Thursday, May 16, 2019

मोदींचा मोठा पराभव करण्याची संधी विरोधकांनी घालवली !

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ दिवसात समोर येतील. मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर त्याला कारणीभूत मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम असणार नाही तर सगळेच विरोधी पक्ष असतील. दोष काँग्रेसकडे जास्त जाईल.
-----------------------------------------------------------------------------------------------
हा लेख प्रकाशित होईल तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरु झालेले असेल. ११ एप्रिल ते १९ मे या काळात प.बंगालचा काहीसा अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्यात दिसत असलेला उत्साह मतदारांत दिसला नाही तरी मतदानाची टक्केवारी पाहता मतदारांनी आपला निर्णय प्रभावीरित्या नोंदविला असा निष्कर्ष काढता येतो. संसदीय पद्धतीच्या निवडणुकांना अध्यक्षीय पद्धतीच्या निवडणुकीचे स्वरूप देण्याचा भाजपने गेल्या निवडणुकीत यशस्वी प्रयत्न केला होता आणि तोच कित्ता या निवडणुकीत गिरवला. अध्यक्षीय पद्धतीच्या निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाची आणि मोठी असते. भाजपने एका रणनीती तहत २०१४ साली पक्षाला गौण करून त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याना मोठे केले आणि मत पक्षासाठी नाही तर मोदींसाठी मागितले. हा प्रयोग कमालीचा यशस्वी होऊन ध्यानीमनी नसताना भाजपला बहुमत मिळाले. मागच्या लोकसभा निवडणुकीत संघ-भाजपाने मोदींची प्रतिमा मोठी केली होती. सत्तेत आल्यानंतर प्रतिमा मोठी करण्याचे काम स्वतः मोदींनी आपल्या हातात घेतले आणि २०१४ मध्येकिंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या संघ-भाजपाला २०१९ मध्ये काही काम उरले नाही. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी कितीही सांगत असले की भाजपा व्यक्ती केंद्रित नव्हती आणि नाही तरी आजची वस्तुस्थिती सर्वाना माहित आहे. मोदी आणि शाह यांचे शिवाय भाजपला अर्थ आणि अस्तित्व नाही. हे लक्षात घेऊनच लेखाचे शीर्षक भाजपचा नाही तर मोदींचा मोठा पराभव करण्याची संधी विरोधकांनी घालवली असे दिले आहे.

मोदींची मोठी प्रतिमा रंगवायची तर दुसऱ्यांची प्रतिमा आणि विशेषतः जवळच्या प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा छोटी करावी लागते. राहुल गांधींच्या बाबतीत ५ वर्षे तो प्रयोग चालला आणिपप्पूठरविण्यात यशही आले. यातून मोदींना प्रतिस्पर्धीच नाही असे वातावरण पहिल्या तीन-साडेतीन वर्षात निर्माण करता आले. दुसऱ्याला सतत छोटे दाखविण्याच्या प्रयत्नांची उणे बाजू आहे हे मोदींची प्रतिमा मोठी करणारे विसरले. राहुल गांधींना सतत छोटे लेखण्याचा प्रयत्न मोदी समर्थकांच्या अंगलट आला. राहुल गांधी सतत चर्चेत राहिले. आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही असे वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात राहुल गांधी प्रतिस्पर्धी बनले. मोदींच्या कारभाराने आणि कार्यक्रमाने जनताही निराश होऊन हळूहळू राहुल गांधींच्या पाठीशी उभी राहू लागली. शेवटच्या दिड - दोन वर्षात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीतील मोदींची पीछेहाट याचा पुरावा आहे. प्रतिस्पर्धी कोणी नाही म्हणता म्हणता लोकसभा निवडणुका येईपर्यंत राहुल गांधी समर्थ प्रतिस्पर्धी म्हणून समोर आलेत. मोदींना पक्षापेक्षा मोठे करण्याचा प्रयत्न संघ-भाजपला करावा लागला. काँग्रेस मध्ये तसा वेगळा प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. ती त्यांची परंपराच राहिली आहे. गांधी - नेहरू घराण्यातील व्यक्तीचे श्रेष्ठत्व काँग्रेसमध्ये मान्यच आहे. मोदींना आणि त्यांच्या पक्षाला प्रतिस्पर्धी म्हणून राहुल गांधीच पाहिजे होते पण तेपप्पूम्हणून पाहिजे होते. मोदींच्या आर्थिक धोरणामुळे ग्रामीण भारताची जास्त होरपळ झाल्याने निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचीपप्पूप्रतिमा धूसर होऊन ग्रामीण भारताच्या असंतोषाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व राहुल गांधींकडे आले. ग्रामीण असंतोषामुळेच एकतर्फी वाटणारी निवडणूक तुल्यबळच बनली नाही तर मोदींचा पराभव शक्य आहे असे वातावरणही लोकसभा निवडणुकी आधी तयार झाल्याने लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले होते आणि तशी ती चुरशीची झाल्याचे चित्रही पाहायला मिळते.

अशा प्रकारे परिस्थितीने मोदींचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून राहुल गांधींना उभे केले. मात्र या निवडणुकीवर व निवडणूक प्रचारावर नजर टाकली तर परिस्थितीचा लाभ राहुल गांधींना उठवता आला नाही असेच म्हणावे लागेल. राहुल गांधींना मोदींचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर गठबंधन तयार करण्यात यश आले नाही किंवा त्यांचे प्रयत्न कमी पडले असे म्हणावे लागेल. तामिळनाडू, कर्नाटक,बिहार या राज्यात जशी आघाडी बनली तशी आघाडी इतरत्र बांधता आली नाही. खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने उ.प्र. , महाराष्ट्र आणि प.बंगाल हे महत्वाचे प्रदेश असतांना आणि या प्रदेशात स्वबळावर लढण्या इतकी काँग्रेसची शक्ती नसतांना इथे इतर पक्षांसोबत आघाडी न होणे हे राजकीय अदूरदर्शितेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी झाली पण याला वंचितची जोड देता आली असती तर आता येणाऱ्या निकालांपेक्षा वेगळे निकाल पाहायला मिळाले असते. बंगाल किंवा उत्तर प्रदेशात आघाडी करणे राजकीय सोयीचे नव्हते तर आघाडी न बनवता काही जागांवर उमेदवार उभे न करता तिथे एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेता आली असती. उत्तर प्रदेशात ती घेतली पण फक्त नेत्यांच्या मतदार संघाबाबत घेतली गेली. त्या ऐवजी अशी समजदारी आणखी २५-३० मतदार संघात दाखविली असती तर उत्तर प्रदेशात भाजपला आता बसेल त्यापेक्षा मोठा झटका देता आला असता. अशीच समजदारी आघाडी न करताही बंगाल मध्ये दाखवणे जास्त गरजेचे होते. काही जागांवर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे न करण्याची खबरदारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी घेतली असती तर आज तिथल्या मतदारांचे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यामध्ये झालेले ध्रुवीकरण टाळता आले असते. अशा ध्रुवीकरणाचा लाभ भाजपला होणार आहे.

मोदी विरोधात राष्ट्रीय पातळीवर आघाडी बांधण्यात आलेल्या अपयशाला केवळ राहुल गांधींना दोष देता येणार नाही. मोदी विरोधात असंतोष वाढल्याने मोदी-शाहच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी पराभूत होऊ शकते असे वातावरण तयार झाल्याने अनेकांच्या प्रधानमंत्रीपदी बसण्याच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्यात. राहुल गांधींच्या नेतृत्वात आघाडी बनली तर त्या पदापर्यंत पोचायला अडचणी येतील हे हेरून अनेकांनी आघाडीला खोडा घातला. मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्याला कारणीभूत मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम असणार नाही तर सगळेच विरोधी पक्ष असतील. दोष काँग्रेसकडे जास्त जाईलतील हे मोदी विरोधात विरोधी पक्षांची राष्ट्रीय आघाडी न बनण्याचे कारण झाले. मोदींना बहुमत मिळणार नसेल तर आपण स्वतंत्रपणे लढून नव्या राजकीय तडजोडीत जास्त पदरात पाडून घेता येईल हा विचार मायावतीसह अनेक नेत्यांनी केला. मोदी पराभूत होऊ शकतात असे वातावरणाने विरोधी ऐक्याचा घात केला. आघाडी बनविण्यात मोदी-शाह यांनी जशी लवचिकता आणि दूरदृष्टी दाखवली तशी काँग्रेसला दाखवता आली नाही. शिवसेनेने ४ वर्षे सातत्याने अपमान करूनही कमीपणा घेऊन भाजपने आघाडी करणे ही जशी त्या पक्षाची गरज दर्शविते तशीच दूरदर्शीताही दर्शविते. आघाडीची भाजपा पेक्षा काँग्रेसला अधिक गरज असतांना लवचिकता दाखविता आली नाही. यामुळे भाजपला बहुमत मिळाले नाही तरी काँग्रेसला सरकार बनविता येईलच अशी परिस्थिती नाही. निकाल काय लागतील सांगता येत नाही. मात्र एक सांगता येईल. सर्वच विरोधी पक्षांनी मोदींना मोठ्या पराभवापासून वाचविले आहे !
---------------------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८ ------------------------------------------------------

No comments:

Post a Comment