Thursday, June 25, 2020

चीनचा विस्तारवाद रोखण्यात अपयश


लडाख सीमेवर सगळे सुरळीत होते, कोणी घुसखोरी केली नाही की कुठली पोस्ट कोणी ताब्यात घेतली नाही तर मग भारतीय आणि चीनी सैनिकात भांडण कुठे आणि कशावरून झाले, आपले एवढे सैनिक शहीद आणि जखमी कसे झालेत या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.
----------------------------------------------------------------------------

लडाख मध्ये भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केल्याच्या वार्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून येत होत्या. भारतीय व चीनी सैनिकात त्यावेळी झटापट झाल्याने चीनच्या घुसखोरीला पुष्टीच मिळाली. अनेक सेवानिवृत्त सेनाधिकारी चीनच्या घुसखोरी बद्दल लिहित होते बोलत होते. लडाख सीमेवर नेमके काय चालले याबद्दल जनतेला विश्वासात घेवून सांगा असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सरकारला विचारत होते. पण विरोधी पक्षांना आणि विशेषत: राहुल गांधी यांना गंभीरपणे घ्यायचे नाही , ते काय विचारतात त्याच्या उत्तरात त्यांची टिंगलटवाळी करायची हे गेल्या ६ वर्षातील सत्ताधारी भाजप नेत्यांचे धोरण राहिले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लाखो समर्थकांची फौज सत्ताधारी पक्षाने उभी केली आहे. या फौजेचे एकच काम. सरकारला कोणी प्रश्न विचारले तर त्याला अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या घालायच्या , देशद्रोही ठरवायचे आणि त्याचे तोंड बंद करायचे. आपल्या इथले बहुतेक सर्व न्यूज चैनेल्स कोणत्याही मुद्द्यावर सरकारची री ओढण्याचे काम करीत असतील तरी देशातील काही वृत्तपत्रे दबक्या आवाजात का होईना सरकारच्या चुका दाखवून देण्याचे काम करतात. अशा वृत्तपत्रांमधून चीनच्या घुसखोरी बद्दलच्या वार्ता छापून येत होत्या. इंग्लंड-अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व मान्यतेच्या वृत्तपत्रांनी तर चीनने दोन देशातील नियंत्रण रेषा ओलांडून ८ ते १० मैल भारतीय हद्दीत घुसखोरी केली असून ५० ते ६० चौरस कि.मि. क्षेत्रावर कब्जा केल्याचे निदर्शनास आणून दिले होते.              

भारत सरकार कडून मात्र सीमेवर तणाव असला तरी चीनशी वाटाघाटी सुरु असून तणाव निवळत असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर १५-१६ जूनच्या रात्री भारत आणि चीन यांच्या सैनिका दरम्यान हाणामारी होवून काही भारतीय सैनिक शहीद झाल्याची वार्ता आल्याने साऱ्या देशाला धक्का बसला. आधी एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाल्याचे सांगण्यात आले. नंतर आणखी १७ सैनिक शहीद झाल्याचे सांगण्यात आले. नंतर ७० च्या वर सैनिक जखमी झाल्याची पुष्टी करण्यात आली. त्या नंतर चीनने आपल्या ताब्यात घेतलेले १० भारतीय सैनिकांना सोडल्याची वार्ता आली. दोन्ही सैन्यात झालेल्या हाणामारी बाबत जे लपविणे शक्य नाही तेवढेच सरकार कडून सांगितले गेल्याने नेमके काय घडले याबद्दल गूढ निर्माण झाले. हे गूढ उकलून सांगण्या ऐवजी आपणही कसे चीन सैनिकांना मारले , त्यांचे नुकसान केले हे सांगितले जावू लागले. दोन्हीकडच्या सैनिकात एवढी हाणामारी झाली तर त्यात चीनी सैनिकाची हानी होणार नाही असे होवूच शकत नव्हते. चीनने बऱ्याच उशिरा आपली थोडीफार हानी झाल्याचे मान्यही केले. चीनच्या झालेल्या हानी बद्दल आपल्याकडून जे दावे केले गेले ते १०० टक्के मान्य केले तरी आपली हानी तुलनेने बरीच जास्त झाली हे स्पष्ट झाल्याने सरकार अडचणीत आणि दबावात आले. मे च्या पहिल्या आठवड्यात चीनने लडाख मध्ये घुसखोरी केल्याची वार्ता आल्यापासून प्रधानमंत्री मोदी मौन बाळगून होते . घडलेल्या भीषण घटने नंतरही २४ तास पर्यंत ते मौनातच होते. या वरून सरकार किती अडचणीत व दबावात होते याची कल्पना येईल. या दबावामुळेच मोदी आणि त्यांचे सरकार ६ वर्षाच्या काळात पहिल्यांदा विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेवून घटने बद्दल माहिती देण्यास तयार झाले. या बैठकीत प्रधानमंत्री जे बोलले त्यातून ते विरोधी पक्षांना विश्वासात घेवून माहिती देण्या ऐवजी त्यांच्यापासून माहिती लपविण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांच्यावर आरोप झाला. या बैठकीतील मोदींचे वक्तव्य देशासाठी आणि त्यांच्यासाठीही आत्मघातकी ठरले.

एरव्ही छोट्याशा घटने संदर्भात सोशल मेडियावर पटकन प्रतिक्रिया देण्यास प्रसिद्ध असलेले प्रधानमंत्री मोदी आपले २० जवान शहीद झाले तरी २४ तास पर्यंत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मेडियावर आलेच नाहीत हा देशवासीयांसाठी पहिला धक्का होता. जेव्हा त्यांनी सोशल मेडियावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली तेव्हा सदर घटनेस पूर्णतः जबाबदार असलेल्या चीनचा धिक्कार करणे सोडा साधा नामोल्लेख देखील केला नाही हा देशवासीयांसाठी दुसरा धक्का होता. त्यांच्या आधी या घटनेवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह बोलले होते त्यांनी देखील चीनचा नामोल्लेख टाळला होता. बेताल बडबडीसाठी प्रसिद्ध असलेले अनेक भाजप नेते या घटनेवर एक तर तोंड शिवून बसले होते किंवा जे बोललेत त्यांनी देखील आपल्या ओठावर चीनचे नाव येणार नाही याची काळजी घेतली होती. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्याने देखील चीनचे नाव घेणे टाळणे लक्षवेधी ठरले. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते जे बोलले त्याचे सार प्रधानमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले. त्यात प्रधानमंत्री मोदी यांनी बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना भारतीय हद्दीत कोणी घुसखोरी केली नाही (इथेही चीनचे नाव घेणे टाळण्यात आले), सीमेवरील आपल्या कोणत्याही पोस्टवर कोणीही कब्जा केला नाही किंवा आपल्या भूभागावर कोणी कब्जा केला नाही असे सांगितल्याची माहिती देण्यात आली. हा समस्त देशवासियांसाठी तिसरा मोठा धक्का होता.

सीमेवर सगळे सुरळीत होते, कोणी घुसखोरी केली नाही की कुठली पोस्ट कोणी ताब्यात घेतली नाही तर मग भारतीय आणि चीनी सैनिकात भांडण कुठे आणि कशावरून झाले, आपले एवढे सैनिक शहीद आणि जखमी कसे झालेत या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. जी स्पष्टीकरणे पुढे येतात त्यातून समाधान होण्या ऐवजी प्रश्नच जास्त निर्माण होतात. सरकार काहीच स्पष्ट बोलत नाही पण नेहमी प्रमाणे सरकार समर्थक या मुद्द्यावर स्पष्टीकरण देवून सरकारचे आणि विशेषतः मोदी बोलले ते कसे खरे आहे हे सांगू लागले आहेत. मोदी समर्थकांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा कि, चीनी सैनिकांना धडा शिकविण्यासाठी आपले सैनिक चीनच्या हद्दीत गेले होते. पुढे ते असेही सांगतात कि आपले शे-सव्वाशे सैनिक चिन्यांच्या हद्दीत ३००-३५० सैनिकांशी भिडले. चीन्यांचे काय झाले माहित नाही पण आपल्या सैनिकांचे काय झाले याचा हिशेब आपल्या सरकारने व सेनादलाने दिला आहे. त्यानुसार आपले २० जवान शहीद झाले , ७० च्यावर जखमी झालेत आणि १० जणांना चीनी सैनिकांनी बंदी बनविले. आणि तरीही आम्ही चीनला धडा शिकविला , हा १९६२ चा भारत नाही , मोदींच्या नेतृत्वाखाली घरात घुसून मारणारा भारत आहे अशा गोष्टी बोलत आहोत. १९६२ चा भारत तर १९६७ सालीच बदलला होता. १९६७ साली नथू-ला खिंडी परिसरात चीनच्या घुसखोरीला उत्तर देताना भारतीय सेना दलाने ३५० च्यावर चीनी सैनिकांना कंठस्नान घालून चीनला त्याच्या हद्दीत परत पाठविले होते. तेव्हा १९६२ चा भारत आता नाहीच. पण तसे नसताना कोणाच्या चुकीमुळे आपले सैनिक शहीद झालेत हे जाणून घेण्याचा आपल्या सेनादलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भारतीय जनतेला जाणून घेण्याचा हक्क आहे.
--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com

  

1 comment:

  1. छान आणि वस्तुस्थिती दाखवणारा लेख.

    ReplyDelete