Wednesday, March 20, 2019

सर्जिकल स्ट्राईक परिणामकारकच, पण कोणावर ?


 पठाणकोट ते पुलवामा प्रकरणी आमच्या चुकांची ना जबाबदारी निश्चित झाली ना कोणाला दोषी ठरवून कारवाई झाली. पाकिस्तानच्या पदराआड आमच्या चुका लपवून आम्ही आणखी किती जवानांचा बळी देणार आहोत हे विचारण्याची गरज असताना आम्ही मात्र सर्जिकल स्ट्राईकने बेहोष झालो आहोत. पाकिस्तानचे होश उडवायचे असतील तर ही बेहोशी कामाची नाही.  
------------------------------------------------------------------------------------------------


पुलवामा घटने नंतर देशात प्रचंड संताप आणि अस्वस्थता पसरली होती. भीषण आणि क्रूर अशा आतंकवादी हल्ल्याची ती परिणती होती. क्रूर आतंकवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविलाच पाहिजे अशी जनतेची सार्वत्रिक भावना आणि एकमुखी मागणी होती. पाकिस्तानशी युद्धच पुकारले पाहिजे असे मानणाऱ्यांची आणि म्हणणाऱ्यांची संख्या मोठी होती. मोदी काळातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा भुक्तभोगी असलेल्या पाकिस्तानला भारतात पसरलेला क्षोभ पाहून भारताकडून कारवाई केली जाईल हे अपेक्षितच होते. त्यामुळे बऱ्यापैकी सावध असलेल्या पाकिस्तानला चकवून कारवाई करणे सोपे नसते. तरीही आमच्या सेनादलाच्या अफलातून नियोजनाने आणि ते नियोजन तंतोतंत अंमलात आणण्याच्या क्षमतेने पाकिस्तानची सावधानता निकामी ठरवत आमच्या वायुदलाने अचूक लक्ष्यभेदी कारवाई केली. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच ही कारवाई होती. या कारवाईत किती मेलेत कि मेले नाही हा मुद्दाच निरर्थक आहे. यावर वाद उपस्थित करणे आणि सेनादलाच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे या दोन्ही गोष्टी टाळून राष्ट्र म्हणून आमची एकजुटता पाकिस्तानला आणि जगाला दिसली असती तर लष्करी कारवाईची परिणामकारकता अधिक दिसली असती. येत्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन अशी कारवाई करण्यात आली अशी समजूत कारवाईची परिणामकारकता कमी करणारी ठरते. अशी समजूत निर्माण करण्यात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे वर्तन आणि वक्तव्य बऱ्याच अंशी कारणीभूत ठरले आहे. विरोधी पक्षांना सोबत घेण्याची , काय आणि कशी कारवाई झाली याची माहिती देण्याची आणि सगळे सरकार सोबत आहेत हे दाखविण्याची जबाबदारी प्रधानमंत्री आणि सत्ताधारी पक्षाची होती. आजवरची अशीच परंपरा होती. प्रधानमंत्री मोदी यांनी ही परंपरा पाळली नाही. हे आपले यश आहे आणि यात कोणी भागीदार नको यासाठी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना स्वत: माहिती देण्याचे व त्यांच्याशी संवाद साधण्याचे टाळले की काय हे सांगता येणे कठीण आहे. प्रधानमंत्र्याला याची गरज वाटली नाही याचे एक महत्वाचे कारण या कारवाईवर जनता समाधानी आणि खुश आहे मग विरोधी पक्षांचे समाधान करण्याची गरज नाही हे आहे. उलट या यशावर विरोधी पक्ष प्रश्न विचारत असतील तर ते जनतेला रुचणार नाही हे हेरून प्रधानमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते विरोधी पक्षांना उकसावुन प्रश्न विचारण्याच्या सापळ्यात अडकवीत आहेत. अंतर्गत प्रश्नाबाबत जनता आमच्या सोबत आहेत , विरोधी पक्ष सोबत नसले तरी बिघडत नाही ही भूमिका चालू शकते पण राष्ट्रीय सुरक्षेबद्दल अशी भूमिका घातक आहे. याचे कारण आमची व्यक्ती म्हणून सार्वजनिक स्मरणशक्ती क्षीण असते. मागचे सगळे विसरून नवे घडले त्यावर प्रतिक्रिया देऊन, पटले तर समाधानाचा ढेकर देऊन मोकळे होतो, नाही पटले तर नाक मुरडून आपल्या कामाला लागतो. कोणताही सत्ताधारी पक्ष जनतेच्या सार्वजनिक विस्मरणाचा गैरफायदा घेवून आपल्या चुका आठवणार नाहीत याची काळजी घेत असतो. विरोधी पक्षांचे काम सरकारच्या चुका, उणीवा दाखविण्याचे असते. म्हणून प्रधानमंत्री विरोधीपक्षांना विश्वासात घेण्याऐवजी जाहीरसभांतून जनतेशी बोलतात. तिथे कोणी प्रश्न विचारण्याचा संभव नसतो. त्यामुळे आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकची गरज का पडली हे कोणी विचारत नाही. न विचारण्याचे एक कारण तर हेही आहे की जनताच ते विसरलेले असते ! उरी घटनेनंतरचा सर्जिकल स्ट्राईक घडून जेमतेम दोन वर्षे झालीत. राज्यकर्त्यांकडून दोन वर्षे त्याचे कवित्व सुरु होते. तरीही ताज्या हवाईहल्ल्यानंतर त्या गोष्टीचा विसर पडला.


जनतेने आपल्या स्मरणशक्तीला थोडा ताण दिला तर हे नक्कीच आठवेल की आत्ताच्या पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर जी संतापाची लाट निर्माण झाली होती तशीच लाट उरी हल्ल्यानंतर निर्माण झाली होती. तेव्हाही बहुसंख्य लोकांना पाकिस्तानशी युद्ध पुकारून एकदाचा सोक्षमोक्ष लावावा असेच तीव्रतेने वाटत होते. उरी हल्ल्यानंतर आपल्या जवानांनी अकराव्या दिवशी ठरवून नियंत्रण रेषा ओलांडली आणि दहशतवादी अड्डे उध्वस्त करून सुखरूप परतले होते. त्यावेळी देखील आता सारखेच आम्ही कसा बदला घेतला या आनंदात होतो. पाकिस्तानला असाच धडा शिकवला हवा होता आणि तो शिकविला गेला आहे या समाधानात आम्ही होतो. अशा घटनांमुळे युद्ध उन्माद निर्माण होण्याचे एक टोक गाठले जाते आणि काही कारवाई झाली तर आनंदोन्मदाचे दुसरे टोक गाठतो. कारवाई काय झाली, त्याचे परिणाम काय हे प्रश्न आम्हाला पडत नाहीत. उलट अशा कारवाई आधी पडलेले प्रश्न आम्ही विसरून जातो. सुरक्षा व्यवस्था चौकस आणि मजबूत असताना दहशतवादी सैन्यतळावर घुसून आमच्या सैनिकांना कसे काय मारू शकतात हा उरी हल्ल्यानंतर पडलेला प्रश्न उरी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकच्या आनंदोन्मादात आम्ही विसरून गेलो. पुलवामा घडले तेव्हाही काश्मीरात सर्वत्र चोख बंदोबस्त असताना स्फोटकाने भरलेली गाडी सुरक्षा दलाच्या काफिल्यावर आढळतेच कशी हा पडलेला प्रश्न हवाईदल हल्ल्यानंतर आम्ही विसरून गेलो. संरक्षण विषयक चुका किती जीवघेण्या असतात हे उरी घटनेच्या वेळी लक्षात आले होते. तरीही पुलवामा घडले. कारण चुकांची चर्चा , विश्लेषण आणि उपाय यावर विचार करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. अशा घटनांमागे पाकिस्तानचा हात आहे ही गोष्ट आता जगभर मान्य झाली आहे. आम्हालाही ते चांगलेच माहित आहे. असे असतांना पुरेशी सावधगिरी न बाळगल्याने पाकिस्तान आमचे नाक कापून मोकळे होतो आणि प्रत्येकवेळी धडा शिकविण्याची भाषा करतो, कारवाईही करतो आणि पुन्हा बेसावध राहतो. चुकांची चर्चा झाली तर ती थेट राज्यकर्त्यांच्या दारात जाते. म्हणून प्रत्येक वेळी राज्यकर्त्याला त्याच्या बेफिकिरी बद्दल प्रश्न विचारला की तुम्ही असे प्रश्न विचारून सेनेचे मनोधैर्य खच्ची करता आहात असे सांगून गप्प करण्याचा आणि घटनेचा दोष आपल्या दारात येणार नाही याची काळजी घेतली जाते. परिणामी उरी घटनेत आम्ही २२ जवान गमावले आणि आता पुलवामात त्याच्या दुप्पट जवान गमावलेत. दोन घटना दरम्यान आणि पुलवामा नंतरही आम्ही किती जवान रोज गमावतो याची तर विचार करण्याची देखील गरज आम्हाला वाटत नाही. वायुदल हल्ल्यात त्यांचे २००-४०० आतंकवादी मारले गेले असतील तरीही रोज मरणाऱ्या आमच्या जवानांची हानी त्यातून भरून येत नाही.

उरी घटनेच्या ६ महिने आधी पठाणकोट घडले होते. थेट वायुदलाच्या तळावर आतंकवादी घुसले होते. असा हल्ला होणार याची दिल्लीत आधीच सूचना मिळाली होती. पण हल्ला रोखण्यासाठी ज्या वेगाने हालचाली व्हायला पाहिजे त्या झाल्या नाहीत. त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध करण्यासाठी आमच्या सरकारने वायुदल तळा सारख्या संवेदनशील ठिकाणी पाकिस्तानच्या पोलीस आणि सेनेच्या अधिकाऱ्याला पाचारण केले होते. पाकिस्तानला त्याने घडवून आणलेल्या हल्ल्याचे पुरावे देण्यासाठी सरकार एवढे धडपडते पण भारतात सरकारने नेमके काय केले याचे पुरावे मागितले तर विविध बाजूनी देशद्रोही म्हणून संभावना केली जाते.सत्ताधारी पक्षाचे बहुमत असलेल्या आणि सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष असलेल्या गृहमंत्रालयाच्या संसदीय समितीने पठाणकोट हल्ल्याबद्दल सरकार आणि त्याच्या यंत्रणाना जबाबदार धरले होते. आपल्या अहवालाचा गंभीरपणे विचार करून सुरक्षा व्यवस्था चोख करावी अशी विनंती सरकारला संसदीय समितीने केली होती. त्यानंतर ४ महिन्यातच उरी घडले. आणि सर्जिकल स्ट्राईकच्या आनंदात उरी का घडले हे आम्ही विसरून गेलो. पठाणकोट ज्या चुकांमुळे घडले त्याच चुकांमुळे उरी घडले. संसदीय समितीचा अहवाल गंभीरपणे घेऊन उपाययोजना केली असती तर उरी टळले असते. पुलावामाच्या बाबतीतही तेच आहे. रस्ता बंद होता त्यावेळी जवानांना विमानाने नेणे आवश्यक असतांना त्याची परवानगी दिली गेली नाही. पुलवामा नंतर आता तसे आदेश काढण्यात आले. पाकिस्तान तर जबाबदार आहेच पण आमच्या चुकांचे काय ? पठाणकोट ते पुलवामा प्रकरणी आमच्या चुकांची ना जबाबदारी निश्चित झाली ना कोणाला दोषी ठरवून कारवाई झाली. पाकिस्तानच्या पदराआड आमच्या चुका लपवून आम्ही आणखी किती जवानांचा बळी देणार आहोत हे विचारण्याची गरज असताना आम्ही मात्र सर्जिकल स्ट्राईकने बेहोष झालो आहोत. पाकिस्तानचे होश उडवायचे असतील तर ही बेहोशी कामाची नाही. सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळेल ही समजूत बाळबोधपणाची आहे. तसे असते तर उरी सर्जिकल स्ट्राईक नंतरच्या एक वर्षात आपले ९५ जवान मारले गेले नसते आणि हजाराच्या आसपास पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले नसते. आत्ताही वायुदल हल्ल्याच्या जल्लोषात पुलवामा हल्ल्यानंतरच्या एक महिन्यात आमचे २२ जवान शहीद झालेत याचे आम्हाला भान नाही. मुळात सर्जिकल स्ट्राईक ही लष्करी कारवाई नसून केवळ संदेश देणारी आणि क्षमता दर्शविणारी कारवाई आहे याचेही आम्हाला भान नाही. सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ झालेच नाही. सर्जिकल स्ट्राईकचा जेवढा परिणाम पाकिस्तानवर झाला त्याच्यापेक्षा जास्त परिणाम आमच्यावर झाला हेच आमची बेहोशी दर्शविते. सर्जिकल स्ट्राईकच्या हत्याराचा पाकिस्तानवर परिणाम दिसत नसला तरी या हत्याराचा उपयोग सत्ताधारी पक्ष विरोधकांना नामोहरण करण्यासाठी अधिक परिणामकारकपणे करताना दिसत आहे. पाकिस्तानला जगाला दाखवायला तोंड उरले नसताना सर्जिकल स्ट्राईकच्या अस्त्राचा राजकीय वापर केल्यामुळे राजकीय कारणासाठी भारताने हवाई हल्ला केल्याचा कांगावा करण्याची संधी आपण पाकिस्तानला देत आहोत.
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment