Thursday, January 6, 2022

धर्म संसदे मागील राजकारण !

 संघाचा महात्मा गांधींवरील  राग इतक्या वर्षानंतरही कायम आहे नव्हे वाढतच आहे याचे कारणआहे हिंदू गांधी प्रभावातून मुक्त होत नाही हे. हिंदू वरचा गांधी प्रभाव कोणता तर उदारवाद आणि सहिष्णुता ! हिंदू धर्माची एक पोथी किंवा एक धर्मगुरू नसल्याने या धर्मातच वैविध्य आणि उदारता असणे स्वाभाविक आहे. पण या धर्मातही बळी तो कान पिळी या न्यायाने आणि स्वार्थ साधण्यासाठी धर्म मार्तंडानी जातीची उतरंड निर्माण करून धर्मातील सहिष्णुता , उदारता घालविण्याचा प्रयत्न शेकडो वर्ष केला. स्वातंत्र्य आंदोलनाच्या माध्यमातून गांधीनी या प्रयत्नात खीळ घातली. हिंदू धर्मातील उदारता आणि सहिष्णुता याचेवर बसलेली धूळ स्वातंत्र्य आंदोलनाने धुवून टाकली ! 

----------------------------------------------------------------------------------------------

 उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यात दोन 'धर्म संसद' पार पडल्या. या दोन्ही तथाकथित आयोजनामागे अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते असले तरी एकूणच या धर्म संसदेच्या आयोजना मागे भारतीय जनता पक्षाचा वरदहस्त असला पाहिजे हे या धर्म संसदेतील आक्षेपार्ह विधाने आणि कामकाजावर काहीही प्रतिक्रिया देण्याचे भाजपच्या व केंद्र सरकारातील वरिष्ठ नेत्यांनी टाळले यावरून स्पष्ट होते. देशातील १०० च्या वर गणमान्य व्यक्तींनी या तथाकथित धर्म संसदेत जे काही झाले त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्याकडे केली होती. मागणी करणारात केवळ सिव्हील सोसायटीचे लोक नसून यात भारतीय लष्करात वरिष्ठ पदे भूषविलेल्या तिन्ही दलातील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. असा समावेश धर्म संसद नावाचे प्रकरण किती गंभीर आहे हे समजण्यासाठी पुरेसा आहे. एवढ्या मोठ्या संख्येत निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती व प्रधानमंत्र्याला पत्र लिहूनही दोघांनी काहीही प्रतिसाद दिला नाही हे आणखी गंभीर आहे. सरकारचा जो प्रतिसाद असतो तोच राष्ट्रपतींचा असतो आणि सरकारच काही प्रतिसाद देणार नसेल तर अशा मुद्द्यावर राष्ट्रापतीचे चूप राहणे समजण्यासारखे आहे. मोदी म्हणजेच सरकार असे मानले जात असताना मोदींनी चूप राहणे किंवा भाजपा शासित राज्यांनी कारवाई न करणे हे अशा धर्म संसदाना राजाश्रय असल्याचा पुरावा मानला पाहिजे. मोदी राजवटीचा 'सब का साथ सबका विकास' पासून सुरु झालेला प्रवास अतिरेकी धार्मिक धृविकरणाच्या दिशेने सुसाट सुरु असल्याचे दिसून येते. या तथाकथित धर्म संसदांमध्ये अल्पसंख्याकांची कत्तल करण्यासाठी हाती शस्त्र घेण्याची चिथावणी ही सरळ भारतीय घटना आणि कायदा यांना धाब्यावर बसवणारी आणि देशात गृहयुद्धाला आमंत्रण देणारी होती. खुलेआम कत्लेआम करण्याची चिथावणीने देशातील कायद्याच्या राज्यालाच आव्हान दिले आहेत. एवढेच नाही तर घटना बदलण्याची भाषा उच्चरवात केली गेली आहे. कारण आपली राज्यघटना देशातील प्रत्येक नागरिकाला मग तो कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा किंवा कोणत्याही आर्थिक स्तरातला असो समान असण्याची हमी देते.  राज्यघटनेला न मानणे हा सरळ सरळ घटना द्रोह आहे आणि घटना द्रोहींवर कारवाई न होणे ही राज्यकर्त्यांची घटनेप्रती अनास्था दर्शविणारे आहे. 

छत्तीसगड हे कॉंग्रेस शासित राज्य असल्याने तिथल्या सरकारने कारवाई केली पण ती अतिशय मर्यादित स्वरुपाची आहे. तिथल्या धर्म संसदेत ते सगळे बोलले गेले जे हरिद्वारच्या धर्मसंसदेत बोलले गेले. पण त्या बोलण्यावर कॉंग्रेस शासित छत्तीसगड राज्याने देखील कारवाई केलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. रायपुर मध्ये झालेल्या धर्मसंसदेत एकाने महात्मा गांधी यांचे विरोधात गरळ ओकले आणि गोडसेचा गौरव केला तेवढ्याच संदर्भात ही कारवाई झाली आहे. महात्मा गांधी बद्दल जे बोलले गेले त्यात नवीन काही नाही. संघ आणि तत्सम विचारसरणीच्या लोकांच्या  मानगुटीवर बसलेला गांधी उतरण्याचे नाव घेत नाही एवढाच याचा अर्थ. बोललेला वक्ता तसा किरकोळ होता आणि त्याचा संघाशी संबंध असेलच असेही नाही. पण गांधी हत्या ही संघ समाजात जी विष पेरणी करीत आहे त्याचा परिपाक असल्याचे विधान आणि निदान गांधी हत्येनंतर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी थेट तत्कालीन संघ सरसंचालकाना पत्र लिहून केले होते ते खरेच असल्याचे कालीचरण सारखे लोक गांधी विरुद्ध गरळ ओकून सिद्ध करीत असतात. वल्लभभाई पटेलांनी संघावर केलेल्या कारवाई नंतर संघाने महात्मा गांधीना शाखेत प्रात:स्मरणीय केले. प्रात:स्मरणात ही मंडळी गांधी बद्दल काय बोलत असतील किंवा गांधींचे नाव आल्यावर कसे छद्मीहास्य करीत असतील हे कळण्यासाठी संघ शाखेवर जाण्याची गरज नाही. शाखे बाहेर संघ स्वयंसेवक गांधींबद्दल जे तारे तोडतो त्यावरून ते सहज कळते. संघाचा गांधीवरील राग इतक्या वर्षानंतरही कायम आहे नव्हे वाढतच आहे याचे कारण समजून घेतले तर त्या रागाचे आश्चर्य वाटणार नाही. 

ते कारण आहे हिंदू गांधी प्रभावातून मुक्त होत नाही हे. हिंदू वरचा गांधी प्रभाव कोणता तर उदारवाद. हिंदू धर्माची एक पोथी किंवा एक धर्मगुरू नसल्याने या धर्मातच वैविध्य आणि उदारता असणे स्वाभाविक आहे. पण या धर्मातही बळी तो कान पिळी या न्यायाने आणि स्वार्थ साधण्यासाठी धर्म मार्तंडानी जातीची उतरंड निर्माण करून धर्मातील सहिष्णुता , उदारता घालविण्याचा प्रयत्न शेकडो वर्ष केला. स्वातंत्र्य आंदोलनाच्या माध्यमातून गांधीनी या प्रयत्नात खीळ घातली. हिंदू धर्मातील उदारता आणि सहिष्णुता याचेवर बसलेली धूळ स्वातंत्र्य आंदोलनाने धुवून टाकली ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एवढे उदार, सहिष्णू आणि समता प्रधान संविधान बनवून मंजूर करून घेता आले यामागे त्यांनी केलेला संघर्ष जसा आहे तेवढाच स्वातंत्र्य आंदोलनाने निर्माण केलेल्या सहिष्णू वातावरणाचा आहे. स्वातंत्र्य आंदोलनाने अशी मूल्यनिर्मिती असे वातावरण तयार केले नसते तर बाबासाहेबांनी बनविलेले संविधान त्यावेळच्या संविधान सभेत मंजूर होणे अवघड बनले असते. स्वातंत्र्य संग्रामात संघाचा सहभाग का नव्हता, किंवा स्वातंत्र्य संग्रामाला हिनविण्याचा, कमी लेखण्याचा आजही सातत्याने संघ आणि त्याचे बिजेपीत असलेले नेते प्रयत्न करतात आणि जगात आदर्श मानल्या गेलेले संविधान बदलण्याची भाषा का होते या सगळ्याचे उत्तर महात्मा गांधीनी संघाच्या मूल्य व्यवस्थेच्या उलट दिशेने स्वातंत्र्याची चळवळ नेली. हिंदू गांधी मागे गेला संघामागे नाही ! आज संघाचा विचार प्रमाण मानणाराची सत्ता आली आहे. याच सत्तेच्या बळावर देशाला हिंदुराष्ट्र बनविण्याची भाषा बोलली जात आहे. सत्ता यांच्या हाती आली तरी अजूनही हिंदूंचे पाहिजे तेवढे समर्थन संघ आणि भाजपला लाभलेले नाही ही सल, खंत, वेदना संघ विचार मानणाऱ्या लोकांना आहे. हिंदू उदार आहे म्हणून हे विविधता असलेले राष्ट्र उभे आहे असे म्हणत त्यांना हिंदुना गोंजारावे लागते. पण ते नेम धरून हल्ला मात्र उदारतेवर करतात. देशातील उदारता सत्ता हातात येवूनही संपत नाही याचा राग ते महात्मा गांधी आणि बाबासाहेबांनी बनविलेल्या संविधानावर काढत असतात. म्हणून आजही संघ किंवा तत्सम विचारसरणीचे लोक गांधीच्या छायाचित्राला गोळी मारतात आणि संविधान बदलण्याची भाषा करतात. गांधीवर ते जे आघात करतात ते व्यक्ती म्हणून नाही तर उदारवादी आणि सहिष्णू मूल्य व्यवस्थेचे प्रतिक म्हणून करतात. छत्तीसगड सरकारची कारवाई व्यक्ती म्हणून गांधीना अवमानित केले यासाठी आहे म्हणून ती अपुरी आणि चुकीची आहे. कारवाई धर्म संसदेच्या नावावर समाज विघटीत करण्याच्या प्रयत्नावर आणि राज्यघटनेवर हल्ला करून अराजक निर्माण करण्या विरुद्ध झाली पाहिजे.
---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

No comments:

Post a Comment