Thursday, January 30, 2014

पराभवच कॉंग्रेसला बदलू शकेल !

दीर्घकाळ सत्ता उपभोगल्याने कॉंग्रेस पक्षाचे  नेते आणि कार्यकर्ते भोगवादी बनले आहेत किंवा भोगासाठीच पक्षात स्थिरावले आहेत. या लोकांना बदलवून त्यांना व्यवस्था बदलण्यासाठी तयार करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मोदींनी दिलेल्या आव्हानापेक्षा हे आव्हान मोठे आहे आणि ते पेलण्याचा राहुल गांधी प्रयत्न करीत असतील तर राहुल गांधीचे कौतुकच केले पाहिजे.
--------------------------------------------------------------


कॉंग्रेस पक्षात तोंडाची वाफ दवडणाराची  कमी नाही, कमी आहे ती ज्यांनी बोलायला पाहिजे ते बोलत नसल्याची. पक्ष आणि पक्षाच्या सरकारच्या नेतृत्वात न बोलण्याची स्पर्धा लागली आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. मनमोहनसिंग आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात तीनदा पत्रकारांशी बोलले. ज्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आगामी लोकसभा निवडणूक लढणार  आहे त्या  राहुल गांधीनी पहिल्यांदा प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. त्यामुळे ही मुलाखत म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ बाब म्हणून लक्षवेधी ठरली तर नवल वाटण्याचे कारण नाही. राजकारणात नेतृत्व प्रभावशाली आहे कि नाही हे मानण्याची एकमेव कसोटी निवडणूक जिंकून देण्याची क्षमता असते. या कसोटीला राहुल गांधी न उतरल्याने त्यांच्या नेतृत्व क्षमतेपुढे भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मुलाखतीवर टोकाच्या प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. विरोधकांना पोकळ तर समर्थकांना ही मुलाखत भरीव वाटली ती यामुळेच. तटस्थपणे या मुलाखतीकडे पाहिले तर राहुलच्या नेतृत्व क्षमतेबाबत जनमानसात का संभ्रम आहे याचा उलगडा या मुलाखतीतून होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक मोदी विरुद्ध राहुल  असा सामना पाहण्यास उत्सुक आहेत आणि मैदानात मात्र एकटे मोदीच दिसतात. त्यामुळे लोकांची निराशा होणे समजण्यासारखे आहे. ज्यांना मोदी विरुद्ध राहुल असा संघर्ष पाहायचा आहे त्यांच्यासाठी ही मुलाखत काहीशी निराशाजनक ठरणारी आहे. कारण या मुलाखतीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि राहुल गांधीचा खरा सामना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचेशी नसून कॉंग्रेस पक्षाशी आहे. विरोधी पक्षाला शिंगावर घेण्याऐवजी कॉंग्रेस पक्षाला बदलण्यावर त्यांचा भर अधिक आहे हे या मुलाखतीतून स्पष्ट होते. लोकांची आकांक्षा सत्ता बदलाची आहे आणि राहुल गांधीची आकांक्षा कॉंग्रेस मध्ये बदल घडवून आणण्याची आहे. कॉंग्रेस मध्ये काय बदल होतात , नाही होत याचे सर्वसामान्यांना देणेघेणे नसल्याने राहुल गांधीची नाळ लोकांशी जुळत नाही. लोकांना ज्या कारणासाठी सत्ताबदल हवा आहे नेमका त्याच कारणासाठी राहुल गांधीना कॉंग्रेस पक्षात बदल घडवून आणायचा आहे. कॉंग्रेस पक्षाचे आजचे स्वरूप लोकांच्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्याच्या आड येत आहे याची जाणीव राहुल गांधीना झाली आहे . कॉंग्रेसचे हे स्वरूप बदलल्याशिवाय कॉंग्रेसची गेलेली पत सावरली जाणार नाही किंवा निवडणुकीत यश लाभणार नाही याची जाणीव झाल्यानेच राहुल गांधीनी मोदी विरुद्ध दंड थोपटण्याची घाई केलेली नाही. मोदी विरुद्ध राहुल गांधी स्पर्धेत का दिसत नाही याचे जसे उत्तर या मुलाखतीतून मिळते तसेच कॉंग्रेसला सुधारण्यात राहुल गांधीना थोडे जरी यश आले तर त्यांच्यात मोदींचे प्रबळ प्रतिस्पर्धी बनण्याची क्षमता आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. राजकारणाकडे सत्ताकांक्षा पूर्ण करण्याचे हत्यार म्हणून पाहण्या ऐवजी बदलाचे हत्यार म्हणून पाहणारा प्रांजळ आणि विचार करणारा समजदार नेता या मुलाखतीत सतत डोकावत होता हे राजकीय विरोधकांना उघडपणे मान्य करणे सोयीचे नसले तरी तटस्थ विश्लेषकांना ते मान्य करायला अडचण जाणार नाही हा या मुलाखतीचा राहुल आणि कॉंग्रेसच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम मानला पाहिजे. पण एवढ्याने राहुल गांधींच्या किंवा कॉंग्रेसच्या पदरी निवडणूक यश पडेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल . उलट राहुल गांधीना सत्तेत येण्याच्या तिकडमी पेक्षा कॉंग्रेसला सुधारण्यात जास्त रस आहे हे समोर येणे कॉंग्रेसजणांसाठी निराशाजनक ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. राहुल गांधीना सत्तेत रस नाही , पंतप्रधान बनण्याची महत्वकांक्षा नाही असे मानणे त्यांचे उदात्तीकरण करण्यासारखे होईल. त्यांना पंतप्रधान बनण्याची घाई नाही हे मात्र म्हणता येईल. आजचे वातावरण पाहून असे म्हणता येईल कि कॉंग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता नसल्याने राहुल पंतप्रधान बनण्यास उत्सुक असल्याचे  दाखवीत नाही. आज यात तथ्य वाटत असले तरी राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास उतावीळ असते तर गेल्या दहा वर्षात मनमोहनसिंग यांना बाजूला सारून त्यांना कधीही पंतप्रधान होता आले असते हे कोणी नाकारू शकत नाही.
 

राहुल गांधींची मुलाखत घेणाराला वादग्रस्त मुद्द्यावर प्रश्न विचारून वादंग उभे करण्यात अधिक रस असला तरी राहुल गांधींचा प्रयत्न अधिक मुलभूत बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचा होता.  मुलाखतीतील दंगली संबंधी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांची जेवढी चर्चा होत आहे तेवढी दुसऱ्या प्रश्नासंबंधी होताना दिसत नाही. १९८४ च्या दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलीत कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याची कबुली देवून राहुल गांधीनी कॉंग्रेसची अडचण केली नाही तर गुजरात दंगलीत करून सवरून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी आणि संघ परिवार यांचा अप्रामाणिकपणा अधोरेखित करून मुत्सद्देगिरीत आपण कमी नसल्याचे दाखवून दिले. या मुलाखतीवर संघ परिवार चिडला तो राहुल गांधीच्या या हुशारीमुळे. राहुल गांधी गुजरात दंगली संबंधी त्याच त्याच गोष्टी उगाळत असल्याचा आरोप संघ परिवार करीत असला तरी तो विषय उगाळण्यात राहुल गांधीना अजिबात रस नव्हता हे ज्यांनी ती मुलाखत बघितली त्यांच्या नक्कीच लक्षात आले असेल. राहुल गांधींचा जोर वेगळ्याच मुद्द्यावर होता आणि भूतकाळापेक्षा भविष्यकाळाकडे होता.  राहुल गांधीनी आजच्या राजकीय ,आर्थिक , सामाजिक व्यवस्थेच्या दोषावर नेमके बोट ठेवले आहे. ही व्यवस्था बंदिस्त बनली आहे. या व्यवस्थेचे लाभ ज्यांना मिळत आहेत त्यांना बंदिस्त व्यवस्था खुली करायची नाही. ही व्यवस्था खुली केल्याशिवाय लोकांना न्याय आणि त्यांचे हक्क मिळणार नाहीत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. राजकारणात विशिष्ठ लोकांची मक्तेदारी निर्माण झाल्याने मोठा वर्ग सत्तेपासून वंचित राहिला. आम आदमी पार्टीचा उदय आणि यश हे या मक्तेदारीला तोडून राजकीय व्यवस्था सर्वसामन्यासाठी खुली करण्यात आलेले यश आहे हे लक्षात घेतले तर राहुल गांधी योग्य दिशेने विचार करीत असल्याचे दिसून येईल. सत्तेत दीर्घकाळ काँग्रेसपक्ष राहिल्याने हा पक्ष बंदिस्त बनला . यात युवकांना , महिलांना आणि सर्वसामान्यांना शिरून स्थान मिळणे अशक्य झाल्याची जाणीव राहुल गांधीना झाली आहे. बंदिस्त व्यवस्था तोडण्याची सुरुवात ते कॉंग्रेस पासून करणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. पक्षातील घराणेशाही हा या बंदिस्त व्यवस्थेचा परिणाम आणि परिपाक आहे ही त्यांची कबुली प्रांजळ म्हंटली पाहिजे. घराणेशाही दूर करण्यासाठी त्यांनी अंमलात आणायचा ठरविलेला उपाय देखील अचूक आहे. उमेदवार कोण असावा हे पक्षश्रेष्ठींनी नाही तर जनतेने ठरवावा आणि असे झाले तर घराणेशाहीचा अंत व्हायला वेळ लागणार नाही हा त्यांचा दावा बरोबर आहे. घराणेशाहीच्या अंताच्या दिशेने जाण्यास सुरुवात म्हणून त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत १५ जगाचे उमेदवार निश्चित करताना त्या क्षेत्रातील पक्ष सभासदांचे मत अंतिम राहील अशी घोषणा त्यांनी केली आहे. १५ हा आकडा फारच छोटा असल्याने त्याची व्हावी तशी चर्चा झाली नाही. लोकसभेच्या एकूण मतदार संघापैकी  १० टक्के मतदार संघात अशा पद्धतीने उमेदवार निवडण्याची तयारी दाखविली असती तर कॉंग्रेसच्या बदलाचा तो प्रारंभ ठरला असता. युवकांना , महिलांना सत्तेत स्थान देणे , निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे ही बंदिस्त व्यवस्था खुली करण्याचा मार्ग आहे. जसे ते १५ मतदार संघ लोकनिवडीवर सोडले तसेच युवक आणि महिलांसाठी किती मतदारसंघ सोडणार हे देखील सांगितले असते तर पक्षांतर्गत बदल होत आहेत हे पक्ष कार्यकर्त्यांना व लोकांना दिसले असते. निवडणुकीत कोण कोणा विरुद्ध लढणार या पेक्षा बंदिस्त व्यवस्था खुली करण्यासाठी कोण काय करतो याची चर्चा होणे महत्वाचे आहे आणि त्यावर मला प्रश्न विचारा असे प्रश्नकर्त्यांना सांगणे यातून राहुल गांधीनी आपला प्राधान्यक्रम स्पष्ट करून प्रगल्भता दाखविली आहे.
या मुलाखती बाबत कोणाचे कितीही भिन्न मते असली तरी आजच्या स्वरूपातील कॉंग्रेस सत्तेत परतू शकत नाही , सत्तेत परतण्यासाठी  पक्षात बदल अपरिहार्य आहे याची जाणीव असणे हे जमिनीवर पाय असण्याचे आणि विचारीपणाचे लक्षण आहे एवढे गुण राहुलला नक्कीच देता येतील. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रसमध्ये बदल घडवून आणण्याचा राहुल गांधी प्रयत्न करीत असल्याचे या मुलाखतीतून समोर आले. असे काही प्रयत्न सुरु आहेत हे आजतागायत सर्वसामन्यांच्या सोडा माध्यमांच्या किंवा राजकीय वर्तुळात सतत वावरणाऱ्या मंडळींच्या लक्षात येवू नये याचा अर्थच राहुल गांधीचे प्रयत्न तोकडे पडत आहेत , परिणामकारक ठरत नाहीत असाच होतो. दीर्घकाळ सत्ता उपभोगल्याने पक्ष नेते आणि कार्यकर्ते भोगवादी बनले आहेत किंवा भोगासाठीच पक्षात स्थिरावले आहेत. या लोकांना बदलवून त्यांना व्यवस्था बदलण्यासाठी तयार करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मोदींनी दिलेल्या आव्हानापेक्षा हे आव्हान मोठे आहे आणि ते पेलण्याचा राहुल गांधी प्रयत्न करीत असतील तर राहुल गांधीचे कौतुकच केले पाहिजे. त्याच सोबत हे देखील मान्य केले पाहिजे कि बदलाच्या दिशेने पक्षाला चार पावले देखील पुढे नेण्यात राहुल गांधीना यश आले नसल्याने ते काम त्यांच्या क्षमतेच्या पलीकडचे आहे. त्यांच्या प्रयत्नाला लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या पराभवाची जोड आवश्यक आहे. सत्तेची चरबी चढलेले काँग्रेसजन राहुल गांधीच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाहीत हे सिद्ध झाले आहे. सत्ता आणि संपत्तीच्या लोभात काँग्रेसजन कॉंग्रेस  विचार आणि मार्गावरून ढळले आहे. तसेही काँग्रेसजनांवर पक्षातील नेतृत्वापेक्षा सत्तेतील नेतृत्वाचाच अधिक प्रभाव राहात आला आहे. नेमके गेल्या दहा वर्षात सत्तेतील नेतृत्व कमालीचे दुबळे राहिल्याने काँग्रेसजनांना आपापल्या सोयीने आणि स्वार्थाने वागण्याचा मुक्त परवाना मिळाला. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष न राहता लुटारूंची टोळी बनली. लुटारूंची टोळी नेस्तनाबूत करून खऱ्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष उभा करायचा असेल तर या पक्षाला पराभवाचे कडू औषध पिणे जरुरीचे आहे. या पराभवानंतरच पक्षात कॉंग्रेसची धर्मनिरपेक्ष व सर्वसमावेशक  विचारसरणी मानणारे लोक प्रामुख्याने उरतील . राहुल गांधीना जे बदल कॉंग्रेसमध्ये घडवून आणायचे आहेत त्यासाठी पराभवा नंतरची कॉंग्रेस अधिक उपयुक्त ठरणार आहे. मात्र अशा पराभवाला सामोरे जात असताना कट्टर धार्मिकता जोपासणाऱ्या शक्तीच्या हाती निरंकुश सत्ता जाणार नाही याची काळजी राहुल गांधीना घ्यावी लागणार आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाच्या मदतीशिवाय केंद्रात कोणीही सत्तेवर येणार नाही हेच राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे प्रमुख उद्दिष्ट राहिले पाहिजे. राहुल गांधींच्या मुलाखतीतून त्यांची शालीनता आणि प्रगल्भता प्रकट झाली आहे पण त्याला आक्रमकतेची जोड देणे गरजेचे आहे. आक्रमकता नसेल तर शालीनता व प्रगल्भता नेभळटपणाच्या रुपात समोर येते. अशा नेभळटपणाचा बळी त्यांचे सरकार ठरले आहे. आता पक्षाचाही तसा बळी जावू द्यायचा नसेल तर राहुल गांधीना आक्रमकतेची कास पकडावी लागेल.

          (संपूर्ण)

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment