Wednesday, December 15, 2021

कॉंग्रेस ना पुढे जायला तयार ना मागे राहण्याची तयारी !

आम्हीच भाजप आणि मोदी विरोधात आहोत म्हणत उर बडवून घेण्याने काही फायदा होणार नाही. ममता किंवा शरद पवार नसतील मोदी आणि त्यांच्या सरकार विरुद्ध सातत्याने बोलत पण ते मोदी-शाह यांच्या नाकावर टिच्चून सरकार चालवितात याला कमी लेखण्याची चूक कॉंग्रेसने करू नये. अशा नेतृत्वाला हिणवण्या ऐवजी त्यांना आपलेसे करण्याची रणनीतीच सद्य परिस्थितीत कॉंग्रेसला तारू शकेल आणि सत्तेच्या जवळ नेवू शकेल.
------------------------------------------------------------------------


कोणीही लचका तोडावा आणि काँग्रेसीनी हालचालही करू नये या अवस्थेत कॉंग्रेस गेल्या ७ वर्षापासून आहे. भाजपने लचके तोडलेच. आता ममता बैनर्जी-च्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस लचके तोडत आहे. ममताजीनी बंगाल मध्ये मोदी-शाह या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या शक्तीशाली जोडीला धुळ चारल्या नंतर त्यांच्या महत्वकांक्षाना धुमारे फुटणे स्वाभाविकच आहे. असे धुमारे फुटण्यामागे केवळ मोदी-शाह यांना धूळ चारली हेच एकमेव कारण नाही. मी पहिल्या वाक्यात कॉंग्रेसचे जे वर्णन केले तेही तितकेच महत्वाचे कारण आहे. कॉंग्रेस हालचाल करतच नाही. ममताजी मुंबईत येवून गेल्या तेव्हा त्यांनी कॉंग्रेसला घायाळ करणारा एक प्रश्न विचारला . यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) अस्तित्वात आहे का ? खरे तर त्यांनी कॉंग्रेस अस्तित्वात आहे का असा प्रश्न विचारला असता तरी तो संयुक्तिक ठरला असता. देशभरातील कॉंग्रेसच्या आमदारांची आणि खासदारांची संख्या ममताजींच्या तृणमूलपेक्षा अधिक आहे हे वास्तव असले तरी त्यांच्या प्रश्नाचा संदर्भ केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देण्या संबंधी होता. एकाच प्रदेशातील शक्तीच्या बळावर ममताजीनी भाजपला जे आव्हान दिले ते देशभरच्या कॉंग्रेसला देता आले नाही हे विदारक वास्तव आहे. यूपीएतील घटक पक्षांना एकत्र ठेवणे आणि केंद्र सरकार विरुद्ध मोर्चा उघडणे हे काम कॉंग्रेसला जमले नाही म्हणण्यापेक्षा कॉंग्रेसने केलेच नाही. कागदावर यूपीए असेलही पण जमिनीवर त्याची सक्रियता दिसत नसल्याने ममताजीनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आणि औचित्यपूर्ण असाच आहे. बंगालच्या निवडणुकीच्या आधी भाजपने तृणमूल कॉंग्रेसचे कमी लचके तोडले नव्हते. ममताचे डावे-उजवे हात समजले जाणारे नेते भाजपने पळवले. निवडणूक आयोग भाजपच्या बाजूने होत्या. इडी आणि सीबीआय विशेष सक्रीय झाले होते. तरीही ममताजीनी लढाऊवृत्ती दाखवून भाजप आणि मोदींना चारीमुंड्या चीत केले.भाजप विरुद्ध अशी लढाऊ वृत्ती कॉंग्रेसने कधी दाखवली नाही. ममताजींच्या प्रश्नाचा अर्थ आणि खोच  या संदर्भात समजून घेतली पाहिजे. कॉंग्रेस नेतृत्वाने यावर जाहीर प्रतिक्रिया न देण्याचा समंजसपणा दाखविला असला तरी अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची उमटलेली प्रतिक्रिया कॉंग्रेसची ममताजी बद्दलची चडफड स्पष्ट करणारी आहे. ममता काय भाजपशी लढणार, त्यांनी भूतकाळात भाजपला साथ दिली होती हे कसे विसरता येईल असे म्हणत हे कार्यकर्ते ममताजीना खारीज करू पाहत आहेत.

देशात फक्त राहुल, प्रियांका आणि कॉंग्रेस पक्षच मोदी आणि भाजप विरुद्ध बोलत असतो आणि बाकीचे नेते मुग गिळून बसतात असे कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणत असतात. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच पण मर्यादित तथ्य. सकाळ संध्याकाळ राहुल गांधी मोदी-शाह आणि त्यांच्या सरकार विरुद्ध आक्रमक बोलत असतात, आक्रमक निवेदने काढत असतात हे खरेच आहे. पण हे सगळे प्रसिद्धीमाध्यमातून चाललेले असते. जनतेत जावून नाही. बहुतांश प्रसिद्धी माध्यमावर भाजपचा ताबा असताना त्यावर विसंबून न राहता जनतेत जावून बोलणे गरजेचे असताना कॉंग्रेस नेतृत्व मोदी आणि त्यांच्या सरकार विरुद्ध निवेदने प्रसिद्ध करून समाधानी असते. तुम्ही आहात भाजप व मोदीच्या विरुद्ध हे खरे आहे पण सरकार विरुद्ध लोकांना संघटीत व आंदोलित करणे गरजेचे असताना ते करणार नसाल तर तुमच्या विरोधाला अर्थ उरत नाही. अमित शाह यांनी साम दाम दंड भेद वापरून कॉंग्रेस मुख्य घटक असलेले कर्नाटकचे सरकार पाडले. कॉंग्रेस नेतृत्वाने त्या विरुद्ध कोणती पाउले उचलली ? फक्त तमाशा बघत राहिले ! ना सरकार वाचविण्यासाठी धावपळ केली ना फुटलेले आमदार पुन्हा निवडून येवू नये हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून मोर्चेबांधणी केली. ममताने फुटून निघालेल्यांना जो धडा शिकविला तसा धडा कॉंग्रेस नेतृत्वाला शिकविता आला नाही आणि परिणामी कर्नाटकची पुनरावृत्ती मध्यप्रदेशात झाली. किती कोटीत आमदार फुटलेत याचे आकडे जाहीर होतात आणि अशा विकाऊ आमदारांना पराभूत करण्यासाठी कोणते नियोजन नसते ना तशी जिद्द कुठे दिसते. मग मोदींच्या कागदी विरोधाला कितपत महत्व द्यायचे आणि त्याचा सरकार बदलण्यासाठी कितपत उपयोग होणार आहे या विषयी आत्मचिंतन करण्याची कॉंग्रेसला गरज आहे. आम्हीच भाजप आणि मोदी विरोधात आहोत म्हणत उर बडवून घेण्याने काही फायदा होणार नाही. ममता किंवा शरद पवार नसतील मोदी आणि त्यांच्या सरकार विरुद्ध सातत्याने बोलत पण ते मोदी-शाह यांच्या नाकावर टिच्चून सरकार चालवितात याला कमी लेखण्याची चूक कॉंग्रेसने करू नये. अशा नेतृत्वाला हिणवण्या ऐवजी त्यांना आपलेसे करण्याची रणनीतीच सद्य परिस्थितीत कॉंग्रेसला तारू शकेल आणि सत्तेच्या जवळ नेवू शकेल. त्यासाठी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर पडून जनतेत जावे लागेल. आलेली आत्मग्लानी आत्मगौरवातून जाणार नाही. पुन्हा एकदा जनतेशी नाळ जोडण्यासाठी नेतृत्वाला घराबाहेर पडण्या शिवाय पर्याय नाही.

मागच्या सत्तर वर्षात जनतेला सामना करावा लागला नसेल एवढ्या प्रश्नांचा सामना या सात वर्षात करावा लागत आहे पण त्यांचा आवाज जसा सरकारला ऐकू जात नाही तसाच कॉंग्रेसलाही ऐकू जात नाही. सरकारचे समर्थक सक्रीय असल्याने लोकांचा आवाज न ऐकण्याची चैन ते करू शकतात. कॉंग्रेसचे नेतृत्व आणि समर्थक सारखेच निष्क्रिय आणि बधीर असल्यामुळेच मोदी सरकार आणि त्यांच्या समर्थकांचे फावले आहे. भाजपला पर्याय ममताजी किंवा शरद पवार असू शकत नाही, कॉंग्रेस आणि राहुल गांधी किंवा प्रियांका गांधीच पर्याय असू शकतात हे लोकांना माहित आहे. दुसऱ्या नेत्यांना दुखवून कॉंग्रेसजनानी ते ओरडून सांगण्याची गरज नाही. प्रियांकाच्या सभांना मिळणारा प्रतिसाद किंवा राजस्थान मध्ये कॉंग्रेसच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पर्याय कोण हेच सांगणारा आहे. सात वर्षात कॉंग्रेसने घेतलेली ही पहिली रैली होती ! कॉंग्रेस नेतृत्व ज्या सभा घेत आले त्या निवडणुकी पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. त्यातही सरकार चालविण्याची जबाबदारी असणारे मोदी जेव्हा २५ सभा घेतात तेव्हा कुठलीच जबाबदारी नसलेले राहुल गांधी पाच सभा घेवून आपले कर्तव्य पार पाडल्याच्या समाधानात असतात ! पर्याय सतत जनतेत दिसला पाहिजे आणि रमला पाहिजे. एवढेच नाही तर जे नियोजन करून मोदी सत्तेत आले त्या तोडीचेच नियोजन त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी लागणार आहे. वर्षभर आधीपासून मोदी जवळपास रोज एक सभा घेत होते. राहुल गांधीनी दिल्लीत बसून ट्वीटर वर टीव टीव केल्याने सत्ता परिवर्तन होणार नाही. राहुल गांधीनी सोशल मेडीयाच्या कुबड्या फेकून देवून जनतेत आणि कार्यकर्त्यात सतत राहणे यातून सत्ता परिवर्तन होणार आहे. राहुल गांधीना हे जमणार नसेल तर त्यांनी सन्मानाने बाजूला होवून प्रियांका गांधीना पुढे केले पाहिजे. त्यांच्यामुळे कॉंग्रेस सत्ता परिवर्तनासाठी ना आघाडीला येत ना मागे राहण्याची तयारी दाखवत. ही स्थिती तातडीने बदलणे कॉंग्रेस आणि देशाच्या हिताचे आहे.
-------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८  

No comments:

Post a Comment