--------------------------------------------------------------------------------------
१९८३च्या जम्मू -काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी आधीच मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या मर्जीतून उतरले होते. विरोध सहन न करण्याची इंदिरा गांधींची मानसिकता जशी यासाठी कारणीभूत होती तसेच फारुख अब्दुल्लांचे अपरिपक्व राजकीय वर्तन कारणीभूत होते. जनसमर्थन नसतानाही काश्मीरच्या सत्तेत सहभागी होण्याची कॉंग्रेस नेत्यांची इच्छा फारुख अब्दुल्लाशी निवडणूक समझौता केला तरच पूर्ण होण्याची स्थिती होती. इंदिरा गांधीनाही काश्मीरच्या सत्तेत कॉंग्रेसचा सहभाग हवाच होता. कॉंग्रेसला सोबत घेवून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव त्यांनी फारुख अब्दुल्ला यांचे समोर ठेवला. आई बेगम अब्दुल्ला आणि इतर सहकाऱ्यांशी विचार विनिमय न करताच संयुक्तपणे निवडणूक लढण्यास हरकत नसल्याचे फारुख अब्दुल्लांनी इंदिरा गांधी यांना कळवूनही टाकले. संयुक्तपणे निवडणूक लढविण्याची अंतिम रूपरेखा व रणनीती तयार करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक इंदिरा गांधी यांच्या सूचनेनुसार नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. स्वत: इंदिरा गांधी बैठकीस हजर राहणार नव्हत्या. फारुख अब्दुल्ला यांनी बैठकीस येण्याचे मान्य केले होते व ते दिल्लीत पोचले पण बैठकीकडे फिरकलेच नाहीत. न फिरकण्याचे कारण होते त्यांच्या आईचा कॉंग्रस सोबत संयुक्तपणे निवडणूक लढविण्यास असलेला विरोध ! बापाला इतकी वर्षे तुरुंगात ठेवणाऱ्या पक्षाला सोबत घेवून तू निवडणूक कसा लढू शकतो असा त्यांचा सवाल होता. या प्रश्नाचे फारुख अब्दुल्लाकडे उत्तर नव्हते.
आई म्हणूनच नव्हे तर शेख अब्दुल्लांच्या राजकीय प्रवासात खंबीर साथ दिल्यामुळे लोकात व पक्षात त्यांच्याप्रती असलेला आदर लक्षात घेता बेगम अब्दुल्लांची इच्छा डावलणे पुत्र फारुख अब्दुल्लांसाठी शक्य नव्हते. अशावेळी दिल्लीत आयोजित बैठकीत उपस्थित राहून आपल्या पक्षाचा कॉंग्रेसला सोबत घेवून निवडणूक लढायला ठाम विरोध असल्याचे कॉंग्रेस नेत्यांना स्पष्टपणे सांगणे हा एक मार्ग फारुख अब्दुल्ला समोर होता. पण काहीही न कळवता बैठक स्थळी कॉंग्रेस नेत्यांना तिष्ठत ठेवण्याचा बालीशपणा फारुख अब्दुल्लांनी दाखविला. कॉंग्रेसच्या सत्ताकांक्षी काश्मिरी नेत्यांना फारुख अब्दुल्ला विषयी इंदिरा गांधींचे मत कलुषित करण्यास या घटनेने संधी दिली. या आधी मुख्यमंत्री बनल्यानंतर फारुख अब्दुल्लांचा श्रीनगर ते हैदराबाद असा झालेला राजकीय प्रवास इंदिरा गांधीना खटकला होताच.
आंध्र प्रदेशात एन.टी. रामाराव यांच्या तेलगु देशम पक्षाने तिथल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव करून मोठे यश मिळवत सत्ता हस्तगत केली होती. इंदिरा गांधींच्या साम्राज्याला हा मोठा हादरा होता. रामाराव आंध्रची सत्ता मिळवून थांबले नाहीत. त्यांनी इंदिरा गांधी व कॉंग्रेस पक्षाला देशव्यापी आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी बनविण्याचा प्रयत्न सुरु केला. १५ पक्षांच्या नेत्यांना त्यांनी आघाडी बनविण्यासाठी आमंत्रित केले होते. त्या मेळाव्यात फारुख अब्दुल्ला उत्साहाने सहभागी झाले होते ! फारुख अब्दुल्लांच्या प्रारंभीच्या राजकीय कारकिर्दीतील त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे अनेक किस्से आजही चर्चिले जातात पण परंपरेला छेद देणाऱ्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांची फारसी दखल घेतल्या जात नाही. स्वत:ला काश्मिरी नव्हे तर भारतीय समजून भारतीय राजकारणात रस दाखविणारे, भारतीय राजकारणाचा घटक समजणारे फारुख अब्दुल्ला हे पहिले काश्मिरी मुख्यमंत्री होते.
शेख अब्दुल्ला सह इतर कोणत्याही काश्मिरी मुख्यमंत्र्यांनी काश्मीर बाहेरच्या भारतीय राजकारणात रस घेतला नव्हता. त्यामुळे भारतीय राजकारणातील दैनदिन घडामोडीची दखलही काश्मीरची वृत्तपत्रे घेत नव्हती. काश्मीरबद्दल काश्मीर बाहेरची वृत्तपत्रे भरपूर बातम्या द्यायची पण ते वार्तांकन काश्मिरी जनतेची चुकीची प्रतिमा उभी करणारी असायची. १०-१५ तरुणांच्या टोळक्याने घडवून आणलेल्या चुकीच्या घटनेस संपूर्ण काश्मिरच जबाबदार असल्याचा भारतीय जनतेचा समज करून देणारी बहुतांश वार्तापत्रे असायची. काश्मीरमधील वृत्तपत्रांनी भारताच्या इतर भागातील घडामोडीची दखल न घेणे आणि काश्मीर बाहेरच्या मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांनी काश्मिरी जनतेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे यामुळे तांत्रिकदृष्ट्या काश्मीर भारतात सामील होवूनही काश्मिरी जनता व काश्मिरेतर भारतीय जनता कधी मनाने जवळ येवू शकली नाही. फारुख अब्दुल्ला यांनी मात्र आपल्या कृतीने काश्मिरी वृत्तपत्रांना भारतीय राजकारणातील घडामोडींची दखल घेण्यास भाग पाडले. हैदराबादच्या विरोधी पक्षांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाचे सामील होणे ही काश्मिरी वृत्तपत्रांसाठी हेडलाईन ठरली ! काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदिरा विरोधाचा सूर असलेल्या मेळाव्याची काश्मिरात झालेली प्रसिद्धी प्रधानमंत्री इंदिरा गांधीना रुचणारी नव्हतीच. त्यात कॉंग्रेससोबत संयुक्तपणे निवडणूक लढविण्यास फारुख अब्दुल्लांच्या नकाराने आणखीच डिवचल्या गेलेल्या इंदिरा गांधी १९८३च्या काश्मीर विधानसभा निवडणुकीत फारुख अब्दुल्लांना धडा शिकविण्याच्या निर्धारानेच प्रचारात उतरल्या !
इंदिरा गांधी सारख्या परिपक्व आणि तगड्या प्रचारकाचा सामना निवडणुकीच्या राजकारणासाठी अगदीच नवखा असलेल्या फारुख अब्दुल्लांना करावा लागणार होता. फारुख अब्दुल्ला यापूर्वी खासदार बनले होते पण त्यात त्यांचे कर्तृत्व काहीच नव्हते. शेख अब्दुल्लांच्या मनात आले आणि फारुख अब्दुल्ला खासदार बनले. यावेळी स्वत:च नाही तर पक्षाला जिंकून देण्याची जबाबदारी खांद्यावर येवून पडली होती. तगड्या प्रतिस्पर्ध्या समोर टिकण्यासाठी फारुख अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरंसचे काश्मिरातील परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या मीरवायज फारुखशी हातमिळवणी केली. त्यामुळे धार्मिकतेकडे झुकण्याचा व आतून पाकिस्तान समर्थक असलेल्या गटाशी फारुखने हातमिळवणी केल्याचा आरोप झाला. वास्तविक फारुख अब्दुल्लांना ना कोणत्या धर्माचे वावडे होते ना कोणत्या धर्माचे आकर्षण होते. जितक्या सहजपणे ते मस्जिद मध्ये चक्कर मारत तितक्याच सहजपणे मंदिरातही जावून येत. ज्याला धर्मच कळत नव्हता किंवा धर्म जाणून घेण्याचीही इच्छा नव्हती त्याच्यावर धर्मांधतेचा आरोप निवडणूक प्रचारात झाला. या आरोपांना भारतीय प्रसार माध्यामानीही मोठी प्रसिद्धी दिली. अर्थात निवडणूकित नीरक्षीर विवेकाला स्थान नसते. त्यामुळे दोन फारुख मध्ये असलेले अंतर समजून घेण्याची ती घडीही नव्हती व तसे करणे फारुख विरोधकांना सोयीचे व फायद्याचेही नव्हते. पण त्यामुळे फारुख्ची अंतर्बाह्य धर्मनिरपेक्षता दुर्लक्षिल्या गेली. मिरवायज फारुखशी युती ही फारुख अब्दुल्लांची राजकीय गरज होती. ही युती प्रभावीही ठरली. आज निवडणूक प्रचारात विकासासाठी 'डबल इंजिन'चा उल्लेख होतो त्याची सुरुवात या निवडणुकीत झाली होती. फारुख अब्दुल्ला आणि मीरवायज फारुख हे ते डबल इंजिन काश्मीर विधानसभा निवडणुकीत उतरले होते !
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment