Thursday, February 17, 2022

ना तजुर्बाकारीसे वाईज (वाईन) की ये बाते है !

 दारूच्या नशेत कायदेशीर व जबाबदार व्यवहार करता येत नाही हे तर खरेच आहे आणि म्हणून दारूला विरोध करणे चांगलेच मानले पाहिजे. पण वाईन पिण्याचा असा काही परिणाम होतो असा अनुभव कोणी मांडलेला नाही. वाईन मद्य श्रेणीत मोडत असले तरी त्याचे दारू सारखे दुष्परिणाम होत नाहीत हे सत्य स्वीकारले तर त्याचा कुठेही दारूबंदीच्या प्रयत्नावर विपरीत परिणाम होत नाही.
---------------------------------------------------------------------------------


सध्या महाराष्ट्र विवाद्भूमी बनलाआहे. त्यासाठी वाईन निमित्त ठरले आहे. वाईनने नशा येत नाही म्हणतात पण चर्चा मात्र नशा चढल्या सारखी झडत आहे. साधारणत: १० वर्षापूर्वी असाच एक वाद झाला त्याचे या निमित्ताने स्मरण झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने ज्वारी-बाजरी सारख्या धान्यांपासून दारू तयार करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. तो असाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यावेळी मी याच स्तंभात 'हंगामा है क्यो बरपा ...' या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. त्याकडे मागे वळून पाहताना आणखी एक गोष्ट लक्षात आली तिचाही उल्लेख करायला हवा. ती गोष्ट म्हणजे देशोन्नती दैनिकात हा स्तंभ एक दशक उलटून गेले तरी सुरूच आहे. वृत्तपत्रात सहसा एवढा प्रदीर्घ काळ एखादा स्तंभ चालत नाही.  संपादक प्रकाशभाऊ पोहरे आणि वाचकांचे लाभलेले प्रेम याला कारणीभूत आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त न करणे कृतघ्नपणाचे ठरेल. आता वादविषयावर नजर टाकू. १० वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या त्या निर्णयावर तुटून पडणाऱ्यात सर्वोदयी नेते ठाकुरदासजी बंग, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, नरेंद्र दाभोळकर, अनिल अवचट, अण्णा हजारे आणि डॉ. अभय बंग हे महाराष्ट्रातील जनतेसाठी आदरणीय असलेले समाजसेवक होते. आज यांच्यापैकी अण्णा हजारे आणि अभय बंग हे दोघेच हयात आहेत. या दोघांनीही सरकारच्या वाईन निर्णयाचा तीव्र शब्दात विरोध आणि धिक्कार केला आहे. अण्णा हजारे यांनी तर उपोषणाला बसण्याची धमकी दिली आहे. अभय बंग यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल किळस वाटते असे म्हंटले आहे. दोघांनीही टोकाचे शब्द वापरले असले तरी या १० वर्षात त्यांच्या भूमिकेत किंचित झालेला बदल जाणवतो जो स्वागतार्ह आहे. दारू साठी धान्य वापरू नका ही १० वर्षापूर्वीच्या वादात त्यांची भूमिका होती. आज ते द्राक्ष किंवा इतर फळांचा वापर वाईन बनविण्यासाठी करू नका असे म्हणत नाहीत. विक्रीसाठी ते सुलभ उपलब्ध व्हायला नको असा त्यांचा आग्रह आहे. म्हणून किराणा दुकानांमधून वाईन विक्रीला त्यांचा विरोध आहे. यामुळे महाराष्ट्र मद्यराष्ट्र बनेल हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे.

.
हा आक्षेप मुख्यत: वाईन आणि अन्य प्रकारची दारू सारखीच परिणामकारक किंवा हानिकारक आहे या गृहितकावर आधारित आहे. त्यांचे दुसरे गृहितक आहे ते म्हणजे खेडोपाडी प्रत्येक किराणा दुकानातून वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही दोन्ही गृहितके चुकीच्या समजुतीवर आधारित आहेत. एखाद्या निर्णयाचा सर्व बाजूनी विचार करण्यासाठी अण्णा हजारे कधीच प्रसिद्ध नव्हते. त्यांना एखादी गोष्ट वाटली म्हणजे त्यांच्यासाठी ती पूर्ण सत्य असते. त्यांची समजूत कितीही बाळबोध असली तरी त्यांना फरक पडत नाही. लोकपाल आला की देशातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांची  शंभरी भरणार असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांच्या अशा वाटण्याला आधार वगैरे असण्याची गरज नसते. वाईन विक्री सुलभ केली तर महाराष्ट्र मद्यराष्ट्र कसे बनेल हे ते सांगणार नाहीत. सांगूही शकणार नाहीत ही त्यांची मर्यादा आहे. त्यांच्या या मर्यादेचा अमर्याद लाभ घेवून संघपरिवाराने सत्तांतर घडवून आणले त्याचेही त्यांना सोयरसुतक नसणे ही आणखी एक त्यांची मर्यादा. त्यामुळे आपल्या वाईन विरोधाचा काय परिणाम होईल याचा ते विचार करणार नाहीत. तशी त्यांची क्षमताही नाही. पण अभय बंग म्हणजे अण्णा हजारे नाहीत. ते अभ्यासू आहेत. एखाद्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार करण्याची त्यांची क्षमता वादातीत आहे. त्यांनी तरी सरकारचा निर्णय समजून घेवून प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते. त्यांच्या प्रतिक्रियेवरून तरी सरकारी निर्णयाचा त्यांनी अभ्यास केला असे दिसत नाही. त्यांनीही वाईन आणि इतर प्रकारची दारू एकच असल्याचा घोळ घातला आहे.आणि सरकारी निर्णयाचा अभ्यास न करताच सर्वत्र वाईनच्या महापुराचे संकट येण्याचे चित्र उभे केले आहे.

अशाच श्रेणीत वाईनचा विरोध करणारे सगळेच मोडत असल्याने मी लेखाचे शीर्षकच 'ना तजुर्बाकारीसे वाईज की ये बाते है' म्हणजे अनुभवाविना नीतिमूल्यांचा उपदेश करणारे असे दिले आहे ! १० वर्षापूर्वीचा लेखाला ज्या गझलचे शीर्षक दिले होते त्याच गझल मधील ही ओळ आहे !  अर्थात त्यांनी वाईन आणि दारूची चव घेवून फरक ओळखावा असे मला म्हणायचे नाही. मलाही त्यांची चव माहित नाही. त्यासंबंधीचे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत ते समजून घेवून भूमिका ठरविता येते. दारूच्या नशेत कायदेशीर व जबाबदार व्यवहार करता येत नाही हे तर खरेच आहे आणि म्हणून दारूला विरोध करणे चांगलेच मानले पाहिजे. पण वाईन पिण्याचा असा काही परिणाम होतो असा अनुभव कोणी मांडलेला नाही. वाईन मद्य श्रेणीत मोडत असले तरी त्याचे दारू सारखे दुष्परिणाम होत नाहीत हे सत्य स्वीकारले तर त्याचा कुठेही दारूबंदीच्या प्रयत्नावर विपरीत परिणाम होत नाही. सरकारने आणखी एक मद्य सुलभ केले असे सरकारच्या निर्णयाकडे न बघता या निर्णयामुळे मनावरचे नियंत्रण घालविणाऱ्या आणि शरीर खंगविणाऱ्या आणि कुटुंब बरबाद करणाऱ्या दारूकडून वाईनकडे वळविण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि तसे प्रयत्न केले पाहिजे. दारू प्यायला मिळू नये म्हणून दारूबंदीचा आजवर चोखाळलेला सरधोपटमार्ग अपयशी ठरला आहे हे एकदा प्रांजळपणे मान्य केले तर दारू कशी कमी करता येईल याच्या पर्यायी मार्गाचा शोध सुरु होवू शकेल. त्याची खरी गरज आहे. वाईनला विरोध करून दारूबंदीचा पर्यायी मार्ग आपण बंद करू हे लक्षात घेण्याची गरज आहे.                                                                                                                                           

प्रचलित दारूबंदीच्या मार्गाने दारू उपलब्धतेत अडचण येते हे खरे पण लोक या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जे काही करतात त्याचे दुष्परिणाम दारू इतकेच वाईट आहेत. दारूबंदी क्षेत्रात चढ्या दराने दारू विक्री होवून त्याचा कुटुंबावर अधिक ताण पडतो.दारू माफियांच्या टोळ्या निर्माण होवून त्यांचा धुडगूस सुरु होतो. सरकारी यंत्रणा विशेषत: आधीच भ्रष्ट असलेली पोलीस यंत्रणा अधिक भ्रष्ट होते. एका दारूबंदीचे हे सारे दुष्परिणाम आहेत. दारूबंदीचा सरकारी बंदी हा मार्ग नाही. दारूबंदीसाठी लोकचळवळ हाच प्रभावी मार्ग आहे. आपल्याकडे लोकचळवळ होते ती सरकारने दारूबंदी करावी यासाठी. लोकांना दारू पिण्यापासून रोखण्याचे जनचळवळीचे प्रयत्न दारूबंदी घोषित झाली की संपतात व चळवळही संपते. चळवळ संपली की दारूबंदीचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात अशा दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत. यातून सुटण्याचा एकमार्ग वाईन आहे. त्यासाठी वाईन स्वस्त झाली पाहिजे आणि सहज उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी वाईन उत्पादन वाढणे गरजेचे आहे. वाईन विरूद्धचे अहेतुक वा सहेतुक आकांडतांडव सुरु राहणे हा वाईन उत्पादन व वितरणातील मोठा अडथळा ठरेल. सरकारच्या निर्णयाने वाईन विक्री सुलभ होईल हा मोठा गैरसमज जाणीवपूर्वक फैलावण्याचे काम सध्या सुरु आहे. ५-७  हजार लोकसंख्या असलेल्या गांवात वाईन विक्रीसाठी सरकारी निकषा प्रमाणे १० कामगार कामास असलेले १०० चौ.मि. क्षेत्रफळाचे दुकान क्वचितच असू शकते. त्यामुळे सरकारच्या निर्णयाने खेडोपाडी वाईनचे पाट वाहतील भीती तद्दन प्रचारकी आहे.. तेव्हा अशा प्रकारच्या अपप्रचारात न पडता सर्वच दारूबंदी समर्थकांनी वाईन बाबतची भूमिका प्रामाणिकपणे तपासली पाहिजे.

------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment