शरद जोशींचे महाराष्ट्रातील अनुयायी शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत गल्लीतले मोदी म्हणून वावरत होते. आंदोलनाने मोदींचा जसा मुखभंग केला तसा यांचाही झाला. पण दिल्लीतील आणि गल्लीतील मोदी काही शिकण्याच्या आणि सुधारण्याच्या पलीकडचे आहेत हे आंदोलनाची प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.
---------------------------------------------------------------------------------------------
शेती सुधारणांच्या नावाखाली मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे
घेण्याची घोषणा प्रधानमंत्री मोदी यांनी केली आहे. ज्या पद्धतीने कृषी कायदे लागू
केलेत त्याच पद्धतीने ते मागे घेण्यात आलेत. कृषी कायदे लागू करतांना जसा कोणाशी
विचारविनिमय करण्यात आला नाही तसा तो मागे घेतांनाही करण्यात आला नाही.’हम करे सो
कायदा’ म्हणतात तो हाच ! कृषी कायदे लागू केलेत तेव्हा जितके प्रश्न निर्माण झाले
होते तितकेच प्रश्न कृषी कायदे मागे घेतांना निर्माण होणे हे सरकारची निर्णय
पद्धती व कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा ठळक पुरावा आहे.आधी सरकारने कोणाशीही
विचारविनिमय न करता कायदे लागू करणारा अध्यादेश काढला. असे कायदे अध्यादेशाने लागू
करण्याची काय घाई होती हे कळण्याच्या पलीकडे असल्यामुळे सरकारच्या हेतू विषयी संशयाचे
बीज त्यामुळे पेरले गेले. संसदेत अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याच्या प्रसंगी
विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. फारसी चर्चा होवू न देता बहुमताच्या
हडेलहप्पीने कायद्यात रुपांतर करण्यात आल्याने सरकारच्या हेतूविषयी संशय बळावला
नसता तरच् नवल ! आंदोलनाचा जोर बघून दोन वर्षे कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची
सरकारी तयारीही प्रश्न निर्माण करणारी होती. दोन वर्षे जी कायदे सहज स्थगित करू
शकता ती कायदे अध्यादेशाने लागू करण्याचे आणि अध्यादेशाला संसदेत मंजूर करताना घाई
करण्याचे कारणच काय होते असा प्रश्न पडून हे कायदे आणण्याची प्रक्रियाच संशयाच्या
भोवऱ्यात आली.
कायदे लागू केल्यानंतर नेहमीप्रमाणे या कायद्यांमुळे कृषीक्षेत्रात
अभूतपूर्व बदल होवून शेतकरी संपन्न होतील असा भाजप आणि मोदी समर्थकांचा कोरस
नेहमीप्रमाणे सुरु झाला. त्यात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतील काही नेभळट, काही
बावळट तर बरेचसे संघाचे संघटनेतील छुपे अनुयायी यांनी शेतकरी स्वातंत्र्याची पहाट
झाल्याची आवई उठविली. सात-आठ वर्षाच्या मोदी सरकारच्या कार्यपद्धतीशी हे सारे
सुसंगत होते ! शासनयंत्रणां आणि समर्थकांच्या झुंडीच्या बळावर मोदी आणि शाह या
जोडगोळीने अनेकदा विरोधकांचा आवाज दडपण्यात यश मिळविले होते. आताही तसेच होईल या
भ्रमात सरकार आणि त्यांचे समर्थक होते. नव्या नागरिकता कायद्या विरोधातील आंदोलन
चिरडून टाकण्याचा ताजा अनुभव पाठीशी असल्याने मोदी , त्यांचे सरकार आणि त्यांचे
समर्थक यापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोदी सरकारचा नवा भूमीअधिग्रहण कायदा वापस
घ्यावा लागला होतां हे विसरून गेले होते. न हटणारा, न झुकणारा नेता अशी प्रतिमा
तयार करण्याच्या नादात मोदी आणि त्यांच्या सरकारला कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या
भावना आणि म्हणणे समजून घेण्याचीही गरज वाटली नाही. निर्णय मोदी,शाह आणि त्यांच्या
विश्वासातले नोकरशाह घेणार आणि त्या निर्णयाचे समर्थन करण्याची पाळी मंत्र्यांची
ही मोदीं सरकारची रीत. ज्यांनी निर्णय घेतला त्यांनीं शेतकऱ्यांशी चर्चा केली असती
तर कृषिकायदे लागू कारण्यामागची भुमिका शेतकरी समुहाला कळली असती. पण सहकाऱ्यानाही
विश्वासात न घेता निर्णय घेणारे मोदी निर्णयाच समर्थन करण्याची जबाबदारी
सहकाऱ्यांवर टाकून मोकळे होत असतात.
एखादया समुहाला निर्णय पटला नाही तर समोरासमोर बसून चर्चा करून तो
पटवून देण्याची त्यांची तयारी नसते. एक तर यात त्यांना कमीपणा वाटत असावा किंवा
त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असावा. सात वर्षाच्या त्यांच्या कार्यपद्धतीवरून
त्यांच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी खऱ्या वाटतात. राष्ट्रीय महत्वाचे निर्णय
विरोधकांशी चर्चा करून घेण्याची पद्धत तयांनी मोडीत काढली आणि आपल्या निर्णयाचे
समर्थन तयांनी फक्त भाषणातून केले. समोरासमोर बसून चर्चा करण्यातून, पत्रकार परिषद
घेवून त्यांनी कधीच केले नाही. त्यामुळे विरोधकाशी त्यांचे वर्तन एखादया लोकशाही
देशाच्या प्रधानमंत्र्याला न शोभणारे असते. वर्षापेक्षा अधिक काळ एवढे मोठे शेतकरी
आंदोलन सुरु होते तरी त्यांना आंदोलकाशी चर्चा करण्याची, संवाद साधण्याची गरज
वाटली नाही. मोदींच्या अशा वर्तनानेच या सरकारची प्रतिमा मग्रूर सरकार अशी बनली
आहे. त्यामुळे कृषी कायदे मागे घेतांना त्यांनी केलेल्या भाषणात, आमची तपस्या कमी
पडली , शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही असे जे म्हंटले ते दांभिकपणाचे ठरते. त्यांनी
वर्षभर शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष तरी केले किंवा आंदोलनजीवी सारखे शब्द वापरून आंदोलनाची
हेटाळणी केली. साम दाम दंड भेद वापरूनही शेतकरी आंदोलन या मग्रूर सरकारला मोडून
काढता आला नाही म्हणून शेतकरी आंदोलनाचा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
१९८० च्या दशकात शरद जोशी सारख्या नेत्याने शेतकऱ्यांना मोठ्या
प्रमाणावर आंदोलित करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर होणारे शेतकऱ्यांचे हे
पहिलेच आणि सर्वात मोठे आंदोलन होते. शरद जोशींनी शेतकऱ्यांची मोठी आंदोलने
समर्थपणे हाताळलीत हे खरे पण आंदोलनासंबंधी सर्व निर्णयांवर फक्त त्यांचाच प्रभाव
आणि छाप असायची. इथे मात्र कोणी करिष्मा असणारा एक नेता नसतांना शेतकऱ्यांचे
अद्भुत, अभूतपूर्व म्हणावे असे आंदोलन उभे राहिले. नुसते आंदोलन उभे राहिले नाही
तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते टिकून राहिले, वाढत राहिले. सत्तेच्या क्रूरते
सोबत माध्यमांचा अपप्रचार सहन करावा लागला. ज्यांच्या घरातून देशासाठी बलिदान
करणारे सैनिक निघाले त्यांना देशासाठी कोणताही त्याग न करणाऱ्यांच्या मुखातून
देशद्रोही शिवी ऐकावी लागली. उन, वारा, पाऊस , वादळ तर होतेच पण ज्या
महाराष्ट्रातल्या शेतकरी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, शेतकऱ्यांचे पंजाबात तयांनी
पायघड्या घालून स्वागत केले, वडिलभावा सारखा आदर दिला, प्रेम दिले तेच लोक
त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांच्या ताटात जेवलेले त्यांना दलाल म्हणून
हिणवत होते.त्यांच्यापैकी एक माईचा लाल त्यांचे म्हणणे त्यांच्या मागण्या समजून
घेण्यासाठी त्यांच्याकडे गेला नाही. शरद जोशींचे महाराष्ट्रातील अनुयायी शेतकरी
आंदोलनाच्या बाबतीत गल्लीतले मोदी म्हणून वावरत होते. आंदोलनाने मोदींचा जसा
मुखभंग केला तसा यांचाही झाला. पण दिल्लीतील आणि गल्लीतील मोदी काही शिकण्याच्या
आणि सुधारण्याच्या पलीकडचे आहेत हे त्यांच्या आंदोलनाची प्रमुख मागणी मान्य
झाल्यानंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते. शरद जोशींचे अनुयायी
शेतकरी आंदोलनाच्या विजयाला दलालांचा विजय म्हणून हिणवत आहेत. तर मोदींचे भक्त
मोदींनी शेतकऱ्यांवर केवढे उपकार केले होते पण शेतकरी कृतघ्न निघाल्याचे म्हणू
लागले आहेत. मोदींची माघार मोदी समर्थकांना पचली नाही याचा अर्थ ती मोदींना पचली
नाही असा होतो. आपला सगळा राग द्वेष समर्थकांच्या मुखातून व्यक्त करण्याची ही मोदी
पद्धत आहे. याचा स्पष्ट अर्थ देशावर थोपवलेले कृषीकायदे मागे घेतांना मोदींनी केलेले
भाषण हे मगरीने अश्रू गाळण्या सारखे आहे. सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे.
----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment