Tuesday, September 14, 2021

अफगाणिस्तानचा धडा -- 3

आज जगात सर्वात मोठा धोका कोणता असेल तर धर्म आणि  राज्यसत्ता पुन्हा एक होण्याचा. अफगाणिस्तानने हा धोका अधोरेखित केला असला तरी इस्लामी मूलतत्त्ववाद आणि मुलतत्ववाद्यांची भीती दाखवून इतर धर्मीय मुलतत्ववादी सत्तेवर  कब्जा करून धार्मिक मूलतत्ववादाला खतपाणी घालून वाढवत आहे.

------------------------------------------------------------------

अफगाणिस्तानात जे घडत आहे त्याला धर्मसत्ता आणि राज्यसत्ता याचा संगम झाला असे म्हणता येणार नाही. राज्यसत्ते पेक्षा धर्मसत्ता प्रबळ झाली असेही म्हणता येणार नाही. कारण अफगाणिस्तानातील सत्ता धार्मिक गटांच्या ताब्यात गेलेली नाही जशी पूर्वी चर्चच्या हाती सत्ता होती. चर्चची ओळख धर्माशी निगडित आहे. अफगाणिस्तानात सत्ता ताब्यात घेतलेल्या कोणत्याही समूहाची अशी धार्मिक ओळख नाही. तालिबान,हक्कानी यांची ओळख आतंकवादी अशीच आहे. तालीबानने जे मंत्रीमंडळ जाहीर केले आहे त्यात संयुक्त राष्ट्र संघाने ज्यांना आतंकवादी घोषित केले आहे त्यांची संख्या निम्मी आहे. त्यामुळे हे इस्लामिक अमिरात आॅफ अफगाणिस्तानचे मंत्रीमंडळ असले तरी त्यात धर्म कमी आणि आतंकवाद अधिक आहे. अमेरिकेने दोहा येथे तालिबानशी जो सामंजस्य करार केला होता त्यात आतंकवादी कारवायांसाठी अफगाण भूमी वापरण्याची परवानगी दिली जावू नये ही अट होती. पण संयुक्त राष्ट्र संघाने ज्यांना आतंकवादी घोषित केले आहे अशांचा मंत्रीमंडळात समावेश नसला पाहिजे ही अट नव्हती. त्यामुळे ज्याच्या शिरावर अमेरिकेने कोट्यावधीचे बक्षीस ठेवले होते तो हक्कानी मंत्रीमंडळात महत्वाचे स्थान बळकावून बसला आहे. हक्कानी किंवा युनोने घोषित केलेल्या इतर आतंकवाद्यांशी कसा संबंध ठेवायचा असा पेच जगातील राष्ट्रांसमोर आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी जगाची अफगाणिस्तान बाबत अवस्था झाली आहे. अशा अवस्थेस अमेरिका जबाबदार आहे.                                                                         

अमेरिकेने अफगाणिस्तानात 20 वर्षे तळ ठोकला . आणि पर्यायी व्यवस्था निर्माण होण्याच्या आधीच तिथून निघण्याची घाई केली. अमेरिकेवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, सत्तेत असलेल्या आतंकवाद्यांना सत्ताच्युत करण्यासाठी अमेरिका आणि नाटोच्या फौजांनी अफगाणिस्तानात घुसणे चुकीचे नव्हते. पण तेथे तळ ठोकण्याऐवजी पर्यायी सरकार स्थापन करुन तेथून लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. तसे न केल्याने अमेरिकाचे पाय अफगाणिस्तानात एवढे  खोल गेले की तेथून काढता पाय घेण्याशिवाय पर्याय ऊरला नाही. शेवटी ज्यांना शिक्षा देण्यासाठी अमेरिकेने तिथे तळ ठोकला त्यांच्याच हाती सत्ता देवून माघारी फिरण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढवली. याचे कारण अमेरिका अनुभवातून किंवा इतिहासापासून काही शिकली नाही.

जिथे जिथे अमेरिकेने असा तळ ठोकून घडी बसवण्याचा प्रयत्न केला तिथे अमेरिकेने सपाटून मार खाल्ला आहे. दुसर्‍या देशाची घडी तिसरा देश नाही तर तिथले लोकच बसवू शकतात हा धडा अमेरिकेला पचवता आला नाही. या बाबतचे आदर्श ऊदाहरण भारताने घालून दिले आहे ज्याची जगाने आजच्या प्रसंगी आठवण केली पाहिजे. भारताने पाकिस्तानचा भाग असलेला पूर्व पाकिस्तान मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. स्थानिक लोकांना प्रशिक्षित करुन पाकिस्तानच्या सेनेशी लढायला प्रोत्साहित केले. गरज पडली तेव्हा सैन्य घुसवून पाकिस्तानला शरणही आणले. पण पाकिस्तानने शरणागती पत्करल्यावर बांगलाभूमीतून आपले सैन्य मागे घेतले.                                             

भारताने ठरवले असते तर तिथे तळ ठोकून राहता आले असते. तिथले सरकार कसे असले पाहिजे हेही ठरवता आले असते. पण त्यावेळच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधीनी स्थानिक नेत्यांना आणि नागरिकांना आपले निर्णय घेवू दिले. त्याचे चांगले परिणाम आज आपल्याला दिसताहेत. बांगलादेश आपल्या पायावर ऊभा राहिला आणि भारताचा विश्वसनीय मित्र बनला. भारताने बांगलादेश निर्मिती वेळी घेतलेली भूमिका अमेरिकेने अफगाणिस्तानात घेतली असती तर तिची नाचक्की टळली असती आणि अफगाणिस्तानचे करायचे काय असा प्रश्न जगापुढे पडला नसता. दुसर्‍या देशात हस्तक्षेप अनिवार्य ठरला तरी तो भारताने त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात केला तसा असला पाहिजे हा धडा या निमित्ताने जगातील इतर देशांनी - विशेषत: महासत्तांनी- घेण्याची गरज आहे.


सर्वसामान्य जनतेने देखील  अफगाण घडामोडींचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. त्यांचे दैनंदिन जीवन आणि भविष्य प्रभावित करण्याची क्षमता  घडामोडींमध्ये आहे. कारण धर्माचा 
आधार घेत किंवा धर्माचा वापर करून सत्ता काबीज करण्याची अफगाण खेळी अनेक ठिकाणी खेळली जाऊ शकते. असे घडले तर प्रगती पथावरून मागे मध्य युगाकडे वाटचाल होण्याचा धोका वाढणार आहे. धर्म सत्तेवर स्वार होतो तेव्हा त्याचा पहिला बळी सत्यान्वेषण करणारे विज्ञान असते. युरोपातील मध्ययुगीन घडामोडींचे स्मरण केले , त्या घडामोडी समजून घेतल्या तर अफगाणिस्तान आणि एकूणच कट्टरतावाद प्रगतीला किती मारक आहे हे लक्षात येईल.                       

ख्रिस्ती धर्म नियंत्रित करणारे चर्च तसे शिक्षण प्रसार, वैद्यकीय सेवा आणि काही बाबतीत संशोधनाला प्रोत्साहन देणारे म्हणूनही ओळखले जाते. असे  असले तरी जे संशोधन बायबल मधील कल्पनांच्या विपरीत असेल, बायबल मानणाऱ्यांना , ख्रिस्ती श्रद्धांना धक्का देणारे असेल अशा संशोधनाला आणि संशोधन करणाऱ्यांना चर्चने केवळ विरोध केला नाही तर प्रसंगी कडक शासन देखील केले आहे. कोपर्निकस हा शास्त्रज्ञ आधुनिक भौतिक शास्त्राचा जनक मानला जातो. पण त्याचे संशोधन बायबल आणि कॅथॉलिक चर्चच्या कल्पनांना धक्का देणारे असल्याने होणाऱ्या परिणामांच्या भीतीने त्याने संशोधन प्रकाशीत आणि प्रचारित करण्यात बराच विलंब केला. मृत्यूच्या काही महिने आधी त्याने लिहिलेले पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या या पुस्तकावर चर्चने जवळपास २०० वर्षे बंदी घातली होती. मृत्यूपूर्वी काही दिवस आधीच पुस्तक प्रकाशित झाल्याने चर्चच्या संभाव्य कारवाई पासून कोपर्निकस वाचला तरी त्याच्या संशोधनाची पुष्टी करून  ते पुढे नेणारे ब्रुनो आणि गॅलिलिओ सारखे शास्त्रज्ञ चर्चच्या कोपापासून वाचू शकले नाहीत.                                               

ब्रूनोने तर काही ख्रिस्ती मान्यतांवरच अवैज्ञानिक म्हणून हल्ला चढविल्याने चर्चने त्याला देहांत शासन केले. गॅलिलिओचा मृत्यूही चर्चने सुनावलेल्या कैदेच्या शिक्षेतच झाला. धर्म ग्रंथात सांगितलेल्या कल्पनाच खऱ्या आणि अंतिम मानल्या गेल्या असत्या तर विज्ञानाचा विकास आणि जगाची प्रगती झाली नसती.  विज्ञानाचा विकास आणि जगाची प्रगती तेव्हाच होऊ शकली जेव्हा राज्यसत्तेची आणि धर्माची फारकत झाली.  जगाला कलाटणी देणारी संशोधने प्रामुख्याने ख्रिस्ती बहुल देशात झालीत याचे कारण सर्वप्रथम आणि समजून उमजून ख्रिस्ती जगात धर्म आणि राज्यसत्ता यांची फारकत झाली. 

आज जगात सर्वात मोठा धोका कोणता असेल तर धर्म आणि  राज्यसत्ता पुन्हा एक होण्याचा. अफगाणिस्तानने हा धोका अधोरेखित केला असला तरी इस्लामी मूलतत्त्ववाद आणि मुलतत्ववाद्यांची भीती दाखवून इतर धर्मीय मुलतत्ववादी सत्तेवर  कब्जा करून धार्मिक मूलतत्ववादाला खतपाणी 
घालून वाढवत आहे. धार्मिक मूलतत्ववादाचा पहिला बळी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचाच जात नाही तर विविधता, उदारवाद आणि लोकशाही याचाही जातो. धार्मिक मूलतत्ववादावर मात करून जगाने जे साध्य केले ते गमावण्याची पाळी पुन्हा येते का अशी भीती वाटण्यासारखी आजची परिस्थिती आहे. 

---------------------------------------------------------------------------------

 सुधाकर जाधव 

पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment