Thursday, March 14, 2019

प्रश्नबंदी वर प्रश्न !


नौदल,तटरक्षक दल,सीमा सुरक्षा दल, लष्कर, वायुदल हे सगळे तुमच्या हाती असताना  दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र आणि दारुगोळा कसा आणि कोठून मिळतो असा सवाल मागच्या लोकसभा निवडणूक प्रचारात मोदीजींनी मनमोहनसिंग यांना विचारला होता. आज तोच प्रश्न मोदीजींना विचारला तर तो देशद्रोह ठरू लागला आहे.
----------------------------------------------------------------------------------------

   
पुलवामा घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना लोकसभा निवडणुकीचे वारे  वाहू लागले आहेत. ५ वर्षापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा सारखा मोठा आतंकवादी हल्ला झाला नसतांनाही निवडणूक प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा प्रमुख होता. कारण देशात लहान-मोठ्या आतंकवादी कारवाया घडत होत्या. या कारवाया घडत असतील तर कशामुळे घडतात असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ५ वर्षांपूर्वी आजचे प्रधानमंत्री आणि त्यावेळचे प्रधानमंत्री  पदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोदी यांनाही ५ प्रश्न पडले होते. जवळपास प्रत्येक प्रचारसभेत त्यांनी ते प्रश्न जनतेसमोर मांडले. इतर सर्व प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न अग्रक्रमाचा असल्याने जनतेसमोर प्रश्न येणे आणि त्याची चर्चा होणे योग्यच. निवडणुकीच्या तोंडावर विचारलेल्या प्रश्नाचा हेतू राजकीय नेतृत्व अक्षम असल्याचा दर्शविण्याचा असला तरी मोदीजींनी त्यावेळी विचारलेले प्रश्न महत्वाचे आणि अंतर्मुख करणारे होते. ५ वर्षानंतर पुन्हा निवडणूक प्रचार सुरु झाला आहे आणि पुलवामा हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाई नंतर राजस्थान मधील एका प्रचार सभेत मोदीजीनी देश सुरक्षित हाती असल्याची घोषणा केली. ५ वर्षांपूर्वीच्या प्रचारसभेत मोदींनी उपस्थित केलेले प्रश्न त्यांचे भाषण ऐकलेल्या-वाचलेल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत नसतील . अशा विस्मरणामुळेच वर्षानुवर्षे गरिबी हटविण्याच्या किंवा राममंदीर बनविण्याच्या घोषणेवर मतदार मतदान करीत असतो. आज राष्ट्रीय सुरक्षे संबंधी प्रश्न उपस्थित करणारा देशद्रोही ठरत असला तरी मोदीजींनी जे प्रश्न विचारले होते ते नक्कीच देशद्रोहीपणाचे नसतील त्यामुळे स्मरण करून देण्यात काही वावगे वाटू नये. 

राष्ट्रीय सुरक्षे संबंधी मोदीजींनी त्यावेळचे प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांना विचारलेले प्रश्न कोणते होते ? त्यांचा पहिला प्रश्न होता : बाहेरचे लोक देशात कसे घुसतात आणि दहशतवादी कारवाया करतात. दुसरा प्रश्न स्थानिक दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र आणि दारुगोळा कुठून मिळतो हा विचारला होता. पहिल्या दोन्ही प्रश्नाच्या संदर्भात मोदीजींना पडलेला अतिशय महत्वाचा प्रश्न होता : नौदल,तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल, लष्कर, वायुदल हे सगळे तुमच्या हातात असताना दहशतवादी कसे घुसतात आणि कारवाया करतात. चौथा: दहशतवाद्यांना परदेशातून आर्थिक मदत मिळते. सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात असताना ती मदत रोखण्यात अपयश कसे येते. पाचवा प्रश्न होता सगळी संवादयंत्रणा भारत सरकारच्या हातात असतांना दहशतवाद्यांच्या नेटवर्कची माहिती सरकारला कशी मिळत नाही. दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने मोदीजींनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे होते. मोदीजींनी उपस्थित केलेल्या प्रश्नातून तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंग आणि त्यांच्या सरकारची राष्ट्रीय सुरक्षे विषयीची अनास्था आणि अक्षमताच प्रकट होत होती. त्यामुळे देश सुरक्षित हाती नाही हे पटवायला मोदीजींना फार अडचण आली नाही. आताच्या प्रचारात ते म्हणतात देश त्यांच्या सुरक्षित हातात आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षे संबंधी त्यांनी उपस्थित केलेले पाचही प्रश्न सुटले आहेत. पण मग नवा प्रश्न उपस्थित होतो पुलवामा घडले कसे. प्रचंड विनाश घडविणारी स्फोटके एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना कशी आणि कुठून मिळाली. जागोजागी सुरक्षा चौक्या असताना स्फोटकाने भरलेली गाडी रस्त्यावर कशी येऊ शकली आणि इच्छित स्थळी पोचू शकली असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की ५ वर्षांपूर्वी मोदीजींनी उपस्थित केलेले प्रश्न आजही तसेच आहेत.

 पुलवामा घटनेने आणखी एका प्रश्नाला  किंवा शंकेला जन्म दिला आहे. एखाद्या व्यक्तीच्या हाती देश सुरक्षित असायला ही राजेशाही नाही. विविध संस्थांच्या समन्वयातून आणि प्रयत्नातून देश सुरक्षित होतो. यात लष्करा सारख्या  संस्थे इतकेच प्रधानमंत्री संस्थेचे महत्व कोणीच नाकारणार नाही. पुलवामा घटनेनंतर प्रधानमंत्री नामक संस्थेच्या (व्यक्तीच्या नव्हे) कार्यक्षमतेवर भले मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. पुलवामा घटना प्रधानमंत्री मोदींना लवकर कळली नाही ही प्रधानमंत्री नामक संस्थेची आणि सरकारची मोठीच अक्षमता दर्शविते. पुलवामा घडले तेव्हा प्रधानमंत्री फिल्म शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचा काँग्रेसचा आरोप खोटा मानला तरी हे वास्तव आहे की पुलवामा सव्वातीन वाजता घडले आणि प्रधानमंत्री त्या दिवशी कॉर्बेट नॅशनल पार्कमधून पावणेसात वाजता बाहेर पडले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही भयंकर मोठी चूक आहे. अशी चूक कशी घडली याचे उत्तर देण्याऐवजी असा प्रश्न विचारणारे पाकिस्तानला मदत करीत आहेत असा आरोप करून प्रश्नकर्त्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न झाला. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वक्षमतेबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल  शंका उपस्थित न करताही असे म्हणता येईल की ज्या प्रधानमंत्र्याच्या हाताखालच्या लोकांना तातडीने प्रधानमंत्र्याला दिल्लीला घेऊन येण्याची व्यवस्था करता येत नाही त्या प्रधानमंत्र्याच्या हातात देश सुरक्षित आहे हे कसे मानायचे. मनमोहनसिंग यांचे हातात देश असुरक्षित आहे असे सांगणे देशभक्ती ठरते आणि मोदीजींच्या हातात देश सुरक्षित नाही असे म्हंटले तर तो देशद्रोह असे दुहेरी मापदंड कसे लावता येतील. मनमोहन काळात मोदींनी उपस्थित केलेले प्रश्न चुकीचे  नव्हते आणि मोदीकाळात तेच प्रश्न विचारण्यात गैर काहीच नाही. प्रश्न विचारल्याने सतर्कता वाढते आणि सतर्कता हाच राष्ट्रीय सुरक्षेचा मूलाधार आहे.  
----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment