Thursday, September 9, 2021

अफगाणिस्तानचा धडा - २

‘इस्लाम खतरे में है’ या आवईतून राजकीय उलथापालथ शक्य आहे आणि राजकीय शक्ती वाढते हे बघून इतर धर्मीय देखील आपला धर्म धोक्यात आल्याची आवई उठवून राजकीय स्वार्थ साधू लागली आहेत. 
---------------------------------------------------------------------------------

तालीबानने अफगाणिस्तान वर कब्जा केल्यानंतर पुन्हा एकदा इस्लामी आतंकवाद किंवा आतंकवादाला धर्म नसतो वगैरे चर्चा झडू लागल्या आहेत. याला काय म्हणायचे ही चर्चा निरर्थक आहे. जगाला भीतीच्या छायेत ढकलणारा आणि जगात अस्थिरता निर्माण करणाऱ्या आधुनिक आतंकवादाची उत्पत्ती समजून घेणे महत्वाचे आहे. तालीबान, अल-कायदा, इसीस, हक्कानी नेटवर्क, जैश या सारख्या अनेक संघटनांच्या आतंकवादाने जग त्रस्त आहे. आतंकवाद फैलावणाऱ्या सगळ्याच संघटना इस्लामी नसल्या तरी बहुसंख्य संघटनाचे नेते आणि अनुयायी इस्लामधर्मीय असल्याने आणि रशिया, अमेरिके सारख्या महासत्तांना नमविण्याची त्यांची ताकद असल्याने इस्लामी आतंकवाद चर्चेत असतो. लिट्टे सारखी आतंकवादी संघटना तितकीच धोकादायक होती पण पराभूत होवून संपल्याने त्याची फारशी चर्चा होत नाही. लिट्टेच्या आतंकवादी कारवायात आपण आपले एक प्रधानमंत्री आणि अनेक सैनिक गमावल्याने लिट्टेच्या ताकदीचा अनुभव आपल्याला आहे. जेवढ्या इस्लामी आतंकवादी संघटना आहेत त्यांच्यात एक समानसूत्र किंवा समान धागा आहे तो म्हणजे इस्लामचे मूळ स्वरुपात आचरण झाले पाहिजे.


 इस्लामचा जन्म ७ व्या शतकात झाल्याचे मानले जाते. त्यावेळच्या परिस्थितीनुसार कसे राहिले पाहिजे आणि काय केले पाहिजे याचा उपदेश पैगंबराने केला होता. पैगंबर जसा अंतिम तसा पैगंबराचा शब्दही अंतिम ही जवळपास सर्व मुस्लिमांची धारणा आहे आणि याच धारणेचा उपयोग या सगळ्या आतंकवादी संघटना करतात. पण या संघटना अजिबात धार्मिक नाहीत म्हणजे यांच्या नेत्यांचे आणि अनुयायांचे वर्तन धर्मानुसार नाही. इस्लाम मध्ये तर व्याज घेणे सुद्धा मान्य नाही. पण यांना संघटना चालविण्यासाठी खंडणी चालते, लुट चालते आणि अफू सारख्या वस्तूंचा व्यापारही चालतो. अशा अनेक इस्लाम विरोधी गोष्टी ज्यांना इस्लामी अतिरेकी संघटना म्हंटले जाते ते करीत असतात. २१ व्या शतकातील सर्व आधुनिक सुविधा, ज्यातील बहुतांश सुविधा आणि साधनांची निर्मिती ख्रिस्ती लोकांनी केली आहे, त्या वापरून त्यांना सातव्या शतकातील इस्लामिक आचरण अंमलात आणायचे आहे. पण त्यांचे आचरणच धर्मानुसार नसल्याने त्यांना इस्लामिक म्हणणे चुकीचे ठरते. धर्माचा बुरखा पांघरून बंदुकीच्या बळावर सत्तेचा खेळ हा त्यांचा खरा उद्योग आहे आणि या उद्योगाला जगातील महासत्तांनी भांडवल पुरवले आहे.                                                                 

या उद्योगाला इस्लामिक म्हणण्या मागेही राजकारण आहेच. त्यांची भीती दाखवून इतर धर्मियांनाही सत्ता उलथून टाकण्याची किंवा सत्ता मिळविण्याची संधी मिळते. म्हणूनच आधुनिक आतंकवाद हा धार्मिक कमी आणि धर्माचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अधिक आहे. तो तसा असल्यामुळेच जगातील सत्ता आणि महासत्ता या आतंकवादाचा उपयोग आपला स्वार्थ साधण्यासाठी किंवा विरोधकावर मात करण्यासाठी करून घेतात. या आतंकवादाला सत्तेचे पाठबळ असेल तर तो वाढतो आणि जास्त घातक बनतो. तमिळ टायगरची जडणघडण करण्यात इस्त्रायलने मदत केली असली तरी कोणत्याही महासत्तेचे पाठबळ त्यांच्या मागे नसल्याने काही वर्षात ते संपले. इस्लामी म्हणविणाऱ्या आतंकवादी संघटना संपण्या ऐवजी वाढत आहेत याचे कारण त्यांना सत्तेचे आणि महासत्तेचे आपल्या स्वार्थासाठी मिळणारे पाठबळ आहे. यात धर्माचा वाटा तसा अल्प आहे. डोळे उघडे ठेवून ताज्या घडामोडीकडे पाहिले तर ते लक्षात येईल.

अफगाणिस्तान मधून अमेरिकेने माघार घेतल्याचा , तालीबानने अमेरिकेची नाचक्की केल्याचा सर्वात जास्त आनंद रशिया आणि चीनला झाला आहे. जगात ५० च्यावर मुस्लीम राष्ट्रे आहेत पण पाकिस्तान वगळता तालिबान्यांनी अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्याचा आनंद अन्य मुस्लीम राष्ट्रांनी व्यक्त केलेला नाही. पाकिस्तानचा आनंदही इस्लामिक सत्ता स्थापन झाल्याचा नसून आपल्या अनुकूल आणि भारताला प्रतिकूल सत्ता अफगाणिस्तानात स्थापन झाली याचा आहे. रशियाने याच शक्तीच्या हातून अफगाणिस्तानात मार खाल्ला होता. तालीबान सारखे गट निर्माण करून त्यांना बळ पुरवून अमेरिकेने अफगाणीस्तानात रशियाचा पाडाव घडवून आणला होता. २० व्या शतका अखेर जी गत रशियाची झाली होती तीच आता अमेरिकेची झाली म्हणून रशियाला तालिबानची सत्ता आली याचा आनंद आहे. चीनला या नव्या घडामोडीचा आनंद झाला त्यामागे व्यापारी मार्ग बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुढे सरकण्यास मदत होणार असल्याचे कारण आहे. भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या राष्ट्रात आतंकवादी संघटना सत्तेत आल्याचे दु:ख त्यांना नाही. आतंकवादाचा हा सरळ सरळ राजकीय वापर आणि उपयोग आहे. यात धर्माचा वापर असला तरी कमी आहे महासत्तांचा स्वार्थ या आतंकवादात अधिक आहे.

धर्माच्या आड आतंकवाद वाढण्याचे कारणही राजकीय आहे. आधुनिक औद्योगिक व्यवस्था तेलावर अवलंबून आहे आणि तेल प्रामुख्याने मुस्लीम राष्ट्रातून येते. या बहुतेक राष्ट्रात हुकुमशाही राज्यव्यवस्था आहे. तेलाचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी अमेरिकेने ही राष्ट्रे आपल्या कह्यात ठेवली. लोकशाही राष्ट्रापेक्षा हुकुमशाही राष्ट्रे कह्यात ठेवणे केव्हाही सोपे असते. हुकुमशाही राजवटी जुलमी असतातच आणि उठाव होण्याची शक्यता व भीती तिथे असते. असे उठाव झालेत आणि ते चिरडण्यात अमेरिकेने तिथल्या हुकुमशहाना मदतही केली. अमेरिका म्हणजे आधुनिक सभ्यतेचे प्रतिक. मुस्लीम जनसमुदायात आधुनिक सभ्यते बद्दल अप्रिती असण्याचे हे एक कारण आहे. हुकुमशाही अत्याचार आणि हुकुमशाही राजवट उलथून टाकायची असेल तर अमेरिकेने आणि त्याच्या बळावर राज्य करणाऱ्या मुस्लीम शासकांनी धर्म धोक्यात आणला ही आवई परिणामकारक ठरली.                     

सत्तेचे अत्याचार कमी होण्यासाठी, सत्ता उलथून टाकण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी आतंकवाद्यांनी धर्म धोक्यात आल्याचा कांगावा करत धर्म भोळ्या जनतेत आपला जम बसविला . धर्म धोक्यात आल्याचे दाखविणे सोपे होते. शरिया प्रमाणे राज्यकारभार होत नाही हे पटविणे सोपे असते. आतंकवादी संघटनांचे शरिया प्रेम यातून आले आहे. मुस्लीम राष्ट्रात लोकशाही नसणे हे इस्लाम धर्मात अन्य धर्मा सारख्या सुधारणा न होण्याचे एक कारण आहे. ‘इस्लाम खतरे में है’ या आवईतून राजकीय उलथापालथ शक्य आहे आणि राजकीय शक्ती वाढते हे बघून इतर धर्मीय देखील आपला धर्म धोक्यात आल्याची आवई उठवून राजकीय स्वार्थ साधू लागली आहेत. इस्लाममुळे हे सगळे घडते असा आरोप करत त्यांच्याच मार्गाने जाणारे , धर्माचा राजकीय फायदा उठविणारे जगभर वाढू लागले हा नवा धोका निर्माण झाला आहे. धर्मप्रधान राजकारणाकडून धर्मातीत राजकारणाकडे प्रवास करून अनेक राष्ट्रांनी जी प्रगती केली त्यावर राजकारणात धर्म पुन्हा प्रभावी झाला तर पाणी फिरेल.  अफगाणिस्तानातील घडामोडीचा जगाला हाच संदेश आहे.
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८  

No comments:

Post a Comment