Thursday, April 24, 2014

जातीअंताच्या लढाईला खापची कुमक

आंतरजातीय विवाहाशिवाय जातीअंत होणार नाही हे आंबेडकरांनी फार पूर्वीच आमच्या लक्षात आणून दिले होते. आंतरजातीय विवाहातच हजेरी लावण्याचा गांधींचा निर्णय याच साठी होता. गांधी-आंबेडकरा नंतर जातीअंताचे प्रयोग आणि प्रयत्न थांबले होते. देशात जातीअंताची थांबलेली लढाई जाती साठी आजवर माती खात आलेल्या खाप पंचायतीने सुरु करून दिली आहे.
--------------------------------------------------------


निवडणुकीमध्ये मतांचे गणित जुळविण्यासाठी समाजामध्ये फाटाफूट आणि भेदाभेद पसरविण्याचे काम करण्यात सर्वच राजकीय पक्ष गुंतले असताना समाजातील जातीभेद मिटविण्याच्या दिशेने  पाउल टाकण्याचा जाटबहुल क्षेत्रातील सर्वात मोठ्या खाप पंचायतीने ऐतिहासिक निर्णय घोषित केला आहे.  सरंजामी व्यवस्थेचा प्रचंड पगडा असलेल्या खाप पंचायतीनी आपापल्या पंचायत क्षेत्रात लादलेल्या अनेक बंधनातून समाजाला मुक्त करण्याचा निर्णय स्वयंप्रेरणेने घेतला आहे. स्त्रियांवर आणि मुलींवर बंधने लादण्यासाठी आणि प्रेमविवाह केलेल्या मुलामुलींना  देशाच्या घटनेची व कायद्याची तमा न बाळगता अत्यंत क्रूरतेने ठार करायला  संबंधित कुटुंबियांना भाग पाडण्यासाठी खाप पंचायती कुप्रसिद्ध आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून आणि घटनेचा अंमल सुरु होवून कित्येक वर्षे लोटली तरी या क्षेत्रात खाप पंचायतीचे पुराणमतवादी नियम-कायदे चालूच राहिले. स्वातंत्र्याचा प्रकाश आणि स्वातंत्र्याचे वारे आपल्या भागात शिरून आपले वर्चस्व मोडीत निघणार नाही याची काळजी खाप पंचायतीनी आजवर यशस्वीपणे घेतली होती. खाप पंचायतीच्या असंवैधानिक आणि बेकायदेशीर कृत्या विरुद्ध आजवर अनेक न्यायालयीन निर्णय झालेत , अनेकांना शिक्षाही झाल्यात . खापच्या वर्चस्वावर याचा परिणाम झाला नव्हता. कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा राजकीय नेत्यांची खाप विरुद्ध बोलण्याची , कृती करण्याची हिम्मत न होण्या इतक्या खाप पंचायती शक्तिशाली आहेत. खाप विरुद्ध लढणे सोडा बोलण्याची हिम्मत राजकीय नेतृत्वाला दाखविता आली नाही. राजकीय पक्ष मतांवर डोळा ठेवून नेहमीच खापची भलावण करीत आले आहेत. काही स्वयंसेवी संस्था , व्यक्ती आणि माध्यमे खाप पंचायतीच्या स्वातंत्र्य विरोधी वर्तनावर टीका करीत आलेत . अशा टीकेचा खापने आपल्यावर परिणाम होवू दिला नव्हता. उलट बंधने सैल करण्या ऐवजी नवनवी बंधने लादण्यावर खाप पंचायतीचा जोर होता. मुलीनी मोबाईल वापरू नये , एकटीने बाहेर फिरू नये या सारखी नवनवी बंधने खाप पंचायतीनी लादली होती. तरुण-तरुणींनी प्रेम विवाह करू नयेत , जाती बाहेर तर मुळीच विवाह करू नयेत यासाठीच खाप पंचायतीचा जन्म तर झाला नसावा ना असे वाटण्या इतपत या पंचायतीची विवाहां संदर्भात लुडबुड राहात आली आहे.खाप पंचायतीची दादागिरी संपली पाहिजे अशी भावना व्यक्त होत असली तरी बदल व्हावेत म्हणून सरकारच्या किंवा समाजाच्या पातळीवर कोणतेही संघटीत प्रयत्न सुरु नव्हते. खाप विरुद्ध कोणी चळवळ उभारली नव्हती. बदलासाठी कोणतेही राजकीय दडपण नव्हते. तरीही खाप पंचायतीने महत्वाची बंधने सैल करण्याचा स्वयंस्फुर्त निर्णय घेतला. खाप पंचायतीना उपरती कशामुळे झाली असा प्रश्न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे.

 हरियाणा सारख्या जाटबहुल प्रदेशातील सर्वात मोठ्या खाप पंचायतीने ७०० पेक्षा अधिक वर्षापासून सुरु असलेल्या परंपरांना तिलांजली देण्याचा निर्णय घेताना विरोध झालाच. पण तो विरोध बाजूला सारत मुलामुलीना प्रेमविवाह करण्याचीच नाही तर आंतरजातीय विवाह करण्याची देखील मुभा दिली आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी बाह्य दडपण नसले तरी परिस्थितीचे दडपण नक्कीच होते. हरियाणात मुला-मुलींचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक व्यस्त आहे. परंपरागत बंधनामुळे लग्न जमण्यात अधिक अडचण आणि अडथळे येत होते. त्यामुळेच मुलामुलींना आपल्या मर्जीने कोठेही व कोणत्याही जातीतल्या मुलामुलीशी विवाह करायला परवानगी देणे भाग पडले. परिस्थितीचा रेटा या निर्णयामागे असला तरी त्याचे व्हायचे ते दूरगामी परिणाम होणारच आहेत. निर्णयाचे सारे श्रेय परिस्थितीला देवूनही चालणार नाही. कारण कमी अधिक प्रमाणात अशी परिस्थिती पूर्वीही होती. त्यामुळे जनतेच्या आणि पंचायत प्रमुखांच्या इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेलाही याचे श्रेय जातेच. पण घटनेने जे अधिकार या देशातील नागरिकांना दिलेत ते मिळायला या क्षेत्रातील मुलामुलींना ६० वर्षे लागलीत , त्यांना मरणयातना सहन कराव्या लागल्या हे आमचे फार मोठे सामाजिक आणि राजकीय अपयश आहे. गांधी आंबेडकरा नंतर सामाजिक चळवळीचा जोर ओसरला , राजकीय नेतृत्वाचे सामाजिक भान हरपत गेले आणि त्यामुळे खाप प्रवृत्तीला बळ मिळत गेले. शेकडो निष्पाप तरुण मुलामुलीच्या सांडलेल्या रक्तास खाप पंचायती जितक्या जबाबदार तितक्याच सामाजिक आणि स्त्रीवादी चळवळी जबाबदार आहेत. खापच्या अन्यायाला आणि अत्याचाराला बळी पडणाऱ्यासाठी एकही मेणबत्ती पेटवली गेली नाही हे पुरोगामी चळवळीचे नाकर्तेपण साबित करण्यासाठी पुरेसे आहे. देशात जातीअंताची थांबलेली लढाई जाती साठी आजवर माती खात आलेल्या खाप पंचायतीने सुरु करून दिली आहे. आंतरजातीय विवाहाशिवाय जातीअंत होणार नाही हे आंबेडकरांनी फार पूर्वीच आमच्या लक्षात आणून दिले होते. आंतरजातीय विवाहातच हजेरी लावण्याचा गांधींचा निर्णय याच साठी होता. जातीअंताचे प्रयोग आणि प्रयत्न थांबल्यानेच संस्कृती ,परंपरा याच्या नावावर खापची मनमानी चालू राहिली. परिस्थितीच्या रेट्याने खाप पंचायातीना बदलायला भाग पाडले नसते तर चुकीच्या गोष्टी आणखी कितीकाळ चालू राहिल्या असत्या याचा अंदाज बांधणे कठीण होते.

मुलामुलींच्या - विशेषत: मुलींच्या - स्वातंत्र्याचा प्रश्न खाप पंचायती असलेल्या क्षेत्रापुरत्या किंवा जाट बहुल प्रदेशांपुरता मर्यादित नाही. खाप पंचायत सामाजिक पातळीवर संघटीतपणे मुस्कटदाबीचा प्रयत्न करतात म्हणून त्यांची कृती चर्चेचा आणि बातमीचा विषय बनते. पण देशात घरोघरी स्त्री स्वातंत्र्याचे वैरी आहेत. बहुतांश घरातून प्रेम विवाहाला आणि आंतरजातीय विवाहाला विरोध होतो. मुलीनी आणि स्त्रियांनी काय केले पाहिजे म्हणण्या पेक्षा काय करू नये , कोणत्या वाटेला जावू नये या बद्दलच्या खाप पंचायतीच्या ज्या धारणा आहेत तशाच धारणाचा  कमी अधिक प्रमाणात देशभरातील पुरुष जातीवर पगडा आहे.  या अर्थाने आपला देश हीच  सर्वात मोठी खाप पंचायत ठरते. म्हणूनच तर स्त्रीला पूजनीय मानण्याचा दंभ बाळगणारा हा देश स्त्रियांना राहण्यासाठी नरक असल्याचे जगभर मानल्या जात असल्याचे संपन्न अशा जी - २० देशांमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे .  खाप पंचायतीचे नाव आणि तिचा प्रताप ज्यांच्या कानीही पडला नसेल अशा घरा-घरातून मुलींवर आणि स्त्रियांवर खाप पंचायती सारखेच निर्बंध लादल्या जातात. तुमच्या आमच्या घरात आणि सभोवताली हे घडत असते. मुलगी खाप पंचायतीच्या प्रभाव क्षेत्राच्या हजारो मैल दुर असली तरी अशा बंधनातून तिची सुटका नसते. या प्रश्नावर देशव्यापी विचार करण्याची आणि कार्यक्रम हाती घेण्याची संधी हरियाणामधील सर्वात मोठ्या खाप पंचायतीच्या निर्णयाने उपलब्ध झाली आहे.  हरियाणातील सतरोल खापच्या महापंचायतीत प्रेमविवाह आणि आंतरजातीय विवाहास मान्यता देण्याचा जो निर्णय झाला तसाच निर्णय देशभरातील सर्व खाप आणि जात पंचायतीने घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर अशा निर्णयासाठी दबाव आणण्याची गरज आहे. जगात सर्वात जास्त संख्येत तरुणवर्ग भारतात आहे. त्यांच्यासाठी हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कुटुंब, समाज विरोध करतो म्हणून पळून जावून मुले मुली लग्न करतात आणि मग वेगळ्याच संकटात सापडतात.तरुणांच्या रोजगारासाठी जसा प्रयत्न करण्याची गरज सर्वमान्य आहे ,तसेच आपल्या मर्जीने त्यांना विवाह करता आला पाहिजे आणि जातीअंताचे उद्दिष्ट डोळ्या समोर ठेवून आंतरजातीय विवाह समाजात मोठ्याप्रमाणात होतील यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. युवक संघटना आणि स्त्री संघटना यांनी पुढाकार घेवून सतरोल खाप महापंचायती प्रमाणे देशातील तरुण -तरुणींना जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि जोडीदार निवडताना तो आंतरजातीय  निवडण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आले पाहिजे. आज देशाचे सरकार कसे असावे याचा निर्णय प्रामुख्याने तरुण मतदार करणार आहेत. जे तरुण देशाचे सरकार निवडण्यास समर्थ आहेत ते आपला जोडीदार निवडण्यास समर्थ असणारच हे पंचायतीनीच नव्हे तर प्रत्येक कुटुंबाने मान्य केले पाहिजे. खाप पंचायतीने मार्ग दाखविला आहे. त्यामार्गावर चालण्याची हिंमत देशातील तरुणाईने दाखविली पाहिजे आणि त्यासाठी खाप पंचायतीने सैल केलीत तशी प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलामुलीवर लादलेली बंधने सैल करून निर्णय स्वातंत्र्य दिले पाहिजे. यातून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळून जातीअंत दृष्टीपथात येईल.
-----------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८

1 comment:

  1. ek hazar mage 700 muli , mulagi lagna sathi paise devun kontyahi rajyatun kay videshatun aanavi lage hariyanatil lonkanna.
    mhanun ha nirnay, ashi pashan yugi khapwale nisargatun apoaap namshesh hot hoti hich nisargachi kimaya.

    ReplyDelete