Thursday, January 16, 2020

नागरिकत्व सुधारणा कायद्याला भारतातील विरोधाने पाकिस्तानला चपराक !


गेल्या ५-६ वर्षातील भारतातील परिस्थिती बाबत सर्वात जास्त आनंदाच्या उकळ्या कोणाला फुटत असतील तर त्या पाकिस्तानला फुटत होत्या. भारतात मुस्लिमांवर अन्याय होत आहे, त्यांचा वाली कोणीच नाही हा अपप्रचार पाकिस्तान जगभर करत होता. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या सर्वधर्मीय नागरिकांनी पाकिस्तानच्या अपप्रचाराची हवाच काढून टाकली आहे.
-------------------------------------------------------------------------------


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यात आमच्या सरकारने सुधारणा केल्याने देशात व जगभरात जे वादंग निर्माण झाले त्यामुळे पाकिस्तानात अल्पसंख्यांकांचा कसा छळ होतो हे जगाला कळले असा दावा केला आहे. नोटबंदीच्या काळात नोटबंदी कशी फायद्याची यासाठी रोज एक नवे कारण पुढे केले जाई तसाच हा प्रकार आहे. शेतकरी शेतात पाखरांना आणि जनावरांना भीती दाखविण्यासाठी जसा बुजगावण्याचा वापर करतात तसाच मोदीजी देशातील जनतेला भीती दाखविण्यासाठी पाकिस्तानचा वापर करीत असतात. नागरिकत्व सुधारणा कायद्याला होत असलेला विरोध मोडून काढण्यासाठी पाकिस्तान नावाच्या हुकमी अस्त्राचा वापर स्वाभाविकच समजला पाहिजे. पण आकडे पाहू गेल्यास भारतात अनधिकृतपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी नाही. त्यात हिंदू आणि शीख जास्त आहेत. भारतात सातत्याने घुसखोरी होत राहिली ती भारत-बांगलादेश सीमेवरून. नजीकच्या भूतकाळात घुसखोरी झाली आहे ती म्यानमार मधून आलेल्या रोहिंग्यांची. आसामात नागरिकत्व पडताळणीची गरज भासली ती त्यामुळेच.पण बांगलादेश किंवा म्यानमार किंवा अफगाणिस्तान या राष्ट्राचे नावाने बोटे मोडले तर आम्हा भारतीयांचे रक्त खवळत नाही. पाकिस्तानचे नाव घेतले तरच आमचे रक्त खवळते. जगापुढे पाकिस्तानचा छळ मांडण्यासाठीच कायदा केला असेल तर मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे कायद्याचा उद्देश्य सफल झाला आहे. कोणाला नागरिकत्व प्रदान करण्यासाठी या सुधारित कायद्याची गरजच नव्हती. पाकिस्तानातून गुजरात मध्ये आलेल्या ६०० हिंदूंना २०१५ सालीच मोदी सरकारने नागरिकत्व प्रदान करून जुन्या कायद्याने नागरिकत्व प्रदान करण्यात अडचण येत नाही हे स्वतः मोदीजींनीच दाखवून दिले आहे. या कायद्याने मोदीजींनी सांगितलेला हेतू सफल झाला असेल तर या कायद्याचा विरोध करून देशातील नागरिकांनी पाकिस्तानला त्याहीपेक्षा मोठी चपराक लगावली हे देखील मान्य केले पाहिजे.
मोदीजींच्या मनातले लोकांना न समजल्याने हा सुधारित कायदा धार्मिक भेदभाव करणारा आणि घटनेच्या कलम १४ चे उल्लंघन करणारा वाटल्याने त्याविरुद्ध देशभर आंदोलन उभे राहिले. कायदा सकृतदर्शनी मुस्लिमांविरुद्ध भेदभाव करणारा वाटत असला तरी या कायद्याविरोधात सर्वधर्मीय आणि कोणताही धर्म न मानणारे नागरिक एकमेकांचा हात हातात धरून रस्त्यावर उतरले. त्या कायद्या बद्दलचा समज चुकीचा की बरोबर हा मुद्दा बाजूला ठेवला तर आपल्या लक्षात येईल की या कायद्यामुळे मोदीजी म्हणतात तसे पाकिस्तान उघडे पडलेच पण आपली  एकात्मता किती मजबूत आहे याचे दर्शन या निमित्ताने घडले. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मुस्लिम समाजात एकटे पडत असल्याची भावना वाढीस लागली होती. मुस्लिमांना असे एकटे पाडण्याला देशात किती मोठा विरोध आहे हे या कायद्याच्या निमित्ताने देशवासीयांनी ६ वर्षात प्रथमच दाखवून देऊन राष्ट्रीय एकात्मतेला मजबुती प्रदान केली आहे. लोकशाही म्हणजे विरोधी विचाराला आणि विरोधी मताला मान. लोकशाहीत विरोधी मत हे विरोधी पक्षाकडून व्यक्त होत असते. गेल्या सहा वर्षात विरोधी मत समर्थपणे व्यक्त झाले आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मताला मान दिला असे घडल्याचा एकही प्रसंग नाही. कोणत्याच पातळीवर आपल्याला विरोध होऊ नये अशीच सत्ताधाऱ्यांची रणनीती राहिली आणि साम,दाम,दंड,भेद वापरून ती रणनीती अंमलात  आणण्यात फार अडचण कधी आली नव्हती. आज भलेही राजकीय पक्षांकडून अपेक्षित असा विरोध होत नसला आणि सत्ताधाऱ्यांची विरोधाला न जुमानण्याची वृत्ती प्रकट होत असली तरी जनता स्वत: नेतृत्वाची वाट न बघता विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे ही लोकशाहीला मजबुती देणारी गोष्ट घडत आहे.                                                 


लोकशाहीची ज्यांच्यावर मदार आहे अशा संवैधानिक संस्था आणि राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांसमोर नांगी टाकतांना दिसत असताना विरोधाचा झेंडा देशातील स्त्रियांनी आणि युवकांनी आपल्या खांद्यावर घेणे हे गेल्या कित्येक वर्षात स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात घडतांना दिसत आहे. विरोधी आवाज उठणारच नाही असा चंग बांधलेले सरकार असेल तर प्रस्थापितांना सरकारच्या विरोधापेक्षा सरकारच्या सोबत राहण्यातच आपली खैर वाटते. आज प्रस्थापित राजकीय पक्षांना असेच वाटत आहे. अशा परिस्थितीत विरोधाचा आवाज युवकच बुलंद करू शकतात आणि  तसा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात युवकांनीच आवाज बुलंद केला. ज्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने आजच्या सत्ताधाऱ्यांना मोठे केले तिची सुरुवात युवकांनीच केली होती. त्याच इतिहासाची आता पुनरावृत्ती होत आहे. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने देशातील लोकशाही वाचविली असेल मजबूत केली असेल तर आज रस्त्यावर उतरलेला युवक नेमके तेच करीत आहे हे मान्य करावे लागेल. गेल्या ५-६ वर्षातील भारतातील परिस्थिती बाबत सर्वात जास्त आनंदाच्या उकळ्या कोणाला फुटत असतील तर त्या पाकिस्तानला फुटत होत्या. भारतात मुस्लिमांवर अन्याय होत आहे, त्यांचा वाली कोणीच नाही हा अपप्रचार पाकिस्तान जगभर करत होता. नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या सर्वधर्मीय नागरिकांनी पाकिस्तानच्या अपप्रचाराची हवाच काढून टाकली आहे. या कायद्यामुळे मोदीजी म्हणतात तसे पाकिस्तान ऊघडे पडले असेलही  पण त्याहीपेक्षा या कायद्याच्या विरोधात प्रकट राष्ट्रीय एकात्मतेने पाकिस्तानची बोलतीच बंद केली आहे. मोदीजींना पाकिस्तानला जे दाखवून द्यायचे होते त्यापेक्षा अधिक भारतीय जनतेने दाखवून दिले आहे. 
 --------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment