Thursday, July 16, 2020

पाकिस्तान केंद्रित विचार व धोरणाचा लडाख मध्ये फटका !


मोदीजी आणि भाजपसाठी पाकिस्तान मत देणारी कोंबडी आहे. त्यासाठी गेली ६ वर्षे पाकिस्तानला मार देवून मतपेटी भरण्याचा विचार त्यांच्या मानगुटीवर सवार आहे. यात चीनचा अडथळा नको म्हणून चीनला खुश ठेवण्याची कसरत मोदीजी करत आलेत. चीन अडचणीत आणू शकतो हा विचारच त्यांनी केला नाही. त्याचाच फटका लडाख मध्ये बसला आहे.
----------------------------------------------------------
चीनच्या आगळीकीवर जेव्हा जेव्हा बोलले जाते तेव्हा आपण आता १९६२ चा भारत राहिला नाही असे सांगत असतो. हे कथन सत्यच आहे. मागच्या शतकातले जग या शतकात खूप बदलले तसा भारतही बदलला. १९६२ मध्ये जेव्हा युद्धात चीनने भारताचा पराभव केला तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळून अवघे १५ वर्षे झाली होती आणि या काळात राष्ट्रउभारणीचे काम नेटाने सुरु होते. युद्धाची तयारी करण्यापेक्षा लोकांच्या गरजा कशा पूर्ण होतील इकडे अधिक लक्ष देणे त्या काळात गरजेचे होते. त्यामुळे तोपर्यंत म्हणावी अशी सैनिकी तयारी न झाल्याने चीनने अचानक पुकारलेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. भारताचा चीनशी मैत्री करार होता आणि त्यामुळे भारत चीन सीमेवरील सैनिकी तयारीत गाफिलता होती. तयारी अभावी लढावे लागल्याने मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवातून भारत बरेच काही शिकला आणि सैनिकी तयारीकडे विशेष लक्ष दिले गेले.                       

१९६२ नंतर अवघ्या ५ वर्षात १९६७ साली सीमेवर झालेल्या चकमकीत (युद्ध म्हणता येणार नाही) भारत चीनला धडा शिकविण्या इतका प्रबळ झाल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर १० वर्षाने अरुणाचल प्रदेशात सैनिकांची जमवाजमव करून चीनला आव्हान देण्यात आले होते. या दोन्ही प्रसंगात बोलणी करून सीमाप्रश्नावर तोडगा काढू अशी भाषा बोलायला भारताने चीनला भाग पाडले होते. याचाच परिणाम नरसिंहराव प्रधानमंत्री असताना १९९२ साली सीमेवर शांतता ठेवण्याचा करार झाला. या करारात सीमेवर सैनिक समोरासमोर आले तरी  एकमेकांवर गोळीबार करू नये असे ठरले. भारत चीन सीमेवर शेवटचा गोळीबार १९७५ साली झाला होता. डोक्लाम मध्ये धक्काबुक्की झाली. लडाख सीमेवर गोळी चालली नाही पण धक्काबुक्की पेक्षा जीवघेणी तुंबळ मारहाण होवून त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाल्याने सीमेवर गोळीबार न करण्याचा करार संकटात आला. पण ही घटना घडायच्या आधी प्रधानमंत्री मोदी यांनी मागच्या ४५ वर्षात जिथे भारत-पाक सीमेवर रोज गोळीबार होतो तिथे भारत चीन सीमेवर एकदाही गोळीबार न झाल्याचा एका पेक्षा अधिक प्रसंगी गौरव केला होता. ४५ वर्षात सीमेवर गोळीबारी करण्याची चीनची हिम्मत न होणे ही भारताच्या  वाढत्या सामर्थ्याची पावतीच होती.

१९६२ च्या पराभवापासून धडा घेत झालेली ही वाटचाल आहे आणि प्रत्येक प्रधानमंत्र्याच्या राजवटीचे यात योगदान आहे. पण मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी व सरकारच्या आहारी गेलेल्या माध्यमांनी चित्र असे निर्माण केले की मागच्या ६ वर्षात भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळे शत्रूची नजर वर करण्याची हिम्मत होत नाही. चीनने लडाखमध्ये जे केले त्यामुळे ६ वर्षात केले गेलेले सगळे दावे पोकळ होते हे सिद्ध झाले आहे. गेल्या ६ वर्षात कधी नव्हे एवढी लष्कराची चर्चा झाली, त्यांच्या बद्दल दररोज आदर व्यक्त करून झाला पण त्यांच्या गरजांकडे, संरक्षणाच्या दृष्टीने असलेल्या उणीवाकडे या काळात पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही. कारण मागच्या ६ वर्षात आम्ही आमची तुलना सतत पाकिस्तानशी करत आलोत. पाकिस्तानच्या तुलनेत आपण वरचढ आहोत, पाकिस्तानला केव्हाही धडा शिकवू शकतो याच समाधानात आम्ही वावरत आलो आहोत. मुळात आपण आपली तुलना पाकिस्तान सारख्या अप्रगत, चिमुकल्या राष्ट्राशी करून आपली पाठ थोपटून घेणेच चूक होते.            

पाकिस्तानला धडा शिकविण्याची ताकद आपल्यात कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे आपले संरक्षण धोरण पाकिस्तान केंद्रित ठेवण्याची गरज नव्हती. पण मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी पाकिस्तान ही मत देणारी कोंबडी आहे. परिणामी आमच्या राजकारणाचा आणि सैन्यकारणाचा गेल्या ६ वर्षातील केंद्रबिंदू पाकिस्तान राहिला आणि त्याला डोळ्यापुढे ठेवून संरक्षण विषयक धोरणे ठरत गेलीत. गेल्या ६ वर्षात पाकिस्तान आमच्या मानगुटीवर एवढा बसला आहे की चीनकडे लक्ष देण्याची गरज आणि उसंत आम्हाला मिळाली नाही. उलट पाकिस्तानची जिरविण्यासाठी आम्ही चीनची सरबराई करू लागलो. व्यापारामध्ये आणि गुंतवणुकीसाठी चीनला नको तितक्या सवलती जितक्या मोदी काळात दिल्या गेल्या तितक्या मागील सर्व प्रधानमंत्र्याच्या काळात दिल्या गेल्या नाहीत. हे करण्यात जेवढा आपल्या गरजा भागविण्याचा विचार होता तेवढाच चीनला खुश ठेवण्याचा प्रयत्न होता. आर्थिक व्यवहार जेवढे वाढतील तेवढे चीनच्या खुसपट काढण्याच्या वृत्तीला लगाम बसेल आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या आड चीन येणार नाही अशी यामागे धारणा होती. चीन आपल्याला अडचणीत आणू शकतो हा विचार मोदी आणि त्यांच्या सरकारच्या डोक्यातच आला नाही. त्यामुळे चीनला रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून आपल्या संरक्षण विषयक धोरणाची आखणीच या सरकारने केली नाही. त्याचा फटका आता लडाख मध्ये बसला आहे.

आता असे सांगण्यात येत आहे कि मोदी सरकारने सीमेवर रस्ते आदि चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचे काम केले आणि त्यामुळे चिडून चीनने अशी आगळीक केली. याबाबतीत मुद्दाम आणि नवे असे मोदी सरकारने काहीही केले नाही. सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चरचे काम जे आधीच्या राजवटीपासून सुरु होते तीच कामे या राजवटीत पुढे नेली जात आहेत. लडाख सीमेपर्यंत रस्त्याचे जाळे उभारण्याचे काम मनमोहन राजवटीत सुरु झाली होती ती आता मोदी काळात पुरी होत आहेत. आधीचे प्रधानमंत्री मोदीजी सारखा फक्त पाकिस्तानचा विचार करून संरक्षण विषयक धोरणे ठरवत नव्हती तर चीन देखील त्यांच्या नजरेसमोर असायचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनमोहन काळात लडाखमध्ये जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर लढाऊ विमाने उतरण्याची करण्यात आलेली सोय. चीनला डोळ्यापुढे ठेवून ही सोय करण्यात आली. लडाखची उंच आणि दुर्गम अशी युद्धभूमी लक्षात घेवून चीनच्या आक्रमक घुसखोरीचा तितक्याच आक्रमकपणे व समर्थपणे मुकाबला करता येईल अशी सैन्याची नवी डिव्हिजन “माउंटन स्ट्राईक कॉर्प्स” उभी करण्याचा निर्णय मनमोहन सरकारने घेतला आणि अंमलात आणायला सुरुवात देखील केली होती. एक डिव्हिजन तयारही झाली. मोदी सरकार आल्यानंतर दुसऱ्या डिव्हिजनची उभारणी थांबविण्यात आली ! कारण चीनचा मुकाबला करण्याचा विचारच मोदींनी केला नाही. त्याचाच फटका लडाखमध्ये बसला आहे. आम्हाला मात्र मनमोहनसिंग लेचेपेचे वाटतात आणि मोदी आक्रमक ! प्रचाराचे हे सामर्थ्य आहे.
---------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com  

No comments:

Post a Comment