Thursday, June 3, 2021

चुकीला चूक म्हणणे टाळल्याने आजचे संकट - ४

 अपयशाला यशाचा रंग देवून त्याचे श्रेय घ्यायचे , अपयश दिसू द्यायचे नाही कि चर्चिले जावू द्यायचे नाही ज्यामुळे अपयशाची जबाबदारी घेण्याचा प्रश्नच नसतो ही मोदी सरकारची कार्यपद्धती राहिली आहे.
--------------------------------------------------------------------------

मागच्या लेखात मोदी आणि त्यांचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी होत असतांना त्या अपयशाची चर्चा किंवा टिका न होण्या मागच्या एका प्रमुख कारणाचा उल्लेख केला होता. ते कारण म्हणजे मोदीजी पाकिस्तानला धडा शिकवू शकतात किंवा भारतीय मुसलमानांची कोंडी करू शकतात हे असल्याचे सांगितले होते. पण पाकिस्तान बाबतीत प्रचारच अधिक आहे. पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने मोदीना निवडणूक जिंकणे सोपे गेले असेल पण पाकिस्तानला धडा मिळाला आणि तो शहाण्या सारखा वागू लागला हे साफ खोटे आहे. कारण त्यानंतर सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार आणि काश्मीर मध्ये घुसखोर पाठविणे याचे प्रमाण वाढले. काश्मीर मधील रोजच्या चकमकी याचा पुरावा आहे. पुलवामा घटने नंतर सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा त्यात पाकिस्तानचे किती नुकसान झाले किंवा मनुष्य हानी किती झाली या बद्दल बोलताना वायुदल प्रमुखाने स्पष्ट केले होतेहोते कि आम्हाला जिथे बॉम्ब टाकायला सांगितले होते ते काम आम्ही केले. नुकसानीचे मोजमाप आमचे काम नाही. त्यावेळच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हा हल्ला कोणाला मारण्यासाठी नव्हता तर पाकिस्तानला त्याने कारवाया थांबविल्या नाही तर आम्ही काय करू शकतो याचा इशारा देण्यासाठी होता. त्यांनी आमचे ४० मारले तर आम्ही त्यांचे ४०० मारले असा निवडणुकीत प्रचार केला गेला तरी पाकिस्तानचे किती नुकसान झाले याचा अधिकृत आकडा आजतागायत समोर आला नाही. निवडणुकी नंतर तर हा मुद्दाच मागे पडला. पाकिस्तानच्या नुकसानी बद्दल देशात फारसा आधार नसताना भरपूर चर्चा झाली पण त्यावेळी आपले झालेले नुकसान डोळ्यासमोर दिसत असताना त्याबद्दल कोणी बोलले नाही. कोणी बोलायचा प्रयत्न केला तर तो आपल्या सैन्यावरील अविश्वास ठरवून देशद्रोहाचा शिक्का मारायला भाजपची प्रचार यंत्रणा सज्ज होती.या प्रचार यंत्रणेने मोदी सरकारच्या मोठमोठ्या अपयशावरच पांघरून घातले नाही तर ते अपयश प्रत्यक्षात मोदींचे कसे यश आहे हे लोकांना पटवून देण्यात ही प्रचारयंत्रणा यशस्वी ठरली. अपयश दडविल्या गेल्याने अपयशाची जबाबदारी कोणी घेण्याचा प्रश्नच येत नाही. यशस्वी झाल्याचे ढोल बडवून त्याचे श्रेय मात्र मोदींना मिळत गेले. अगदी पुलवामा प्रकरणात सुद्धा हे आपल्याला दिसेल.

पुलवामा हल्ल्यात आमचे ४४ जवान मारल्या गेल्या नंतर पाकिस्तानला कळेल अशी कारवाई गरजेची होती आणि आपल्या सैन्याने तेव्हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करून दाखविला. आपली लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर घुसली आणि सुखरूप परतली देखील. ही कारवाई कौतुकास्पदच होती आणि त्यासाठी मोदी सरकार आणि आपले वायुदल अभिनंदनास पात्रच होते आणि आहे. पण नंतर जे घडले त्याची जबाबदारी मात्र कोणाचीच नव्हती ! भारताच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकने नाचक्की झालेल्या पाकिस्तानने त्याच दिवशी याचा बदला घेण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानची धमकी लक्षात घेता सरकारने सैन्याला तयार राहण्याचा आदेश द्यायला हवा होता. पण वायुदलाच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय जल्लोष करण्यात सरकार गुंतले होते. पाकिस्तानने अगदी दुसऱ्याच दिवशी भारताची नक्कल करत आपली विमाने काश्मिरात घुसविली . सैन्याच्या बराकीजवळ बॉम्ब टाकून विमाने परतू लागली तेव्हा कुठे आपल्या विमानांनी पाठलाग केला. पाकिस्तानने सांगून केलेला हा हल्ला असूनही पुरेशी सावधगिरी न बाळगल्याने पाकिस्तानी विमाने आत आली. सावध नसल्याने उडालेल्या गोंधळात आम्ही आमचेच हेलिकॉप्टर पाडले ज्यातील आमचे सैनिक जीवानिशी गेले. पाठलाग करताना पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले आमचे विमानही पाकिस्तानने पाडले व वैमानिकाला बंदी बनविले. सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय मोदी आणि त्यांच्या सरकारचे असेल तर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने आमची हानी केली त्याची जबाबदारी पण मोदी सरकारचीच असायला हवी. पण ही जबाबदारी तुम्ही मोदी सरकारवर टाकायला गेलात की ते सैन्याला पुढे करणार आणि म्हणणार बघा बघा हे सैन्याला दोष देत आहेत. अशा अपयशाची चर्चाच होवू द्यायची नाही ही या सरकारची नीती राहिली आहे. चर्चा झाली नाही की जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी पडत नाही व सरकार आपले अपयश झाकण्यात यशस्वी ठरते. 

पुलावामाच्या बाबतीत आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा म्हणजे हे सरकार संरक्षण क्षेत्राबाबातीत किती गलथान आणि असंवेदनशील आहे हे लक्षात येईल. पुलवामा हल्ला अशा हायवे वर झाला जिथे थोड्या थोड्या अंतरावर पोलीस नाका बंदी आहे व वाहनांची नियमित तपासणी होते. सुरक्षा दलाची वाहने जाणार असतील तेव्हा तर बंदोबस्त आणखी कडक असतो. तरीही आतंकवाद्याचे वाहन सुरक्षादलाच्या ताफ्यात घुसते आणि ४४ जवानांना मारण्यात यशस्वी होते.हे कसे घडू शकते यावर ना चर्चा होत ना सखोल चौकशी. असा हल्ला होवू शकतो याचा अंदाज असल्याने निमलष्करी दलाने आपल्या जवानांना काश्मिरात रस्तामार्गे न पाठविता विमानांनी पाठविण्याची मागणी मोदी सरकारकडे घटनेच्या १० दिवस आधीच केली होती. पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली आणि विमाना ऐवजी वाहनांनी जाण्याचा आदेश दिला. धोक्याची पूर्वसूचना असताना पुरेशी खबरदारी घेतली गेली नाही. सरकारातील नोकरशहांनी विमानाची व्यवस्था करण्यास नकार दिला. या दोन कारणांनी आपले जवान आतंकवादी हल्ल्याला बळी पडले. याची जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. या घोडचुकांची चर्चा होवून जबादारी निश्चित करण्यात आली असती तर त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व गृहमंत्री - संरक्षणमंत्री यांची  नावे आली असती.  अपयशाला यशाचा रंग देवून त्याचे श्रेय घ्यायचे , अपयश दिसू द्यायचे नाही कि चर्चिले जावू द्यायचे नाही ज्यामुळे अपयशाची जबाबदारी घेण्याचा प्रश्नच नसतो ही मोदी सरकारची कार्यपद्धती राहिली आहे. पुलवामाच्या आधी झालेल्या पठाणकोट आणि उरी आतंकवादी हल्ले होण्यामागेही आमच्याच काही चुका होत्या ज्यामुळे हल्ला करणे आतंकवाद्यांना सोपे गेले.पण या चुकांची जबादारी न निश्चित झाली ना कोणी स्वीकारली. पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सीला आमंत्रित करणे व आपला सगळा तळ फिरून दाखवणे ही भयंकर अशी घोडचूक होती. पण चुकीला चूक म्हणणारे प्रश्न विचारणारे नसतील तर सरकारच्या चुका वाढतच जाणार हे स्पष्ट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटे वेळी देखील अशा अनेक चुका मोदी आणि त्यांच्या सरकारने केल्या पण त्या चुकांना मतदारांनी चूक न म्हंटल्याने भारत कोरोनाच्या दुसऱ्या जबरदस्त जीवघेण्या लाटेत सापडला आहे. या लाटेत लाखो लोकांचे जीव गेले याला मोदी आणि त्यांचे सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच या सरकारच्या चुका नजरेआड करणारे, चुकांवर पांघरूण घालणारे आणि चुकांना चूक म्हणण्याचे टाळणारे तुम्ही आम्हीही जबाबदार आहोत.
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment