Thursday, December 13, 2018

राजकीय समीकरण बदलवणारे निवडणूक निकाल

गुजरात आणि कर्नाटकच्या निवडणुकीने मोदी-शाह यांच्या निवडणूक जिंकून देण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राजस्थान, म.प्र. व छत्तीसगड निवडणुकीने हे प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
-------------------------------------------------------------------------------

निवडणुकीला सामोरे गेलेल्या ५ राज्यांपैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन प्रदेशातील विधानसभा निवडणूकांचे भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षासाठी अनन्य साधारण महत्व होते. इथे प्रामुख्याने या दोन पक्षात सरळ लढत असल्याने लोकसभा निवडणुकीत हे पक्ष किती ताकदीने एकमेकांसमोर उभे राहू शकतात याचा अंदाज येणार होता. या तीन राज्यात लोकसभेच्या ६५ जागा आहेत आणि सध्या ६२ जागा भाजपच्या ताब्यात असल्याने लोकसभेचा अंदाज येण्याच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या. भाजपच्या दृष्टीने या निवडणुकीचा उपयोग कॉंग्रेसचे आणखी खच्चीकरण करून राहुल गांधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करूच शकत नाही हे दर्शविण्या पुरता मर्यादित होता. काही महिन्यापूर्वी राजस्थानात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मार खाल्ला असल्याने राजस्थानचीच थोडीशी काळजी होती. पक्षाचा मोदींच्या प्रभावी प्रचारावर आणि पक्षाध्यक्ष अमित शाहच्या सूक्ष्म नियोजनावर भरवसा असल्याने राजस्थान मध्ये सुद्धा ही जोडी विजय मिळवील याची पक्षाला खात्री होती. राजस्थान व छत्तीसगड मधील विजयाबद्दल भाजपला १०० टक्के खात्री होती. राजकीय विश्लेषक व प्रसार माध्यमे ही खात्री चुकीची नसल्याचे सांगत होते. सर्वेक्षण आणि सट्टा भाजपचे पारडे जड असल्याची ग्वाही देत होते.                         

निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष जिंकण्याचा दावा करतात तसा दावा करण्या पलीकडे कॉंग्रेस जवळ ठोस सांगण्या सारखे काही नव्हते. भाजप आणि बरेच राजकीय विश्लेषक या विधानसभा निवडणुकांचे निकालच कॉंग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील आव्हान संपुष्टात आणेल याची खात्री देत होते. या पार्श्वभूमीवर समोर आलेले निकाल भाजपसाठी मोठा धक्का देणारे आणि अनेक राजकीय पंडीतासाठी आश्चर्यकारक ठरले. मुळात हा धक्का आणि आश्चर्य भाजपच्या प्रचाराचाच परिणाम आहे. आमचा विशेषत: नरेंद्र मोदींचा मुकाबला कोणी करू शकत नाही आणि पुढची अनेकवर्षे आमचेच राज्य राहणार आहे हे गुलाबी चित्र उभे करण्यासाठी माध्यमांना हाताशी घेवून जो प्रचार केला गेला त्याने भाजप कार्यकर्ते स्वत:च प्रभावित झालेत. मोदी आणि शाह त्यांना खरोखरच अवतार पुरुष वाटू लागले. आपले नेतृत्व अजेय असल्याच्या भावनेने ते एवढे प्रभावित होते कि पुढे काय वाढून ठेवले आहे हेच त्यांना दिसेनासे झाले. म्हणूनच हे निकाल भाजपसाठी , त्याच्या कार्यकर्त्यासाठी पचायला जड जात आहे. खरे तर प्रधानमंत्री मोदी आणि भाजपसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याचे संकेत बरेच आधीपासून मिळत होते. जे या स्तंभाचे नियमित वाचक आहेत त्यांना या संदर्भात काही लेखामधून केलेली चर्चा आठवत असेल त्यांना या विधानसभा निवडणूक निकालाचे आश्चर्य वाटणार नाही.

याची सुरुवातच गुजरात विधानसभा निवडणुकी पासून झाली होती. याच स्तंभात ‘अजेयतेची कवचकुंडले गुजरातने हिरावली’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात मी म्हंटले होते, ”आज पर्यंतच्या विजय मालिकांनी मोदींचा पराभव करणारा समर्थ नेताच अस्तित्वात नाही अशी जी धारणा बनली होती त्या धारणेला तडा देणारा भाजपचा गुजरात विजय ठरला ! एकप्रकारे हवेत चाललेला मोदीजींचा विजय रथ गुजरातच्या मतदारांनी जमिनीवर टेकवला. गुजरातच्या जनतेने आपल्या माणसाचापराभव केला नाही पण पराभव शक्य आहे हे दाखवून दिले. आकड्यांच्या पलीकडे गुजरात निवडणुक निकालाने जो चमत्कार केला तो हाच आहे. हा चमत्कारच भविष्यातील राजकारणावर प्रभाव टाकणारा आणि राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार आहे. ज्याला इंग्रजीत गेम चेंजरम्हणतात तो अर्थ सार्थ करणारा गुजरातचा निवडणूक निकाल आहे. .” भाजपला सावध करणारा हा निकाल होता. सावध व्हायचे म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी मोदीजीवर विसंबून चालणार नाही असे मानावे लागले असते. असे मानणे ना कार्यकर्त्यांच्या सोयीचे होते ना नेत्यांच्या. त्यामुळे गुजरातचा संदेश दुर्लक्षिला गेला. त्यानंतरच्या त्रिपुरा विजयाने तर कार्यकर्ते हुरळूनच गेले. जिथून लोकसभेचे फक्त २ खासदार येतात त्या विजयाचे एवढे ढोल बडविण्यामागे गुजरात विसरले जावे हे कारण देखील असू शकते. पण नंतरच्या कर्नाटक निवडणुकीने गुजरात सारखाच संदेश अधिक ठळकपणे दिला.

१९७८ नंतर कर्नाटकात राजस्थान प्रमाणेच दर पाच वर्षांनी सरकार बदलत आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सत्ता काबीज करणे निवडणूक जिंकण्याच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध असलेल्या मोदी-शाह या जोडीला अवघड नव्हते. तिथे बहुमत मिळविता आले नाही. तरीही सरकार बनविण्याच्या अट्टाहासाने भाजप नेतृत्वाने स्वत:चे हसे करून घेतले. एवढे होवूनही नेतृत्वाचे अपयश पक्षाला खटकले नाही. नेतृत्वावरचा आंधळा विश्वासच आत्ता निवडणूक झालेल्या भाजपशासित राज्यात बसलेल्या दणक्याला कारणीभूत आहे. मोदी-शाह यांचे भोवती विजयाचे वलय निर्माण करतांना एक गोष्ट सोयीस्कर विसरल्या गेली. विरोधी पक्षांची सरकारे सहज ताब्यात आली पण स्वत:च्या ताब्यातील सरकार कायम राखण्यात या जोडीची दमछाक झाली. गोव्यात सरकार बनले तरी निवडणुकीत पराभवच झाला होता. पंजाब राखता आले नाही आणि गुजरात कसेबसे राखता आले. पहिल्यांदा स्वत:च्या ताब्यातील मोठी राज्ये राखण्याची वेळ आली तर मोदी-शाह जोडी सपशेल अपयशी ठरली. ताज्या विधानसभा निकालाने मोदी-शाह केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यास समर्थ आहेत का याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. या निकालाचे काय परिणाम होवू शकतात याचा आढावा पुढच्या लेखात.
---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८


No comments:

Post a Comment