भाजप आणि मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात यशस्वीपणे कोणते काम केले असेल तर २०१९ च्या विजयाचे नियोजन केले ! काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात आणि माती खाल्ली ती इथेच !
---------------------------------------------------------------------------------------
प्रधानमंत्री मोदी यांनी काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांना जोरदार तडाखा देत लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. या विजयाचे भाकीत मतदान चाचण्यातून करण्यात आले तेव्हा त्यावर अनेकांचा विश्वास बसला नव्हता. सर्वच विरोधी पक्ष ते खोटे ठरतील अशी आशा लावून बसले होते. निकालाने त्यांची घोर निराशा केली. २०१४ मध्ये भाजपने विजयाचे सर्वोच्च शिखर गाठले आणि आता फक्त घसरणच शक्य आहे असे सर्वसाधारण अनुमान होते. हे अनुमान खोटे ठरले.
भाजपच्या मित्रपक्षांच्या जागांत किंचित घसरण पाहायला मिळाली तरी भाजपच्या जागात लक्षणीय वाढ होऊन पक्षाने यशाचे पुढचे शिखर गाठले. असे घडायला मागच्या ५ वर्षात मोदी सरकारने कुठल्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणला हे त्या सरकारलाच सांगता येणार नाही अशी परिस्थिती असतांना आचंबित करणारा विजय मिळाला आहे. एखादा चमत्कार वाटावा असा हा विजय असल्याने वर वर विचार केला तर याचे कारण ‘मोदी है तो मुमकिन हैं’ असे देण्याचा मोह भाजप आणि भाजपा बाहेरच्या मोदी समर्थकांना झाल्याशिवाय राहणार नाही. विजयात मोदींच्या प्रतिमेचे मोठे स्थान आहेच. मात्र केवळ प्रतिमेच्या बळावर एवढा मोठा विजय मिळविला असे मानणे भाबडेपणाचे होईल. भाजप आणि मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात यशस्वीपणे कोणते काम केले असेल तर २०१९ च्या विजयाचे नियोजन केले ! काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात आणि माती खाल्ली ती इथेच !
निवडणूक आली की जागे व्हायचे आणि कामाला लागायचे ही काँग्रेससह इतर पक्षांची पद्धत. ही पद्धत भाजपाची सुद्धा होती पण मोदी-शाह यांनी ती बदलली. त्यांनी दूरचा विचार करून खूप आधीपासून निवडणूक लढविण्याचे नियोजन करून अंमलबजावणी सुरु केली. राजकीय पक्षाच्या निधीसाठी निवडणूक बॉण्ड आणिनोटबंदीची अंमलबजावणी हा निवडणूक पूर्वतयारीचाच भाग होता. दोन्ही योजनांच्या परिणामी भाजपला पैशाची बेगमी करता आली आणि विरोधी पक्ष मात्र तोट्यात राहिले. इतर विरोधीपक्ष आणि भाजप यांच्याकडे असलेल्या पैशात प्रचंड फरक आहे. काळा पैसा नाहीसा करण्यासाठी लादलेल्या नोटबंदी नंतर झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक काळा पैसा निवडणूक आयोगाने जप्त केला आहे. यातील मोठी रक्कम भाजप नेत्यांकडून जप्त करण्यात आली हे लक्षात घेतले तर नोटबंदीचा या रकमेशी असलेला संबंध स्पष्ट होईल. कोणत्या प्रदेशावर व कोणत्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचे हे बरेच आधी ठरवून त्यानुसार भाजपचे काम सुरु होते. भाजपचा मुख्य आधार असलेल्या हिंदी भाषिक प्रांतात वाढलेल्या विरोधाने जागा कमी होण्याचा धोका लक्षात घेऊन त्याची भरपाई अन्य प्रांतातून करण्याची योजना बऱ्याच आधी आखल्या गेली आणि अंमलातही आली. त्याचे दृश्य परिणाम आपल्याला बंगाल आणि ओडिशाच्या निकालामध्ये पाहायला मिळाले आहेत. तीन वर्षे काश्मिरात पीडीपी सोबत सत्ता उपभोगल्या नंतर काहीही नवीन घडलेले नसतांना भाजपने अचानक सरकारातून अंग काढून तिथे राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती निर्माण केली हा २०१९ची निवडणूक जिंकण्याचा भाग होता. निवडणुकीसाठी काश्मीरचा प्रश्न पेटवायचा तर सत्ता सोडणे भाग होते. पुलवामा - बालाकोट घडण्या आधीच निवडणुकीत काश्मीरचा प्रश्न केंद्रस्थानी आणायचा ही भाजपची रणनीती स्पष्ट दिसत असताना त्याचा मुकाबला कसा करायचा याचा विचार एकाही पक्षाने केला नाही. भाजपची एवढी जय्यत तयारी दिसत असताना काँग्रेस आणि इतर पक्ष मात्र निवडणुकीची कोणतीही नियोजनबद्ध तयारी करत नव्हते. मोदी आणि शाह यांनी निवडणूक जिंकण्याचे नवे तंत्र विकसित केले त्याचा मुकाबला करण्याचा विचार आणि योजना कोणत्याही पक्षाकडे नव्हत्या.
कोणत्या पक्षाशी हातमिळवणी केली म्हणजे मतांची संख्या भाजपला मिळालेल्या मतसंख्ये पेक्षा जास्त राहील याचे गणित कागदावर जुळविण्यातच बाकी पक्ष रमले आणि विजयाची स्वप्ने पाहू लागलीत. अशा कागदी गणिताच्या जोरावर भाजपला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न
उत्तरप्रदेश आणि कर्नाटकात झाला. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वाट्याला
आलेल्या विधानसभा जागा बघता त्याप्रमाणात लोकसभेच्या जागा मिळतीलच असे गणित
काँग्रेसपक्ष जुळवत बसला. कागदावर तर अशा गणिताच्या आधारे विजय निश्चित वाटत होता. जमिनीवरची समीकरणे बदलली तर काय करायचे याचे कोणतेही नियोजन कोणत्याच पक्षाकडे नव्हते. पुलवामाची घटना आणि बालाकोट हवाई हल्ल्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. मोदी आणि भाजपने या घटनांचा ज्या पद्धतीने उपयोग करून घेतला त्याला
विरोधीपक्षांकडे उत्तर नव्हते. निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न मुख्य बनत
असेल तर त्या प्रश्नावरही सरकारला घेरण्यासाठी मुबलक दारू गोळा होता. पठाणकोट ते
पुलवामा घटनाक्रम सरकारची नाकामी व अक्षमता दर्शविणाऱ्या घटना असताना त्यावर
विरोधकांना आक्रमक होता आले नाही. बालाकोटच्या ज्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये
साडेतीनशेच्यावर आतंकवादी मारल्याचा दावा करून मोदींनी तो मुख्य निवडणूक मुद्दा
बनविला त्यात आतंकवादी मेल्याची पुष्टी वायुदलाला देखील करता आली नाही. पण तो
मुद्दा मोदींनी निवडणुकीवर केलेला सर्जिकल स्ट्राईक ठरून विरोधीपक्षांचे ३५० च्यावर
उमेदवार धाराशायी झालेत ! या अभूतपूर्व विजया मागे प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे नियोजन आणि परिश्रम आहेत हे नाकारून चालणार नाही.
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – 9422168158
मोबाईल – 9422168158
No comments:
Post a Comment