Tuesday, September 24, 2019

शरद पवारांनी कात टाकली !

आजूबाजूचा भ्रष्ट गोतावळा दूर झाल्याने पवारांना जनतेशी सरळ संबंध स्थापण्यातील अडथळाही दूर झाला. विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा जनतेशी नाळ जोडण्याची संधी मिळाली. पवारांना आज मिळणारा प्रतिसाद जुन्या पवारांची आठवण करून देणारा आहे. 
----------------------------------------------------------------------------

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे पानिपत झाल्यानंतर देशभरातील अनेक राजकीय कार्यकर्ते आणि नेते याना आपल्या पक्षापेक्षाही स्वत:च्या अस्तित्वाची चिंता लागली. यापैकी अनेकांना आपले भवितव्य सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सुरक्षित राहील याची खात्री झाली. कमजोर झालेल्या विरोधी पक्षांना विशेषतः काँग्रेस सारख्या पक्षांना पुन्हा उभेच राहता येऊ नये यासाठी भाजपने पक्षांतरास प्रोत्साहन दिले. भाजपने पाहिजे असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी साम,दाम,दंड,भेद नीती वापरून आपल्याकडे येणे भाग पाडले. सीबीआय आणि ईडीचा वापर पाहिजे असलेले लोक आपल्याकडे खेचण्यासाठी उघडपणे केला. बंगाल, ओडिशा, कर्नाटक राज्यात अशी उदाहरणे एकापेक्षा अधिक आहे. नुकताच महाराष्ट्र राज्यातही याचा प्रयोग करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध महाराष्ट्रात प्रचाराची राळ उडवून देणाऱ्या राज ठाकरेंचा आवाज ईडीचा ससेमिरा मागे लावून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंद करण्याचा प्रयत्न झाला. ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राला ऐकू आला नाही  लक्षात घेण्यासारखे आहे.                   


विरोधी पक्ष आणि त्यांची २-४ राज्यात असलेली सरकारे टिकूच नाहीत यासाठी 'हनी ट्रॅप' (निवडून आलेल्या आमदारांना, मंत्र्यांना सेक्स रॅकेट मध्ये अडकविण्याचा प्रयत्न) लावण्यात आल्याचे मध्यप्रदेशात उघडकीस आले आहे. सत्ताधारी पक्षाने कोणत्याही थराला जाऊन कोणालाही आपल्यापक्षात सामील करण्याची जी रणनीती आखली आहे त्यात महाराष्ट्रात त्यांना चांगले यश लाभले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे जहाज बुडणार असे वातावरण निर्माण करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आल्याने बुडणाऱ्या जहाजातून उंदीर पटापट उद्या मारतात तसे राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्यात विरोधी पक्षांच्या जहाजातून सत्ताधारी पक्षाच्या जहाजात उड्या घेऊ लागले  आहेत. हे प्रमाण एवढे मोठे आहे की भाजपमधील निष्ठावंतांना आपल्या भवितव्याबद्दल चिंता वाटावी ! या उंदीरउड्यांमुळे विरोधी पक्षांचे जहाज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बुडणार याची खात्री वाटत असतांना एका जहाजावरील कप्तान जहाज बुडू न देण्याच्या जिद्दीने उभा राहिला आणि त्याच्या प्रयत्नांना लोकांची विशेषतः तरुण वर्गाची मिळत असलेली साथ बघता महाराष्ट्रातील निवडणूक सत्ताधारी पक्षाला एकतर्फी जिंकता येणार नाही आणि चुरशीच्या व चिवट विरोधाचा सामना करावा लागणार याचे संकेत निवडणुका  जाहीर झाल्यानंतर मिळू लागले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या विजयात अडथळा बनून शरद पवार घट्ट पाय रोवून उभे असल्याचे चित्र दिसू लागल्याने विरोधी तंबूत चैतन्याची झुळूक निर्माण झाली आहे.

सत्तेत असताना आणि नसतानाही महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार केंद्रित राहात आले आहे. राजकारणात आपले अस्तित्व टिकवायचे आणि वाढवायचे असेल तर शरद पवारांचे समर्थन किंवा शरद पवारांचा विरोध यापैकी काही तरी एक असणे ही महाराष्ट्राच्या राजकारणाची अपरिहार्यता बनून गेली होती. सत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडगोळीने शरद पवारांचा आधार घेतला होता आणि पुढे पवारांचा विरोध करूनच राजकारणात मोठे स्थान मिळविले होते. पण नंतरच्या काळात परिस्थिती बदलत गेली. शरद पवारांची जुनी प्रतिमा आणि अपरिहार्यता लयाला जाऊ लागली असतांना राखेतून उठून उभे राहावेत तसे उभे राहतांना पवार दिसू लागले आहे. पवारांचे पतन समजून घेतले तरच पवारांच्या पुन्हा उभे राहण्याचा अर्थ लक्षात येईल. 

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आणि त्यापूर्वीचे शरद पवार हे वेगळं रसायन होतं. त्यानंतर मुंडेंच्या बेफाम आरोपांचा कालखंड सुरु झाला. एनरॉन गाजले. विरोधकांनी पवारांवर आरोपाच्या फैरी सुरु केल्यावर शंकरराव चव्हाण सारख्या पक्षांतर्गत विरोधकांना पवारांचे प्रभुत्व संपविण्याची संधी चालून आली. त्यांच्या फुसीने शरद पवार समर्थक असलेले मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक पवारांवर उलटले. पवारांच्या केलेल्या घाताने पश्चात्तापदग्ध झालेले सुधाकरराव नाईक पवारांनी एनसीपीची स्थापना करताच काँग्रेसमधून एनसीपीत येणारे पहिले नेते होते. पक्षातूनच इंधन पुरविणे सुरु झाल्याने मुंडेंच्या आरोपांना जोर चढला आणि बळही मिळाले. तेलगी व लवासा प्रकरणी आरोप झालेत. आरोप खंडीभर आणि पुरावे गाडीभर असल्याचे खूप बोलले गेले . आरोप कोणताच सिद्ध झाला नाही किंवा आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करण्याचा काडीचाही प्रयत्न केला नाही. आरोपाने प्रतिमा मलीन व्हायची ती झालीच. पण पवारांचे खरे नुकसान झाले ते एनसीपीच्या स्थापनेने.                                         

देवाच्या आळंदीपासून सुरु झालेला शरद पवारांचा राजकीय प्रवास एनसीपीच्या स्थापनेने चोराच्या आळंदीत पोचला. पवारांच्या सर्वसमावेशक राजकारणाला मर्यादा आल्या. पक्षात मराठा जातीचे वर्चस्व निर्माण झाले. विचार आणि कार्यापेक्षा नातीगोती प्रभावी ठरली. काँग्रेस-एनसीपीच्या खातेवाटपात मलईदार खाती एनसीपीच्या वाट्याला आली. अर्थात हे खाते वाटप सेना-भाजप युती फॉर्म्युल्यानुसारच होते. पण भाजप सारखा सफाईदार हात न मारता आल्याने एनसीपीचे मंत्री उघडे पडून पक्ष आणि शरद पवार बदनाम झालेत आणि कारवाई न करण्याइतके अगतिकही. आता हा सगळा भ्रष्ट कंपू भाजपने आपल्याकडे खेचल्याने पवारांना नव्या पद्धतीने नवे राजकारण करण्याची संधी मिळाली आहे. आजूबाजूचा भ्रष्ट गोतावळा दूर झाल्याने पवारांचा  जनतेशी सरळ संबंध स्थापण्यातील अडथळाही दूर झाला. पवारांना आज मिळणारा प्रतिसाद -विशेषतः तरुण वर्गाचा प्रतिसाद जुन्या पवारांची आठवण करून देणारा आहे. पवारांनी कात टाकली आहे. विजय मिळेल न मिळेल पण पवारांचा नवा डाव विधानसभा निवडणुकीतील रंगत आणि चुरस वाढविणारा आहे.   
------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

1 comment:

  1. योग्य आकलन आणि विश्लेषण

    ReplyDelete