमे विशेष जागरूकता दाखवू लागलीत. अशा कार्यक्रमाचे सर्व चैनेल्सवर लाइव्ह प्रक्षेपण देखील होवू लागले. त्यामुळे या कार्यक्रमात जे काही बोलले गेले त्याला व्यापक प्रसिद्धी मिळणार होती आणि तशी ती मिळाली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रणव मुखर्जी काय बोलतात इकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी त्या आधी सरसंघचालक काय बोलतात इकडे कोणाचे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. संघाच्या बाबतीत त्यांनी नवे काय सांगितले याचा विचार करण्यापूर्वी ज्या दुसऱ्या खुलाशाचा उल्लेख केला त्याबद्दल आधी खुलासा करतो. ज्याला मी दुसरा खुलासा म्हणतो त्याची चर्चा सोशल मेडीयावर जास्त आणि मुख्यप्रवाहातील प्रसिद्धी माध्यमात कमी झाली. त्यामुळे सरसंघचालकानी संघा बद्दल केलेला खुलासा जसा सर्वत्र प्रचारित झाला तसे दुसऱ्या खुलाशा बद्दल झाले नाही. सोशल मेडीयावर दुसऱ्या खुलाशाची जी चर्चा झाली ती देखील अर्धवट आणि वरवरची झाली. त्यामुळे त्यातील मर्म फारसे लक्षात आले नाही. कदाचित त्या खुलाशाचा खुलासा प्रथमच या स्तंभामधून होत असावा. हा दुसरा खुलासा भारतातील प्रसिद्धीमाध्यमा बाबत म्हणून ओळखला जातो आणि त्याची तशीच चर्चा झाली आहे. कोब्रापोस्ट या वेबपोर्टलच्या प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये अत्यंत प्रतिष्ठीत आणि मोठी समजली जाणारी माध्यमे सत्ताधाऱ्याच्या घरी कसे पाणी भरतात आणि पैशासाठी सर्व नितीमत्ता धाब्यावर बसवून काहीपण प्रसिद्ध करायला तयार होतात हे दिसले. कोब्रापोस्टच्या प्रतिनिधीला माध्यमांचीच पोलखोल करायची होती आणि तशी ती यशस्वीपणे झाली. माध्यमांची पोलखोल म्हणूनच या सगळ्या स्टिंगकडे पाहिले गेले. यातून आणखी एक पोलखोल झाली आणि ती फार महत्वाची असली तरी त्याकडे कोणाचेच कसे लक्ष गेले नाही याचे नवल वाटते. कोब्रापोस्टच्या स्टिंग मधून माध्यमांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीचेही स्टिंग झाले आणि यावर संघासह कोणी काही बोललेले नाही. या स्टिंग मधून संघाच्या कार्यप्रणाली बाबत काय खुलासा झाला ते पाहण्या आधी सरसंघचालक भागवत यांनी संघाबद्दल नवा काय खुलासा केला ते पाहू.


संघप्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आधी बोलताना सरसंघचालक यांनी संघ हे केवळ हिंदूंचे संघटन असल्याचा इन्कार केला. संघाचा उद्देश्य केवळ हिंदुना संघटीत करणे नसून सर्व समाजाला संघटीत करण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व समाजाला संघटीत करण्याची गोष्ट करताना समाजात विविध जाती ,धर्म आणि पंथाचे लोक आहेत, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आहे हे त्यांनी मान्य केले आणि ती विविधता अबाधित ठेवून सर्व समाजाला संघटीत करण्याबद्दल ते बोलले. आजवरच्या संघाच्या भाषे पेक्षा ही वेगळी भाषा आहे . एवढेच नाही तर संघप्रमुख म्हणून भागवत आजवर जे बोलत आले त्यापेक्षाही हे वेगळे आहे. हिंदू ही सांस्कृतिक संकल्पना असून या संस्कृतीत राहणारे सगळे हिंदू अशी संघाची प्रकट धारणा आहे. भारतात ज्या धर्मांचा जन्म झाला ते भारतीय आणि परकीय भूमीत जन्म झाला ते परकीय धर्म अशी संघाची विभागणी आहे. त्यामुळे जे परकीय धर्माचा अवलंब करतात ते परकीय अशी आपोआप विभागणी होते. यातूनच मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजाकडे परकीय म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित झाली आहे. त्यांच्या बद्दलची अविश्वासाची भावना रुजण्यास आणि वाढण्यास बऱ्याच अंशी संघाची ही विचारसरणी कारणीभूत झाली आहे. या मांडणीला छेद देत भागवतांनी जे जे भारतात जन्मले ते भारतीय आणि या सर्वांचे भारताप्रती समान कर्तव्य असल्याचे नव्याने त्यांनी सांगितले. भागवत जे बोलले ते ठरवून बोलले कि त्यांचे ते प्रकट चिंतन होते हे कळायला मार्ग नाही. मात्र त्यांनी ही जी नवीन मांडणी केली त्याला संघात मान्यता आहे असे दिसत नाही. कारण ते बोलण्याआधी प्रास्ताविकात संघकार्यकर्ते बोलले त्यात हिंदूंचे संघटन , हिंदूराष्ट्र हीच जुनी भाषा होती. भागवत म्हणतात तसे संघ सर्व समाजाचे संघटन करण्यास कटिबद्ध असेल तर ही भाषा आणि धारणा बदलायला हवी होती. संघाला १९७७-७८ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संघ सर्व धर्मीयांसाठी खुला करण्याचे आवाहन केले होते. संघाला सर्व समाजाचे संघटन करायचे असेल तर संघाचे द्वार सर्वधर्मीयांसाठी खुले झाल्याशिवाय ते होणार नाही. तसे करण्याचे जयप्रकाश नारायण यांचे आवाहन तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी फेटाळले होते. जाती,धर्म,पंथ विचारात न घेता सर्व समाजाला संघटीत करण्यास संघ कटिबद्ध असल्याचे सरसंघचालक गंभीरपणे म्हणत असतील तर त्यांनी संघाचे दरवाजे सर्व धर्मीयांसाठी उघडले पाहिजेत. तसे होणार नसेल तर संघाची कथनी आणि करणी वेगळी आहे असाच अर्थ होईल.


संघ दहशतवादी नसून उदारमतवादी आहे हे सांगण्याचा प्रयत्न भागवतांनी आपल्या भाषणातून केला. संघाच्या उदारमतवादाचा भाग म्हणूनच माजीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केले तसे भिन्न आणि विरोधी विचाराच्या लोकांना आमंत्रित करीत असतो हे त्यांनी सांगितले. भिन्न किंवा विरोधी विचाराचे लोक संघाच्या कार्यक्रमात बोलावले जातात , पाहुणे म्हणून त्यांना योग्य तो मान दिला जातो हे खरे आहे. प्रश्न त्यांच्या विचारांना किती मान दिला जातो याचा आहे. आजवर अनेक दिग्गज आले , बोलले आणि गेले. संघाच्या विचारसरणीत आणि कार्यपद्धतीत कोणामुळे काही किंचित बदल झाला असे चित्र नाही. आम्हाला जे बोलायचे ते आम्ही बोलतो आणि तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही बोला असा दृष्टीकोन असेल तर भूमिका आणि विचार बदलण्यास वाव असत नाही. हे हे लोक संघात येवून गेलेत अशी मोठी यादी तयार करणे आणि ती समाजात सांगत राहणे या पलीकडे अशा उपक्रमाचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. संघ समजण्यास मदत व्हावी म्हणून संघाच्या परिघा बाहेरच्या लोकांना आमंत्रित करतो , समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो असा संघाचा नेहमीच दावा राहिला आहे. अशा औपचारिक कार्यक्रमातून दिसते ती फक्त शिस्त. शिस्ती पलीकडे संघ कळत नाही. संघ कळतो तो औपचारिक कार्यक्रमांच्या बाहेरच. संघा बद्दलच्या काही एक धारणा समाजात पसरल्या आहेत. या धारणा संघाच्या अनुकूलही आहेत आणि प्रतिकूलही. अनुकूल धारणा अर्थातच संघाकडून प्रसारित झालेल्या असणार आणि प्रतिकूल धारणा संघविरोधकांनी प्रसारित केल्या असणार. त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल धारणा तितक्या विश्वासार्ह मानता येणार नाही. आणि म्हणून संघ समजून घ्यायला वर सांगितलेल्या स्टिंग ऑपरेशनचा चांगला उपयोग होवू शकतो. या स्टिंग मधून संघा बद्दलचा जो समज पुढे आला तो खरा की खोटा यावर भाष्य न करता असा समज कसा निर्माण झाला याचा सर्व संघजनानी गंभीरपणे विचार केला पाहिजे. संघ समाजाला जबाबदार आहे असे मानत असेल तर त्याबद्दल जाहीरपणे बोलले देखील पाहिजे. काय आहे हा समज. समज संघा बद्दल गंभीर चिंता आणि प्रश्न निर्माण करणारा आहे.


काय आहे हे स्टिंग ? आधी सांगितल्या प्रमाणे माध्यमे पैसे घेवून काय काय करू शकतात हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता. मग याचा संघाशी काय संबंध हा प्रश्न उपस्थित होईल. तर ज्याने हे स्टिंग केले त्याने स्वत:ला आरेसेस आणि भाजपच्या आतल्या गोटातील माणूस म्हणून स्वत:ला पेश केले. भाजपला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी माध्यमांनी काय केले पाहिजे आणि त्यासाठी किती पैसे मिळतील याची झालेली सौदेबाजी या स्टिंग मधून उघड होते. स्टिंग करणाराने स्वत:ला आरेसेसचा पदाधिकारी म्हणून दाखविले नाही हे खरे आहे पण आपण आरेसेसच्या वतीने या मोहिमेवर आहे हे त्याने यशस्वीरीत्या समोरच्यावर बिंबविले. हे समोरचे कोण होते ? तर देशातील प्रमुख ३६ माध्यमांचे मध्यामाचार्य होते. प्रत्येकाचे आपल्या क्षेत्रात नाव आणि स्थान असलेले हे लोक होते. कोणी पत्रकार होते. कोणी संपादक होते. कोणी जाहिरात विभाग सांभाळणारे होते. कोणी कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक होते. कोणी माध्यमाचे मालक होते. ही सगळीच नावाजलेली मंडळी होती. अशा लोकांसमोर संघाच्या जवळचा अशी ओळख दाखविणारा व्यक्ती पैसे दाखवून जी सौदेबाजी करायला जातो त्यावर हा माणूस संघाशी संबंधित असूच शकत नाही असे एकालाही का वाटू नये याचा संघ पदाधिकाऱ्यानी तर विचार केलाच पाहिजे पण प्रत्येक  संघस्वयंसेवकाने देखील मंथन आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. कोट्यावधी रुपये देवून हा तथाकथित संघाच्या जवळचा म्हणविणारा तोतया माध्यमांना काय करायला सांगत होता तर धार्मिक ध्रुवीकरणाला चालना मिळेल अशा पद्धतीने हिंदुत्वाला बढावा द्यायला सांगत होता. निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होण्यासाठी असे धार्मिक ध्रुवीकरण कसे गरजेचे आहे हे पटवून देत होता. विरोधी पक्षातील राहुल गांधी, मायावती , अखिलेश यादव यांची खिल्ली उडविण्यासाठी करोडो रुपये मिळतील असे म्हणत होता. ज्यांच्या-ज्यांच्याशी तो बोलला त्या सगळ्यांना ते खरे वाटत होते . अशा प्रकारे धार्मिक ध्रुवीकरणाला हलका विरोध करणारे एक-दोघे निघालेत नाही असे नाही. पण बहुतेक मंडळी हे काम करायला एका पायावर तयार झाली. अनेकांनी संभाषणात कबुल केले की आपण आरेसेसचे समर्थक आहोत. भाजपची मदत करीत आलो आहोत. अशा प्रकारचे कपटी आणि नीच काम देशभक्तांची संघटना करूच शकत नाही असे कोणाच्याच मनात का आले नाही हा खरा प्रश्न आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करतो की माध्यमांना असे करायला कोणत्याही आरेसेसच्या स्वयंसेवकाने किंवा पदाधिकाऱ्याने सांगितले नाही. त्यामुळे यात आरेसेसचा सहभाग किंवा दोष आहे असे नाही. माझा प्रश्न वेगळा आहे. स्वत:ला आरेसेसचे समर्थक आणि सहानुभूतीदार म्हणविणारे माध्यामाचार्य संघाचे अशा प्रकारचे कार्य आणि कार्यपद्धती असू शकते यावर कसा विश्वास ठेवू शकतात. यापैकी कोणीही संघ विरोधकाच्या अपप्रचाराला भुलणारा किंवा बळी जाणारा नाही. उलट यांच्या अपप्रचाराला सामान्यजन बळी जात असतात. विरोधकांच्या संघाबद्दलच्या अशा धारणा आहेत. विरोधक विरोधासाठी काहीपण कुभांड रचू शकतात हे मान्य करता येईल. हा तोतया ज्यांना ज्यांना भेटला त्यात संघ विरोधक किंवा भाजपचा  राजकीय विरोधक कोणी नाही. उलट हे सगळे लोक भाजप पुन्हा निवडून येण्यासाठी पैसा मिळत असेल तर कोणत्याही थराला जावून काम करण्याची तयारी दर्शविलेले हे लोक आहेत. ही सगळी माध्यमे नोटबंदीचे समर्थन करणारी आणि त्यामुळे काळा पैसा नाहीसा झाला अशी प्रचार करणारी होती. अशा माध्यमांच्या माध्यमाचार्याचा संघपरिवाराकडे एवढा काळा पैसा असावा यावर चटकन विश्वास बसावा आणि ते काळ्या पैशाच्या रुपात पैसे घ्यायला तयार व्हावेत हा सगळाच प्रकार संभ्रमात टाकणारा आणि चिंता निर्माण करणारा आहे. माणूस संघाचा नव्हता म्हणून संघ खुलासा करायला बांधील नाही असे जरूर म्हणता येईल. पण समाजाच्या उच्चभ्रू , बुद्धीजीवी आणि समाजमत घडविणाऱ्या वर्गात संघाबद्दल अशा धारणा असतील तर हा केवळ संघासाठी नाही तर देशासाठी चिंतेचा विषय आहे. सरसंघचालक भागवत संघप्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात जे बोलले त्याच्या विपरीत या धारणा आहेत आणि संघसमर्थक म्हणविणाऱ्याच्या या धारणा आहेत. संघाचे बोलणे एक आणि कृती दुसरी असा जर यातून समज निर्माण होत असेल तर दोष कोणाचा हा प्रश्न निर्माण होतो.


संघाच्या करणी आणि कथनीतील फरका बद्दल आजच प्रश्न निर्माण झाला अशातला भाग नाही. स्वातंत्र्य मिळाल्या पासूनच हा प्रश्न चर्चेत आहे. स्वातंत्र्यापूर्वीची संघाची भूमिका अमान्य किंवा चुकीची असू शकते पण त्यात कथनी आणि करणीतील अंतराचा आरोप करता येणार नाही. हेडगेवार कॉंग्रेसच्या कार्यक्रमात सामील झाल्याचा भागवतांनी केलेला उल्लेख चुकीचा नाही. पण ते व्यक्ती म्हणून सामील झाले होते. संघाने स्वातंत्र्य चळवळीत सामील होवू नये हीच हेडगेवारांची भूमिका होती आणि शेवटपर्यंत संघ त्या चळवळीत सामील झाला नाही. वंदे मातरम म्हणत लोक जेव्हा इंग्रजांच्या लाठ्या,गोळ्या खात होते तेव्हा त्यात संघ कधी सामील  नव्हता. पण ती चुकीची वाटली तरी संघाची अधिकृत भूमिका होती आणि त्या भूमिकेचे संघाने पालन केले. ते करणी आणि कथनी मधील अंतर नव्हते. ते अंतर स्वातंत्र्या नंतर सुरु झाले. गांधीहत्ये नंतर संघावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यासाठी मध्यस्था मार्फत तत्कालीन संघप्रमुख गोळवलकर गुरुजी यांनी गृहमंत्री सरदार पटेल यांच्याशी जो करार केला त्याचे संघाने गांभीर्याने पालन केले असे दिसत नाही. १२ जुलै १९४९ च्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात या कराराचे ठळक आणि विस्ताराने वर्णन आलेले आहे. सरदार पटेलांच्या गृहमंत्रालयाची प्रेसनोट देखील त्या दिवशीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या करारानुसार संघाने स्वत:ची घटना मान्य करून त्यानुसार काम करणे , राज्यघटना मान्य करणे आणि राष्ट्रध्वज मान्य करून त्याचा आदर करणे ही महत्वाची अट होती. राज्यघटना आणि राष्ट्रध्वज याला गोळवलकर गुरुजीच्या नेतृत्वाखालील संघाचा उघड विरोध असल्याने या अटीचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय संघ सांस्कृतिक संघटना म्हणूनच कार्य करील आणि कोणत्याही प्रकारे राजकारणाशी संबंध ठेवणार नाही या अटीचा करारात समावेश होता. बंदी उठविण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी या अटी मान्य केल्या तरी शेवटपर्यंत ते राज्यघटनेला आणि राष्ट्रध्वजाला मुखर विरोध करीत राहिले. मात्र राजकारणापासून त्यांनी संघाला बरेचशे अलिप्त ठेवले. गोळवलकर गुरुजी इतका राज्यघटनेचा आणि राष्ट्रध्वजाचा मुखर विरोध नंतरच्या सरसंघचालकांनी केला नाही हे खरे. पण अधूनमधून दबक्या आवाजात आजही राज्यघटनेला विरोध असल्याचे सूचित करणारे वक्तव्य येतच असते. संघमुख्यालयात राष्ट्रध्वज फडकण्यासाठी तर ५२ वर्ष इतकी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. राजकारणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज संघ राजकारणात आकंठ बुडाल्याचे दिसत आहे. मोदी सरकारचे समर्थन आणि मोदींना पुन्हा निवडून आणणे हेच संघाचे जीवनकार्य बनले की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. भाजपच्या राजकारणात आणि धोरणात अंतिम शब्द संघाचा असतो हे आता लपून राहिले नाही. लोकशाही मध्ये राजकारण करण्याचा राजकारणात येण्याचा हक्क प्रत्येक व्यक्ती आणि संघटनेला आहे. तो आम्ही बजावणारच असे संघाने छातीठोकपणे सांगायला पाहिजे. सांस्कृतिक संघटनेचा बुरखा पांघरून राजकारण करणे हे संघाच्या करणी आणि कथनीतील अंतर दर्शविणारे आहे. संघाच्या करणी आणि कथनीतील अंतरच संघ समजण्यातील प्रमुख अडथळा आहे हे संघाने लक्षात घेवून करणी आणि कथनीतील अंतर मिटविले पाहिजे. बाहेरच्यांना कार्यक्रमांना बोलावून संघा बद्दलचे समज-गैरसमज दूर होणार नाहीत. संघ पारदर्शक असण्याची गरज आहे.

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल -- ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------


No comments:

Post a Comment