Thursday, March 30, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ४९

 पंडीत समुदायाने काश्मीर घाटीतून  बाहेर पडण्याच्या घटनाक्रमात १९ जानेवारी १९९० हा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी राज्यपाल जगमोहन यांचे जम्मूत आगमन आणि स्वागत होत असतांना तिकडे काश्मीर घाटीत श्रीनगर मधील मस्जीदीतील भोंग्यावरून काश्मिरी पंडितांना धमकावण्यास सुरुवात झाली. भयभीत करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या. १९ तारखेला सुरु झालेला हा प्रकार लगेच थांबविण्यासाठी कारवाई झाली असती तर पंडितांच्या मनातील भीती कमी करता आली असती.
-----------------------------------------------------------------------------------


आपण बघितले की जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी जगमोहन यांच्या नियुक्ती नंतर लगेच घडलेल्या घटना होत्या मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा राजीनामा, सुरक्षा दलाने मुस्लीम वस्त्यांमध्ये श्रीनगर शहरात केलेली कारवाई, या कारवाईने एकाचवेळी भयभीत आणि संतप्त मुस्लीम समुदायाचे प्रतिकारासाठी रस्त्यावर येणे, चेकाळलेल्या दहशतवाद्यांनी मस्जीदीच्या भोंग्यावरून पंडीत समुदायाला काश्मीर मधून बाहेर पडण्यासाठी धमकावणे आणि पंडीत समुदाय भयभीत होईल अशा घोषणा सतत देणे , भयभीत पंडितांनी जीव मुठीत धरून बाहेर पडण्यासाठी धडपडणे .  जगमोहन राज्यपाल म्हणून येण्या आधीच्या महिनाभरात दहशतवाद्यांनी पंडितांनी काश्मीरच्या बाहेर पडावे असा विचार करण्यास बाध्य केले होतेच, जगमोहन यांच्या आगमना नंतर लगेच घडलेल्या घटनांनी बहुसंख्य पंडीत कुटुंबाचा काश्मीर घाटी सोडण्याचा निर्णय झाला . जगमोहन यांनी उकसावले म्हणून पंडीत बाहेर पडले असे घडले नाही. जगमोहन यांचे आगमन आणि पंडितांच्या काश्मीर बाहेर पडण्यास सुरुवात एकाचवेळी झाल्याने अनेकांनी यात जगमोहन यांचा हात असावा असा निष्कर्ष काढला. आणि जगमोहन यांच्या मनात असते तरी प्रशासन कोलमडलेले असल्याने त्या प्रशासनाच्या मदतीने ते पंडितांना बाहेर काढू शकत नव्हते. आहे तिथे पंडितांना सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न ते नक्कीच करू शकत होते. कारण काश्मीर घाटीतील प्रशासन कोलमडलेले असले आणि प्रशासनातील अनेक कर्मचारी दहशतवाड्याच्या बाजूने झाले असले तरी जगमोहन यांच्या हातात केंद्रीय सुरक्षा बल होते. या सुरक्षा बलाच्या मदतीने ग्रामीण भागात नाही तरी शहरी भागात व विशेषतः श्रीनगर शहरात पंडीत समुदायाला सुरक्षा प्रदान करण्याला जगमोहन यांचे प्रथम प्राधान्य असायला हवे होते. पण सुरक्षा दलाने जगमोहन यांच्या आगमनाच्या वेळी जी कारवाई केली त्या कारवाईने पंडीत समुदायाची सुरक्षा अधिक धोक्यात आली.

पंडीत समुदायाने काश्मीर घाटीतून  बाहेर पडण्याच्या घटनाक्रमात १९ जानेवारी १९९० हा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी राज्यपाल जगमोहन यांचे जम्मूत आगमन आणि स्वागत होत असतांना तिकडे काश्मीर घाटीत श्रीनगर मधील मस्जीदीतील भोंग्यावरून काश्मिरी पंडितांना धमकावण्यास सुरुवात झाली. भयभीत करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या. सर्व मस्जीदीमधून याच पद्धतीने पंडितांना भयभीत केले जात होते याचा अर्थच या मागे नियोजन होते. पद्धत ठरलेली होती. रात्रभर घोषणा आणि धमक्या द्यायच्या. रात्रीच्या भयाण अंधारात या घोषणा ऐकून पंडीत समुदायाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. १९ जानेवारी पासून सुरु झालेला हा प्रकार पुढे अनेक दिवस सुरु होता आणि हा श्रीनगर पॅटर्न नंतर इतर शहरातही पसरला. ज्या गोष्टीमुळे पंडीत समुदायाची झोप उडाली होती ते थांबविण्याचे मोठे आव्हान जगमोहन यांच्या नेतृत्वाखालील प्रशासना समोर होते. १९ तारखेला सुरु झालेला हा प्रकार लगेच थांबविण्यासाठी कारवाई झाली असती तर पंडितांच्या मनातील भीती कमी करता आली असती. परंतु त्या रात्री सुरक्षा दलाने मस्जीदिना घेरून भोंगे बंद पाडण्याची कारवाई करण्याऐवजी मुस्लीम वस्त्यात झडत्याचे आणि अटकेचे सत्र राबविले. सुरक्षा दलाच्या या कारवाईने संतप्त जनसमुदाय दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरला. मस्जीदीमधून देण्यात येणाऱ्या घोषणांच्या जोडीला संतप्त जमावाच्या आक्रमक घोषणांची भर पडली. पंडीत समुदायाच्या घरासमोरून जातांना तर घोषणाना विशेष जोर येत होता. हा जमाव रात्रभर शहरात फिरत होता. त्यांना अडविणारे कोणी नव्हते. प्रशासन, सरकार किंवा सुरक्षा दल आपल्याला वाचवू शकत नाही अशी भावना पंडीत समुदाया मध्ये निर्माण होवून अनेकांनी घाटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २१ जानेवारीला कर्फ्यू लावण्यात आला. कर्फ्युला न जुमानता लोक रस्त्यावर आले. शहरातील वेगवेगळ्या भागातून मोर्चे निघाले आणि ते गाऊ कदल येथे एकत्र आले. निमलष्करी दलांनी हे मोर्चे कुठेच अडवले नाहीत मात्र एकत्र आल्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांचा कमाल आकडा बराच मोठा सांगितला जात असला तरी किमान ३५ लोक मृत्यमुखी पडल्याचे मानले जाते.  यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. ना पंडितांना सुरक्षा मिळत होती ना चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात येत होती. श्रीनगर सारख्या शहरात पंडितांना सुरक्षा मिळत नसेल तर आपला वाली कोण अशी भावना काश्मीर घाटीत विखुरलेल्या पंडीत कुटुंबियांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक होते.       

मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल जगमोहन यांनी राज्यपाल राजवट लावली. त्यावेळी लागू असलेल्या काश्मीरच्या घटनेनुसार राज्य्पालाकडे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार होते. कोणत्याही निर्णयासाठी त्यांना केंद्र सरकारच्या संमतीची गरज नव्हती.  पंडीत कुटुंबाना घाटी बाहेर जावू देण्या ऐवजी श्रीनगर शहरात असलेल्या कँटोनमेंट एरियात किंवा या एरियाच्या जवळपास सेनादलाच्या संरक्षणात पंडीत कुटुंबाच्या छावण्या उभारल्या असत्या तर घाटीच्या बाहेर पडण्यापासून पंडितांना थांबविणे शक्य होते. पण. या दिशेने जगमोहन यांनी प्रयत्न केले नाहीत. जम्मूत मात्र पंडीत कुटुंबियांची राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. असा प्रयत्न त्यांनी श्रीनगर शहरात केला असता तर आपल्याच राज्यात आणि आपल्याच देशात निर्वासित म्हणून राहण्याची पंडीत समुदायावर आलेली वेळ टाळता आली असती. नंतर घाटीत प्रत्येक जिल्ह्यात पंडीत कुटुंबियांना सुरक्षित राहता येईल अशा छावण्या उभारण्यात आल्या पण त्याला उशीर झाला होता. त्यावेळी अनंतनागचे विभागीय आयुक्त असलेले वजाहत हबीबुल्लाह यांनी जगमोहन यांना पंडितांनी घर सोडू नये. त्यांना सर्वप्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात येईल असे दूरदर्शन वरून आश्वस्त करण्याची विनंती केली होती. जगमोहन दूरदर्शनवर आलेही पण त्यांनी वेगळाच संदेश दिला. ज्यांना घरी राहणे असुरक्षित वाटत असेल त्यांनी त्यांच्यासाठी बनविलेल्या निर्वासित छावण्यात येवून राहण्यास सांगितले. तिथे ज्यांना राहायचे नसेल ते जम्मूच्या निर्वासित छावण्यात जावून राहू शकतात.. सरकारी कर्मचारी जम्मूला गेले तर त्यांचा पगार चालू राहील असे त्यांनी आपल्या दूरदर्शन संदेशात सांगितले. हा संदेश काश्मिरी पंडितांना काश्मीर घाटीत राहण्या ऐवजी जम्मूला निघून जाण्यासाठी प्रोत्साहित करणारा होता. हे खरे आहे की १९९०च्या जानेवारी महिन्यात ज्या पंडितांनी घाटी सोडली ती भीतीपोटी स्वत:च्या निर्णयाने. नंतर मात्र जगमोहन यांनी पंडितांना घाटी सोडण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे दिसून येते. 
                                                (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment