Thursday, July 23, 2020

१९६२ चा भारत नाही तरीही नमते घेण्याची पाळी का ?


चीनच्या विस्तारवादाचा त्यावेळी नेहरू, भारत व जगाला तितका अनुभव नव्हता जितका त्यानंतरच्या काळात अनुभव आला. हा अनुभव पाठीशीच नाही तर डोळ्यासमोर दिसत असतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भ्रमात आणि बेसावध राहणे नेहरूंपेक्षा मोठी आणि अक्षम्य राजकीय चूक ठरते.
----------------------------------------------------------------

१९६२ चा भारत या शब्दाला ऐतिहासिक संदर्भ आहे तो भारत – चीन युद्धाचा. चीनने अचानक हल्ला करून लादलेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. आता जेव्हा जेव्हाही चीन कुरापत काढतो तेव्हा आपण १९६२ चा भारत आता राहिलेला नाही असा इशारा आपण आपल्यालाच ऐकू येईल अशा आवाजात देत असतो. १९६२ च्या तुलनेत भारताने आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे आणि १९६२ च्या तुलनेत आपले सेनादल प्रगत आणि अद्यावत झाले आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या १९६५ आणि १९७१ च्या लढाईत मोठा विजय मिळविल्याने आणि कारगील सारखी अवघड लढाई जिंकल्याने सेनेचा आत्मविश्वासही दुणावला आहे. सेनेच्या गरजा लक्षात घेवून त्या पुरवण्याची आर्थिक क्षमता सुद्धा आम्ही प्राप्त केली आहे. हे सगळे १९६२ नंतर घडले. अर्थात १९६२ नंतर चीनने सुद्धा प्रगती केली आणि ती आपल्यापेक्षा जास्त केली हे मान्य करायला हवे. असे असले तरी सैन्य बळात १९६२ साली लढाईच्या तंत्रात आणि तंत्रज्ञानात चीन जेवढा वरचढ होता त्याच्या पेक्षा फार वरचढ झाला अशातला भाग नाही. सैन्यावर खर्च करण्याची त्याची ताकद आपल्या पेक्षा जास्त आहे इतकेच. आर्थिक आणि तंत्रज्ञानात प्रबळ असलेल्या शत्रूला पराभूत करता येते याचे अनेक दाखले जुन्या आणि ताज्या इतिहासातही उपलब्ध आहेत. अशी बाजू पलटवण्याची क्षमता असताना आम्हाला १९६२ मध्ये हार स्वीकारावी लागली आणि त्यानंतर सर्वव्यापी प्रगती करूनही आज २०२० मध्ये चीनला धडा कसा शिकवायचा या बाबत चाचपडत आहोत. आधी कुरापती थांबवा मगच बोलणी करू असे दरवेळी पाकिस्तानला ठणकावणारे सरकार चीनला आधी सैन्य मागे घ्या मगच बोलणी करू असे ठणकावत नाही. चीनने आपल्या हद्दीत परत जावे म्हणून सुरु झालेला वाटाघाटीचा सिलसिला संपता संपत नाही. १९६२ चा भारत राहिला नसतांना असे का घडत आहे हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

१९६२ च्या पराभवामागे आज जे मुख्य कारण सांगण्यात येते ते म्हणजे त्यावेळी आम्ही लढण्यासाठी पुरेशा साधनसामुग्रीनिशी तयार नव्हतो. त्यावेळी आपली आर्थिक स्थिती अशी नव्हती कि संरक्षण विषयक गरजा सहज पूर्ण करता येतील. पण त्याही पेक्षा चीनशी लढायची वेळ येईल असे प्रामुख्याने त्यावेळचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांना वाटत नव्हते. कारण ते भारत – चीन मैत्री संबंधाने भारावलेले होते. सीमा विषयक ज्या काही समस्या आहेत त्या चर्चेद्वारे सोडविता येतील असे त्यांना वाटत होते. त्यामुळे चीनशी मुकाबला करण्यासाठी जशी सैनिकी सज्जता पाहिजे तशी केली गेली नाही. दुर्गम डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशात लढण्यासाठी सैनिकांना पेहरावापासून लढण्या पर्यंतची जी आयुधे आवश्यक होती त्याची कमतरता होती आणि त्यातून मानहानीकारक पराभव झाल्याचे राजकीय विश्लेषण आहे आणि नेहरू मुळेच ते घडले असे आजच्या भाजप सत्ताधाऱ्यांना वाटत आले आहे. सैनिकी विश्लेषण या पेक्षा वेगळे आहे आणि त्याविषयी भारतीय सैन्यदलाने अहवाल देखील तयार केला आहे पण त्याविषयी नंतर कधीतरी चर्चा करू.  एक गोष्ट खरीच आहे कि लढण्यासाठी त्यावेळी साधनसामुग्रीची कमी होती आणि असलेली साधनसामुग्री वेळेवर आवश्यक तिथे पोचविता येईल अशा प्रकारच्या दळणवळणाचा अभाव होता. आता २०२० मध्ये ती परिस्थिती राहिली नाही यावर जवळपास सर्वांचे एकमत आहे. आणि तरीही मागच्या तीन महिन्यापासून  लडाख सीमेवर चीनच्या कुरापती सुरु असूनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकदाही चीनचे नाव घेवून चीनला ललकारले नाही. सैनिकी कारवाई ही दूरची गोष्ट झाली. सर्व प्रकारची क्षमता असताना आणि साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याची क्षमता विकसित झाली असताना आम्हाला चीनला आव्हान देणे शक्य झाले नाही ही १९६२ पेक्षा गंभीर बाब आहे. ६२ मध्ये मुळातच आमची आर्थिक आणि सैनिकी क्षमता कमी होती. पण आज तशी परिस्थिती नसतांना चीन विरुद्ध १९६२ च्या स्थितीत आपण सापडलो आहोत.

या परिस्थितीत आपण सापडण्याचे कारण शोधायला गेले तर तर प्रथमदर्शनी तीच कारणे समोर येतात जी १९६२ च्या पराभवासाठी संघ-जनसंघ-भाजपा देत आला आहे ज्याचा वर उल्लेख केला आहे. चीन-भारत मैत्रीने पंडीत नेहरू जितके भारावले होते तितकेच मागच्या ५ वर्षात सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारावलेले होते. त्यातूनच मागच्या ६५ वर्षात भारतीय नेत्यांनी जेवढ्या चीनी नेत्यांच्या भेटी घेतल्या तेवढ्या भेटी तर गेल्या ५ वर्षात एकट्या मोदीजीनी घेतल्या. नेहरू – चौ एन लाय मैत्री सारखीच मोदी-क्षी जिनपिंग यांची मैत्री आपण पाहिली. भारत – चीन यांच्यातील वाढत्या संबंधाने नेहरूंनी चीन सोबत युद्धाची वेळ येईल याचा विचारच केला नव्हता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेमके त्याच भ्रमात राहिले. चीनच्या विस्तारवादाचा त्यावेळी नेहरू, भारत व जगाला तितका अनुभव नव्हता जितका त्यानंतरच्या काळात अनुभव आला. हा अनुभव पाठीशीच नाही तर डोळ्यासमोर दिसत असतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भ्रमात आणि बेसावध राहणे नेहरूंपेक्षा मोठी आणि अक्षम्य राजकीय चूक ठरते. १९६२ मध्ये अचानक हल्ला करून चीनने नेहरुंना आणि भारताला सावरायला वेळ दिला नव्हता. पण लडाख मध्ये जे घडले ते अचानक नव्हते. चीनने लडाख सीमेवर एका दिवसात जमवाजमव केली नव्हती. मे महिन्यात घुसखोरी केली त्याच्या कितीतरी आधी सैनिकांची आणि युद्ध सामुग्रीची चीनने जुळवाजुळव केली असणार. पण तिकडे आमचे दुर्लक्ष झाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घुसखोरी केल्याचे लक्षात आल्यावरही घुसखोरांना बाहेर हाकलण्याचे नियोजन करण्या ऐवजी घुसखोरी लपविण्याचा प्रयत्नच अधिक झाला. चीन निघून जाईल या आशेवर दीड महिना घालविला. १५ जूनच्या घटनेत आपले २० सैनिक मारले गेलेत, कित्येक जखमी झालेत तर काहीना चीनने बंदी बनवून ठेवले तेव्हा कुठे मोदी सरकारला खडबडून जाग आली. आणि जाग आल्यावर हेही दिसले की चीनशी मुकाबला करायचा तर सैन्याकडे युद्ध सामुग्रीची कमी आहे ! तोंडाने आम्ही हा १९६२ चा भारत नाही म्हणत राहिलो तरी युद्धसामुग्री आणि सीमेवरील सैन्यसज्जते बाबत १९६२ च्या स्थितीत असल्याचे लक्षात आले. २०२० मध्ये आम्ही १९६२ अनुभवत असू तर त्यातून विद्यमान राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आणि धोरण व नियोजन शून्यता अधोरेखित होते. मनमोहनसिंग यांच्या काळात असे घडले असते तर मोदी व भाजपने काहूर माजवून मनमोहनसिंग यांचा राजीनामा मागितला असता. आत्ताच्या विरोधीपक्षात राजीनामा मागण्याचीही ताकद नसल्याने मोदी व त्यांच्या सरकारची घोडचूक दुर्लक्षित होते आहे. सरकारने विरोधी पक्षाच्या हल्ल्याची वाट न पाहता चीन बद्दलची चूक कबुल करून दुरुस्त केली पाहिजे.  
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com


No comments:

Post a Comment