मुठभर हिंदुत्ववादी सोडले तर महात्मा गांधींच्या समकालीन पिढीला आणि देशाला स्वातंत्र्य मिळायच्या वेळी वयाने लहान असलेल्या पिढीला अशा आरोपांचा विचार देखील त्यांच्या मनाला शिवला नाही. त्या पिढीचा महात्मा गांधी फाळणीला किंवा त्यानंतर झालेल्या रक्तपाताला जबाबदार असण्यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते. कारण त्यांनी गांधीजी स्वातंत्र्योत्सवात सहभागी न होता दिल्लीपासून दूर फाळणी नंतरचा हिंसाचार थांबविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचे पाहिले होते, ऐकले होते. हा इतिहास घड्तानाची पिढी कायम गांधी आणि कॉंग्रेसच्या बाजूने उभी राहिली हा इतिहास आहे.
------------------------------------------------------------------------------
देशाची फाळणी आणि पाकिस्तानला रिझर्व बँकेच्या पैशातील ५५ कोटी रुपये देण्यास महात्मा गांधी जबाबदार होते म्हणून आपण त्याची हत्या केल्याचे नथूरामचे म्हणणे होते असे त्यांचे बंधू गोपाळ गोडसे यांनी नंतर पुस्तके लिहून प्रचारित केले. त्यासाठी नथुराम याने कोर्टापुढे सादर केलेल्या निवेदनाचा आधार घेतला. गोपाळ गोडसे यांनी ५५ कोटीचे बळी हे पुस्तक लिहून गांधीनी ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा हट्ट धरला नसता तर त्यांची हत्या झाली नसती असा आव आणला. पण हे किती असत्य आहे हे एकाच घटने वरून सिद्ध होईल. गोपाळ गोडसे १९६४ साली तुरुंगातून मुक्त झाल्यावर पुण्यात केसरी दैनिकाचे संपादक यांचे अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार आणि सत्यनारायणाची पूजा झाली. त्या प्रसंगी बोलताना केतकर यांनी आपण गांधीना ठार मारणार आहोत हे प्रत्यक्ष खुनाच्या कित्येक महिने आधी सांगितले होते याचा त्या कार्यक्रमात पहिल्यांदा जाहीर उच्चार केला. त्यांच्या या विधानामुळे देशभर खळबळ माजली आणि गांधी हत्ये मागच्या कारस्थानाचा शोध घेण्यासाठी १९६५ मध्ये नवा आयोग सरकारला नेमावा लागला. या आयोगापुढे बरीच माहिती नव्याने समोर आली. एक महत्वाचा निष्कर्ष आयोगाने काढला तो म्हणजे गांधींचा खून होणार हे नथुराम याने केतकरांना ऑक्टोबर १९४७ मध्येच सांगितले होते. म्हणजे ५५ कोटी चा प्रश्न निर्माण होण्या आधीच गांधी हत्येचा कट शिजला होता. ही एकच गोष्ट गांधी हत्येच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी मंडळी काय काय कुभांड रचत आली आहेत हे सिद्ध करायला पुरेशी आहे.
पाकिस्तानला देण्यात आलेल्या ५५ नव्हे तर ७५ कोटीच्या बाबतीत तथ्य एवढेच आहे की ही रक्कम फाळणीच्या अटीचा भाग होती आणि तसा लेखी करार भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रात झाला होता. भारता तर्फे नेहरू आणि पटेल यांनी हा करार मान्य केला होता. तुम्ही मान्य केलेल्या कराराची पूर्तता झाली पाहिजे एवढेच गांधींचे म्हणणे होते. आपण या कराची पूर्तता केली नाही तर आपली विश्वासार्हता आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार नाही हे गांधींचे म्हणणे होते. गांधींची ही भूमिका चुकीची नव्हती हे सिद्ध करणारी आजही या दोन देशात एक गोष्ट अस्तित्वात आहे. ती म्हणजे भारत-पाक या देशातील पाणी करार ! फाळणी झाली त्यामध्ये नद्यांचा उगम हिंदुस्थानात राहिला आणि पुढे पाणी वाहत पाकिस्तानात जाते. त्या पाण्यावर पाकिस्तानची शेती अवलंबून आहे. पाकिस्तान भारत भूमीवर आतंकवादी कारवाया करत आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केल्याचा गवगवा करण्यात आला. पण त्याने पाकिस्तानला काहीच फरक पडला नाही. भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी अडवून भारतीय शेतीसाठी पुरविले असते तर पाकिस्तानची काय दुर्दशा झाली असती याची कोणालाही कल्पना करता येईल. मग सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववादी मोदीजीनी तो करार तोडून पाणी अडविण्याचा का निर्णय घेतला नसावा ? कारण उघड आहे. असे करार सहजासहजी मोडता येत नाहीत. मग मोदीजी तिकडे पाणी जावू देतात म्हणून ते पाकिस्तान व मुस्लीम धार्जिणे ठरतात का याचे उत्तर गांधींविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या आणि त्या प्रचारावर विश्वास ठेवणाऱ्या मंडळीनी दिले पाहिजे.
पाकिस्तानला ५५ कोटी देण्यात यावे यासाठीच गांधीनी दिल्लीत उपोषण केले हा देखील गोडसेवादी मंडळीचा अपप्रचार आहे. उपोषण मुख्यत: दिल्लीतील धार्मिक दंगली थांबविण्यासाठी होते आणि दोन जमातीत तसा सामंजस्य करार झाल्या नंतरच गांधीनी उपोषण सोडले. असे सामंजस्य निर्माण करायला हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी लेखी संमती दिल्यावरच गांधीनी आपले उपोषण सोडले होते. भारत सरकारने पाकिस्तानचे देणे असलेले ५५ कोटी तर उपोषण सुटण्याच्या तीन दिवस आधीच देवून टाकले होते. ५५ कोटी साठीच गांधीनी उपोषण केले असते तर ते दिल्या बरोबर गांधीजीनी उपोषण सोडले असते. पण तसे झाले नाही. तरीही हिंदुत्ववादी मंडळी कडून ठरवून अपप्रचार होत आलेला आहे. जी गोष्ट ५५ कोटी बद्दल तीच गोष्ट देशाच्या फाळणी बाबत. फाल्नीतील गांधींच्या भुमिके बाबत तसेच असत्य पेरण्याचे काम ही मंडळी करत आली आहे. महात्मा गांधींच्या समकालीन पिढीला आणि देशाला स्वातंत्र्य मिळायच्या वेळी वयाने लहान असलेल्या पिढीला हे मुठभर हिंदुत्ववादी वगळले तर अशा आरोपांचा विचार देखील त्यांच्या मनाला शिवला नाही. त्या पिढीचा महात्मा गांधी फाळणीला किंवा त्यानंतर झालेल्या रक्तपाताला जबाबदार असण्यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते. कारण त्यांनी गांधीजी स्वातंत्र्योत्सवात सहभागी न होता दिल्लीपासून दूर फाळणी नंतरचा हिंसाचार थांबविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचे पाहिले होते, ऐकले होते. हा इतिहास घड्तानाची पिढी कायम गांधी आणि कॉंग्रेसच्या बाजूने उभी राहिली हा इतिहास आहे.
फाळणीच्या वेळी एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला निघालेले हिंदू आणि मुसलमान कॉंग्रेसच्या समर्थनार्थ अनेक वर्षे एकजुटीने उभे राहिलेत हा काही फार जुना इतिहास नाही. आज जी सत्तरीतील पिढी आहे ती या सत्याचे साक्षीदार आहे. ज्या पिढीच्या बाबतीत हे घडले त्या पिढीने फाळणीसाठी आणि नंतरच्या हिंसाचारासाठी महात्मा गांधी किंवा कॉंग्रेसला जबाबदार धरले असते तर ती १९५२ ला झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून कॉंग्रेसच्या विरोधात राहिली असती. फाळणीचे दु:ख तर त्या पिढीने भोगले होते. एकूण परिस्थिती लक्षात घेता ती टाळता न येण्यासारखी आपत्ती होती हे त्या पिढीने समजून घेतले होते. महात्मा गांधी आणि कॉंग्रेसने फाळणीला मान्यता दिली हे मान्य केले तरी फाळणीची न टाळता येण्यासारखी आपत्ती कोणी निर्माण केली हे समजून घेण्याची खरी गरज आहे. अपप्रचाराला बळी न पडता आपण इतिहासाची पाने चाळली पाहिजे , वाचली पाहिजेत. तसे केले तरच आपल्याला फाळणीचे दोषी कोण आणि फाळणी अपरिहार्य होती की नव्हती हे लक्षात येईल. आणि आज अखंड भारताचा जप करणारे विखंडीत भारताच्या निर्माणाला कसे खतपाणी घालत होते हेही कळेल. या इतिहासावर एक नजर पुढे कधीतरी टाकू या.
---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment