Thursday, August 1, 2019

मनमोहनसिंग यांच्या कार्य-कर्तृत्वाचे फेरमूल्यमापन व्हावे - २


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचा शिल्पकार असा मनमोहनसिंग यांचा गौरव करूनही भारतीयांच्या डोळ्यावर बांधण्यात आलेली पट्टी कायम आहे. डोळ्यावरची पट्टी दूर करून मनमोहनसिंग यांच्या कार्य-कर्तृत्वाकडे आणि त्यांच्या राजवटीतील उपलब्धीकडे पाहिले पाहिजे. 
-----------------------------------------------------------------

डॉ. मनमोहनसिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर योजना आयोगाचे उपाध्यक्षपद सांभाळले असले तरी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या बद्दल फारसी माहिती नसल्याने तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी थेट अर्थमंत्रीपदी डॉ.सिंग यांची पहिल्यांदा नियुक्ती केली तेव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. मनमोहनसिंग चर्चेत आले ते अर्थमंत्री झाल्यानंतरच. त्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशात प्रचंड वादळ उठले होते. विविध बंधनात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला मुक्त आणि मोकळे करण्याचे काम प्रखर विरोधाला न जुमानता मनमोहनसिंग यांनी केले. मनमोहनसिंग अर्थमंत्री होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या कोणत्याच अर्थमंत्र्याला प्रखर विरोधाचा सामना करावा लागला नाही जितका डॉ.सिंग यांनी केला. त्यांच्या आर्थिक धोरणाची फळे जेव्हा मध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय आणि उद्योजकांना चाखायला मिळाली तेव्हाच या समुदायाचे मनमोहनसिंग यांचे बद्दलचे मत बदलले. त्यामुळे २००४ साली कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांचे नांव प्रधानमंत्री म्हणून प्रस्तावित केले तेव्हा त्याचे याच समुदायाने हर्षोल्लासात स्वागत केले होते. सर्वसाधारण जनतेनेही एक प्रामाणिक व्यक्ती प्रधानमंत्री झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या बद्दलची ही भावना पहिली पाच वर्षे केवळ टिकलीच नाही तर वाढली देखील होती. ती वाढल्याचा पुरावा म्हणजे २००९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल.

२००४ साली झालेल्या निवडणुकीत आणि विजयात मनमोहनसिंग यांची काहीच भूमिका नव्हती. २००९ सालच्या निवडणुकीचा कौल मात्र मनमोहनसिंग यांच्या ५ वर्षाच्या कामगिरीवर होता. २००४ साली प्रधानमंत्री म्हणून सोनिया गांधी यांनी डॉ.सिंग याना प्रधानमंत्रीपदी बसविले पण २००९ साली मात्र जनतेने त्यांना राजसिंहासनावर बसविले होते. इथे लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. २००४ च्या तुलनेत २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुधारली याचे कारण होते शहरी मतदार संघात काँग्रेसचे वाढलेले समर्थन. आज जो मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय मतदार काँग्रेसने ६० वर्षात काहीच केले नाही याला नंदी बैलासारखी मान हलवतो त्याच मतदारांनी २००९ साली मनमोहनसिंग प्रधानमंत्री असताना काँग्रेसला भरभरून मते दिली. २००९ सालचा शहरी मतदार संघांचा कौल पाहिला तर तो काँग्रेसच्या बाजूने होता हे लक्षात येईल. दिल्ली,मुंबई बंगलोर सारख्या महानगराने तर जवळपास सर्वजागी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आणि हा कौल डॉ.मनमोहनसिंग यांच्या ५ वर्षाच्या राजवटीला मिळाला होता. ज्यांनी असा कौल दिला तेच आज मनमोहनसिंग याना कमकुवत प्रधानमंत्रीनिर्णय न घेणारा प्रधानमंत्रीगांधी घराणे सांगेल तेच करणारा प्रधानमंत्री म्हणून त्यांची बदनामी करत आहेत. सोनिया गांधींचे गुलाम अशी संभावना करीत आहेत. खरे तर मनमोहनसिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात सोनिया गांधी अधिक सक्रिय होत्या आणि पक्ष व सरकारात समन्वयाचे श्रेय त्यांना दिल्या गेले होते. त्या तुलनेत दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीमुळे सोनिया गांधी यांची सक्रियता कमी झाली होती. पक्ष आणि सरकारातील समन्वयही त्यामुळे ढळला होता. म्हणजे सोनिया गांधी अधिक प्रभावी होत्या तेव्हा मतदारांना  मनमोहनसिंग याना कौल देताना ते सोनिया गांधी यांच्या हातचे बाहुले वाटत नव्हते हे उघड आहे. आज मात्र तसा प्रचार होतो.


२ जी स्पेक्ट्रम वाटप आणि कोळसा खाण वाटप यावरून मनमोहनसिंग यांची राजवट भ्रष्ट ठरली आणि त्यांचा व काँग्रेसचा २०१४ साली दारुण पराभव झाला. वस्तूत: ही दोन्ही प्रकरणे त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील आहेत. पहिल्या कार्यकाळात त्याची चर्चाही झाली. पण मतदारांनी ती बाब गंभीरपणे घेतली नाही. अमेरिके सोबतच्या अणू  करारामुळे डाव्यांनी मनमोहन सरकारचा पाठिंबा काढला तेव्हा भ्रष्ट मार्गाने विश्वासदर्शक ठराव संमत करून सरकार टिकविल्याचा आरोप होऊनही मतदारांनी २००९ च्या निवडणुकीत मनमोहनसिंग यांनाच डोक्यावर घेतले होते. दुसऱ्या कार्यकाळात मात्र याच आरोपावरून गदारोळ होऊन मनमोहन सरकार पायउतार झाले. २ जी स्पेक्ट्रमच्या आरोपात तथ्य नसल्याचा निकालही न्यायालयाने दिला आहे. कोळसा घोटाळ्यात कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव व काही अधिकाऱ्यांना शिक्षा झाली हे खरे. पण झालेली शिक्षा आर्थिक भ्रष्टाचार केला म्हणून झाली नाही तर खाण मिळविण्यासाठी विविध कंपन्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची नीट पडताळणी न करताच खाण वाटप केल्या गेले म्हणून शिक्षा सुनावण्यात आली. परवाच तत्कालीन कोळसा मंत्र्याची खाण वाटप प्रकरणात निर्दोष मुक्तता करणारा निकाल आला आहे. २०१४ च्या निवडणुकीत २ जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाण वाटप हे मुख्य मुद्दे होते आणि २०१९ च्या निवडणुकीत हे मुद्दे गायब झालेत हे लक्षात घेतले तर मनमोहनसिंग यांचे विरुद्ध अपप्रचार झाल्याचे स्पष्ट होते. पण त्यामुळे मनमोहनसिंग यांचे कार्य-कर्तृत्व झाकोळल्या गेले आहे. त्यांचा १० वर्षाचा कार्यकाळ हा स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णकाळ होता. कमकुवत असल्याचा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाचा धुराळा उडवत  हा सुवर्णकाळ लोकांच्या नजरेत येणार नाही याची काळजी घेतल्या गेली.  मोदी यांच्या निमंत्रणावरून भारत दौऱ्यावर आलेल्या बराक ओबामांनी आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचा शिल्पकार असा मनमोहनसिंग यांचा गौरव करूनही भारतीयांच्या डोळ्यावर बांधण्यात आलेली पट्टी कायम आहे. डोळ्यावरची पट्टी दूर करून मनमोहनसिंग यांच्या कार्य-कर्तृत्वाकडे आणि त्यांच्या राजवटीतील उपलब्धीकडे पाहिले पाहिजे.
--------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment