Sunday, December 23, 2018

सत्ताधारी आणि विरोधकांनी शिकण्यासारखे बरेच काही


२०१४ ची निवडणूक मोदीजीनी एकहाती जिंकून दिली असली तरी २०१९ ची निवडणूक त्यापद्धतीने जिंकून देण्याच्या स्थितीत ते नाहीत हे या निकालांनी स्पष्ट केले आहे. धृविकरणाचा त्याग आणि सामुहिक नेतृत्वाच्या पुनर्स्थापनेची गरज निवडणूक निकालाने स्पष्ट केली आहे.
---------------------------------------------------------------------------

प्रत्येक निवडणूक ही पराभूतांसाठी धडा असते. नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांनी पराभूतांसोबत विजेत्यानाही धडे दिले आहेत. अर्थात हे धडे जो अधिक विनम्र त्याला अधिक समजतील असे आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला निवडणूक निकालापासूनचे धडे शिकायला जड जाणार आहे. कारण गेल्या चार वर्षात सत्ताधारी भाजपचे वागणे चढत्या क्रमाने उन्मादी राहिले आहे. ५० वर्षापेक्षा अधिक काळ सत्तेत राहूनही कॉंग्रेसने आणीबाणीचा अपवाद वगळता सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही ती या चार वर्षात जनतेने बघितली. आणीबाणीचा मस्तवालपणा कॉंग्रेसला इतकी महाग पडली की पक्षाचे मूळ स्वरूप आणि वैभव पुन्हा कधीच प्राप्त झाले नाही. भाजपच्या बाबतीतही आता हाच धोका असल्याचे या निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे. भाजप उन्मादाच्या एवढ्या शिखरावर पोचला आहे की विनम्रतेच्या धरातलावर येवून आपण काय होतो आणि काय झालो हे समजून घेईल की नाही याबाबत शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. सिनेअभिनेता नसिरुद्दीन शाह याच्या ताज्या वक्तव्यावर पक्ष कार्यकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया या शंकेची पुष्टी करणाऱ्या आहेत. या राजवटीत असुरक्षित वाटते असे कोणाला वाटत असेल तर सत्ताधारी या नात्याने ते समजून घेवून त्याच्या मनातील भीती दूर करणे हे कर्तव्य ठरते. हे कर्तव्य पार पाडण्या ऐवजी सत्ताधारी पक्षाकडून अधिक भीती घालण्याची ४ वर्षापासून सुरु झालेली परंपरा ५ राज्याच्या निवडणुकात दणका बसूनही खंडित झालेली नाही हेच यातून सिद्ध होते. या प्रकरणात नेहमीप्रमाणे कार्यकर्ते अद्वातद्वा बोलत असले तरी नेहमी प्रमाणे भाजपच्या नेत्यांनी यावेळी आगीत तेल ओतण्याचे काम केले नाही ही जमेची बाजू आहे. भाजप नेते निवडणूक निकालातून शिकू लागलेत असा याचा अर्थ होतो.
  

केवळ प्रधानमंत्री मोदीचा करिष्मा आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे नियोजन या बळावर निवडणुका जिंकण्याचे दिवस संपले आहेत हा या निवडणुकांनी भाजपला दिलेला संदेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाणे या निवडणुकीत भाजपने चालवून पाहिले. ‘तुमचा अली, आमचा बजरंग बली’ या प्रकारची दुहीची बीजे पेरण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांना वापरले पण फायदा झाला नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केरळ मधील साबरीमला मंदिराचा वाद पेटता ठेवला होता. त्या वादाचा भाजपला केरळ मधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात जसा फायदा झाला नाही तसा विधानसभा निवडणुकात सुद्धा फायदा झाला नाही. निवडणूक प्रचार जोरात असताना संघाने मैदानात उतरून राम मंदिराचा दिलेला हुंकारही भाजपच्या कामी आला नाही. याचा अर्थ आपले नेते आणि आपला धृविकरणाचा कार्यक्रम पुढे करून भाजपला लोकसभा निवडणुका जिंकता येणार नाहीत याची आगाऊ ताकीद मतदारांनी भारतीय जनता पक्षाला दिली आहे. प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणूक जिंकण्याच्या यंत्राचे रूप दिले आहे. निर्णय प्रक्रियेत पक्ष कार्यकर्ते व पक्षाचे इतर नेते यांना स्थानच उरले नाही. पक्ष यंत्र बनला तर मेहनत खूप करेल पण मतदारांना भावनिक साद त्याला घालता येणार नाही.


भाजपमध्ये भावनिक साद घालणारा एकच नेता उरला आहे आणि तो म्हणजे प्रधानमंत्री मोदी. आणि आता याच नेत्याचा भावनिक साद लोकांच्या हृदया पर्यंत पोचत नसेल तर भाजपला लोकसभा निवडणूकीत विजय मिळविणे कठीण जाणार आहे. वेळीच पक्षाने सामुहिक नेतृत्वाकडे वळले पाहिजे आणि सामुहिक नेतृत्वाने पक्षात चैतन्य निर्माण केले तर आजच्या प्रतिकूलतेवर मात करता येईल. यापूर्वी अटलजी आणि अडवाणीजी भाजपचे सर्वोच्च आणि शक्तिशाली नेते होते. त्यांनी नेहमीच पक्षात विचार विनिमयाला आणि सामुहिक नेतृत्वाला वाव आणि स्थान दिले. याची आठवण पक्षाला आणि नेतृत्वाला या निकालांनी दिली आहे. आज शिखरस्थानी मोदी आणि शाह आहेत आणि भाजप मधून त्यांना मोठे समर्थनही आहे. पण हे समर्थन ते निवडणूक जिंकून देतात यासाठी आहे. पण आता परीस्थिती बदलल्याचे स्पष्ट संकेत विधानसभा निवडणुकीतून मिळाले आहेत. २०१४ ची निवडणूक मोदीजीनी एकहाती जिंकून दिली असली तरी २०१९ ची निवडणूक त्यापद्धतीने जिंकून देण्याच्या स्थितीत ते नाहीत हे या निकालांनी स्पष्ट केले आहे. धृविकरणाचा त्याग आणि सामुहिक नेतृत्वाच्या पुनर्स्थापनेची गरज निवडणूक निकालाने स्पष्ट केली आहे. भाजपा पुढे कशी वाटचाल करतो यावर पक्षाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.


कॉंग्रेससाठी सुद्धा मतदारांचा हाच संदेश आहे. लोकांचा भाजप आणि त्याच्या नेतृत्वाबद्द्लचा राग मतपेटीतून आजच्या पेक्षा मोठ्या स्वरुपात प्रकट होवू शकला असता. पण कॉंग्रेस खिळखिळी आणि विस्कळीत असल्याने कमी पडली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नेतृत्व विजय मिळवून देईल या आशेवर राहणे सोडून मेहनत घेतली तरच त्याला बरे दिवस येतील हे मतदानातून स्पष्ट झाले आहे. मोदीजी विरुद्ध राहुल गांधीना बळ मिळायचे असेल तर ‘असेल हरी तर देईल खाटेवरी’ या मानसिकतेतून कॉंग्रेसला बाहेर पडावे लागेल. बसपा-सपा सारख्या पक्षाच्या नेत्यानाही कॉंग्रेसला अडचणीत आणून त्यांचा फायदा होणार नाही हा धडा मिळाला आहे. यापासून धडा घेतील तेच लोकसभा निवडणुकीत यशस्वी होतील.
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८



No comments:

Post a Comment