तुमच्या आमच्या प्रयत्नाने नव्हे तर गांधीवरच्या सर्वसामन्यांच्या विश्वासानेच आजवर गोडसे विचारसरणीला पराभूत केले आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा नवा नथुराम गांधीना मारण्यासाठी पुढे येत असतो. अमोल कोल्हेची भूमिका असणारा चित्रपट अशाच प्रयत्नाचा एक भाग आहे. त्यावर टीका करण्या ऐवजी सत्य सांगत राहणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.
--------------------------------------------------------------------------
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार आणि छोट्या पडद्यावर संभाजीची भूमिका साकारणारे कलाकार अमोल कोल्हे यांनी १९१७ साली एका चित्रपटात नथूरामची भूमिका साकारल्याचे अचानक समोर आले आणि त्यावर मोठे वादळ उठले. नथुराम नायक आणि महात्मा गांधी खलनायक म्हणून रंगविलेल्या चित्रपटात आपण नथुरामची भूमिका केल्याचे स्वत: अमोल कोल्हे यांनीच जाहीर केले. हा चित्रपट २०१७ सालीच तयार झाला पण निर्माता-दिग्दर्शक यांच्यातील वादामुळे तो प्रदर्शित झाला नसल्याचे सांगण्यात येते. आता चत्रपट महात्मा गांधीच्या पुण्यतिथीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होत असल्याचे स्वत: कोल्हे यांनी जाहीर केल्यावर वादळी चर्चेला प्रारंभ झाला. एखाद्या चित्रपटाची निर्मिती गोपनीय राहू शकत नाही. पण २०१७ साली हा चित्रपट तयार होवूनही त्याच्यावर तेव्हा काही चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. अचानक त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणे व त्यात कोल्हे नथूरामच्या भूमिकेत असणे यावर मोठा वाद निर्माण होण्याचे एक कारण कोल्हे यांची बदललेली राजकीय भूमिका आहे. हा चित्रपट तयार झाला तेव्हा कोल्हे शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सामील होवून खासदार झाले. शिवसेनेत असतांना अमोल कोल्हे यांना नथूरामची भूमिका साकारण्यात काही वावगे वाटले नसणार. कारण शिवसेनेचे सावरकर प्रेम जगजाहीर आहे.
अमोल कोल्हे शिवसेनेत असल्याने ते नथूरामची भूमिका साकारणार याबद्दल त्यावेळी कोणाला आश्चर्य वाटले नसणार आणि त्यामुळेच त्यावेळी त्याची फार चर्चा झाली नसणार. या संबंधी खुलासा करतांना कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून आपण ही भूमिका केल्याचे स्पष्ट केले. नथुरामचा विचार आपला विचार नाही आणि शिवसेनेत असतानाही महात्मा गांधी बद्दल आपल्याला आदर आहे आणि आजही आदरच आहे असे त्यांनी सांगितल्यावरही त्यांच्या चित्रपटातील भुमिकेवरचा वाद थांबला नाही. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या सहजतेने अमोल कोल्हेचे समर्थन केले त्यामुळे वाद शमण्या ऐवजी आगीत तेल ओतल्या सारखे होवून अधिकच भडका उडाला. या निमित्ताने अमोल कोल्हे यांचे सोबत शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना ठोकण्याची मिळालेली संधी कोण सोडणार ! अर्थात अशी संधी पवारांनी स्वत:हून दिली . यापूर्वी चित्रपटातून औरंगजेब वगैरे साकार करण्यात आले तेव्हा ते कलाकार काही औरंगजेब समर्थक ठरत नाहीत तसेच कोल्हेही त्यामुळे नथुराम समर्थक ठरत नाहीत असे म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली. सकृतदर्शनी यात तथ्य वाटत असले तरी यातला औरंगजेबला खलनायक म्हणून रंगविणे आणि नथुरामला नायक म्हणून रंगविणे हा फरक पवारांनी लक्षात घेतला नाही. औरंगजेबला नायक म्हणून रंगविणे सर्वसामान्यांना पटणे शक्यच नाही. तसेच महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुरामला नायक म्हणून स्वीकारणे सर्वसामान्यांना जड जाते.
अर्थात नथुरामला गांधींचा खून केला म्हणून नायक मानणारांची कमी या देशात नाही. पण ती कट्टर हिंदुत्ववादी मंडळीच आहेत. ही मंडळी गांधी खुनाची कारणे काहीही देत असतील आणि क्षणभर चर्चेसाठी मान्य केले की त्यातील काही कारणात तथ्य आहे तरीही आपण स्वीकारलेल्या व्यवस्थेत गांधी खुनाची कृती कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. म्हणूनच अशा कृतीचे कोणीही उदात्तीकरण करणे चुकीचे ठरते आणि नथूरामची कृती १०० टक्के चुकीची आहे असे मानणाऱ्या पक्षाच्या खासदाराने चुकीचे उदात्तीकरण करण्याची भूमिका साकारली तर त्याचा समाजात चुकीचा संदेश जातो हे कोल्हे यांच्या भूमिकेवर वाद निर्माण होण्या मागचे कारण आहे. कोल्हे शिवसेनेत राहिले असते आणि राष्ट्रवादीत आले नसते तर त्यांच्या भूमिकेवर फार प्रश्नचिन्ह उभे राहिले असते असे वाटत नाही. त्यांनी भूमिका केलेला तो चित्रपट जरूर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला असता. तसे वाद यापूर्वीही 'मी नथुराम बोलतोय' या नाटकावर झाले आहेत. जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी शक्तींना राजकीय अनुकुलता लाभते तेव्हा तेव्हा नथुराम हमखास डोके वर काढत असतो ! महाराष्ट्रात जेव्हा पहिल्यांदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा मी नथुराम बोलतोय या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरु झालेत. केंद्रात त्यावेळी वाजपेयी सरकार होते. गोडसेचे उदात्तीकरण करून गांधीना खलनायक म्हणून रंगविण्यावर संसदेत आक्षेप घेण्यात आला तेव्हा वाजपेयी सरकारातील गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी या नाटकावर बंदी घालण्याची सूचना महाराष्ट्र सरकारला केली. त्यावेळचे युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अडवाणीच्या सूचनेनुसार त्या नाटकावर बंदी घातलीही. पुढे नाटकाचे निर्माते सरकारच्या निर्णया विरोधात हायकोर्टात गेले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कड घेत हायकोर्टाने नाटकावरची बंदी उठविली. आजही त्या नाटकाचे प्रयोग होत असतात. ही बंदी उठविल्यानंतर काही महिन्यांनी त्या नाटकाचे लेखक प्रदीप दळवी यांनीच एक निवेदन प्रसिद्ध करून आपल्या या नाटकामुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होत असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
आजचे तर राजकारणच सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्यावर आधारित असल्याने त्याचा फायदा उचलण्यासाठी नथुराम वर सिनेमा काढण्याचा कोणी विचार केला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण अशा चित्रपटाना किंवा नाटकांना विरोध करून किंवा बंदी घालून नथुराम ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो ती विचारसरणी संपणार नाही. अशा प्रयत्नातून जे असत्य प्रचारित होत आहे आणि समाजात जो विद्वेष पसरविण्यात येत आहे याचा विरोध झाला पाहिजे. याचा विरोध करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गांधी खुनाची जी कारणे नथुराम याने दिली आणि संघ व हिंदू महासाभाचे लोक नाटक सिनेमाच नाही तर इतर अनेक माध्यमातून नथूरामच्या भूमिकेचे उदात्तीकरण करत आहेत ते कसे चूक आहे ते ऐतिहासिक सत्याच्या आधारे मांडले पाहिजे. एकच गोष्ट हजारो मुखातून हजारदा सांगितली तर लोकांना कधीनाकधी सत्य वाटेल या भूमिकेतून गोडसेवादी चिवटपणे आपले म्हणणे रेटत आले आहे. सत्ता अनुकूल नव्हती तेव्हा त्यांचा प्रचारकी आवाज क्षीण असेल पण बंद नव्हता. आज तर त्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्याचा फायदा ते घेणारच. गांधीजींना मुस्लीमधार्जिणे रंगवून किंवा फाळणीसाठी जबाबदार धरून त्यांना देशातील हिंदू-मुस्लीम ऐक्य संपवायचे आहे. हे होवू द्यायचे नसेल तर फाळणीसाठी जबाबदार असणारे खरे चेहरे पुढे ठेवत राहिले पाहिजे..अमोल कोल्हे यांचेवर टीकेची झोड उठवून किंवा त्यांची भूमिका असलेल्या चित्रपटावर बंदीची मागणी करून फाळणीचे किंवा द्विराष्ट्रवादाचे खरे जनक लोकांपुढे येणार नाहीत. सर्वसामन्यांचा गांधीवरचा विश्वास यानेच आजवर गोडसे विचारसरणीला पराभूत केले आहे. नव्या पिढीतही हा विश्वास कायम राहावा असे वाटत असेल तर इतिहास विसरत चाललेल्या या पिढीपुढे तो मांडला पाहिजे. नुसती ठोकाठोकी निरुपयोगी आहे. गांधी स्वयंप्रकाशित आहे. त्याच्यावर प्रकाश टाकण्याची गरज नाही. सत्यावर झगझगीत प्रकाश टाकण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment