Thursday, January 9, 2020

मोगलाई की रझाकारशाही ?सत्तेत आल्यानंतर भाजपने पोलीस आणि तत्सम यंत्रणांचा विरोध मोडून करण्यासाठी अभूतपूर्व   दुरुपयोग सुरु केला आहे आणि अशा दुरुपयोगाला जे विरोध करतात त्यांना देशद्रोही संबोधिले जात आहे. पोलीस आणि सैन्यदलाला बेकायदेशीर हुकूम न पाळता नियमानुसार काम करण्याचे इंदिरा राजवटीत जयप्रकाश नारायण यांनी केलेले आवाहन किती समयोचित होते हे मोदी राजवटीने सिद्ध केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------


मी इतिहासाचा विद्यार्थी नाही. त्यामुळे मोगल काळात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कशी होती यावर मला अधिकारवाणीने सांगता येणार नाही. पण व्यवहारात एक वाक्य नेहमी तुमच्या आमच्या कानावर पडत असते. जेव्हा दोन व्यक्ती हमरीतुमरीवर येतात तेव्हा त्यातला एक दुसऱ्याला 'ही काय मोगलाई आहे का?' असे सुनावताना आपण ऐकतो. यातून ध्वनित हे करायचे असते की इथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही वाटेल ते करू शकत नाही. देशात सध्या घडत असलेल्या घटना बघता आपण मोगलाईत तर जगत नाही ना असा भास होतो. मोगलांचे माहित नाही पण मी मराठवाड्यातला असल्याने हैदराबादच्या निजामाच्या कथा माझ्या कानावर पडल्या आहेत. या निजामाने आपल्या विरोधकांना नामोहरण करण्यासाठी एक दल उभारले होते. त्यांना रझाकार म्हणायचे. हे रझाकार निजाम सरकारच्या कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेच्या नाकाखाली आणि संरक्षणात लोकांवर अन्याय अत्याचार करायचे. सरकारी यंत्रणेची फूस आणि संरक्षण असल्याने त्यांच्या विरुद्ध तक्रारी करायची सोय नव्हती. थेट देशाच्या राजधानीत घडलेल्या घटना बघितल्या की निजामाच्या रजाकारांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. फरक एवढाच आहे कि, आताचे रजाकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झाले आहेत आणि देशाचे सध्याचे सर्वोच्च नेते मोदी आणि शाह देशात त्यांना होणारा विरोध मोडून काढण्यासाठी या राजाकारांचा वापर करीत आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घडलेली ताजी घटना याचा पुरावा आहे. 
जे एन यू चा उल्लेख वाचताच काहींना तिथे असेच घडायला पाहिजे होते असे वाटत असणार याची कल्पना आहे. एखाद्या विषयी पराकोटीचे समज - गैरसमज निर्माण करण्याची विलक्षण हातोटी आणि शक्ती संघ परिवारात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यावर ज्या 'देशद्रोही' घोषणांचे भांडवल जेएनयूच्या प्रतिमा भंजनासाठी केले गेले त्या बाबतीत ५ वर्षानंतरही खटला उभा राहिलेला नाही. खरी गोष्ट अशी आहे की जेएनयू हे देशातील राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक आणि संवेदनशील विद्यापीठ आहे . असे विद्यापीठ सर्वच सत्ताधाऱ्यासाठी गैरसोयीचे असते. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रधानमंत्री असताना इंदिरा गांधींना विद्यापीठात रोखले होते आणि परत जाण्यास भाग पाडले होते. असे होणे चूक की बरोबर यावर वाद होऊ शकतात. पण या घटनेनंतर काँग्रेसची एन एस यु आय आणि जेएनयू विद्यार्थी संघटना यांच्यात वाद, हमरीतुमरी किंवा मारामारी झाली नव्हती. विरोध हाच लोकशाहीचा आत्मा आहे हे मोदी सत्तेत येईपर्यंतचे सर्वमान्य तत्व होते. विरोध करणारे कायदा मोडत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि तशी ती करण्याला कोणाचा आक्षेप असू नये. पोलीसांनी कारवाई केली म्हणजे ती कायदेशीर ठरत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून झालेली पोलीस कारवाईच कायदेशीर असते. म्हणून सरकारी संरक्षणात पोलिसांच्या डोळ्यासमोर जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला जेवढा बेकायदेशीर तेवढाच दिल्लतील जामिया मिलिया विद्यापीठात विनापरवानगी घुसून दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला बेकायदेशीर होता. पोलीस यंत्रणाच जर नियम आणि कायदे मोडून अत्याचार करायला लागली तर ती मोगलाई ठरते. अशी मोगलाई हे मोदी राजवटीचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे.                                   

सत्तेत आल्यानंतर भाजपने पोलीस आणि तत्सम यंत्रणांचा विरोध मोडून करण्यासाठी अभूतपूर्व   दुरुपयोग सुरु केला आहे आणि अशा दुरुपयोगाला जे विरोध करतात त्यांना देशद्रोही संबोधिले जात आहे. सध्याच्या घटना बघता मोदी राजवटीला जयप्रकाश नारायण यांची आठवण करून देणे उचित ठरेल. कारण आज भाजप लोकमान्यतेच्या ज्या शिखरावर पोचला आहे त्यात जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील संघपरिवाराचा सहभाग महत्वाचा ठरला आहे. पोलीस आणि सैन्यदलाला बेकायदेशीर हुकूम न पाळता नियमानुसार काम करण्याचे इंदिरा राजवटीत जयप्रकाश नारायण यांनी केलेले आवाहन किती समयोचित होते हे मोदी राजवटीने सिद्ध केले आहे. जेएनयू मध्ये जे घडले ते याच्याही पलीकडचे आहे. ज्यांना माहित नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो मोदी राजवट आल्यापासून जेएनयू मध्ये प्रवेश करणाऱ्या द्वाराजवळ २४ तास मोठ्या संख्येत पोलीस असतात.                                                 

या पोलिसांच्या डोळ्यासमोरून  आणि जेएनयूचे गार्ड ठिकठिकाणी उभे असताना ५०-६० लोक तोंडावर कपडा बांधून हातात रॉड घेऊन आत शिरतात. तेथील शिक्षकांच्या घरावर हल्ला करतात , मुलींच्या वसतिगृहात घुसतात, मुलींना मारहाण करून रक्तबंबाळ करतात  आणि आरामात कोणाचीही भीती न बाळगता परत जातात. हे सरकारी आशिर्वादाशिवाय शक्य नाही. निजामाचा रझाकारांना जसा आशीर्वाद असायचा तसाच हा आशीर्वाद आहे. आणीबाणीचे दु:ख भोगलेले आणि आजही त्या दु:खाचे भांडवल करणारे लोकच सत्ता हाती आल्यावर बेभान  होऊन सत्तेचा दुरुपयोग करू लागले आहेत. इंदिराजींनी जे केले ते चूकच होते पण त्यांनी जे केले त्याला  किमान कायदा व घटना याचा आधार होता. मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि संघपरिवारातील संस्थांचे वर्तन 'हम करे सो कायदा' असे आहे. सध्याच्या राजवटीचे वर्णन नवी मोगलाई करायचे की नवी रझाकारशाही एवढाच काय तो मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो.
-----------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment