Thursday, May 31, 2012

शेतकरी आंदोलनाला बी टी चा अपघात

-------------------------------------------------
शेतकरी आंदोलनाची सर्व शक्ती शेती क्षेत्रा समोरील आव्हानाचा मुकाबला करण्यावर केंद्रित झाली पाहिजे. शेतमालाच्या किफायतशीर भावाचा प्रश्न , शेतकऱ्याला पाहिजे असलेले बाजार स्वातंत्र्य , शेती टिकविण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि भांडवल , शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार नियोजनपूर्वक कमी करणे या सारखे मुलभूत ,किचकट आणि गंभीर प्रश्न शेतीक्षेत्रासमोर उभे आहेत. शेतकरी चळवळ मात्र आव्हानांचा हा सागर पार करण्याऐवजी बीटी च्या डबक्यात उड्या मारून स्वत:च्या अंगावर चिखल उडवून घेत आहे.  
-------------------------------------------------


   बी टी बियाणाचे वाण भारतात रुजून १० वर्षे झालीत. हे वाण भारतात येण्या आधीपासून याच्या बऱ्या-वाईट परिणामावर घनघोर चर्चा सुरु आहे  बीटी बियानांमुळे भारतीय शेतीचे आणि पर्यावरणाचे न भरून येणारी हानी होईल या टोका  पासून ते  बीटी शिवाय भारतीय शेती तग धरणार नाही या टोकापर्यंत चर्चेच्या व वादाच्या फेऱ्या झडत राहिल्या. शेतकऱ्यांनी मात्र या वादाकडे  अधिक परिपक्वतेने पाहिले.  जुन्या वाणाचा अनुभव पाठीशी असल्याने आणि त्यातून आता अधिक मिळकतीची आशा उरली नसल्याने नव्या वाणाचा अवलंब करण्याशिवाय अधिक चांगला आणि व्यावहारिक पर्याय त्याच्याकडे नव्हता. हरित क्रांतीचा अनुभव घेवून झाला होता. हरित क्रांतीने देशाची अन्न धान्याची गरज भागविली पण शेतकऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबियाच्या कोणत्याच गरजा हरित क्रांतीने पूर्ण झाल्या नाहीत. जास्त पीक घेण्याच्या प्रयत्नात रासायनिक खते आणि कीटकनाशके व पाणी याचा अति वापर झाल्याने शेतीच्या उत्पादकतेवर व शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाल्याने नवे काही तरी केले पाहिजे ही प्रेरणा बलवत्तर होत गेली. अशा परिस्थितीत बीटी कापसाच्या बियाणांचा शेतकऱ्यांनी अविलंब व हातोहात स्विकार केला. शेतकऱ्याची जी परिस्थिती होती त्यात अधिक वाईट व्हायला काही वावच नव्हता. त्यामुळे आणखी वाईटाची भिती नव्हती. झालीच तर कीटकनाशकाच्या वाढत्या आणि खर्चिक फवारण्यापासून सुटका होण्याची शक्यता होती. बीटी वाणाच्या विरोधाचा शेतकऱ्यावर परिणाम झाला नाही तो याच मुळे. जुन्या सर्व बियाणांचे उच्चाटन करून कापसाच्या बीटी बियाणांनी  कापूस शेतीवर कब्जा केला. बीटीतून देखील फारसे हाती लागतं नाही हा अनुभव घेवून शेतकरी पुन्हा नव्याच्या शोधात आहे.  पण बीटी बियाणांचा भारत प्रवेश होण्या आधीपासून सुरु झालेली चर्चा मात्र अजूनही त्याच त्याच मुद्द्यांवर सुरु आहे. बीटी बियाणांच्या समर्थकांच्या  आणि विरोधकांच्या कुस्तीचे फड अजूनही रंगतात. वास्तविक १० वर्षाच्या अनुभवानंतर बीटी बियाण्याच्या उपयोगितेवर  आणि उणीवांवर चर्चेची गरज असताना चर्चे ऐवजी वादच झडत आहेत. या वादाला प्रारंभी तात्विक संघर्षाचा आणि बियाणे व कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या हितसंबंधातील संघर्षाचे कंगोरे होते. नंतर या वादाला संघटनात्मक स्वरूप आले. संघटनांना एकमेकांना कमी लेखण्यासाठी किंवा संपविण्यासाठी बीटी बियाणांचे निमित्त मिळाले. आधीपासूनच बहुराष्ट्रीय कंपन्याच्या विरोधात असणाऱ्या गटांनी देखील या वादात हात धुवून घेतले. आता तर शेती निरक्षर असलेली प्रसारमाध्यमे देखील आपल्या स्वार्थासाठी या वादात उतरली आहेत. किंबहुना बीटी बियाण्या संबंधी महिनाभरापुर्वी जो ताजा वाद रंगला त्यामागे देशातील  दोन मोठया आणि प्रतिष्ठीत अशा वृत्तपत्र समूहामधील स्पर्धा कारणीभूत ठरली आहे. महिनाभरा पूर्वी डाव्या पक्षाचे खासदार वासुदेव आचार्य यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने यवतमाळ जिल्ह्यातील विशिष्ठ गावांना ठरवून भेट दिली त्यामागे हिंदू आणि टाईम्स ऑफ इंडिया या दोन वृत्तपत्रातील स्पर्धा आणि संघर्ष कारणीभूत होता याची फारंच थोड्या लोकांना कल्पना असेल. अशाप्रकारे विशिष्ठ हेतूने बीटी बियाणाच्या वादाला खतपाणी घालून दोन्ही बाजू आपापला जो निष्कर्ष शेतकऱ्यांच्या समोर मांडू पाहात आहेत ते  बघता  शेती आणि शेतकऱ्यांच्या हलाखी बाबत अतिशय तकलादू , वरवरची आणि चुकीची कारण मीमांसा केली जात असल्याची पुष्ठी होते. यातून शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याचा धोका तर आहेच पण त्यापेक्षाही गंभीर धोका शेतकरी चळवळ दिशाहीन होण्याचा आणि भरकटण्याचा आहे. किंबहुना या दोन वृत्तपत्र समूहामधील वादाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेवून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व नेते यांनी जी भूमिका हिरीरीनेच नव्हे तर अरेरावीने मांडली त्यावरून शेतकरी चळवळ भरकटत चालल्याची पुष्ठीच होते असे विधान केले तर ते अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. 
                                    वाद आणि त्याचा निष्कर्ष 

बीटी बियाण्या संबंधीचा ताजा वाद ' टाईम्स ऑफ इंडिया' चे नाक कापण्यासाठी 'हिंदू' दैनिकाने उकरून काढला आहे. २००८ साली बीटी कॉटन बियाणे उत्पादक कंपनीने नागपूरच्या पत्रकारांना बीटी कॉटनची शेती दाखविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांचे दर्शन घडविले. त्यावर आधारित एक वृत्तांत तेव्हा 'टाईम्स ऑफ इंडिया'त प्रकाशित झाला होता. हा वृत्तांत कंपनीला अनुकूल असल्याने पुन्हा छापून आणण्यासाठी जाहिरातीचा मार्ग निवडला. जाहिरात म्हणून हाच मजकूर कंपनीने सलग दोन वर्षे दोनदा छापून आणला. मूळ जो वृत्तांत होता त्यात बीटी मुळे कापसाचा उत्पादन खर्च कमी होवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात १-२ गांवाचा उल्लेख करून तेथे शेतकरी आत्महत्या न झाल्याचे श्रेय बीटी कॉटनला देण्यात आले होते. एखाद्या गावावरून असा निष्कर्ष काढणे चुकीचे, दिशाभूल करणारे व अवैज्ञानिक असल्याने हा मजकूर प्रसिद्ध झाला तेव्हाच त्यावर आक्षेप घ्यायला हवा होता. पण २००८ साली कोणत्याही शेतकरी नेत्याला वा शेतकऱ्याच्या संघटनेला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. पण हाच मजकूर जाहिरात म्हणून प्रसिद्ध झाल्यावर 'हिंदू' दैनिकाचे लक्ष गेले आणि मग जाहिरातच नव्हे तर मूळ मजकूर देखील प्रायोजित असल्याचे दाखविण्याचा खटाटोप झाला. त्यासाठी काही शेतकरी नेत्यांना व संघटनांना हाताशी धरून टाईम्स मधील त्याच मजकुराच्या अगदी विपरीत असे चित्र उभे करण्यात आले. ज्या गावांचा जाहिरातीत उल्लेख होता त्या गांवात बीटी कॉटन मुळे शेतकरी कसा देशोधडीला लागला हे तक्रारीच्या रुपात मांडण्यात आले. कृषी विषयक संसदीय समितीने बीटीग्रस्त भागाची पाहणी करावी असा आग्रह झाला. यातून खासदारांच्या उपसमितीचा यवतमाळ दौरा आयोजित झाला. ( प्रायोजित केला असे जर कोणी म्हंटले तर तो संसदेचा अवमान होईल!) या समितीने जिल्ह्यातील कोणत्याही गांवाला भेट दिली असती तरी शेती आणि शेतकरी यांच्या विदारक स्थितीचे दर्शन  खासदारांना झाले असते. पण 'टाईम्स' च्या मजकुरात उल्लेखित गावातच त्यांना आग्रहपूर्वक नेले गेले. हीच बाब खासदारांचा दौरा हा दोन धनदांडग्या वृत्तपत्र समूहाच्या संघर्षाची परिणती असल्याचे सिद्ध करते. बीटी कॉटन मुळे शेतकरी कंगाल व कर्जबाजारी झाला असून त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढले हे दर्शविण्याचा योजनाबद्ध खटाटोप करण्यात आला. यात शरद जोशींचे कट्टर विरोधक श्री विजय जावंधिया आणि विदर्भ जन आंदोलन समितीच्या किशोर तिवारींनी मोलाचे योगदान दिले.  आपल्या बियाणांविरुद्धचा प्रचार खोडून काढण्यासाठी मग कंपनीने सुद्धा शेतकरी नेत्यांचे दौरे प्रायोजित केले ! बीटी बियाणांचे सर्वात मोठे समर्थक असलेले शेतकरी नेते श्री शरद जोशी यांच्या उपस्थितीत प्रगतीशील शेतकऱ्यांच्या पंचतारांकित मेळाव्यात बीटी बियाणे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याची द्वाही फिरविण्यात आली. या निमित्ताने शेतकरी संघटना मधील वाद आणि मतभेद तर चव्हाट्यावर आलेच , पण शेतकऱ्याचे सर्वात मोठे अहित बीटी बियाणांनी केले किंवा बीटी मुळेच शेतकऱ्याचे हित साधणार आहे असे दोन टोकाचे आणि तद्दन चुकीचे निष्कर्ष समोर मांडण्यात आले. शेतकरी चळवळीतील परस्पर  विरोधी  मतप्रवाह एका मुद्द्यावर सहमत दिसतात . आणि तो मुद्दा म्हणजे बियाणांचा ! शेतकऱ्यांच्या चांगल्या किंवा वाईटा साठी बियाणेच कारणीभूत असल्याचा हा निष्कर्ष आहे . काहीजण बीटी मुळे शेतकरी देशोधडीला लागणार म्हणून चिंतीत आहेत , तर काहीना बीटी मुळे शेतकरी मालामाल होईल असे वाटते. तात्पर्य , शेती आणि शेतकऱ्यांसाठी बियाणे हा कळीचा मुद्दा आहे ! 

                             शेतकरी आंदोलन भरकटले 

शेतकरी चळवळीचे नेते आणि कार्यकर्ते बियाणांचा वाद ज्या पद्धतीने चालवीत आणि वाढवीत आहेत त्यातून निघणारा वरील निष्कर्ष म्हणजे शेतकरी आंदोलनामागील तत्वज्ञान नाकारणारा आहे. बियाणे चांगले कि वाईट हे शेवटी शेतकऱ्याच्या अनुभवावरून ठरणार आहे. एखादी संघटना किंवा चळवळ बियाण्याच्या बाबतीत न्यायाधीशाची भूमिका घेवू शकत नाही. बियाणाच्या प्रश्नाकडे चांगल्या किंवा वाईट या भूमिकेतून न पाहता या प्रश्नाकडे शेतकरी स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे. बीटी बियाणे वापरण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे या शरद जोशींच्या भूमिकेशी सहमत होता येईल. पण शेतकऱ्यांनी बीटी बियाणेच  वापरले पाहिजे असा प्रचार ते कंपनीच्या प्रायोजकत्वाखाली करू लागलेत तर ते त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूळ भूमिकेशी विसंगत ठरते.   शेतकऱ्याला जे बियाणे  -मग ते बीटी बियाणे असो कि परंपरागत बियाणे असो - हवे ते उपलब्ध झाले पाहिजे इतका हा साधा प्रश्न आहे. शेतकरी कोणाचे ऐकून या बाबतीत निर्णय घेतो असे कोणी मानीत असेल तर ते नक्कीच मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचे निर्णय हे अनुभवातून आणि जिवंत राहण्याच्या धडपडीतून होत असतात. बीटी कॉटनला विरोध होत असतानाही त्याला शेतकऱ्यांनी जुमानले नाही आणि आता त्याचा बीटी पासून भ्रमनिरास होत आहे आणि बीटीचे लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे ते शेतकऱ्याच्या अनुभवाने. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि बीटीचा अनुभव घेवून त्याकडे पाठ फिराविनारा शेतकरी कापसाच्या जुन्या वाणाकडे वळलेला नाही. कापूस लागवडीचे क्षेत्र कमी होण्यामागे सरकारचे निर्याती संबंधीचे धोरण जसे कारणीभूत आहे तसेच बीटी वाणातील कमतरता कारणीभूत आहे. याचा अर्थ एकच होतो कि शेती क्षेत्रात शेतकऱ्याचा अनुभव लक्षात घेवून नवनव्या संशोधनाची गरज आहे. शेतकऱ्याला मागे नाही पुढेच जायचे आहे. नव्या किंवा जुन्या वाणाचा प्रचार करीत बसण्यापेक्षा गरजेनुसार संशोधन आणि अनुकूल तंत्रज्ञान विकसित होणे शेती टिकण्यासाठी गरजेचे आहे. हवामान बदलाच्या या कालखंडात तर याची विशेष गरज आहे. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ.स्वामीनाथन यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे गरजेचे असल्याचा गेल्याच आठवड्यात पुनरुच्चार केला आहे. केवल संसदेत अन्न सुरक्षा विधेयक पारित करून उपयोगाचे नाही . कारण उच्च दर्जाच्या  तंत्रज्ञानाशिवाय देशाच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण होणार नाहीत याची त्यांनी स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली आहे. बियाणाच्या प्रश्नावर शेतकरी चळवळीने डोकेफोड करणे हा चळवळीचा कपाळमोक्ष करण्यासारखे आहे. शेतकरी आंदोलनाची सर्व शक्ती शेती क्षेत्रा समोरील आव्हानाचा मुकाबला करण्यावर केंद्रित झाली पाहिजे. शेतमालाच्या किफायतशीर भावाचा प्रश्न , शेतकऱ्याला पाहिजे असलेले बाजार स्वातंत्र्य , शेती टिकविण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि भांडवल , शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार नियोजनपूर्वक कमी करणे या सारखे मुलभूत ,किचकट आणि गंभीर प्रश्न शेतीक्षेत्रासमोर उभे आहेत. शेतकरी चळवळ मात्र आव्हानांचा हा सागर पार करण्याऐवजी बीटी च्या डबक्यात उड्या मारून स्वत:च्या अंगावर चिखल उडवून घेत आहे. 
                                           
                          (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ      

        


                  

2 comments:

  1. A very good and balanced article bringing out the importance of technology in the agriculture sector. What ICAR is doing for last 60 years?

    Nanawaty

    ReplyDelete
  2. बीटी बियाण्यांच्या संदर्भातील वादांची परखड मिमांसा आपण केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण वापरलेली 'शेतीनिरक्षर माध्यमे ' ही संकल्पना अगदी योग्य असून मी त्यास पुर्णतः सहमत आहे. शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाला ज्याने डोळे उघडे ठेवण्याची कला शिकून घेतली आहे त्याला हा लेख आणि त्यातील जळजळीत वास्तव भिडणार यात शंका ती नाहीच... पुन्हा एकदा, हा लेख अप्रतिम आहे.

    ReplyDelete