Thursday, July 30, 2015

विज्ञानाची पिछेहाट

पंडीत जवाहरलाल नेहरू नंतर या देशात विज्ञान रुजविण्याचा , त्याचा प्रसार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना - तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा भगीरथ प्रयत्न कोणी केला असेल तर तो डॉ.कलाम यांनी केला . देशातील आजची विज्ञान क्षेत्राची दुरावस्था बघता कलाम यांची हीच ओळख समाजापुढे आली पाहिजे.
------------------------------------------------------------------------

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर २०२० साला पर्यंत भारताला बलशाली बनविण्याचे स्वप्न पाहणारे थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या निधनाच्या निमित्ताने देशातील विज्ञानाच्या अवस्थेवर झगझगीत प्रकाश पडला आहे. महाराष्ट्रातील वाचकांनी एकाच वेळी शेजारी शेजारी छापल्या गेलेल्या दोन बातम्या वाचल्या असतील. एकीकडे डॉ.कलामांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची केलेली सेवा , केलेला प्रसार याचे वर्णन करणारी बातमी आणि दुसरीकडे पावसासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलेले साकडे याची ठळक बातमी होती. या दुसऱ्या बातमीने पावसाविनाच कलामांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काम धुवून काढले ! कलाम यांच्या मृत्युनंतर त्यांना मनापासून श्रद्धांजली , आदरांजली वाहण्याची लहानापासून थोरापर्यंत अहमिका लागली होती. एक मिसाईल सोडले तर वैज्ञानिक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा , विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान रुजविण्याच्या त्यांच्या कामापेक्षा दुसऱ्याच बाबींना अवास्तव महत्व श्रद्धांजली अर्पण करताना देण्यात आल्याचे दिसून येते. वैज्ञानिक म्हणून सोडा एक उमदा हाडामासाचा माणूस म्हणूनही त्यांचा पुरेसा गौरव झाला नाही. आषाढी एकादशीला निधन झाले म्हणून त्यांना पुण्यात्मा म्हणून गौरविणारे कमी नव्हते . काहीना ते सच्चे मुसलमान वाटले ! काहीना ते जनतेचे राष्ट्रपती वाटले. आता त्यांना सच्चे मुसलमान म्हणत असताना कच्चे मुसलमानही आहेत हे दाखविण्याचा कुत्सितपणा सोडला तर त्यांचा असा गौरव चुकीचा आहे असे नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील या गौण बाबी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही खरी ओळख नाही. ती त्यांची व्यक्तिगत वागण्याची पद्धत होती आणि त्यामुळे समाजात काही बदल झाला नाही. 


त्यांनी आपल्या जीवनात कधी धर्मवाद जोपासला नाही किंवा लोकांना धर्मवादी बनण्यासाठी कधी प्रोत्साहित केले नाही. त्यामुळे ते कोणत्या धर्माचे आहेत हे इंगित करण्याचे कोणतेच प्रयोजन नव्हते. देशातील राष्ट्रपतीचे सर्वोच्च पद आणि जनता यांच्यातील असलेले अंतर त्यांनी कमी केले आणि त्यामुळे कोणत्याही राष्ट्रपती पेक्षा ते लोकप्रिय ठरले हे खरे असले तरी त्या पदावर राहून त्यांना कोणतेही बदल करता आले नाहीत हे लक्षात घेता राष्ट्रपती म्हणून त्यांच्या कामगिरीला गौरविणे निरर्थक ठरते. यामुळे त्यांनी राष्ट्राला दिलेल्या खऱ्या योगदानाकडे दुर्लक्ष होते ते टाळले पाहिजे. जनतेच्या राष्ट्रपती पेक्षा जनतेचा , जनतेत मिसळलेला वैज्ञानिक हीच त्यांची समर्पक आणि समाजावर परिणाम करणारी ओळख आहे. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशात विज्ञान रुजविण्याचा , त्याचा प्रसार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना - तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा भगीरथ प्रयत्न कोणी केला असेल तर तो डॉ.कलाम यांनी केला . त्यांनी प्रत्यक्ष विज्ञान क्षेत्रात जे योगदान दिले , कर्तबगारी दाखविली त्यापेक्षाही त्यांचे विज्ञान प्रसाराचे कार्य मोठे आहे. समाजाने विज्ञानाची कास धरली तर भारत २०२० सालापर्यंत महासत्ता बनेल हे स्वप्न बिम्बविण्याचे कार्य अद्वितीय होते. देशातील आजची विज्ञान क्षेत्राची दुरावस्था बघता कलाम यांची हीच ओळख समाजापुढे येणे गरजेचे आहे. 


हे किती गरजेचे आहे याची प्रचीती विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत दिग्गजांची एवढ्यातील विधाने लक्षात आणून देतात. गेल्या ६० वर्षात भारतात एकही मुलभूत संशोधन झाले नाही किंवा जग बदलणारा एकही शोध भारतात लागलेला नाही हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज नारायण मूर्ती यांनी लक्षात आणून दिले. १६ व्या - १७ व्या शतकानंतर जग झपाट्याने बदलले ते विज्ञान क्षेत्रात लागलेल्या शोधानी आणि त्यातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानांनी. ज्यांनी ज्यानी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली ती राष्ट्रे प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करू लागली हे लक्षात घेतले तर विज्ञानातील मुलभूत संशोधनाचे आणि शोधांचे महत्व लक्षात येते. म्हणूनच नारायण मूर्ती यांचा इशारा झोप उडवून देणारा आहे. गेल्या अनेक वर्षात आमच्याकडे मुलभूत संशोधन का झाले नसावे याचे उत्तर दुसरे एक शास्त्रज्ञ भारतरत्न सी एन आर राव यांनी आय आय टी , आय आय एम यासारख्या संस्थातील विद्यार्थ्यांसमोर केलेल्या काही भाषणातून मिळते. त्यांच्यामते आमच्याकडे शाळा-महाविद्यालयातून जे विज्ञान शिकविले जाते ते कालबाह्य आहे. आज आधुनिक प्रयोगशाळेत संशोधनाचे जे काम चालते त्यात या विज्ञानाचा काही उपयोग नाही. कालबाह्य विज्ञान आणि विज्ञान शिकविण्याची निरस, रटाळ पद्धती यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यात विद्नानाबद्दल अप्रिती निर्माण होत आहे. 

आज आम्ही विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो आहोत ते कालबाह्य झालेले आहे असा शास्त्रज्ञ इशारा देत असतानाच दुसरीकडे राज्यकर्ते प्राचीन काळातील विज्ञानाकडे बोट दाखवून आम्हाला आणखी मागे नेण्याच्या तयारीला लागले आहेत. खुद्द पंतप्रधानांनी गणेशाकडे बोट दाखवून प्राचीनकाळी माणसाच्या शरीरावर हत्तीचे मुंडके बसविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगून प्राचीनकाळच्या प्रगत तंत्रज्ञानाचे गोडवे गात भारद्वाजांचे काल्पनिक विमान उडविले होते ! यावर मुलभूत संशोधनात कार्यरथ टाटा विज्ञान संस्थेचे एक शास्त्रज्ञ मयंक वाहिया यांनी असे दावे गंभीर संशोधनाची खिल्ली उडविणारे असल्याचे सांगून बुद्धीप्रामाण्यवादांची पीछेहाट होणे विज्ञान विकासाला घातक असल्याचे प्रतिपादन केले आहे. विज्ञान आणि दंतकथा किंवा पुराणकथा यात फरक करण्याचा विवेक दाखविण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली . हा विवेक दाखविला नाही तर गतकाळात रममाण होवून आम्ही आमचे भविष्य अंध:कारमय करण्याच्या वळणावर आज देश उभा आहे. कलामांच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच संसदेत एका बिलाच्या संदर्भात जी चर्चा झाली ती बघता आम्ही विज्ञानाच्याही अंत्यसंस्काराची तर तयारी करीत नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 

'स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर' संबंधी बिलावर गेल्या आठवड्यात लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत शिक्षणात विज्ञानाची जागा धर्म घेवू लागल्याबद्दल काही सदस्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. एवढ्यात अशा गंभीर विषयावर गंभीरपणे संसदेत चर्चाच होत नाही ती या बिलाच्या निमित्ताने झाली. आजवर देशाचा मानबिंदू राहिलेल्या आय आय टी, आय आय एम किंवा विज्ञान संस्थेत बाबा-महाराजांचे येणेजाणे वाढल्यावर चिंता देखील व्यक्त झाली. अशा संस्थांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी शाकाहार सक्तीचा करणे असे आचरट प्रयत्न सरकारने सुरु केल्याबद्दल चिंताही व्यक्त झाली. पण सत्ताधाऱ्यांचा प्रतिसाद विज्ञानाचा पराभव करणारा होता. या चर्चेत सत्ताधारी पक्षातर्फे बोलताना हरिद्वारचे खासदार निशंक यांनी आपल्या देशात फलजोतिष शास्त्र जेवढे विकसित झाले आहे त्याच्या तुलनेत जगात विकसित झालेले विज्ञान अगदीच खुजे असल्याचे प्रतिपादन केले. फलज्योतिषशास्त्र विज्ञाना पेक्षा श्रेष्ठ असल्याच्या दाव्यावर सत्ताधारी पक्षाच्या वतीने बडविण्यात आलेली  बाके विज्ञानाची मृत्युघंटा तर नाही ना याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आमची वाटचाल कलामांनी सांगितलेल्या २०२० सालाकडे होणार की इसवीसना पूर्वीच्या शतकाकडे आणि सहस्त्रकाकडे आमची वाटचाल होणार आहे असा प्रश्न आजच्या परिस्थितीत पडल्या शिवाय राहात नाही.

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------- 

No comments:

Post a Comment