Thursday, February 10, 2022

कॉंग्रेसग्रस्त मोदी !

 २०१४ साली झालेला पराभव कॉंग्रेसला स्वीकारता आला नाही व तेव्हाच्याच मानसिकतेत कॉंग्रेस आहे या मोदीजीच्या आरोपात तथ्य असेलही पण कॉंग्रेसवर महाविजय मिळवूनही कॉंग्रेसला पराभूत करायचेच आहे या २०१४ च्या मानसिकतेतून मोदीही अजून बाहेर आले नाहीत याचा पुरावा त्यांच्या संसदेतील भाषणातून मिळतो.
----------------------------------------------------------------------------------------


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथेप्रमाणे राष्ट्रपतीचे अभिभाषण आणि त्यावर चर्चा झाली. विरोधकांनी सरकारच्या अनेक धोरणांवर कठोर टीका केली. अशी टीका करण्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी आघाडीवर होते. राष्ट्रपती अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रधानमंत्री मोदी उत्तर देतील हे अपेक्षित होतेच. शिवाय टीका झालेल्या सर्व मुद्द्यांचा समाचार ते घेतील हेही अपेक्षित होते. पण प्रधानमंत्री बोलायला उभे राहिले आणि त्यांची गाडी कॉंग्रेसच्या रुळावरून सुसाट धावत सुटली. या रुळावरून धावतांना जी स्थानके लागणार ती कॉंग्रेसचीच असणार हे उघड आहे. त्यामुळे लोकसभेत आणि राज्यसभेत प्रधानमंत्र्यांनी आपला बहुतांश वेळ कॉंग्रेसवर टीका करण्यात खर्ची घातला. त्यात त्यांनी कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केलेल्या किंवा इतर विरोधीपक्ष नेत्यांनी मांडलेल्या मतावर , राष्ट्रीय समस्यांवर ते उत्तरादाखल बोलले असेही झाले नाही. कॉंग्रेस बद्दल त्यांना पूर्वीपासून जे जे वाटत आले ते ते बोलले. काही खरे आणि बरेचसे खोटे. एखाद्या प्रधानमंत्र्याने लोकांना माहित असलेले सत्य दडपून बिनदिक्कत खोटे बोलावे हे या पदावर बसलेली व्यक्ती टाळत असते. पण मोदी त्यातले नाहीत. खऱ्याखोट्याची चाड न बाळगता ते बिनधास्त बोलत असतात. इतर होवून गेलेले प्रधानमंत्री आणि मोदीजी यांच्यामध्ये हा एक महत्वाचा फरक आहे. यालाच बहुधा ते आपली छाती ५६ इंची असल्याचे समजत असावेत. खोटे उघडे पडेल किंवा खोटे उघडे पडले याची त्यांना अजिबात चिंता नसते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत त्यांनी जे उत्तर दिले त्यातील खोटेपणावर टीकेची झोड उठली असतांना त्याची पर्वा न करता त्याच पद्धतीने ते राज्यसभेत कॉंग्रेसवर तुटून पडले. सत्तेत असलेल्या कॉंग्रेसवर एखाद्या विरोधीपक्ष नेत्यांनी कॉंग्रेसच्या धोरणाची चिरफाड करावी या पद्धतीने ते बोलत राहिले. कॉंग्रेस सत्तेत नाही आणि आपण विरोधीपक्षात नाही याचा त्यांना विसर पडला की काय असे वाटण्यासारखे त्यांचे लोकसभा व राज्यसभेतील ताजी भाषणे होती.

भाषणातील मुद्द्यांवरून मात्र आपण सत्ताधारी आहोत याचे भान सुटलेले असले तरी कॉंग्रेस विरोधीपक्षात बसलेली आहे याचे भान त्यांना होते हे त्यांच्या भाषणावरून दिसते. म्हणून तर त्यांनी कॉंग्रेसच्या झालेल्या दुर्दशेचे वर्णन करत कॉंग्रेसचे वर्तन असेच राहिले तर ते १०० वर्षे सत्तेत येवू शकणार नाही असे त्यांनी सूचित केले. कॉंग्रेस किती कमजोर झाली आहे याचे मात्र त्यांनी सत्यकथन केले. कॉंग्रेसला १९६२ मध्ये तमिळनाडूच्या जनतेनी संधी दिली होती. त्यानंतर कॉंग्रेस तिथे कधीच स्वबळावर सत्तेत आली नाही. १९८९ पासून उत्तर प्रदेश व बिहारच्या जनतेने कॉंग्रेसला स्वीकारले नाही याची त्यांनी आठवण करून दिली. १९७२ नंतर कॉंग्रेस बंगाल मध्ये जिंकली नाही. त्रिपुरात ३ दशकापासून कॉंग्रेस नाही. गोव्यात २८ वर्षापासून कॉंग्रेस सत्तेत नाही. कॉंग्रेस काळात तेलंगणाची निर्मिती होवूनही तिथे कॉंग्रेस सत्तेत येवू शकली नाही. ही सगळी वस्तुस्थिती त्यांनी आपल्या भाषणातून विषद केली. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे कि आज भारतीय जनता पक्ष ज्या स्थितीत आहे त्या तुलनेत कॉंग्रेस कुठेच नाही याची मोदीजीना जाणीव आहे. आणि तरीही मोदीजींच्या मनाचा आणि डोक्याचा संपूर्ण ताबा कॉंग्रेसने घेतल्यागत मोदीजी वागत आणि बोलत आहे. मृत्यूपंथाला लागलेल्या कॉंग्रेसचे भूत काही केल्या त्यांच्या मानगुटीवरून उतरत नाही हे मोदीजीच्या लोकसभा-राज्यसभा मधील ताज्या भाषणांनी दाखवून दिले. केवळ भाषणातून नाही तर ते त्यांच्या धोरणातून देखील प्रकट होते. कॉंग्रेसकाळात ज्या ज्या गोष्टींची निर्मिती झाली त्याची विल्हेवाट लावण्यात मोदींनी आपल्या राजवटीतील आठ वर्षे घालवूनही कॉंग्रेसची विल्हेवाट लावल्याचा आनंद त्यांना उपभोगता येत नाही. पंजाबमध्ये त्यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटीचे ते राजकीय भांडवल करीत असल्याचे बहुतेकांचे मत होते. पण संसदेतील ताज्या भाषणावरून खरोखरीच मोदींना कॉंग्रेस आपल्याला संपवील अशी भीती वाटत असली पाहिजे असे आता वाटते. 

२०१४ साली झालेला पराभव कॉंग्रेसला स्वीकारता आला नाही व तेव्हाच्याच मानसिकतेत कॉंग्रेस आहे या मोदीजीच्या आरोपात तथ्य असेलही पण कॉंग्रेसवर महाविजय मिळवूनही कॉंग्रेसला पराभूत करायचेच आहे या २०१४ च्या मानसिकतेतून मोदी अजूनही बाहेर आले नाही याचा पुरावा त्यांच्या संसदेतील भाषणातून मिळतो. अन्यथा जळीस्थळी त्यांना मरगळलेली कॉंग्रेस दिसली नसती. २०१४ साली मतदारांना त्यांनी फक्त ५ वर्षे मागितली होती. ५ वर्षात कॉंग्रेसने जे जे चुकीचे केले ते दुरुस्त करून दाखवण्याचे वचन त्यांनी दिले होते. आज ८ वर्षे होवून गेले तरी काँग्रेसमुळे मला काही करता येत नाही अशी असहाय अवस्था ते प्रकट करतात. आपल्या चुकीच्या धोरणासाठी आणि निर्णयासाठी ते प्रत्येक वेळी कॉंग्रेसला जबाबदार धरतात. कॉंग्रेस म्हणजे मोदींच्या चुकांचे खापर फोडण्याचा दगड बनला आहे आणि आपल्या भाषणातून मोदीजीनी बोलण्याच्या ओघात त्याचे उदाहरणही दिले आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्रात असलेल्या उत्तर भारतीयांना कोरोना पसरविण्यासाठी मुद्दाम रेल्वेचे तिकीट काढून पाठवून दिले असा अचाट आरोप त्यांनी केला. लोकांच्या स्मरणशक्तीवर मोदीजींचा पूर्ण विश्वास असावा. देशात कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा सरकारने काय केले हे लोकांना आठवत नसणार हे मानूनच मोदीजीनी कोरोना फैलावण्याचा कॉंग्रेसवर आरोप केला असावा. ४ तासाच्या पूर्वसूचनेने सगळे बंद करून देशातील लाखो नागरिकांची जी ससेहोलपट मोदीजीनी केली त्याला इतिहासात तोड नसताना मोदीजी त्याचेही खापर कॉंग्रेसवर फोडून मोकळे झाले. सगळे बंद करण्याच्या त्यांच्या पद्धतीवर झालेल्या प्रचंड टिके नंतर मोदी सरकारला आपापल्या गांवी लोकांना पोचविण्यासाठी रेल्वे गाड्या सुरु कराव्या लागल्या. प्रवाशांच्या तिकिटाचे ८५ टक्के पैसे केंद्र सरकार देत असल्याचा गवगवा केला. मोदीजीनी लोकांना त्यांच्या गांवी सुखरूप पोचविल्याच्या जाहिराती देशभर झळकल्या. आणि आता मोदीजी म्हणतात कॉंग्रेसने लोकांना आपल्या गांवी पाठवून कोरोनाचा प्रसार केला ! कॉंग्रेसच्या भुताने मोदीजी किती पछाडलेले आहेत याचा पुरावाच मोदीजीनी आपल्या भाषणातून दिला आहे. आव्हान देण्याच्या स्थितीत नसलेल्या गलितगात्र कॉंग्रेसची मोदींना भीती का वाटते हा खरा प्रश्न आहे. मोदींना निर्विवादपणे कॉंग्रेसवर मात करता आली पण स्वातंत्र्य आंदोलन काळापासून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली  कॉंग्रेसने या देशात भारत नामक देश कसा असेल -ज्याला आयडिया ऑफ इंडिया म्हणतात- याची जी मुल्ये रुजविली त्याचा पराभव करता आलेला नाही. मोदींची कॉंग्रेस बद्दलची चीड आहे ती हीच !
------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment