Friday, May 31, 2019

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी संजीवक !


राहुल गांधींचा राजीनामा सुस्तावलेल्या, झोपलेल्या काँग्रेसला गदागदा हलवून जागे करणारा आहे. म्हणूनच राहुल गांधींच्या राजीनाम्याने काँग्रेसचा फायदा होईल.
--------------------------------------------------------------------------------

२०१४ च्या निवडणुकीतील अपयशानंतर पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बऱ्यापैकी कामगिरी करेल अशी आस काँग्रेस पक्ष लावून बसला होता. काँग्रेसपक्ष बहुमताच्या आसपास जाईल अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती पण ५५ खासदार निवडून आणून विरोधीपक्ष नेतेपद देखील काँग्रेसला मिळवता आले नाही. मोदी विरोधात असलेल्या सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली. त्यामुळे पराभवासाठी निव्वळ काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरता येणार नाही हे खरे असले तरी ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाच्या दारुण पराभवाचे परिणामही व्यापक आहेत. अन्य पक्षाशी काँग्रेस पराभवाची तुलना होऊ शकत नाही. काँग्रेसला या पराभवातून सावरून पुढे जायचे असेल तर पहिली बाब पराभवाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली. मोदीजींनी जेवढ्या सभा घेतल्या त्यापेक्षा राहुल गांधींनी १-२ सभा जास्तच घेतल्या. तरीही असा परिणाम आला असेल तर पराभवाची पहिली जबाबदारी राहुल गांधींवर येते. त्यांनी ती खुल्यामनाने स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला याचे स्वागत केले पाहिजे. आजवर काँग्रेसमध्ये अशाप्रकारे पराभवाची जबाबदारी स्वीकारून स्वत:हुन कोणी राजीनामा दिला नव्हता. बहुतांश काँग्रेसजनांची आणि युपीएच्या  घटकपक्षांची प्रतिक्रिया या राजीनाम्यामुळे काँग्रेसपुढील अडचणी वाढतील अशाच आल्या आहेत. गांधी-नेहरू घराण्याशिवाय काँग्रेस ही कल्पनाच जशी काँग्रेसजनांना करता येत नाही तशी ती बाहेरच्यांनाही करता येत नाही.

या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचा मुकाबला कोणी केला असेल तर तो राहुल गांधींनी केला आणि तेच पर्याय म्हणूनही समोर आले हे खरे असले तरी निवडणुकीत कोणत्या मुद्दयाला किती महत्व द्यायचे याचे त्यांचे आकलन चुकले.  याची  त्यांनी व पक्षाने जाहीर कबुलीही दिली आहे. 'चौकीदार चोर आहे' हा मुद्दा लोकांच्या गळी उतरला नाही आणि त्याचा उलट परिणाम होऊन राहुल गांधींच्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेले. याच स्तंभात मी 'राफेल घोटाळ्याचे परिस्थितीजन्य पुरावे या शीर्षकाखाली लेखमाला लिहिल्याचे वाचकांना स्मरत असेल. या लेखमालेच्या चौथ्या भागात (दै .देशोन्नती / ४ नोव्हेंबर २०१८)  मी लिहिले होते ," या व्यवहारात घोटाळा झाल्याचे लोकांना सकृतदर्शनी वाटू लागले असले तरी मोदी चोर आहेत हे राहुल गांधीचे म्हणणे मनाला भिडत नाही. कारण राहुल आपल्या पित्याच्या बाबतीत जे घडले त्याचा त्यांच्या मनावर झालेल्या प्रभावातून हा विषय मांडत आहे. त्यामुळे त्यांनी दुखावलेल्या भावना बाजूला ठेवून राफेल व्यवहारातील भ्रष्टाचाराची तर्कसंगत मांडणी केली तर ती लोकांना अधिक पटेल." पण हा मुद्दा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिला नाही. लक्षात आणून न देण्यामागचे कारण महत्वाचे आहे. एकतर काँग्रेसमध्ये कार्यकर्ते-नेते यांनी खोलवर जाऊन विचार करणे आणि तेही नेतृत्वापेक्षा वेगळा विचार करणे कधीच सोडले आहे. केवळ विचार करणे नाहीच तर कृती करणे देखील सोडले आहे. विचार नेतृत्वानेच करायचा , कृतीही करायची आणि कार्यकर्त्यांनी सत्तेचे ताट आपल्यापुढे कधी वाढल्या जाते याचीच वाट बघत बसायचे हे अनेक वर्षांपासून सुरु आहे. गांधी घराणे हे काँग्रेसचे पॉवर हाऊस आहे हे प्रमुख विरोधक भाजपने कधीच ओळखले आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाची खरीखोटी टीका गांधी घराण्यावर असते आणि ते घराणे जनतेच्या मनातून कसे उतरेल याचाच त्यांचा प्रयत्न असतो. गांधी घराणे काँग्रेसमधून वजा केले तर हाती शून्य उरते ही काँग्रेसची अवस्था. काँग्रेस वाचवायची असेल तर ही अवस्था बदलणे जरुरीचे आहे. सत्तेचे ताट मिळवायचे असेल तर नेतृत्वावर सगळी जबाबदारी टाकून चालणार नाही . त्यासाठी स्वत: हातपाय हलवावे लागतील याची जाणीव काँग्रेस कार्यकर्त्यात निर्माण झाली पाहिजे. राहुल गांधींचा राजीनामा सुस्तावलेल्या, झोपलेल्या काँग्रेसला जागे करणारा आहे.

गांधी घराण्याने काँग्रेस आपल्या मुठीत ठेवली आणि त्यांना काँग्रेसला आपल्या गुलामीतून मुक्त करायचे नाही हा जो अपप्रचार चालतो त्याला राहुल गांधींच्या राजीनाम्याने परस्पर उत्तर मिळू शकेल. मी मुद्दामच इथे अपप्रचार शब्द वापरला आहे. कारण गांधी-नेहरू घराण्याने प्रयत्न करून काँग्रेस आपल्या ताब्यात ठेवली हे सत्य नाही. काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक गांधी घराण्याला आपल्या डोक्यावर बसवून घेतले आहे. राजीव गांधींची हत्या झाली तेव्हाच काँग्रेसजनांना सोनिया गांधी अध्यक्षपदी पाहिजे होत्या. सोनियाजींनी तेव्हा ते पद निग्रहाने नाकारले. त्यामुळे नरसिंहराव यांचेकडे अध्यक्षपद आले. नरसिंहराव यांनी प्रधानमंत्री पदासोबत ५ वर्षे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवले होते. नरसिंहराव यांचे हातून सत्ता गेल्यावर सत्ता परत मिळवायची तर काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याकडे गेले पाहिजे यासाठी नरसिंहराव यांचा राजीनामा घेण्यात शरद पवार आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हाही सोनिया गांधी अध्यक्ष व्हायला तयार नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात शरद पवार हरले, सीताराम केसरी निवडून आले. पण अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच गेले पाहिजे म्हणून काँग्रेसजनानी केसरींना हाकलून सोनिया गांधींना अध्यक्ष केले. सत्ता मिळवायची तर गांधी घराण्याशिवाय  पर्याय नाही ही  भावना काँग्रेसजनांत खोलवर रुजली आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी राहुल गांधींचा राजीनामा उपयुक्त ठरणार आहे. काँग्रेसला संजीवनी द्यायची असेल तर राहुल गांधींनी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले पाहिजे. 
-----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल- ९४२२१६८१५८   

No comments:

Post a Comment