प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांनी बजावलेल्या भूमिकेने महाष्ट्रातील
लोकसभा निवडणूकांचे निकाल प्रभावित असतील असा सर्वसाधारण अंदाज आहे. निकाल कसेही लागले
तरी आगामी विधानसभा निवडणूकीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन नेत्यांची भूमिका
महत्वाची असणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व जागांची निवडणूक शांततेत पार
पडली.राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यात असलेला अटीतटीचा सामना मतदान करणाऱ्या
मतदारांत दिसला नाही. राजकीय पक्षांबद्दल आणि एकूणच निवडणुकीबद्दल मतदार खुलेपणाने
व्यक्त न होता हातचे राखून बोलताना दिसला. मनाचा थांगपत्ता लागू न देण्याची ही
हुशारी होती की व्यक्त झालो तर बदला घेतला जाईल या अनामिक भीतीने त्याला ग्रासले
होते हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे निवडणुकीचे अंदाज बांधणे अवघड आहे.
महाराष्ट्राच्या बाबतीत
निवडणुक प्रचारात गुंतलेले कार्यकर्ते व नेते यांच्या देहबोलीवरून अंदाज बांधायचा
झाला तर युती आणि आघाडी या
दोहोंचाही अपेक्षाभंग होईल
एवढाच अंदाज बांधणे शक्य आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाराष्ट्रातील
निवडणूकीचे रंग बदलत
गेलेत. भाजप-शिवसेना युतीची अनिश्चितता संपल्यानंतर आणि काँग्रेस आघाडीचा
विस्कळीतपणा लक्षात घेता भाजप-शिवसेनेसाठी निवडणूक तितकी अवघड जाणार नाही असे
चित्र निर्माण झाले होते. पण जसजसे दिवस उलटलेत चित्रही पालटत गेले.
महाराष्ट्रातील निवडणूकीचे चित्र पालटण्यात युती आणि आघाडीचे नेते यांच्या पेक्षा
ज्यांना आधी गृहितच धरले नव्हते असे नेते कारणीभूत ठरलेत. हे नेते म्हणजे 'वंचित बहुजन आघाडीचे' प्रकाश आंबेडकर आणि 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे राज ठाकरे. या दोन
नेत्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या लढतीत रंग भरलेही आणि लढतीचे रंग बदलले
देखील. जे काही निकाल समोर येतील त्या निकालावर या दोन नेत्यांची छाप अपेक्षित
आहे. यांनी किती जागा जिंकल्या-हारल्या यावरून त्यांची छाप दिसणार नाही तर
यांच्यामुळे युती आणि आघाडीला किती जागी यश किंवा अपयश आले यावरून ती छाप दिसणार
आहे. प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक परिणामाचे किमयागार ठरणार
आहेत.
निवडणूकीत आंबेडकर आणि
ठाकरे यांच्या भूमिका भिन्न होत्या आणि त्याचे निवडणूक निकालावरील परिणाम देखील भिन्न असणार आहेत. राज ठाकरे
यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हते. मोदी आणि शाह मुक्त भारत ही भूमिका घेवून
ते निवडणूक प्रचारात उतरले होते. कोणाला मते द्या हे ते सांगत नव्हते तरी त्यांच्या
प्रचाराचा सरळ फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराना झाला. कॉंग्रेस आघाडीशी
वाटाघाटी फिसकटल्याने प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सर्वच्यासर्व 48 मतदार संघात
उभे केले होते. प्रकाश आंबेडकरांनी जेवढ्या जागांची मागणी केली होती त्यावरुन
त्यांना कॉंग्रेस आघाडी सोबत जायचे नव्हते असा अर्थ काढता येतो. वरकरणी त्यांचा हा
निर्णय मोदी विरोधी मतांची विभागणी करणारा वाटत असल्याने याचा फायदा भाजपा-सेना
युतीला होइल अशी चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा कॉंग्रेस
आघाडीला फायदा आणि भाजप-शिवसेनेचा तोटा होइल हे जसे ठामपणे सांगता येते तसे प्रकाश
आंबेडकर यांचेमुळे कॉंग्रेस आघाडीचा तोटा आणि भाजप युतीचा फायदाच होइल असे म्हणता
येत नाही. ज्या पद्धतीची आघाडी प्रकाश आंबेडकर बांधण्याच्या प्रयत्नात होते त्याचा
राज्यातील दोन्ही आघाड्यांना फटका बसु शकतो. ओवैसी बहुजन वंचित आघाडीत सामील
असल्याने काही प्रमाणात मुस्लिम मतांचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसेल. आंबेडकरांच्या
मागे असलेली दलित मते तशीही कॉंग्रेस आघाडीला मिळत नव्हती. वंचित आघाडीत ओबीसींना
सामील करण्याचा त्यांचा प्रयत्न अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मूळावर येवू शकतो. ज्या
मतदार संघात मुस्लिम मते वंचित आघाडीच्या पारड्यात गेली असतील तिथेच याचा फायदा
भाजप आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. बाकी सर्व मतदार संघात आंबेडकरांमुळे भाजपला
ओबीसी मतांचा फटका बसू शकतो. याचमुळे महाराष्ट्रातील लढ्ती चुरशीच्या होवून पारडे
कोणाच्या बाजुने झुकेल हे सांगता न येण्या सारख्या झाल्या आहेत. सांगता येइल ते एवढेच
की येणारे निकाल प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांचेमुळे प्रभावित असतील.
प्रकाश आंबेडकर हे भाजपची
बी टीम आहे किंवा राज ठाकरे सुपारी घेवून मोदी-शाह विरोधात प्रचार करतात हे आरोप फार
उथळ आहेत. त्यांनी जे केले ते आपल्या दिर्घकालिन राजकिय रणनिती तहत केले आहे. महाराष्ट्रात
पुढच्या 6 महिन्यात विधानसभा निवडणूका होवू घातल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूकीत बजावलेल्या भूमिकेचे फळ
त्यांना विधानसभा निवडणूकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही. प्रकाश आंबेडकरानी लोकसभा
निवडणूकीसाठी जी आघाडी तयार केली आहे त्या आघाडीने चांगली मते घेतल्याची चर्चा आहे.
निवडून येण्यासाठी ती मते कदाचित पुरेशी नसतीलही पण निवडणूक आयोगाकडून ‘वंचित बहुजन आघाडी’ला अधिकृत राजकिय पक्ष म्हणून मान्यता
मिळण्यास पुरेशी ठरतील असा अंदाज आहे. याचा सर्व दलित मतदारांना एका झेंड्याखाली आणण्यास
आणि इतर समाज घटकांना सोबत घेण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी बजावलेली
कामगिरी त्यांची राजकिय घसरण थांबवून राजकिय पत वाढण्यात मददगार ठरणार आहे. यावेळी
सभांमधून मोदींना राजकिय चैतन्य निर्माण करता आले नाही ती किमया राज ठाकरे यांनी करुन
दाखविल्याने त्यांचे राजकिय महत्व आगामी कळात वाढणार आहे. लोकसभा निवडणूकांचा निकाल
काहीही लागला तरी या पुढील विधानसभा निवडणूकीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील डार्क
हॉर्स म्हणून प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांचेकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – 9422168158
----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – 9422168158
No comments:
Post a Comment