Wednesday, November 30, 2011

अण्णांच्या देऊळात अराजकाची पूजा

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रीचा विनयभंग करण्यात आंबट शौकिनांना जो विकृत आनंद मिळतो तशा प्रकाराचा आनंद उतू जाणारी अथक चर्चा शरद पवार हल्ला प्रकरणी 'मै अण्णा हुं' टोपीवाले उन्मत्त पणे करताना पाहिले की अण्णा आंदोलनाने देशाला अराजकाच्या उंबरठ्यावर आणि अविवेकाच्या घसरणीवर आणून उभे केल्याची प्रचीती येते. अर्थात सगळा दोष अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर थोपवून मोकळे होणे हे वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या शहामृगा सारखे होईल.


------------------------------------------------------------------------------------------------


शरद पवार यांचेवरील हल्ल्यानंतर दुसरे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी अतिशय हताशेने आणि व्यथित होवून म्हंटले होते की माहित नाही हा देश कोठे चालला आहे. देशात सध्या जे वातावरण आहे ते लक्षात घेता प्रणव मुखर्जी यांची प्रतिक्रिया समर्पक आणि सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारी होती. शरद पवार यांचे वरील हल्ला हा त्यांनी केलेल्या वैयक्तिक चुकांचा परिणाम आणि परिपाक नव्हता. शरद पवारांच्या राजकीय शैली बद्दल आणि राजकारण करण्याच्या पद्धतीबद्दल अनेकांचे मतभेद आहेत आणि वेळोवेळी ते प्रकटही झाले आहेत. त्यांच्या विश्वसनीयतेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहतात.पण तरीही संयमी , वादग्रस्त नसलेला ,टोकाची भूमिका न घेताही पुरोगामी प्रतिमा टिकवून ठेवलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.या प्रसंगी सर्व राजकीय पक्ष आणि नेते एक दिलाने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले ते याच मुळे. हल्ल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेतून त्यांची प्रगल्भता व परिपक़्वता दिसून आली आहे. राजकीय परिपक़्वतेतूनच त्यांनी या हल्ल्याला फारसे महत्व दिले नाही व इतरांनीही देवू नये असे आवाहन केले. पण झालेला हल्ला हा शरद पवार नावाच्या व्यक्तीवर नव्हता. शरद पवार ज्या सरकारचे व व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात त्या सरकार व व्यवस्थे बद्दलची चीड त्यातून व्यक्त झाली आहे. देशात वाढत चाललेल्या राजकीय , आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील धगधगत्या असंतोषाची ती विकृत अभिव्यक्ती होती. देशातील राजकीय ,आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात आलेली विकृती दुर करण्याची ती एक फक्त वैयक्तिक विकृत अभिव्यक्ती असती तर फारशी चिंता करण्याचे कारण नव्हते आणि पवार म्हणतात तसे त्या घटनेकडे दुर्लक्ष करता आले असते. समाजात मनोविकृतांची आणि माथेफिरूची कधीच कमी नसते. अशा माथेफिरूच्या कृत्याला गंभीरपणे घ्यायची गरज नसते . पण शरद पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ज्या अस्वाभाविक प्रतिक्रिया मोठया प्रमाणात समोर आल्यात आणि येत आहेत त्या झालेल्या हल्ल्या पेक्षा भयंकर आणि गंभीर आहेत. चिंता आणि चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. प्रणव बाबूंनी दिलेली प्रतिक्रिया उद्वेगातून आली होती. पण नंतर येत असलेल्या प्रतिक्रिया खरोखरच देश कोणत्या वळणावर उभा आहे आणि कोठे चालला आहे या बद्दलचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत. प्रतिक्रियांची तीव्रता लक्षात घेता या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे घातक ठरणार आहे.

अण्णांचे देऊळ

या हल्ला प्रकरणी सर्वात विवादास्पद प्रतिक्रया राहिली ती अण्णा हजारे यांची. त्यांची 'एकच थापड मारली?' ही पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकून अनेकांना प्रचंड धक्का बसला. अर्थात धक्का बसण्याचे प्रमाण महाराष्ट्रा बाहेर अधिक होते. महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक वर्तुळातील लोक अण्णांना बऱ्या पैकी जाणून असल्याने त्यांची प्रतिक्रिया त्यांना धक्का देवून गेली नाही. गेल्या २० वर्षापासून अण्णा हजारे महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांच्या कार्याबद्दल द्यायला हवा तेवढा मान महाराष्ट्राने त्यांना दिला आहे.लोकापेक्षाही सत्ताधाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी तर जास्तच मान दिला आणि त्यांच्याकडून आपल्या राजकीय विरोधकाचे कांटेही काढलेत. अगदी गेल्या एप्रिल महिन्यातील जंतर मंतर आंदोलनाच्या तीन महिने आधी त्यांचा महाराष्ट्र दौरा झाला होता त्याला प्रतिसाद त्यांच्या कार्यकर्त्याचाच होता. आज गांधीवादी म्हणून ते सर्वदुर ओळखले जात असले तरी उपोषण करण्या व्यतिरिक्त त्यांच्यात व गांधीत कधीच कोणते साम्य राहिले नाही. चांगल्या कामासाठी अतिरेकी मार्गाचा वापर ही बाब महाराष्ट्राला नवीन नव्हती.कॉंग्रेस जितकी गांधीवादी तितकेच अण्णा देखील गांधीवादी हे माहित असतानाही महाराष्ट्रातील गांधीवादी कार्यकर्त्यांनी अण्णांची मदतच घेतली. दारू पिणाऱ्यांना फटक्याची शिक्षा देणाऱ्या अण्णांची महाराष्ट्रात धान्यापासून दारू निर्मितीचे कारखाने उघडू नयेत यासाठी गांधीनिष्ठ कार्यकर्त्यांनी अण्णांचा उपयोग करून घेतला होता.. अण्णांच्या समाजसेवी वृत्तीबद्दल व कार्याबद्दल महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे आदर असला तरी महाराष्ट्राने त्यांना कधीच डोक्यावर घेतले नव्हते. त्यांच्या कामाच्या आणि विचाराच्या मर्यादा महाराष्ट्राला चांगल्याच ठाऊक होत्या.म्हणूनच शरद पवार हल्ला प्रकरणी अण्णांच्या प्रतिक्रियेने महाराष्ट्राला धक्का बसला नाही. उलट नंतर लोकशाहीवर हल्ला वगैरे अशी जी अधिकृत प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यामासमोर व्यक्त केली तीच महाराष्ट्रातील लोकांना बेगडी वाटली. अण्णांचे अंतरंग महाराष्ट्राला ठाऊक असले तरी महाराष्ट्रा बाहेर अण्णांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असल्याने त्यांना मात्र अण्णाचे हे 'विश्वरूप दर्शन' पाहून भोवळ आली. कारण सामान्य,सध्या भोळ्या कार्यकर्त्याला देवदूताच्याच नाही तर प्रत्यक्ष देव स्वरुपात पाहण्याचा हा परिपाक होता. अण्णांना तसे रूप देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नच झाला . ज्यांनी 'देऊळ' हा मराठी चित्रपट बघितला असेल आणि मनोरंजनाच्या पलीकडे जावून समजून घेतला असेल त्यांना भारतीय राजकारणाच्या पटलावर अचानक आणि झपाट्याने उभ्या राहिलेल्या अण्णांच्या देवळाचा अर्थ आणि मतितार्थ लक्षात आल्या शिवाय राहणार नाही. अण्णाला देवत्व देण्याचा हा महत्वकांक्षी प्रकल्प अशा पद्धतीने उभा राहिला की अण्णाला स्वत:च आपण अवतार असल्याचे भासले आणि तसे त्यांनी रामलीला मैदानावर लाखो लोकांसमोर जाहीर सुद्धा करून टाकले होते!ज्या देऊळात अण्णा स्वेच्छेने व आनंदाने देव म्हणून बसले त्याचा प्रेरक व कल्पनाकार अद्यापही गुलदस्त्यात असला तरी या देऊलाचे रचनाकार केजरीवाल आणि बेदी कंपनी होती,काळा पैसा निर्माण करून थकलेल्या आमिरखान ,अनुपम खेर,ओम पुरी सारख्यांनी पत पुरवठा केला आणि प्रसार माध्यमातील दबंगानी याची रंग रंगोटी करून आकर्षक जाहिरात करून गर्दी खेचली हे आता जग जाहीर झाले आहे. पण दगडाला शेंदूर फासला म्हणजे दगड देव बनत नाही किंवा दगडाला देवत्व प्राप्त होत नसते हे शरद पवार हल्ला प्रकरणीच्या अण्णांच्या प्रतिक्रियेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. पण अण्णा सारखीच प्रतिक्रिया सर्वच ' मै अण्णा हुं' टोपी वाल्यांचीच नाही तर या आंदोलनाला बढावा व उत्तेजना देवून उत्तेजित करणाऱ्या मेडिया मधील व बाहेरच्या विद्वानांची देखील आहे. वास्तविक अण्णा आंदोलनाने निर्माण केलेल्या उन्मादातून आणि राजकीय पक्ष व नेते वाईट असल्याने त्यांना 'सरळ' केल्याने प्रश्न सुटेल अशा सडक छाप विचारावर आधारित आंदोलनाची परिणती या पेक्षा वेगळी होवू शकत नाही हे अण्णांच्या लक्षात आणून देण्या ऐवजी शरद पवार यांचेवरील हल्ल्याचा संबंध महागाई व शेतकरी आत्महत्या या परस्पर विरोधी गोष्टींशी जोडून व त्याच्या आठवणीने गळा काढून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे आणि अविवेकी विचाराचे प्रदर्शन केले आहे. स्त्रीचा विनयभंग करण्यात आंबट शौकिनांना जो विकृत आनंद मिळतो तशा प्रकाराचा आनंद उतू जाणारी अथक चर्चा शरद पवार हल्ला प्रकरणी 'मै अण्णा हुं' टोपीवाले उन्मत्त पणे करताना पाहिले की अण्णा आंदोलनाने देशाला अराजकाच्या उंबरठ्यावर आणि अविवेकाच्या घसरणीवर आणून उभे केल्याची प्रचीती येते. अर्थात सगळा दोष अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर थोपवून मोकळे होणे हे वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून वाळूत तोंड खुपसून बसणाऱ्या शहामृगा सारखे होईल.

अण्णांना संधी देणारे दोषी

अण्णा हजारे यांचे साठी आमच्या राजकारण्यांनी,समाजधुरीणांनी आणि अर्थवेत्त्यानी जमीन तयार करून ठेवली हे जळजळीत सत्य आहे.या जमिनीत भ्रष्टाचाराचे सर्व प्रकारचे खत टाकून ठेवण्यात आले होते. या जमिनीला पाणी देण्यासाठी विषमतेचे धरण आणि बेरोजगारांचे पाटही बांधून तयार होते.राज्यकर्त्यांनी सामान्य जनतेच्या मानेवर जू ठेवून जमिनीची मशागतही करून ठेवली होती.काही दशकापूर्वी अशाच जमिनीत जर्मनी मध्ये नाझीचे पीक फोफावले होते. अराजकाचे पीक फोफावण्यासाठी आदर्श अशी ही जमीन सरकारने अण्णांनी जंतर मंतरचे आंदोलन मागे घ्यावे म्हणून त्यांना लाचेत देवून टाकली. राळेगण मध्ये गेल्या दोन तपा पासून ठोकशाहीचा जो यशस्वी प्रयोग अण्णांनी राबविला ,तो प्रयोग देश पातळीवर राबविण्यासाठी आवश्यक ती संधी व रसद या जमिनीने पुरविली हे नाकारता येणार नाही. अण्णांनीही त्यांच्या राळेगणच्या ठोकशाही बियाण्यावर दिल्लीच्या समाजसेवी संस्थांच्या संस्थानिकांच्या प्रयोग शाळेत संकर करून देशाच्या भिन्न वातावरणात रुजू शकेल असे जन लोकपाल नामक संकरीत बियाणे तयार केले आणि आयत्या तयार जमिनीत पेरून टाकले! जंतर मंतर हून रामलीला मैदानात येई पर्यंत बंपर पीक अण्णांच्या हाती आले . रामलीला मैदान याच पिकाच्या स्फोटकाच्या राशीने व्यापून गेले होते. पवारांवर हल्ला करणारा हरविंदर या राशीचा एक कण मात्र आहे.

अराजकाची उपासना थांबवा

आज सारा देश अशा स्फोटकाच्या राशीवर जीव मुठीत धरून उभा आहे. हा स्फोट झाला तर अविवेकाच्या लोळात पहिला बळी देशाच्या लोकशाहीचा व संविधानाचा जाईल. अण्णांच्या अनुयायांना या स्फोटकांना बत्ती देण्याची घाई झाली आहे. भ्याड सरकार आधीच अगतिक होवून खंदकात लपून बसले आहे आणि इतर पक्ष व त्यांचे नेते हे सरकार संभाव्य स्फोटापासून जनतेचे रक्षण करण्यास असमर्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी आतुर बनले आहे. जनता दोन पात्याच्या नाही तर तीन पात्याच्या कात्रीत सापडली आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी आता लोकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. सर्व सामान्य जनते जवळ या सर्वाना पाणी पाजता येईल असे मताचे अमोघ अस्त्र आहे. त्याचा संधी मिळताच वापर करता यावा म्हणून ते पारजून ठेवले पाहिजे. पण हे अमोघ अस्त्र फक्त लोकशाही व्यवस्थेतच वापरता येते याचा विसर पडू देता कामा नये. ' मै अण्णा हुं ' टोपीवाल्यानी या अस्त्राकडे नेहमीच तुच्छतेने पाहिले आहे. त्याचा उपयोग न करताच अडगळीत टाकून दिले आहे. त्यांना लोकशाही मार्गाचे नाही तर नाझी मार्गाचे अप्रूप व आकर्षण आहे. हल्लेखोर हरविंदरसिंह त्यांचा आदर्श व गळ्यातला ताईत त्याचमुळे बनला आहे. ज्या सर्व सामान्य सज्जनांनी अण्णा आंदोलनाचे भाबडे पणाने समर्थन केले त्यांचे डोळे या घटनेने उघडले नसतील तर त्यांच्यातील सज्जनपणा अण्णा आंदोलनाने संपवून टाकला असेच मानावे लागेल. असे झाले तर ती त्यांची व्यक्तिगत हानीच नाही तर देशाचीही मोठी हानी ठरेल. अण्णांच्या देऊळात अराजकाची चाललेली उपासना थांबविण्यात तेच महत्वाची भूमिका बजावू शकतात. सरकार तर असून नसल्या सारखे आहे .
(समाप्त)

सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ

3 comments:

  1. Gobar Ganesh banake, usko pujwana yanha ke unchya jatiyonke sanskrutik antakwadiyonki parampara rahi hai, usiko aaj ka media nibha raha hai. Jabtak sari sansrutik mamlonki jachpadatal nahi hogi tabtak naya Bharat nahi banega, aisehi Anna jaise Kai Gobar Ganesh paida hote rahenge woh bhi maatpeti se nahi magar aaluse, bainganse, papitase, na jaane kahan kahase.

    ReplyDelete
  2. 1) "पण शरद पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ज्या अस्वाभाविक प्रतिक्रिया मोठया प्रमाणात समोर आल्यात आणि येत आहेत त्या झालेल्या हल्ल्या पेक्षा भयंकर आणि गंभीर आहेत. चिंता आणि चिंतन करायला लावणाऱ्या आहेत."
    सहमत आहे!

    २)"राळेगण मध्ये गेल्या दोन तपा पासून ठोकशाहीचा जो यशस्वी प्रयोग अण्णांनी राबविला ,तो प्रयोग देश पातळीवर राबविण्यासाठी आवश्यक ती संधी व रसद या जमिनीने पुरविली हे नाकारता येणार नाही."
    सत्याग्रही मार्गाने अहिंसक आंदोलन करणे याला "ठोकशाही"म्हणणे किती संयुक्तिक आहे?

    ३)"सर्व सामान्य जनते जवळ या सर्वाना पाणी पाजता येईल असे मताचे अमोघ अस्त्र आहे. त्याचा संधी मिळताच वापर करता यावा म्हणून ते पारजून ठेवले पाहिजे. पण हे अमोघ अस्त्र फक्त लोकशाही व्यवस्थेतच वापरता येते याचा विसर पडू देता कामा नये."
    सहमत!

    ४)"' मै अण्णा हुं ' टोपीवाल्यानी या अस्त्राकडे नेहमीच तुच्छतेने पाहिले आहे. त्याचा उपयोग न करताच अडगळीत टाकून दिले आहे. त्यांना लोकशाही मार्गाचे नाही तर नाझी मार्गाचे अप्रूप व आकर्षण आहे. हल्लेखोर हरविंदरसिंह त्यांचा आदर्श व गळ्यातला ताईत त्याचमुळे बनला आहे."
    हे अतिशय निराधार वक्तव्य आहे! आपण तसा सर्व्हे केलेला आहे का?किती अण्णा समर्थकांनी पवार प्रकरणाचे समर्थन केले?

    ५)"अण्णांच्या देऊळात अराजकाची चाललेली उपासना"
    हा कदाचित पूर्वग्रहातून आपणास स्वतःपुरता लागलेला शोध आहे!

    अण्णांना विनाकारण यात ओढल्यामुळे एक अतिशय चांगला लेख एकांगी झाला आहे!

    ReplyDelete
  3. yahoo var tya shikhala bhagat singh chi upama dili geli..udya manmohan singh pm aahet mhanun tyanna asa koni lafa marala tar ashich pratikriya yeil kai?..ani bhav vadhila pm dekhil responsible aahet mag tya shikhane pm chya ka nahi vajavali?

    ReplyDelete