आज भाजप हाच देशात एकमेव संघटीत आणि मजबूत असा पक्ष आहे. पक्षाकडे पैसाही प्रचंड आहे. पैसा आणि संघटन कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आहेच पण भारता सारख्या देशात निवडणूक जिंकण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते. ती म्हणजे उदारता आणि सर्वसमावेशकता. याचीच भाजपकडे कमी आहे आणि ही कमी भरून काढण्याची क्षमता अटलजीमध्ये होती. मरणोपरांत त्यांच्या या क्षमतेचा आणि प्रतिमेचा भाजपने वापर करणे अटळ आहे !
-------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
५०
वर्षापेक्षा अधिक काळ भारतातील संसदीय राजकारणावर आपली छाप टाकणारे माजी
प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या
मृत्युनंतर आलेल्या प्रतिक्रिया भारतीय राजकारणासाठी त्यांची प्रासंगिकता दर्शविते.
२००४ साली त्यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए च्या सार्वत्रिक निवडणुकीतील
पराभवानंतर वाजपेयीजी राजकीय मुख्यप्रवाहा पासून दूर फेकले गेले. पराभवानंतर सिमला
येथे विश्रांतीसाठी गेले असताना पराभवासाठी २००२ ची गुजरात दंगल आणि त्यावेळी
गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांचा राजीनामा न घेणे जबाबदार असल्याचे
त्यांनी प्रसृत केलेले निवेदन हे त्यांचे शेवटचे राजकीय वक्तव्य होते. प्रधानमंत्री
असतांना त्यांनी गुजरात दंगलीनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना
राजधर्म पाळण्याचा दिलेला सल्ला अजूनही चर्चेत आहे आणि हा सल्ला केवळ मोदीजी साठीच
नव्हे तर सर्वच राज्यकर्त्यांसाठी तितकाच लागू असल्याचे आज मानल्या जाते.
वाजपेयींचे वक्तव्य त्यांच्यात आणि मोदीजीत अंतर असल्याचे दर्शवीत असले तरी
मोदीजीनी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत पूर्ण वेळ पायी चालणे अटलजीची थोरवी
दर्शविणारे आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि पुढे स्मृतीच गेल्याने दशकापेक्षा
अधिक काळ सार्वजनिक जीवनापासून आणि कार्यापासून दूर असतानाही मृत्यूनंतर विरोधी
पक्षाच्या नेत्याकडून , कार्यकर्त्याकडून आणि सर्वसामान्य जनतेतून व्यक्त झालेल्या
त्यांच्या विषयीच्या भावना अटलजीचा प्रभाव स्वपक्षाच्या सीमा बाहेर तेवढाच
असल्याचा सिद्ध करणारे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वातावरणातून आणि
संस्कारातून पुढे आलेले वाजपेयी हे एकमेव नेते आहेत ज्यांचे गुणगान सर्व थरातून
झाले आहे. याचे एकमेव कारण त्यांच्या ठायी असलेली सर्वसमावेशक वृत्ती आणि उदारता.
आज आपला देश अशा कालखंडातून जात आहे ज्यात सर्वसमावेशकता आणि उदारता म्हणजे दुर्गुण
असे ठसविले जात आहे. अटलजीच्या मृत्यूनंतर त्यांच्यातील सर्वसमावेशकतेचा आणि
उदारतेचा जो गौरव झाला त्यामुळे तो दुर्गुण नसून समाज आणि देशाची ती अपरिहार्य गरज
असल्याचे नव्याने स्पष्ट झाले आहे.
अनेकांना
विशेषत: काही पुरोगामी मंडळीना आणि संस्थाना वाजपेयीजीचा चाललेला गुणगौरव हा
अनुचित , अनाठायी आणि असत्य वाटतो. दुसरीकडे काहीना विशेषत: भाजपायीना वाजपेयी
म्हणजे युगपुरुष वाटतात. किमान बोलतांना तरी ते तसे बोलतात. मोदीकाळात असे टोकाचे
मतभेद नवीन नाहीत. माणूस किंवा नेता एक तर चांगला असतो किंवा वाईट असतो अशा हवेने सध्याचे
वातावरण भरलेले आणि भारलेले आहे. अशा वातावरणात वाजपेयींबद्दल टोकाची मते व्यक्त
झाली तर नवल नाही. डावी असो की उजवी , पुरोगामी असो की प्रतिगामी कट्टरता वाईटच.
अशा कट्टरते मुळे व्यक्ती आणि परिस्थिती याचे नीट आकलन होत नाही. आज व्यक्त होणारी
मत-मतांतरे बघून वाजपेयींचे नीट आकलन न होण्याचा धोका आहे. एखाद्याची प्रतिमा
निर्मिती किंवा प्रतिमा भंजन सहज करता येण्या सारख्या परिस्थितीत वाजपेयींच्या
गुण-दोषाचे, कार्याचे आणि देशासाठीच्या त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन करणे सोपे
नाही. काही व्यक्तींचे मोठेपण समजण्यासाठी आणि सिद्ध होण्यासाठी तुलनेची गरज पडत
नाहीत. ते अतुलनीय असतात म्हणून मोठेही असतात. गांधी – आंबेडकर असे अतुलनीय नेते
होते. काहींचे मोठेपण आणि महत्व तुलनेने सिद्ध होते. वाजपेयीजी यात मोडतात. जनसंघ
आणि नंतर भाजप वाढला तो वाजपेयींच्या स्वीकारार्ह नेतृत्वामुळे. संघ संस्कारातून
पुढे आलेले वाजपेयी संघामुळे स्वीकारार्ह ठरले नाहीत. उलट वाजपेयीमुळे काही
प्रमाणात संघाची स्वीकारार्हता वाढली आहे. वाजपेयीजीनी संघापासून स्वत:ला दूर केले
नाही , पण संघाचा अजेंडा थोपविण्याचा प्रयत्नही केला नाही. संघापासून न तुटण्याची
विशेष काळजी त्यांनी घेतली असेही म्हणता येईल. भिवंडी दंगली नंतर ‘आता हिंदू मार
खाणार नाहीत’ हे म्हणणे त्यातलाच भाग. पण मुस्लीम द्वेषाचे पातक त्यांचेकडून घडले
याचे उदाहरण नाही. आणीबाणी विरुद्धच्या लढाईत आणि तुरुंगवासात सर्वोदयी आणि
समाजवाद्यांपेक्षा वाजपेयींच्या नेतृत्वाखालील जनसंघाचे जमाते इस्लामीशी अधिक सख्य
होते ! आणीबाणीतील १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या तिकिटावर उभ्या असलेल्या
जनसंघाच्या उमेदवारांना मुस्लिमांनी एकगठ्ठा मते दिली होती. संघपरिवाराचा
मुस्लीमद्वेष बऱ्यापैकी काबूत ठेवणारा नेता म्हणून वाजपेयींना गुण द्यावेच लागतील.
वाजपेयी
राजकारणी होते आणि त्यांचे राजकारण संघ-जनसंघ आणि पुढे भारतीय जनता पक्ष यांच्या
बळावरच चालले होते. ते मुत्सद्दी राजकारणी असल्याने आपल्या आधारावरच कुऱ्हाड
मारण्याचा समाजवादी वेडेपणा त्यांनी कधी केला नाही. संघ-जनसंघाला बरोबर घेत
बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जनता पक्ष फुटल्या नंतर पुन्हा जनसंघाकडे न वळता
गांधीवादी समाजवादाच्या पायावर भारतीय जनता पक्ष उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न
केला. गांधी आणि समाजवाद या संघपरिवाराला कधीच न पटणाऱ्या आणि न पचणाऱ्या गोष्टी
असल्याने वाजपेयी प्रयोगाचे अपयश ठरलेलेच होते. पण म्हणून त्यांच्या प्रयत्नाचे
मोल कमी होत नाही. याच प्रयत्नात पक्षाचे नेतृत्व अटलजी कडून अडवाणीकडे गेले.
अडवाणीनी संघ-जनसंघाच्या जुन्या फॉर्म्युल्यानूसार भाजप वाढविण्याचा प्रयत्न केला
आणि त्यात त्यांना मोठे यशही मिळाले. अडवाणींच्या रथयात्रे दरम्यान भाजपसाठी
वाजपेयी अप्रासंगिक ठरावेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रासंगिकता कायम
राखण्यासाठी कारसेवेचे समर्थन करण्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय नव्हता. त्यामुळे
बाबरी मस्जिद पाडण्याच्या एक दिवस आधी कारसेवेचे समर्थन आणि पाडल्यानंतर दुसरे
दिवशी घडलेल्या प्रकारा बद्दल दु:ख आणि खेद प्रकट करण्याची पाळी त्यांचेवर आली.
पक्षाला बदलण्याचा, नवे वळण देण्याचा, पार्टी विथ डिफरन्स बनविण्याचा त्यांनी
प्रयत्न केला पण पक्ष तसा बनला नाही म्हणून त्याचा त्याग केला नाही. याचेच फळ
त्यांना प्रधानमंत्रीपदाच्या रूपाने मिळाले. वाजपेयींच्या प्रयत्नाने जनसंघ जनता
पक्षाच्या रुपात सत्तेत पोचला. भारतीय जनता पक्षाला मात्र अडवाणीनी रथयात्रेद्वारे
सत्तेत पोचविले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बनविण्याची
पहिल्यांदा वेळ आली तेव्हा पक्षातील कार्यकर्त्याची, नेत्यांची , निवडून आलेल्या
खासदारांची अडवाणीच प्रधानमंत्री बनणार याची खात्री होती. अडवाणींनी मात्र सर्वाना
धक्का देत वाजपेयींचे नाव प्रधानमंत्री पदासाठी प्रस्तावित केले. अडवाणींनी हे मित्र
प्रेमाखातर केले नाही किंवा वाजपेयी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांचे
नाव पुढे केले नाही. रथयात्रेतून बाबरी मस्जिद पाडल्या गेल्याने अडवाणींची प्रतिमा
धार्मिक कट्टरपंथीय अशी बनली होती. अशा परिस्थितीत सर्वाना सोबत घेवून चालणारा
नेता म्हणून वाजपेयी शिवाय दुसरा पर्याय नव्हता. हेच वाजपेयींचे वेगळेपण आणि
वैशिष्ट्य होते. संघपरिवारात राहूनही आणि वेळोवेळी संघाचे समर्थन करूनही
सर्वसमावेशक वृत्ती आणि विरोधकांशी सौहार्द आणि सख्य असणारे एकमेव नेते वाजपेयी
होते. आता प्रसारमाध्यमांना हाताशी धरून कोणाला संत , कोणाला नायक किंवा खलनायक
बनविणे शक्य आहे तशा प्रयत्नातून वाजपेयींची प्रतिमा बनलेली नाही. त्यांनी
प्रदीर्घ काळ केलेल्या संसदीय राजकारणातून , वाणीतून आणि कृतीतून लौकिक प्राप्त
केला.
सत्तेत
असताना खूप काही बदल करता आले नाही तरी त्यांनी स्वत:चा आणि आपल्या सरकारच्या उदार
तोंडवळ्याचा लौकिक मात्र टिकविला. त्यांच्या आर्थिक धोरणाचा फटका गरिबांना आणि
शेतीक्षेत्राला बसला आणि त्यातून पराभव होवून सत्ता गेली पण धार्मिक आणि पंथिक अल्पसंख्यांक
त्यांच्या राजवटीत भयभीत आणि असुरक्षित
झालेत असे घडले नाही. गुजरात दंगलीने मात्र अस्वस्थता निर्माण केली आणि त्यानेच
आपला घात झाला असेही वाजपेयींना वाटत राहिले. मुळात वाजपेयींच्या हातात सत्ता
सत्तरी उलटल्यावर आली आणि पद देखील अडवाणीमुळे मिळाले. या दोन्ही गोष्टीचा परिणाम
सत्ता राबविताना झाल्याचे स्पष्ट दिसते. वाजपेयींची अवस्था मनमोहनसिंग पेक्षा फार
वेगळी नव्हती. मनमोहनसिंग यांना सत्ता सोनियाजीमुळे मिळाली. पक्षावर पकड
सोनियाजींची होती. या गोष्टीचा मनमोहनसिंग यांच्या निर्णयावर जसा परिणाम होत होता
तसेच वाजपेयींच्या बाबतीतही घडले. पक्षावर पकड अडवाणीजीची होती. अडवाणीजीचे तेव्हा
संघाशीही चांगलेच सख्य होते. त्यामुळे इच्छा असूनही मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा
राजीनामा त्यांना घेता आला नाही आणि मुशर्रफ सोबतच्या आग्रा शिखर परिषदेत
पाकिस्तानशी करायच्या करारा बाबतीत तोंडघशी
पाडण्याची पाळी आली. मनमोहनसिंग यांना आपल्या सहकाऱ्याच्या उचापत्याना जसा आळा
घालता आला नाही तसाच वाजपेयींना प्रमोद महाजना सारख्यांच्या उचापतीना आळा घालता आला
नाही. काही गोष्टी मात्र त्यांनी संघ , अडवाणी आणि पक्ष यांचा मुलाहिजा न ठेवता
केल्या आणि तेच त्यांचे वेगळेपण देखील ठरले. काश्मीर आणि पाकिस्तान बाबत भूमिका
घेताना त्यांनी कोणाला जुमानले नाही. जसे अमेरिकेशी अणुकरार करताना मनमोहनसिंग
यांनी कोणालाही न जुमानता सरकार पणाला लावले होते आणि सोनियाजी व कॉंग्रेस पक्षाला
करारा बाबतची आपली भूमिका मान्य करायला भाग पाडले होते तसेच काश्मीर आणि पाकिस्तान
बाबत भूमिका घेताना वाजपेयींनी संघाला आणि भारतीय जनता पक्षाला आपल्या मागे फरफटत
नेले. स्वातंत्र्यानंतर काश्मीरी जनतेला कोणत्या प्रधानमंत्र्याबद्दल आपुलकी आणि
विश्वास वाटला असेल तर ते एकमेव प्रधानमंत्री म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आहेत.
मोदीजी प्रधानमंत्री झाल्यावर पहिल्यांदा काश्मीरला गेले तेव्हा काश्मीर प्रश्न
सोडविण्याच्या अटलजीच्या प्रयत्नाचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या पाऊलावर पाउल टाकण्याचा संकल्प
सोडला होता. कारगिल घडून गेल्यावर पाकिस्तानशी भारतभूमीवर बोलणी आणि करार करण्याचा
प्रयत्न करण्याचे धाडस केवळ वाजपेयी करू
शकले. त्यावेळी संघ-भाजप वाजपेयींच्या पाठीशी उभा राहिला असता तर भारत-पाकिस्तानात
काश्मीर बाबत सहमती बनली असती आणि भारतीय लष्करावर आणि संसाधनावर पडत असलेला ताण
कमी झाला असता. संसदेवर दहशतवादी हल्ला, विमान अपहरण या सारख्या घटनांनी दोन
देशातील संबंध सुरळीत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात खंड पडला नाही. संघपरिवाराला
त्यांना पाकिस्तानशी करार करण्यापासून परावृत्त करता आले , पण शस्त्रसंधी
करण्यापासून रोखता आले नाही. अनेकदा भंग होवूनही वाजपेयींनी केलेला शस्त्रसंधी
करार अजूनही अस्तित्वात आहे.
२००४ च्या निवडणुकीत वाजपेयींच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाला नसता तर काश्मीर प्रश्न सुटला असता असे आजही मानल्या जाते. काश्मिरी लोकांशी सहानुभूती दाखविणारा आज देशद्रोही समजला जात असला तरी काश्मिरी जनतेशी आत्मीय संबंध निर्माण करणारे वाजपेयी यांचाच आधार भाजप आगामी निवडणुका जिंकण्यासाठी घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. मृत्यूनंतरही सत्तेत येण्यास वाजपेयीच आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतात असे आजच्या नेतृत्वाला का वाटते हे समजून घेतले तर वाजपेयींचे वेगळेपण लक्षात येईल. आज भाजप हाच देशात एकमेव संघटीत आणि मजबूत असा पक्ष आहे. पक्षाकडे पैसाही प्रचंड आहे. पैसा आणि संघटन कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आहेच पण भारता सारख्या देशात निवडणूक जिंकण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते. ती म्हणजे उदारता आणि सर्वसमावेशकता. २०१४ साली ‘सबका साथ सबका विकास’ घोषणा देत ती उदारता आपल्याकडे असल्याचे दाखवत मोदीजीनी निवडणूक जिंकली. पण सत्तेत आल्यावर उदारतेची आणि सर्वसमावेशकतेची यावी तशी प्रचीती आली नाही. भारतीय जनता पक्षाकडे उदारता आणि सर्वसमावेशकतेची असलेली कमी भरून काढण्यासाठी अटलजींचा उदारमतवादी आणि सर्वसमावेशक चेहरा पुढे करणे ही भारतीय जनता पक्षाची अनिवार्य अटलता बनली आहे. हेच तर अटलजींचे वेगळेपण आणि मोठेपण आहे !
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------
२००४ च्या निवडणुकीत वाजपेयींच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाला नसता तर काश्मीर प्रश्न सुटला असता असे आजही मानल्या जाते. काश्मिरी लोकांशी सहानुभूती दाखविणारा आज देशद्रोही समजला जात असला तरी काश्मिरी जनतेशी आत्मीय संबंध निर्माण करणारे वाजपेयी यांचाच आधार भाजप आगामी निवडणुका जिंकण्यासाठी घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. मृत्यूनंतरही सत्तेत येण्यास वाजपेयीच आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतात असे आजच्या नेतृत्वाला का वाटते हे समजून घेतले तर वाजपेयींचे वेगळेपण लक्षात येईल. आज भाजप हाच देशात एकमेव संघटीत आणि मजबूत असा पक्ष आहे. पक्षाकडे पैसाही प्रचंड आहे. पैसा आणि संघटन कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आहेच पण भारता सारख्या देशात निवडणूक जिंकण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते. ती म्हणजे उदारता आणि सर्वसमावेशकता. २०१४ साली ‘सबका साथ सबका विकास’ घोषणा देत ती उदारता आपल्याकडे असल्याचे दाखवत मोदीजीनी निवडणूक जिंकली. पण सत्तेत आल्यावर उदारतेची आणि सर्वसमावेशकतेची यावी तशी प्रचीती आली नाही. भारतीय जनता पक्षाकडे उदारता आणि सर्वसमावेशकतेची असलेली कमी भरून काढण्यासाठी अटलजींचा उदारमतवादी आणि सर्वसमावेशक चेहरा पुढे करणे ही भारतीय जनता पक्षाची अनिवार्य अटलता बनली आहे. हेच तर अटलजींचे वेगळेपण आणि मोठेपण आहे !
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment