Thursday, June 24, 2021

चुकीला चूक म्हणणे टाळल्याने आजचे संकट -- ७

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या हाताळणीत मोदी आणि त्यांच्या सरकारने केलेल्या चुकांवर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या असे लक्षात येईल की त्याच चुका त्यांनी दुसऱ्या लाटेच्या वेळी केल्या आणि त्याही मोठ्या प्रमाणात.
---------------------------------------------------------------------------

 
मोदी सरकारने चढत्या क्रमाने घोडचुका करूनही त्यावर पांघरूण घालण्यात यश मिळविले याचे प्रमुख कारण निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे आणि त्या प्रश्नावर सरकारने समर्पक प्रतिसाद देण्याची आजवरची राजकीय व्यवस्था मोदी आणि त्यांच्या सरकारने मोडीत काढली. या राजवटीला प्रश्न विचारणारा, निर्णयावर टीका करणारा देशद्रोही ठरेल याची चोख व्यवस्था मोदी सरकारने केली आहे. निर्णयाच्या विपरीत परिणामांकडे साफ दुर्लक्ष करून प्रत्येक निर्णय कसा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे हे सांगण्याची चढाओढ लागलेली मोठी जमात आपल्या पदरी या सरकारने बाळगली आहे. प्रश्न विचारून सत्य लोकांसमोर आणण्याची ज्याची जबाबदारी आहे तो लोकशाहीचा तथाकथित चौथा स्तंभ असलेली प्रसार माध्यमे नितीमत्ता सोडून सत्याचा विपर्यास करत मोदी आणि त्यांचे सरकार कसे बरोबर आहे हेच २४ तास सांगत असतो. अगदी २-३ महिन्यापूर्वी पर्यंत लोकांचा ज्याच्यावर अति विश्वास होता ते देशाचे सुप्रीम कोर्ट सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचे टाळत सरकार म्हणेल तेच खरे हे निमुटपणे मान्य करीत होते. अशा प्रकारे मोदी सरकार बेलगाम झाल्याने त्यांच्या चुकांचा घोडा चौखूर उधळला . या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्था रसातळाला जाणे, सामाजिक,धार्मिक ऐक्याचा धागा कमजोर होणे, महागाई आणि बेरोजगारीत अभूतपूर्व वाढ होणे यात झाला आहे. कोरोनामुळे हे घडलेले नाही.     

कोरोनाने देशात प्रवेश करण्या आधीच सरकारच्या चुकीच्या आणि अविचारी निर्णयाचे परिणाम समोर आले होते. कोरोनामुळे ते परिणाम गडद झाले इतकेच. योग्य वेळी योग्य पाउले उचलून कोरोनाचा विनाशकारी परिणाम कमी करता आला असता. पण मोदी आणि त्यांच्या सरकारच्या चुकांचा आरसा त्यांच्या समोर धरणारा राहुल गांधी सारखे अपवाद सोडले तर कोणीच नसल्याने कोरोना हाताळणीच्या बाबतीतही मोदी सरकारने त्याच त्याच चुका केल्या आणि त्याही चढत्या क्रमाने केल्याने देशात कोरोनाने थैमान घालून  अपरिमित अशी जीवित आणि वित्तहानी केली. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या हाताळणीत मोदी आणि त्यांच्या सरकारने केलेल्या चुकांवर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या असे लक्षात येईल की त्याच चुका त्यांनी दुसऱ्या लाटेच्या वेळी केल्या आणि त्याही मोठ्या प्रमाणात. पहिल्या लाटेच्या वेळी काय घडले ? देशात कोरोनाने प्रवेश केल्या नंतरही सरकारने कोरोनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आपल्या देशात कोरोनाने प्रवेश केला तेव्हा तो विषाणू किती अनर्थकारी आहे हे चीन मधील परिणामावरून समोर आले होते. तरी सरकार बेफिकीर राहिले. कोरोना देशात विमानमार्गे आला हे लक्षात आल्यावर विमान प्रवाशांची चाचणी करण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती ती केली गेली नाही. चाचणी करण्याचीच नाही तर विमान सेवेवर निर्बंधाची गरज होती. पण निर्बंध घालणे लांबवले कारण मोदींना त्यावेळचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना अहमदाबादेत बोलावून भव्य सोहळा घडवून आणायचा होता. आधीच विमान सेवेवर निर्बंध घातले असते तर हा सोहळा होवू शकला नसता. या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांची विना अटकाव व विना तपासणी ये-जा सुरु होती. आणि कोरोना रोखण्यासाठी जेव्हा गर्दी टाळण्याची गरज होती तेव्हा ट्रंप यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमा करण्यात आली.              


कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची गरज होती तिकडे दुर्लक्ष केले गेले. कारण काय तर सरकार आणि सरकार पक्षाला मध्यप्रदेशचे कॉंग्रेसचे सरकार लॉकडाऊन आधी पाडून तिथे आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करायचे होते. कोरोनामुळे लोकसभेचे अधिवेशन घेण्याचे टाळणारे सरकार मध्यप्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी कोरोनाचे कारण देवून अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी नकार दिला तेव्हा या सरकारचा पक्ष अधिवेशन बोलावण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेला. या सगळ्या घडामोडीत मध्यप्रदेशचे सरकार पाडण्यात विलंब झाला आणि लॉकडाऊन लांबले. मध्यप्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर मात्र लॉकडाऊन लावण्याची एवढी घाई केली की लॉकडाऊनला सामोरे जाण्यासाठी लोकांना फक्त ३-४ तासांचा अवधी देण्यात आला. आधी विलंब आणि मग घाई याचा परिणाम कोरोना प्रसार होण्यावर आणि लाखो विस्थापित श्रमिकांचे हाल हाल होण्यात झाले. या चुकांपासून धडा घेवून राजकीय महत्वाकांक्षेला लगाम घालून कोरोनाच्या दुसऱ्या लाटे विरुद्ध उपाययोजना करण्याची गरज होती. पण दुसऱ्या लाटेच्या वेळी त्याच चुका सरकारने केल्या कारण पहिल्या लाटेच्या चुकांबद्दल मोदी सरकारचा कान कोणीच पकडला नाही. अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा.           

अचानक करण्यात आलेल्या टाळेबंदीने लाखो श्रमिकांना रक्ताळलेल्या पायांनी उपाशीतापाशी शेकडो किलोमीटर चालावे लागले तेव्हा त्यांना दिलासा मिळावा म्हणून काहींनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. त्यावेळी सुप्रीम कोर्टात सरकारने सरळ सांगितले रस्त्यावर कोणीच नाही आणि आम्ही सगळ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली. वर्तमानपत्रातून विस्थापित मजुरांच्या जीव पिळवटून टाकणाऱ्या करुण कहाण्या सचित्र प्रसिद्ध होत असताना सरकार सुप्रीम कोर्टात बेधडक खोटे बोलले आणि डोळ्यावर पट्टी बांधून असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायाधीशांनी सरकारचे म्हणणेच खरे मानले !   

सरकारच्या चुकीला चूक म्हणण्याचे टाळत आल्याने सरकारने दुसऱ्या लाटेच्या वेळी तशाच चुका केल्या आणि त्याचा परिणाम अतिशय विनाशकारी झाल्याचे आपण पाहात आहोत.  लोकांनी आणि लोकशाहीचा स्तंभ मानल्या गेलेल्या संस्थांनी चुकीला चूक म्हणणे टाळले पण भाजप आणि त्याच्या समर्थकांनी पहिली लाट ओसरू लागताच मोदीजींमुळे देश कोरोनामुक्त झाल्याची दवंडी पिटली आणि मोदीजींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली ! कोरोनाची दुसरी लाट एवढी विनाशकारी का झाली आणि असे होण्यास मोदी सरकारच्या कोणत्या चुका कारणीभूत आहेत याचा आढावा पुढच्या लेखात घेवू.
-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव

पांढरकवडा, जि. यवतमाळ

मोबाईल- ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment