चीन प्रकरणात ठळकपणे कोणती गोष्ट अधोरेखित होत असेल तर ती म्हणजे प्रधानमंत्र्याच्या प्रतिमेला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची प्राधान्याने काळजी घेतली जात आहे. प्रतिमे पुढे देशहित गौण ठरले आहे.-------------------------------------------------------
चीन संदर्भात बोलावलेल्या
सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याचे सांगून
प्रधानमंत्र्याने देशाची दिशाभूल केल्याचे आता सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे.
प्रधानमंत्र्याच्या विधानानंतर उपग्रहामार्फत घेण्यात आलेली चित्रे प्रकाशित झालीत
तेव्हाच हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर भारताच्या चीनमधील राजदूताची पीटीआय या
वृत्तसंस्थेने जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीतूनही हे सत्य बाहेर आले. सेवानिवृत्त
लष्करी अधिकारी तर मे महिन्यापासून चीनने भारतीय हद्दीत घूसखोरी केल्याचे सांगत
होते. ऊरी घटनेनंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक वेळी सेनेच्या उत्तर विभागाची कमान
ज्यांच्या हाती होती ते लेफ्टनंट जनरल हुडा हे सांगत होते. गलवान खोऱ्यात तैनात
बटालियनचे वर्ष दोन वर्षे आधी प्रमुख असलेल्या सेवानिवृत्त कर्नलने पण चीनने
घुसखोरी केल्याचे सांगत होते. मे महिन्यापासून अशी चर्चा सुरु असतांना सरकार मात्र
मौन धारण करून होते. घुसखोरी बद्दल काहीही न बोलता सैनिक पातळीवर चीनशी बोलणी सुरु
असल्याचे अधूनमधून सांगितले जात होते. बोलणी कशाबद्दल सुरु आहेत हे देखील
स्पष्टपणे सांगितले जात नव्हते. बोलणी सुरु असलेल्या काळातच १५ जूनच्या रात्री भारतीय
आणि चीनी सैनिकात झालेल्या हाणामारीत भारतीय जवान शहीद आणि अनेक सैनिक जखमी झाल्याच्या
घटनेने देशाला धक्का बसला. घटना कशी घडली आणि त्यामागची कारणे काय होती हे
आजतागायत सुसंगतरित्या सांगण्यात आले नाही. आता प्रधानमंत्री मोघमपणे सांगतात की
आमच्या सैनिकांनी शत्रू सैनिकांना चांगला धडा शिकविला ! धडा शिकविला असेल तर
कशाबद्दल, चीनने कोणती आगळीक केली होती याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. या
संदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण हे चीनने घुसखोरी केल्याचा कबुलीनामा ठरणार असल्याने
ही मोघम धडा शिकविल्याची भाषा उच्चारली जात आहे. ज्या घटनेला मोदीजी धडा शिकविला
असे म्हणतात त्या धड्यानंतर त्याच ठिकाणी चीनी सैनिकांचा डेरा वाढल्याच्या सचित्र
बातम्या येत होत्या.
आता वाटाघाटीनंतर त्या
ठिकाणावरून चीनी सैन्य दोन कि.मी. माघारी जात असल्याच्या बातम्या येत आहेत.
भारतातील जी माध्यमे चीनने घुसखोरी केलीच नाही या मोदीजीच्या म्हणण्याची आजवर री
ओढत होती ती माध्यमे चीन माघारी फिरत असल्याच्या बातम्या चढाओढीने देत आहेत. हा
मोदी सरकारचा कसा मोठा विजय आहे हे भासवीत आहेत. चीन प्रकरणात ठळकपणे कोणती
गोष्ट अधोरेखित होत असेल तर ती म्हणजे प्रधानमंत्र्याच्या प्रतिमेला कोणत्याही
प्रकारचा तडा जाणार नाही याची प्राधान्याने काळजी घेतली जात आहे. ही काळजी त्यांचे
सहकारीच घेत नाही तर दस्तुरखुद्द प्रधानमंत्री घेत आहेत आणि या काळजीतूनच ‘चीनने
घूसखोरी केली नसल्याचा’ दावा प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत केला. या उलट
चीन मध्ये घडले. आपल्याला मान्य करणे अवघड जात असले तरी चीन सैनिकी आणि
आर्थिकदृष्ट्या आपल्यापेक्षा बराच प्रबळ आहे. अशा प्रबळ देशाला भारतीय सैनिक
आमच्या हद्दीत आलेत आणि आमच्यावर हल्ला केल्याने संघर्ष झाला अशी उलटी बोंब मारायला
कोणताही कमीपणा वाटला नाही ! चीनच्या या उलट्या आणि खोट्या बोंबावरही आमच्या
स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या बिनडोक लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या तर
बघा मोदीच्या शासन काळात आपले सैनिक चीनच्या हद्दीत गेलेत आणि त्यांना धडा शिकवून
परत आलेत ! म्हणजे
मोदींच्या कथित ५६ इंची प्रतिमेच्या रक्षणासाठी आमच्या हद्दीत शिरलेला चीन आमच्या हद्दीत नाहीच हे सांगण्यापर्यंत मजल गेली. हे तर नेत्याची प्रतिमा सावरण्यासाठी देशहिताचा बळी देणे झाले.
मोदींच्या कथित ५६ इंची प्रतिमेच्या रक्षणासाठी आमच्या हद्दीत शिरलेला चीन आमच्या हद्दीत नाहीच हे सांगण्यापर्यंत मजल गेली. हे तर नेत्याची प्रतिमा सावरण्यासाठी देशहिताचा बळी देणे झाले.
प्रधानमंत्र्याच्या ‘भारतीय
हद्दीत कोणी घुसखोरी केली नाही’ या विधानावर देशात चौफेर टीका झाली असली तरी या
विधानाचे स्वागत चीन मध्ये झाले. घुसखोरी करूनही मोदींच्या विधानाचा आधार देवून
चीन म्हणू लागला कि आम्ही तर आमच्याच हद्दीत आहोत. मोदींच्या विधानाने चीनची बाजू
बळकट झाली हे लक्षात आल्यावर आपली चूक कबुल करण्या ऐवजी सत्ताधारी पक्षाने
काँग्रेसवर हल्ला चढवून मुद्द्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न झाला आणि
आजही सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते चीनशी झालेल्या संघर्षावरून चीनवर तोफ
डागण्या ऐवजी कॉंग्रेसवर तोफ डागत आहेत. कॉंग्रेसला १९६२ च्या पराभवाची आठवण करून
देत आहेत. गेल्या ६ वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सरकारने चुकीचे पाउल
उचलल्यावर आणि कोंडीत पकडल्या गेल्यावर सातत्याने एकच गोष्ट केली ती म्हणजे सगळा
दोष कॉंग्रेसवर ढकलून देण्याची. कॉंग्रेसने चुका केल्यात म्हणून भारतीय जनता
पक्षाला संधी मिळाली हे विसरून आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी कॉंग्रेसने
मागे कशा चुका केल्यात हे सांगण्यात सत्ताधारी पक्ष धन्यता मानत आला आहे. आजही
प्रधानमंत्र्यासह एकही जबाबदार मंत्री चीनचे नाव घेवून टीका करायला तयार नाही.
त्यांचा सगळा जोर कॉंग्रेसवर टीका करण्यात लावत आहेत. १९६२ मध्ये चीनने आपला पराभव
केला आणि बऱ्याच मोठ्या भारतीय भूभागावर कब्जा केला हे कोणी जनतेपासून लपवून ठेवले
नव्हते. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत हा १९६२ चा भारत नाही. आम्ही जशासतसे उत्तर
द्यायला समर्थ आहोत अशा जाहीरसभेत वल्गना करणारे नेते चीनचे नाव घेण्याचे टाळतात
आणि चीनने घुसखोरी केलीच नाही असे खोटे सांगून चीनशी शक्यतो युद्धाची वेळ येवू नये
यासाठी धडपड करीत असल्याचे दृश्य भारताची शान वाढविणारे नाही. युद्ध करणे किंवा युद्ध होणे ही चांगली गोष्ट नाहीच. युद्ध
टाळायलाच हवे. पण कॉंग्रेसने युद्ध टाळायचा प्रयत्न केला तर त्यांना भित्रे
ठरवायचे हा दुटप्पीपणा झाला.
चीनच्या घुसखोरी वरून देशाने एकमुखाने चीन विरुद्ध
उभा ठाकण्याची, बोलण्याची गरज असताना भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांविरुद्ध उभे
ठाकलेले चित्र चांगले नाही. अशा प्रसंगी सर्वाना विश्वासात आणि सोबत घेवून
जाण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. ही जबाबदारी पार पाडण्यात प्रधानमंत्री
मोदी आणि त्यांचे सरकार अपयशी ठरले आहेत. या अपयशाचे मूळ मोदींची प्रतिमा सतत
चमकावत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. विरोधी पक्षा सोबतच्या बैठकीत सर्वाना
विश्वासात घेवून सीमेवर काय चालले आहे या बाबत सत्य सांगता आले असते. स्वत:च्या ५६
इंची प्रतिमेत कैद प्रधानमंत्र्याने विरोधीपक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेवून
त्यांच्याशी संवाद साधण्या ऐवजी जाहीरसभेत ठोकावे तसे भाषण ठोकले. अशी भाषणे
असत्यांनी भरलेली असतात. पण यावेळच्या असत्याने देशहिताचा बळी जाण्याचा धोका
निर्माण झाला. कोण्याही व्यक्ती पेक्षा किंवा व्यक्तीच्या प्रतिमे पेक्षा देश आणि
देशाची प्रतिमा मोठी आणि महत्वाची असते हे चीनच्या घुसखोरीच्या निमित्ताने आपण
आपल्या मनावर बिंबवून घेतले पाहिजे.
----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
No comments:
Post a Comment