Thursday, June 10, 2021

चुकीला चूक म्हणणे टाळल्याने आजचे संकट -- ५

देशहित जपायचे की मोदींची खोटी प्रतिमा जपायची हा प्रश्न चीनच्या घुसखोरीच्या निमित्ताने समोर आला तेव्हा देशभक्तीचा टेंभा मिरविणाऱ्यानी मोदींच्या बाजूने कौल दिला आणि तुमच्या आमच्या सारखे सामान्य नागरिक गप्प बसले.

----------------------------------------------------------

मागच्या लेखात पाकिस्तान कडू
न होणारे आतंकवादी हल्ले आणि सर्जिकल स्ट्राईकच्या रुपात दिलेले प्रत्युत्तर याची चर्चा केली होती. त्या चर्चेवरून आपल्या लक्षात येते की धडा शिकविला, प्रचंड नुकसान केले हा निव्वळ प्रचार आहे. उलट पाकिस्तान आपल्या कारवाया वाढवत असल्याचे चित्र आहे. सरकारने आदेश दिला तर जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानच्या ताब्यातील भाग आम्ही परत मिळवू शकतो असे विधान सध्याचे लष्कर प्रमुख नरवणे यांनी केले आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचा भाग परत मिळविणे हा पाकिस्तानला धडा शिकविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि लष्कर त्यासाठी तयार असताना मोदी सरकार तसा आदेश का देत नाही हा प्रश्न लष्कर प्रमुखाच्या विधाना नंतर आपल्याला पडायला हवा आणि तो प्रश्न मोदी आणि त्यांच्या सरकारलाही विचारायला हवा होता. पण भारतीय जनतेची पाकिस्तान ही कमजोरी आहे. त्याच्या विरुद्ध बोलत राहिले तरी आम्हाला समाधान मिळते. सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई आमच्यात आनंदोन्माद निर्माण करते. युद्ध करून अडचणी वाढवून घेण्यापेक्षा छोट्या छोट्या कारवाया करत जनतेत उन्माद निर्माण करून राजकीय लाभ मिळवित राहण्याची मोदीनीती आहे. या नीतीने राजकीय फायदा होत असला तरी आपल्या सैनिकांना त्याची किंमत चुकवावी लागते. १९४८ साली युद्ध लांबत चालले होते व नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाला ते परवडणारे नव्हते म्हणून त्यावेळी युद्धबंदी करावी लागली त्यावर आजही टीका करणारे आजचे राज्यकर्ते आज लष्कराची जय्यत तयारी असताना तो भाग परत मिळवायची कारवाई का करत नाही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे मोदी सरकारच होत नाही. आम्हीही होतो ही खरी अडचण आहे.                              

जागे अभावी मागच्या लेखात एका महत्वाच्या घटनेची चर्चा करता आली नव्हती. ती घटना म्हणजे लडाख मध्ये चीनने केलेली घुसखोरी. अशी घुसखोरी झाल्याची आणि खूप आतवर घुसखोरी झाल्याची सचित्र माहिती परदेशी नियतकालिकांनी दिली तेव्हा अशी घुसखोरी झाल्याचे देशवासीयांना कळले. नंतर या घुसखोरी संदर्भात दोन देशात चर्चा होत असल्याच्या बातम्या आपल्याकडील माध्यमांनी दिल्या. मात्र घुसखोरी झाल्याचे ना सरकारने मान्य केले ना प्रसिद्धी माध्यमांनी देशवासीयांना सांगितले. लडाख सीमेवर नेमके काय घडत आहे हे देशाला सांगण्याची जबाबदारी प्रधानमंत्र्याची होती. पण त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत चीनचे नांव न घेता कोणी आपल्या हद्दीत घुसले नाही आणि काही विपरीत घडले नाही अशी तद्दन खोटी माहिती दिली. पाकिस्तानचा विषय निघाला की आमच्या प्रधानमंत्र्याच्या जीभेवर शब्दांच्या लाह्या फुटतात पण चीनने केलेल्या घुसखोरी बद्दल त्यांनी ब्र देखील उच्चारला नाही. चीनने घुसखोरी केल्याचे उघड झाल्या नंतर आजतागायत एकदाही प्रधानमंत्री मोदी यांनी चीनचे नांव घेतले नाही. कारवाईच्या नावावर चीनी अॅपवर तेवढी बंदी घातली.                                                

आमच्या हद्दीत कोणी घुसले नाही या प्रधानमंत्र्याच्या वक्तव्याचा उपयोग चीनने करत आम्ही घुसखोरी केली नसून आम्ही जेथे आहोत ती भूमी आपलीच असल्याचा दावा जगासमोर केला आणि त्यासाठी घुसखोरी झाली नसल्याचे आपल्या प्रधानमंत्र्याचे विधान पुरावा म्हणून समोर केले. संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चीनच्या घुसखोरीची माहिती देण्यात आली पण काही तासातच ती माहिती वेबसाईटवरून काढून टाकण्यात आली होती. स्वत:ची ५६ इंच छातीची प्रचारातून निर्माण केलेली प्रतिमा भंगू नये यासाठी चीनने घुसखोरी केली नसल्याचे खोटे विधान हे देशहिताच्या विरोधात असताना कोणाला संताप येणार नसेल , कोणी त्यासंबंधी प्रश्न विचारणार नसतील आणि त्यांचे समर्थक मोदी चुकीचे सांगत नसल्याचा प्रचार करीत असतील तर याचा अर्थ त्यांच्यासाठी देश नाही मोदी महत्वाचे आहेत. देशहित जपायचे की मोदींची खोटी प्रतिमा जपायची हा प्रश्न चीनच्या घुसखोरीच्या निमित्ताने समोर आला तेव्हा देशभक्तीचा टेंभा मिरविणाऱ्यानी मोदींच्या बाजूने कौल दिला आणि तुमच्या आमच्या सारखे सामान्य नागरिक गप्प बसले. चुकीला चूक म्हणण्याचे , प्रश्न विचारण्याची हिम्मतच आम्ही गमावून बसलो. त्यावेळी अशा वागण्याची आणि सरकारच्या लेच्यापेच्या संरक्षण धोरणाची शिक्षा हकनाक आमच्या जवानांना भोगावी लागली. लडाखच्या गलवान घाटीत चिन्यांशी झालेल्या हाणामारीत आपल्या २० पेक्षा अधिक जवानांना प्राण गमवावा लागला, कित्येक जखमी झालेत आणि आपल्या काही सैनिकांना चीनने बंदीही बनवले होते. या घटनेला १५ जूनला एक वर्ष होईल पण घटना का व कशी घडली हे समोर आले नाही.

 

गलवान घाटीत  घुसखोरी करून तंबू ठोकून जिथे चीनी सैनिकांनी आपला डेरा टाकला होता त्या ठिकाणी १५ जूनच्या रात्री आपले शे-दीडशे जवान गेले होते. ते तिथे कशासाठी गेले होते आणि कोणाच्या आदेशाने गेले होते हे आजतागायत सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पण त्यावेळी ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्यानुसार चीनने कबुल करूनही तेथून तळ का हलविला नाही याचा जाब विचारण्यासाठी आणि तंबू उखडून फेकण्यासाठी आपले सैनिक तिथे गेले होते. त्या ठिकाणी चीनी सैनिका सोबत झटापट आणि हाणामारी झाली. या झटापटीत आणि हाणामारीत चीनचेही सैनिक मेले असतील यात शंकाच नाही. पण शेवट काय झाला ते वर सांगितले आहेच. चीनचे सैनिक आणि तंबू तिथेच राहिला. आपल्याला तेथून मृत आणि जखमी सैनिकांना घेवून यावे लागले आणि ज्या सैनिकांना बंदी बनविले होते त्यांच्या सुटकेसाठी रशियाकडून चीनवर दबाव टाकण्यात आला व सैनिकांची सुटका झाली. यावरून स्पष्ट होते की हाणामारीत चीनचे कितीही सैनिक मेले असतील तरी तेथून चीनी सैनिकांना हुसकावण्यात यश आले नाही आणि या कारवाईत आपली मोठी हानी झाली. १९६२ चे चीन सोबतचे युद्ध आणि त्यातील चुका आजही आजचे राज्यकर्ते सांगताना थकत नाहीत , मग गलवान घाटीत कोणाची चूक होती याबद्दल चुप्पी कशासाठी ? त्याची का चर्चा करायची नाही आणि कोणाच्या चुकी मुळे आपल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले याची जबाबदारी का निश्चित होत नाही हे प्रश्न मोदी सरकारला विचारणे गरजेचे होते. हे प्रश्न उपस्थित होण्याला कारणही आहे. या कारणांचा विचार पुढच्या लेखात करू.
----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment