Wednesday, April 5, 2017

पहिल्या शेतकरी सत्याग्रहाची शताब्दी !

भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि शेतकऱ्यांची  लढाई  या दोहोंच्या दृष्टीने चंपारण सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्व आहे. चंपारण सत्याग्रहाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची दिशा आणि लढाईची पद्धत , लढाईचा आशय सूचित केला आणि नेतृत्व निश्चित केले तसेच शेतकरी आंदोलनाचा नवा मार्ग रूढ केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंपारणचा शेतकरी गुलामी विसरून ताठ मानेने उभा राहिला आणि इंग्रजांना मान तुकविण्यास भाग पाडले ही घटना शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी कायम प्रेरणादायक ठरणारी आहे.
------------------------------------------------------------------


इतिहासात शेतकऱ्याचे अनेक उठाव झालेत. शेतकऱ्याच्या लुटीवरच अनेक तख्त प्रस्थापित झालेत आणि उलटले देखील. लुटीसाठी लढाया झाल्यात . अपवाद वगळले तर लुटीची व्यवस्था म्हणजेच राज्य हा सिद्धांत प्रस्थापित झाला. अपवादात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांनी लढाया करून स्वराज्य स्थापिले. छत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्य हे अशा अपवादाचे ठळक उदाहरण. एरव्ही दोन राजांच्या लढाईत शेतकऱ्यांचे मरण ठरलेलेच असायचे. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची म्हणजेच मावळ्यांची जशी प्रमुख भूमिका राहिली तशीच प्रमुख भूमिका इंग्रजांविरुद्धच्या लढाईत, स्वराज्य स्थापनेत शेतकऱ्यांची राहिली आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील  स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवातच शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाने झाली. या सत्याग्रहाला पुढच्या आठवड्यात १०० वर्षे पूर्ण होत आहेत. बिहार मधील चंपारण जिल्ह्यात या सत्याग्रहाचा प्रारंभ १९१७ च्या एप्रिल महिन्यात झाला होता. चंपारणला जाण्यासाठी गांधीजी १० एप्रिल १९१७ रोजी पाटणा शहरात दाखल झाले होते . त्यामुळे बिहार सरकारने येत्या १० एप्रिल पासून चंपारण सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्यक्ष चंपारण मध्ये मोतीहारी रेल्वे स्टेशनवर गांधींचे आगमन १५ एप्रिल रोजी झाले आणि त्यावेळी फारसे परिचित नसलेल्या गांधींच्या स्वागतासाठी आशेने आणि उत्साहाने शेकडो शेतकरी जमले होते. हाच चंपारण सत्याग्रहाचा प्रारंभ समजला जातो . भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि शेतकऱ्यांची  लढाई  या दोहोंच्या दृष्टीने चंपारण सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्व आहे. चंपारण सत्याग्रहाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची दिशा आणि लढाईची पद्धत , लढाईचा आशय सूचित केला आणि नेतृत्व निश्चित केले तसेच शेतकरी आंदोलनाचा नवा मार्ग रूढ केला.

त्याकाळी चंपारण भागात शेतीमध्ये नीळ उत्पादनाची सक्ती करण्यात आली होती. वस्त्रोद्योगाचा  इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रारंभ आणि विस्तार झाला होता. त्या उद्योगासाठी डाय म्हणून नीळचा वापर होत असल्याने या उत्पादनाला इंग्लंड मध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती. इंग्रजांनी शेतकऱ्यांच्या शेतीत काही भाग या उत्पादनासाठी राखीव ठेवण्याची सक्ती केली होती. बिहारमध्ये २० कठा म्हणजे १ एकर जमीन असे माप होते. २० कठा जमिनी पैकी प्रत्येक शेतकऱ्याला ३ कठा सुपीक जमीन नीळ उत्पादनासाठी राखून ठेवावे लागत होते. या पद्धतीला तीनकठीया असे म्हणत. या तीनकठिया जमिनीचे अत्यल्प भाडे इंग्रज देत आणि सगळे नीळ उत्पादन घेऊन जात. नीळ उत्पादनाची किंमत देण्याऐवजी स्वत:च ठरविलेले जमिनीचे अत्यल्प भाडे दिले जायचे. नीळ उत्पादन घेतल्यावर दुसरे पीक त्या जमिनीत घेण्यास मनाई होती. त्यामुळे तीनकठाई प्रथा वेठबिगारीच ठरली होती. शेतकऱ्याने नीळ उत्पादन करण्यास नकार दिला तर त्याला मारहाण केली जाई .शिवाय त्याच्याकडून इंग्रज प्रशासन दंड वसूल करीत असे. तीनकठीया पद्धतीमुळे अन्नधान्य उत्पादन कमी होऊन शेतकरी परिवारावर उपासमारीची पाळी येई. त्यामुळे नीळ उत्पादन सक्तीचे करणाऱ्या तीनकठीया पद्धती विरुद्ध त्याभागात मोठ्याप्रमाणावर असंतोष खदखदत होता. काही गावात या प्रथे विरुद्ध शेतकऱ्यांनी बंड देखील केले. पण इंग्रज प्रशासनाने ते कठोरपणे मोडून काढले होते. अगदी चंपारण सत्याग्रहा आधी १९१४ ला एका गावात तर १९१६ साली दुसऱ्या गावात बंड झाले होते. पण यातून असंतोष तेवढा प्रकट झाला. निष्पत्ती मात्र शून्य होती. १९१६ साली लखनौ येथे काँग्रेसचे ३१ वे अधिवेशन झाले त्यावेळी त्याभागातील शेतकरी कार्यकर्त्याने गांधीजींच्या कानावर शेतकऱ्याची दैना घालून गांधींना त्याभागात येऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचे निमंत्रण दिले. त्याला प्रतिसाद देत गांधीजी चंपारणला गेले होते.
१०० वर्षांनंतरही चंपारणचा सत्याग्रह संदर्भहीन झाला नाही. ज्या दयनीय स्थितीत चंपारणचा शेतकरी  इंग्रजी अंमलात जगत होता, तशीच दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची स्वकीय राज्यकर्त्यांच्या अंमलात आजही आहे. उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी कच्चा माल स्वस्तात लुटून नेण्याची परंपरा स्वातंत्र्यानंतरही खंडीत झाली नाही हे त्याचे कारण. राज्यकर्ते बदलले म्हणण्या पेक्षा राज्यकर्त्यांच्या कातडीचा रंग तेव्हढा बदलला असे म्हणणे वास्तवाला धरून होईल. गोरे गेले काळे आले पण शेती आणि शेतकऱ्याविषयीचे धोरण तेच राहिल्याने तीच दयनीय परिस्थिती आजही कायम आहे. त्या दयनीय परिस्थितील शेतकऱ्याला गांधींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढायला कसे तयार केले हा संदर्भ आज तितकाच महत्वाचा आहे. त्याच सोबत तेव्हाच्या राज्यकर्त्यांचा चंपारणच्या सत्याग्रहाला कसा प्रतिसाद होता हे पाहीले की  स्वकीय राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेवर झगझगीत प्रकाश  पडतो. खरे तर ज्याचा पहिला सत्याग्रह म्हणून इतिहासात नोंद झाली आहे तो कसा झाला हे पाहणे देखील तितकेच उद्बोधक आहे. गांधींनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही स्वरूपाचा प्रतिकार केला नाही आणि तरीही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी तीनकठीया पद्धत इंग्रजांना रद्द करावी लागली. चंपारणला एकही मोर्चा निघाला नाही , उपोषण झाले नाही की शेतकरी देखील रस्त्यावर आले नाहीत आणि तरी या घटनेची पहिला सत्याग्रह म्हणून नोंद झाली हे विशेष ! गांधी शेतकऱ्यांकडे जात होते आणि शेतकऱ्यांच्या कैफियती ऐकत होते. शेतकरी गांधींकडे येत होते आणि आपबिती सांगत होते. या प्रक्रियेत इंग्रजांविषयी वाटणारी भीती नष्ट होऊन गेली  होती. इंग्रजांनी सुरुवातीला गांधींच्या हकालपट्टीचा प्रयत्न केला. गांधी तिथे पोचल्यावर त्यांना येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने चंपारण बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला. गांधींनी नकार दिला तेव्हा अटक करून त्यांना कोर्टापुढे उभे केले. जाणार असाल तर खटला रद्द करण्याचे आमिष इंग्रज न्यायधिशानी दाखविले. पण गांधीजी ठाम राहिले. शेतकऱ्यांनी कोर्टाबाहेर एवढी गर्दी केली की चळवळीच्या आशंकेनेच सरकारने आपला हद्दपारीचा आदेश मागे घेतला. गांधींनी चंपारण मध्ये लोकांना रस्त्यावर आणलेच नाही. उलट तिथल्या अल्प वास्तव्यात त्यांनी त्याभागात तीन शाळा सुरु केल्या. गांधींना लोकांचे मिळालेले समर्थन आणि साथ पाहूनच इंग्रजांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती नेमली आणि त्या समितीत गांधींना देखील घेतले. समितीच्या शिफारसीनुसार एक वर्षाच्या आत तीनकठीया पद्धत रद्द करून नीळ उत्पादनाची सक्ती मागे घेण्यात आली .
इंग्रजांना शेतकऱ्यांच्या विरोधात कारवाईचे निमित्त नको म्हणून हे आंदोलन निव्वळ चंपारणच्या शेतकऱ्यांच्या समस्ये पुरतेच मर्यादित ठेवले . राजकीय स्वातंत्र्यासाठी हे आंदोलन नाही याची स्पष्ट शब्दात लोकांना जाणीव करून दिली. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या समर्थनाचा ठराव तेवढा करावा अशी सूचना केली होती. परिणामी गांधींच्या चंपारण वास्तव्यात शेतकऱ्यांच्या समस्याच केंद्रस्थानी राहिल्या. इंग्रज राजवटी विरोधी आंदोलन असे स्वरूप आंदोलनाचे नसल्याने इंग्रज प्रशासन संभ्रमात पडले. समस्या सोडविल्या नाही तर मोठा उद्रेक होऊन इंग्रज राजवटी विरुद्ध असंतोष निर्माण होईल हे इंग्रजांच्या लक्षात आणून देण्या इतपत लोकांना आंदोलित करण्यात गांधींना यश आले. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्याकडे लक्ष दिले. स्वातंत्र्य संग्रामाशी चंपारणची समस्या न जोडण्याचे जाहीर करूनही परिणाम मात्र उलट झाला. शक्तिशाली इंग्रजांना लोकांना संघटित केले तरी झुकविता येते हा संदेश देशभर गेला. चंपारण मधील दरिद्री आणि दयनीय स्थितीत जगणाऱ्या शेतकऱ्यांपुढे इंग्रज झुकले या भावनेने स्वातंत्र्य संग्रामालाच नाही तर शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही बळ मिळाले. चंपारण मधील घडणाऱ्या घटनांपासून प्रेरणा घेऊन गुजरात मधील खेड जिल्ह्यात सरदार पटेल , नरहरी पारीख आदींनी शेतसारा वाढी विरुद्ध आवाज उठविला. पुढे बार्डोलीचा सत्याग्रह पण झाला. स्वातंत्र्य संग्राम शेतकऱ्यांच्या मुक्तीचाही संग्राम बनण्यात चंपारणच्या सत्याग्रहाची निर्णायक भूमिका राहिली. शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य संग्रामाला बळ दिले आणि स्वातंत्र्य संग्रामाने शेतकऱ्याला बळ दिले. पण स्वातंत्र्याची पहाट होत असतांनाच शेतकऱ्यांच्या पायात पुन्हा बेड्या पडल्या. स्वतंत्र भारतात शेती आणि शेतकऱ्यांविरुद्ध  कायदे करून या बेड्या घालण्यात आल्या. उष:काल होता होता काळरात्र झाली असे म्हणायची पाळी शेतकऱ्यांवर आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंपारणचा शेतकरी गुलामी विसरून ताठ मानेने उभा राहिला आणि इंग्रजांना मान तुकविण्यास भाग पाडले ही घटना शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी कायम प्रेरणादायक ठरणारी आहे. त्यासाठी बिहारमध्येच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पहिल्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्षात स्मरण करून शताब्दी साजरी केली पाहिजे.
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------   

1 comment:

  1. गांधी ने नीलहों के विरुद्ध लडा था। शताब्दी वर्ष में सरकार के नीतियों के विरूध्द संघर्ष करना होता

    ReplyDelete