Thursday, November 24, 2016

अर्थ प्रलय !

कोणताही पुढचा मागचा विचार न करता निव्वळ उत्साहाच्या भरात हा निर्णय घेवून मोदी सरकारने स्वत:चीच नाही तर देशाची फजिती केली आहे. निर्णय घोषित करून प्रधानमंत्री जपानला निघून गेलेत. या निर्णयाने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि देशाचे अर्थकारण ठप्प होईल याची पुसटशी कल्पना असती तर प्रधानमंत्री जपानच्या दौऱ्यावर गेलेच नसते किंवा हा निर्णय जपान दौऱ्यानंतर घोषित केला असता. आपल्या निर्णयावर जपानमध्ये पाठ थोपटून घेणाऱ्या प्रधानमंत्र्याला भारतात परतल्यावर इथली परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी काढण्याची वेळ आली ती त्यामुळेच. ---------------------------------------------------------------------------------------. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकिर्दीला अडीच वर्ष पूर्ण होत असताना ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा साहसिक निर्णय घेवून साऱ्या राष्ट्राला स्तंभित केले.प्रधानमंत्र्याचे नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा करणारे भाषण ऐकल्यावर आपल्या सर्वांच्या काय लक्षात आले तर वाढत्या भ्रष्टाचारावर आणि काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. सीमेपलीकडून खोट्या नोटा येतात आणि त्यामुळे आतंकवादी कारवाया होत असल्याने त्यांचा पतपुरवठा थांबविण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. मात्र सर्वसामान्य जनतेचा , उद्योग आणि व्यापाराचा पतपुरवठा काही काळ खंडित होवू शकतो . काही काळ लोकांना त्रास होवू शकतो तेव्हा त्याची तयारी ठेवली पाहिजे असा कोणताही संकेत त्यांच्या भाषणातून मिळाला नव्हता. निर्णयाच्या अंमलबजावणीच्या तयारीसाठी बँक एक दिवस तर ए टी एम दोन दिवस बंद असतील आणि त्या नंतर नोटा बदलण्याचे काम विनासायास सुरु होईल . ज्यांचा पैसा पांढरा आहे त्यांना कोणताही त्रास होणार नाही . त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे म्हणत त्यांनी देशाला आश्वस्त केले. त्यामुळे संपूर्ण देशातून या निर्णयाला पाठींबा मिळाला. हा मधे बँकाच्या सुटीचा एक दिवस आणि ए टी एम च्या बंदचे २ दिवस असा जो काळ होता त्यात या निर्णयाचे काय परिणाम होतील याचा कोणालाच अंदाज नव्हता. इंदिराजींनी आणीबाणी लादली तेव्हा आणीबाणी म्हणजे काय आणि तिचे परिणाम काय हे कळायला जागृत राजकीय कार्यकर्त्यांना ३-४ दिवस लागले तसेच नोटाबंदीच्या परिणामाचा अंदाज यायला ३-४ दिवस लागलेत हे सत्य आहे. आणीबाणीची तरतूद घटनेत होती पण पहिल्यांदा लागू केल्यामुळे लक्षात यायला वेळ लागला हे समजून घेता येईल. मात्र अशा प्रकारे नोटा चलनातून बाद करण्याचा स्वतंत्र भारतातील हा दुसरा निर्णय आहे. १९७८ साली मोरारजी देसाईच्या जनता राजवटीत १०००, ५००० आणि १०००० च्या नोटा अशाच अचानक रद्द करण्यात आल्या होत्या. पण त्याचा सर्वसामान्य जनतेवर काहीच परिणाम झाला नव्हता आणि त्रासही झाला नव्हता. कारण अशा नोटा सर्वसामान्या जवळ नव्हत्या. त्यांनी बघितल्या सुद्धा नव्हत्या. आता ज्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनात होत्या त्याचा संबंध सामन्यातील सामान्य माणसाशी होता. रोजगार हमी वरील मजूर , बांधकामावरील मजूर हे देखील या नोटा बाळगून होते , दैनंदिन जीवनात वापरत होते. रोज लागणाऱ्या रांगा , सरकारचे रोज बदलणारे निर्देश आणि ए टी एम चा झालेला घोळ, नव्या नोटांची टंचाई हे सगळे पाहता सरकारने या सगळ्या परिस्थितीचा विचार केला नव्हता का किंवा निर्णयातून उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार केला नव्हता का असा प्रश्न पडतो. कारण निर्णय घेताना एकूण चलना पैकी ८६ टक्के चलन रद्द करीत आहोत हे लोकांना नसले तरी सरकारला चांगले माहित होते. हे माहित असताना सरकारने परिस्थितीला तोंड देण्याची , परिस्थिती हाताळण्याची तयारी केली नसेल तर ती गंभीर चूकच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि लोकांच्या जीवनाशी केलेला खेळ ठरतो. देशातील जनता देशासाठी कोणताही त्याग करायला , कष्ट पडतील ते सहन करायला नेहमीच तयार असते. त्यामुळे लोकांनी देशासाठी एवढा त्रास सहन करून आपण देशभक्त असल्याचे दाखवून दिले पाहिजे हे संघशाखेतील शेंबड्या पोरापासून मुख्यमंत्री , प्रधानमंत्री यांनी सांगणे म्हणजे लोकांच्या देशभक्तीवर शंका घेवून त्यांचा अपमान करण्या सारखे आहे. या निर्णयामुळे असे घडणे अपरिहार्य असते तर लोकांनी कोणतीही तक्रार न करता सरकारची साथ दिली असती. सरकारच्या निर्बुद्धपणावर , अदूरदर्शितेवर आणि अविचारीपणावर पांघरून घालण्यासाठी देशभक्तीचा वापर होवू नये. निर्णयाचा आज जो परिणाम दिसत आहे त्यावरून देशात अर्थक्रांती घडत नसून अर्थ प्रलय झाला असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. म्हणूनच सरकारने निर्णयाचा गांभीर्याने आणि सर्वबाजूनी विचार केला होता की नाही याचा उहापोह गरजेचा ठरतो.

या बाबतीत असे सांगितले जाते की हा निर्णय जाहीर होण्या आधी गोपनीयता कायम ठेवण्यासाठी फार पूर्वतयारी करणे शक्य नव्हते. गोपनीयता आवश्यक होती आणि ती ठेवल्या गेली याबद्दल प्रधानमंत्री नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. पण गोपनीयता राखण्यासाठी फार पूर्वतयारी करता येत नव्हती हा दावा मात्र टिकणारा नाही. याची १-२ उदाहरणे देता येतील. पहिली गोष्ट २०००ची नवी नोट चलनात येणार याची चर्चा बरीच आधीपासून होती. त्या नोटेचे छायाचित्र देखील प्रकाशित झाले होते. असे असले तरी त्याचा चलन रद्द होणार याचेशी कोणीही संबंध जोडला नव्हता. सरकारने १००० आणि ५०० च्या नोटाच्या बदल्यात १००० आणि ५०० च्या नव्या नोटा छापल्या असत्या तर नोट छपाईची चर्चा देखील झाली नसती. उलट सरकारने २००० ची नोट छापून गोपनीयता भंग होण्याचा धोका पत्करला होता. तशी ती झाली नाही हे देशाचे भाग्य ! इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि , नोटाचे डिझाईन हे मोठे आणि महत्वाचे काम असते आणि ४-८ दिवसात ते होणारे नसते. असे सांगितले जात आहे कि नव्या ५०० आणि २००० च्या नोटांचे डिझाईन तयार करण्यास ६ महिन्यापूर्वीच सांगण्यात आले होते. याचा अर्थ असा निर्णय घ्यायचा हे ६ महिन्यापूर्वीच ठरले होते. याचा दुसरा आणि स्पष्ट अर्थ असा आहे कि, सरकार जवळ सर्वांगीण विचार करून अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यासाठी पुरेसा वेळ होता. पण सरकारने २००० रुपयाच्या नोटा छापण्या पलीकडे या वेळेचा कोणताही उपयोग केला नाही. देशात असलेल्या चलना पैकी बहुतांश चलन रद्द होणार आणि १३० कोटी लोकसंख्येच्या देशात ८० टक्के व्यवहार रोखीने होत असतात हे लक्षात घेता दैनंदिन व्यवहारासाठी छोट्या मूल्याची गरज धोरणकर्त्याच्या लक्षात आली नसेल तर त्यांना देशातील जमिनीवरचे वास्तव माहित नाही असा त्याचा अर्थ होतो. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्या नंतर अवघे २ लाख कोटीच्या आसपास १०० ,५० , २० आणि १० च्या नोटांच्या स्वरुपात शिल्लक होते. दैनदिन व्यवहारासाठी हे चलन अपुरे होते आणि हेच चलन बाजारात ओतण्याची गरज असताना सगळी यंत्रणा २००० च्या नोटा पुरविण्यात व्यस्त होती. सरकारच्या या उफराट्या निर्णयामुळे काही काळ तर २००० ची नोट हातात असूनही बाजारात वस्तू खरेदी करता येत नव्हती. शे-पाचशेचे सामान घेतले तरी बाजारात २००० चे सुटे मिळणे शक्य नव्हते. मुळात यापुढे मोठ्या नोटांचे चलन कमी करण्याचे धोरण सरकारने स्वीकारलेले असताना प्राधान्यक्रमाने २००० च्या नोटा छापणे हे तात्विक , व्यावहारिक आणि धोरणात्मक दृष्ट्या चुकीचे होते. सरकारचे आकलन अपूर्ण , अर्धवट आणि चुकीचे होते आणि त्याचा फटका साऱ्या देशाला बसला.

धोरणकर्त्यांनी निर्णयाच्या होणाऱ्या परिणामाला कसे तोंड द्यायचे याचा साकल्याने विचारच केला नव्हता हे अनेक ए टी एम अजूनही बंद आहेत यावरून स्पष्ट होईल. प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसात ए टी एम सुरु होतील असे ८ नोव्हेंबर रोजी सांगितले याचा अर्थच ए टी एम मधून नोटा पुरविण्यात काही अडचण होवू शकते याचा विचारच केला गेला नव्हता. ए टी एम मध्ये फेरबदलाचे काम आधी हाती घेतले असते तर लोकांना निर्णयाची कल्पना आधीच आली असती अशी अर्थमंत्र्याने नंतर सावरासावर केली. ही पश्चातबुद्धी आहे. ए टी एम लगेच सुरु होवू शकणार नाहीत हे आधीच लक्षात आले असते तर दोन दिवसात ते सुरु होतील अशी घोषणा करून तोंडघशी पडण्याची वेळ प्रधानमंत्र्यावर आली नसती. कोणाला कळू नये म्हणून ए टी एम मध्ये आवश्यक दुरुस्त्याचे काम हाती घेतले नाही हा युक्तिवाद किती फोल आहे हे दोन गोष्टीवरून स्पष्ट होईल. एक तर २००० ची नवी नोट चलनात येणार याची चर्चा आधीपासून होती. त्यामुळे ए टी एम मधून २००० ची नोट बाहेर पडेल यासाठी आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले असते तर सर्वांनाच ते स्वाभाविक वाटले असते. यातून कुठलीही गोपनीयता भंग झाली नसती. दुसरी गोष्ट फक्त १०० रुपयाच्या नोटाच मिळतील अशी १० टक्के ए टी एम १५ दिवसाच्या आत बसविण्याची किंवा अस्तित्वात असलेल्या ए टी एम पैकी १० टक्के ए टी एम मध्ये तशी दुरुस्ती करण्याचे आदेश २ नोव्हेंबर रोजीच सर्व बँकांना दिले होते. हे काम १५ दिवसात म्हणजे १७ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायचे होते. असे असताना सरकार १७ नोव्हेंबर पर्यंत का थांबले नाही असा प्रश्न उपस्थित होतो. यावरून दोन गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट होतात. लोकांना कळले असते म्हणून ए टी एम ला हात लावला नाही हे खरे नाही. तो मुद्दा सरकार आणि रिझर्व बँकेच्या ध्यानात फार उशिरा आला ही खरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट स्पष्ट होते ती ही कि हा निर्णय घोषित करताना सरकार आणि रिझर्व बँकेत कोणताच ताळमेळ नव्हता. नाही तर रिझर्व बँकेने फक्त १०० च्या नोटा मिळतील असे ए टी एम १७ नोव्हेंबर पर्यंत तयार ठेवण्याचे आदेश दिले असताना ८ नोव्हेंबर रोजीच प्रधानमंत्री घोषणा करतात याचा दुसरा काय अर्थ लागतो. अर्थात अशी ए टी एम तयार असती तरी त्यात भरायला १०० च्या नोटा रिझर्व बँकेकडे होत्याच कुठे. त्या असत्या तर सगळीच ए टी एम सुरु राहिले असते. सरकारने आणि रिझर्व बँकेने नव्या नोटांचे डिझाईन तयार करायला सांगितले त्यावेळे पासून बँकांना ए टी एम ची संख्या वाढवायला आणि बँकिंग सुविधा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर ए टी एम सुरु करायला सांगितले असते आणि त्याठिकाणी वेळेवर पैसा पोचेल याचे नियोजन केले असते तर लोकांवर रांगेत उभे राहून मरायची आणि लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ आली नसती.


निर्णय घेताना जमिनीवरचे वास्तव माहित नव्हते याचा आणखी एक पुरावा म्हणजे देशाच्या ग्रामीण भागाचा , तिथल्या शेतकरी , शेतमजुरांचा , छोट्या व्यावसायिकाचा काहीच विचार सरकारने केला नाही. उलट त्यांच्या अडचणी वाढतील असे निर्णय घेतल्या गेलेत. देशातील ४७ टक्के कुटुंबाची बँक खाती नाहीत. बँक खाते असले पाहिजे याचे कायद्याने बंधन नाही. त्यामुळे बँकखाते असेल तिथे लोकांनी नोटा बदलायच्या हा आदेशच बेकायदेशीर आणि अव्यावहारिक आहे. तुम्हाला पैसे बदलून देण्याची सोय करता येत नाही म्हणून लोकांना वेठीस धरणे यातून अकार्यक्षमता आणि असंवेदनशीलता तेवढी दिसून पडते. सहकारी चळवळ आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर फक्त असंवेदनशिलताच नाही तर सरकारचा खुनशीपणा दिसून आला आहे. सहकारातील नेते बदमाश आहेत , भ्रष्ट आहेत हे मान्य. किती भ्रष्ट असावेत याचा पुरावा फडणवीस सरकारातील सहकार मंत्र्याच्या ९१ लाखाच्या नोटा निवडणूक आयोगाने जप्त केल्या यावरूनच मिळतो. अशा भ्रष्ट नेत्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि शिक्षा मात्र शेतकऱ्यांना द्यायची हा मोदी सरकारचा कोणता न्याय आहे. ज्या बँकावर रिझर्व बँकेचे नियंत्रण आहे अशा सहकारी बँकावर सरकारचा विश्वास नाही म्हणून त्या बँकांना नोटा बदलून देण्याची परवानगी नाही ही तर मनमानी झाली. बहुतेक शेतकऱ्यांची खाती सहकारी बँकेत असतात हे माहित असताना सरकारने अशी मनमानी चालविली आहे. सरकारला सहकार चळवळ मोडीत काढायची असेल तर खुशाल काढावी. त्याचे शेतकरी सभासदाला दु:ख होण्या ऐवजी आनंदच होईल. पण सहकार चळवळ मोडीत काढण्याच्या नादात चलन संकटाने ग्रामीण अर्थकारण कोलमडले आहे याचे भान सरकारला नसणे हे वास्तव भयंकर आहे. ५५ टक्के ग्रामीण लोकांना सहज चलन बदलता येईल याचा विचार सरकारने केला नाही हाच मोठा अविचार आहे.


एवढ्या मोठ्या निर्णयाच्या अंमलबजावनीची जय्यत तयारी सरकारने केली असती तर गोंधळ होण्याचे कारणच नव्हते. यासाठी युद्धस्तरावर तयारी आणि युद्ध प्रसंगी वाररूम असते त्या तयारीने परिस्थितीला सामोरे जायला हवे होते. अगदी तीन सध्या गोष्टी सक्षमपणे केल्या असत्या तर लोकांना आणि एकूणच अर्थव्यवस्थेला जे चटके बसले आणि बसत आहेत ते टळले असते. कोणत्या साध्या गोष्टी आहेत त्या तीन ? एक, निर्णय जाहीर करण्यापूर्वी  पुरेशा नव्या नोटा हाती आहेत याची खात्री करून घेणे, दोन, त्या नोटा सर्वत्र वेळेत पोचविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे. तीन , पैसे बदलून मिळण्यासाठी बँकेत अनेक खिडक्या आणि बँकेच्याच भरवशावर न राहता दुसरी अनेक केंद्रे निर्माण करणे. या अत्यंत साध्या गोष्टींची तयारी आणि विचार सरकारने केला नव्हता ही सरकारची घोडचूक आहे. जम्मू-काश्मीर किंवा पूर्वोत्तर प्रदेशात  हेलिकॉप्टरने चलन पोचविले जाते. अशीच व्यवस्था सरकारला देशभर चलन पोचविण्यासाठी करता आली असती. तासभरात चलन संपले असे सांगण्याची पाळी बँकावर आली नसती. तहसील , कलेक्टर कचेरी , ट्रेझरी , दस्त नोंदणी कार्यालये अशी सगळी यंत्रणा नोटा बदलण्यासाठी वापरली असती तर बँकांसमोर न संपणारी लाईन लागलीच नसती. निवडणूक आयोग जशी निवडणुकीसाठी सगळी यंत्रणा ताब्यात घेवून निवडणुका पार पाडते तसेच पहिल्या ३-४ दिवसासाठी रिझर्व बँकेने सगळी यंत्रणा ताब्यात घेवून नोट बदलीचे काम केले असते तर आजचे परिणाम दिसले नसते. अगदी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीला आठवड्यात घरटी २००० च्या नोटा बदलून देण्याचे अधिकार दिले असते तर देशातील निम्म्यापेक्षा अधिक ग्रामीण जनतेची आज झालेली दैना टाळता आली असती. पण कोणताही पुढचा मागचा विचार न करता निव्वळ उत्साहाच्या भरात हा निर्णय घेवून मोदी सरकारने स्वत:चीच नाही तर देशाची फजिती केली आहे. निर्णय घोषित करून प्रधानमंत्री जपानला निघून गेलेत. या निर्णयाने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि देशाचे अर्थकारण ठप्प होईल याचा निर्णय घेताना प्रधानमंत्र्याला अंदाज नव्हता याचाच हा पुरावा. आपल्या निर्णयाने अशी परिस्थिती निर्माण होईल याची पुसटशी कल्पना असती तर प्रधानमंत्री जपानच्या दौऱ्यावर गेलेच नसते किंवा हा निर्णय जपान दौऱ्यानंतर घोषित केला असता. आपल्या निर्णयावर जपानमध्ये  पाठ थोपटून घेणाऱ्या प्रधानमंत्र्याला भारतात परतल्यावर इथली परिस्थिती पाहून छाती बडविण्याची आणि डोळ्यातून पाणी काढण्याची वेळ आली ती घिसाडघाईमुळे.  मनमोहनकाळात असा निर्णय होवून देशात अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असती तर मोदीजी आणि त्यांच्या पक्षाची काय प्रतिक्रिया राहिली असती ? मोदीजी आणि त्यांचा पक्ष मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला असता ! पण प्रत्येक गोष्टीसाठी असा राजीनामा मागणे हे समस्येवरचे उत्तर नसते. प्रधानमंत्र्याला सगळ्या गोष्टी माहित असणे शक्यच नसते. सल्लागारांनी , तज्ज्ञांनी सगळी परिस्थिती समोर ठेवायची असते. इथे काही तरी घोटाळा झाला आहे. प्रधानमंत्र्याला परिणामाच्या बाबतीत अंधारात ठेवण्यात आले आहे. जे या निर्णयामागे होते त्यांना पुढच्या सर्व निर्णय प्रक्रियेतून बाहेर फेकण्याची आणि आपले प्रशासन चुस्त दुरुस्त करणे हे प्रधानमंत्री आणि देशाच्या हिताचे ठरणार आहे. या निर्णयाचा हेतू कितपत सफल होईल हा वेगळा प्रश्न आहे , पण आजच्या सरकारात निर्णय घेणारा जो कोणता कंपू आहे त्याला देशातील जमिनीवरचे वास्तव माहित नाही आणि गोरगरीब जनता त्याच्या डोळ्यासमोर कुठेही नाही हे या निमित्ताने पुढे आलेले सत्य मात्र चिंताजनक आहे.


---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------

Thursday, November 10, 2016

काळ्याचे पांढरे करणारा निर्णय !

बाहेरचे भांडवल देशात येण्यास असलेली प्रतिकूल स्थिती, पाकिस्तान बरोबरच्या तणावाने प्रतिकूलतेत पडलेली भर यातून मार्ग काढण्यासाठी काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने आधी अभय योजना जाहीर करून काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. पण अपेक्षित पैसा न आल्याने नोटा रद्द करून काळा पैसा अर्थव्यवस्थेच्या कामी आणण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे. फक्त या प्रयत्नाला त्यांनी भ्रष्टाचार , काळापैसा आणि आतंकवाद निर्मूलनाचा साज चढवून लोकांसमोर पेश केले. आर्थिक अडाण्यांच्या देशात वरच्या आवरणाला गाभा समजल्या गेला नसता तरच नवल.
-----------------------------------------------------------------------------------------


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यावर माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती 'हा क्रांतीकारी निर्णय आहे.' आर्थिक क्षेत्रातील जाणकार असलेल्या माझ्या ज्येष्ठ मित्राला ही माझी प्राथमिक प्रतिक्रिया वाटली . थोड्या अभ्यासाने कदाचित बदलू शकेल असे ते बोलले. त्यांच्यामते काळा पैसा कोणी नोटांच्या स्वरुपात दडवून ठेवत नाहीत. जमीन जुमला, सोने-चांदी या स्वरुपात तो प्रामुख्याने असल्याने काळा पैसा आणि भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने हा निर्णय परिणामकारक ठरणार नाही. जमीन आणि सोने चांदीत काळा पैसा गुंतविणे सोयीचे असल्याने त्यात तो आहेच हे नाकारण्याचा प्रश्न नाही. पण ५०० आणि १००० च्या नोटाने पैशाच्या रूपातही काळा पैसा दडविणे सुलभ झाले आहे. आयकर अधिकाऱ्यांनी टाकलेल्या कुठल्याही छाप्यात सोन्या-चांदी सोबत करोडो रुपये मिळताना दिसतात . घर - जमीनीची बेनामी खरेदी आता अशक्य झाल्याने ते खरीदणे म्हणजे आपल्या हाताने भ्रष्टाचाराचा पुरावा निर्माण करण्यासारखे आहे. शिवाय जमिनीच्या खरेदी - विक्री साठीचे सरकारी दर आणि बाजारभाव यातील फरक खूप कमी झाला आहे. या क्षेत्रात काही वर्षापासून जी मंदी आली आहे त्याचे कारणच हे आहे की खरेदीसाठी वैध पैसा जास्त लागू लागला आहे. पूर्वी २५ टक्के वैध आणि ७५ टक्के अवैध पैसा टाकून खरेदी शक्य होती. आता हे प्रमाण उलट झाले आहे. गुंतवणुकीसाठी आणि लपविण्यासाठी सोने सोयीचे असले तरी त्यात भरीव भांडवल वृद्धी होत नसल्याने सगळा काळा पैसा त्यात कोणी गुंतवून ठेवत नाही. त्यामुळे रोखीच्या स्वरुपात काळा पैसा जवळ बाळगण्याचे चलन वाढल्याने काळा पैसा जवळ बाळगनाऱ्याना नोटा रद्द करण्याचा चांगलाच फटका बसणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे असा माझा प्रतिवाद होता. शिवाय शत्रूराष्ट्र बनावट चलन भारतात आणून त्याद्वारे आतंकवादी कारवायांना प्रोत्साहित करीत आहे. अशा बनावट चलनाने आर्थिक अस्थिरताही निर्माण होते. सरकारच्या या निर्णयाने या दोन्ही गोष्टीना लगाम बसेल हा मोठाच फायदा या निर्णयाने होणार असल्याने डोळे झाकून पाठींबा द्यावा असा हा निर्णय वाटला तर नवल नाही. पण नंतर हा निर्णय जसजसा उलगडत गेला तसतसे अनेक प्रश्न या निर्णयाने उभे केले आहेत.
पहिला प्रश्न उभा राहतो तो असा. वर उल्लेखिलेले फायदे खरोखर झाले तरी दावा केल्या प्रमाणे या निर्णयाने भ्रष्टाचाराला प्रतिबंध कसा बसेल ? आता आपण महाराष्ट्राचे उदाहरण घेवू . महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघातील विधान परिषदेसाठीच्या निवडणुका होत आहेत. ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका होत आहेत तेथे तेथे प्रत्येक मतदाराचा भाव १० लाख रुपये असल्याची माध्यमात चर्चा आहे. कोणालाही विजयी व्हायचे असेल तर किमान १०० मतदार आपल्याकडे ओढावे लागतील. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या म्हणून हे मतदार उमेदवाराकडून पैसा न घेता मतदान करणार आहेत का ? अर्थातच नाही. या निवडणुकामध्ये कधी कधी सगळे मतदार तगड्या उमेदवारा भोवती गोळा होतात आणि तेवढ्या मतांची गरज नसताना सगळ्यांना ठरलेला दर द्यावा लागतो. ६ जागी निवडणूक होणार आहे . याचा अर्थ किमान १२०० मतदारांना प्रत्येकी १० लाखाच्या आसपास रक्कम मिळू शकते. आता या निर्णयाने थोडी अडचण होईल पण अगदीच थोडी. कारण लोकांची अडचण होवू नये अशी काळजी सरकारने आधीच घेतली आहे ! प्रत्येकाच्या खात्यात अडीच लाखापर्यंत ५००-१००० च्या नोटा जमा झाल्यात तर सरकार कोणताही प्रश्न विचारणार नाही. उमेदवाराला एका मतदाराच्या कुटुंबात असलेल्या २-३ खात्यात तितके पैसे रद्द झालेल्या नोटानेच भरता येणार आहे. उमेदवार आणि मतदार दोघानाही हे जास्त फायद्याचे झाले आहे. नोटा रद्द झाल्या नसत्या तर मतदारांना उमेदवारा कडून मिळणारा पैसा हा खात्यात जमा न करता काळा पैसा म्हणून सांभाळण्याची जोखीम घ्यावी लागली असती. आता उजळ माथ्याने ती रक्कम बँक खात्यात टाकून वैध रकमेत रुपांतर करता येणार आहे. म्हणजे सरकारच्या निर्णयात भ्रष्टाचार रोखला जाईल अशी तरतूद नाहीच. उलट अक्कल-हुशारीने नियोजन केले तर अधिकृतपणे काळ्या पैशाचे रुपांतर वैध पैशात करता येणार आहे. आता या निवडणुका प्रमाणेच नगरपालिका आणि महानगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. पूर्वी या निवडणुकात हजारची नोट दाखवून काम व्हायचे. पण आता हजार ऐवजी २ हजाराची नोट बाजारात येणार असल्याने त्या नोटेशिवाय समाधान होणार नाही अशी चिंता आता उमेदवारांना सतावत आहेत. म्हणजे भ्रष्टाचाराला प्रतिबंध होण्या ऐवजी तो वाढणार. आज नोटा उपलब्ध नसल्या तरी निवडणुकी पर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. जेवढ्या नोटा चलनाच्या बाहेर गेल्या आहेत त्या मूल्याच्या नोटा चलनात लवकर येतील या बाबत सरकारने आश्वस्त केले आहेच.

 या निर्णयाने काळा पैसा चलनाच्या बाहेर होणार की काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रुपांतर होणार हा नावच प्रश्न उभा राहतो. असे होण्याची दोन कारणे आहेत. एकतर प्रत्येकाला अडीच लाखांपर्यंतच्या ५००-१००० च्या नोटा आपल्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा करता येणार आहे. ज्यांचे खाते नाही त्यांना बँकेत जावून ५ मिनिटात खाते उघडता येईल असे मार्गदर्शन अर्थमंत्री जेटली यांनीच केले आहे. म्हणजे घरातील सर्वांच्या नावाने खाते उघडून त्यात प्रत्येकी अडीच लाखापर्यंतचा काळा पैसा जमा करता येणार आहे. याशिवाय अडीच लाखापेक्षा अधिकच्या पैशावर कर आणि दंड भरून काळ्याचे पांढरे करता येणार आहे. आणखी एक सवलत आहे. सरकारमान्य ओळखपत्र असेल तर कोणालाही दररोज सध्या ४००० आणि नंतर ४००० पेक्षा जास्तीच्या ५००-१००० च्या नोटा बदलून मिळणार आहेत. हा उद्योग काळा पैसा बाळगणाऱ्या सर्वाना ५० दिवस करण्याची मुभा आहे. पूर्वी सिलिंगचा कायदा आला तेव्हा अनेकांनी नोकरांच्या , ओळखी-पाळखीच्या व नातेवाईकांच्या नावे जमिनी केल्या होत्या. आताही अशा लोकांच्या नावे खाते उघडून त्यात अडीच लाख आणि त्यापुढची रक्कम जमा करणे अशक्य नाही. याचा अर्थ भ्रष्टाचारात लिप्त असलेली नोकरदार मंडळी या मार्गाने काळ्याचे पांढरे करून उजळमाथ्याने नव्या भ्रष्टाचारासाठी सज्ज होणार आहेत. मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींचे काळयाचे पांढरे करण्याचा मार्गही या सरकारने उदारपणे खुला ठेवला आहे. ज्यांच्याकडे जास्त काळा पैसा आहे त्यांची या निर्णयानंतर सोने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. एका दिवसात सोन्याचे भाव वाढले आहेत आणि वाढलेल्या भावातही अधिकची रक्कम मोजून , दामदुप्पट पैसे खर्च करून लोक सोने खरेदी करीत आहेत.एक आठवडा आधीची खरेदी दाखविण्याची सोय असल्याने सगळ्या व्यापार जगताला या आठवड्यात ५००-१००० ची नोटांचे मूल्य कमी करून त्या नोटा घेवून माल विकण्याची सोय आहे. टोल पुन्हा सुरु होईल तेव्हा ५००-१००० च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. पण आधीच्या आठवड्यात जमा सगळा टोल ५००-१००० च्या नोटांमध्ये जमा करता येणार आहे. त्यामुळे काळा पैसा अर्थव्यवस्थे बाहेर फेकण्याचा सरकारचा हेतू आहे की काळा पैसा पवित्र करून घेण्याचा सरकारचा उद्देश्य आहे असा प्रश्न पडतो. अर्थात सरकारचा काळा पैसा पवित्र करून घेण्याचा उद्देश्य असेल तर तो वाईट आहे असे म्हणता येणार नाही . मंदीच्या काळात मागणी वाढविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काळ्याचा पांढरा झालेला पैसा उपयोगी ठरणार आहे.  नोटा रद्द करण्या आधीच सरकारने काळ्या पैशा संबंधीची अभय योजना अंमलात आणली होती. त्या योजने अंतर्गत अपेक्षित तेवढा काळा पैसा उघड झाला नसावा किंवा देशांतर्गत पडून असलेला काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी ही उपाय योजना केली असावी. तसे असेल तर हा अगतिकतेतून आलेला निर्णय म्हणावा लागेल. प्रधानमंत्र्यांनी जगभर फिरून अर्थव्यवस्थेत भांडवल ओतण्याचा जो प्रयत्न केला त्यात अपेक्षित यश न मिळण्यातून आलेली ही अगतिकता आहे. आश्वासने भरपूर मिळाली पण देशांतर्गत अनुकूल परिस्थिती नसल्याने परदेशी उद्योजक यायला तयार नाहीत. आता पाकिस्तान बरोबरचा वाढता तणाव लक्षात घेता तो निवळत नाही तोपर्यंत परकीय भांडवलाची आशा करता येणार नाही. भ्रष्टाचार निर्मुलना पेक्षा देशांतर्गत  भांडवल उभारणीचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले पाहिजे. अगतिकतेतून घेतलेला निर्णय असे वाटू नये म्हणून भ्रष्टाचार आणि आतंकवादाच्या निर्मूलनाच्या नावाखाली हा निर्णय लोकांच्या गळी उतरविण्यात आला.

बरे आतंकवाद्यांना पैसा मिळू नये यासाठी हा निर्णय आवश्यक होता का किंवा उपयुक्त आहे का याचा विचार करू. पाकिस्तान , बांगलादेश आणि नेपाळ येथून बनावट भारतीय चलन येते आणि अवैध धंद्यासाठी ते उपयोगात येते हे अगदी खरे आहे. विशेषत: पाकिस्तानातून आय एस आय असे चलन आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात पाठवीत आहे. त्याचे प्रयत्न असफल करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत दुमत असू शकत नाही. पण एवढ्यासाठी एवढ्या मोठ्या निर्णयाचे समर्थन होवू शकत नाही. मुंगी चिरडण्यासाठी रोडरोलरचा उपयोग करण्यासारखे हे आहे. आपल्या सुरक्षा विषयक त्रुटीवर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न आहे. आपण कोणत्याही दुकानात गेलो तरी दुकानदार ५००-१००० ची नोट खरी असल्याची खात्री करूनच व्यवहार करतो. आपल्यापैकी प्रत्येकाचा हा अनुभव आहे. मग आतंकवादी आणि देशद्रोह्याचेच चलन कसे स्विकारले जाते हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आपण खोटी नोट चालवू शकत नाही पण त्याच नोटा चलनात मिसळणे पाकिस्तानला कसे शक्य होते हे कोडे सोडविले तर बनावट चलनाची डोके दुखी संपू शकते. याचे एक कारण तर हे बनावट चलन बँकेत मिसळले जात असावे. अगदी याचे धागेदोरे प्रिंटींग प्रेस ते रिझर्व बँक या नोटांच्या प्रवासातही सापडू शकतात. एक मात्र खरे कि खऱ्या चलनात बनावट चलन मिसळल्या शिवाय ते चालू शकत नाही. एखादे वेळेस एखादे ठिकाणी ५००-१००० ची बनावट नोट चालविणे कठीण नाही. पण असे ५००-१००० चालवून एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणे शक्य नाही. याची संघटीत अशी कार्यपद्धती असली पाहिजे आणि आपल्याच बँकिंग क्षेत्रातील लोकांची साथ असल्याशिवाय दुष्मनांची कार्यपद्धती यशस्वी होवू शकत नाही. ही साठगाठ शोधून मोडून काढल्याशिवाय नोटा रद्द करून सुरक्षा विषयक प्रश्न निकालात काढता येणार नाही. नोटा रद्द केल्याने काही दिवसासाठी हा प्रश्न सुटेल. पुन्हा नव्या नोटांची नक्कल करून पाकिस्तान तोच उद्योग करणार आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटा संबंधी सुरक्षा संस्थांचा जो अंदाज आहे त्यानुसार २०१० पर्यंत १६०० कोटी रुपया पर्यंतचे चलन भारतीय चलनात मिसळले होते. असे गृहीत धरू कि या ५ वर्षात आणखी ७००-८०० कोटीचे बनावट चलन आले असेल. याचा अर्थ पाकिस्तानातून आलेले बनावटी चलन २५०० कोटीच्या पुढे नाही. भारताचे व्यवहारात असलेले अधिकृत चलन १६.४२ लाख कोटी रुपयाचे आहे. या अधिकृत चलनात ५००-१००० रुपयातील चलन तब्बल ८६ टक्के आहे. २५०० कोटीचे चलन बाद करण्यासाठी १२ लाख कोटीच्या वर अधिकृत चलन बाद करणे अव्यावहारिक आणि आतबट्ट्याचे आहे. कारण असे चलन बाद करून नवे चलन छापण्यासाठीचा खर्च आजच्या हिशेबाने १२००० कोटीच्याही वर आहे. शिवाय जुने चलन नष्ट करणे आणि नवे व्यवहारात आणणे याचा प्रचंड असा वेगळा खर्च आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीचा खर्च २०००० कोटीच्या घरात जाईल असा अंदाज आहे . शिवाय संक्रमणकाळात जनतेला होणारा त्रास आणि उद्योगधंद्यावर होणारा विपरीत परिणाम वेगळाच. या निर्णयाने पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट चलनाचा प्रश्न कायमचा निकालात निघाला असता तर सर्वच नागरिकांनी हा सगळा त्रास आनंदाने सहन केला असता.
मोठ्या मूल्याच्या चलनाने भ्रष्टाचार , काळाबाजार आणि आतंकवाद फोफावत असेल तर या नोटा चलनात नसणे केव्हाही चांगले. पुढारलेल्या अर्थव्यवस्थानी मोठ्या मूल्याचे चलन केव्हाच बाद केले आहे. पण प्रधानमंत्र्यांनी १००० रुपयाच्या नोटांच्या बदल्यात २००० रुपयाची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थच नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा आणि भ्रष्टाचार , काळा बाजार आणि आतंकवाद याच्याशी फारसा संबंध नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घरात दडविलेला पैसा बाहेर काढण्याचा हा चलाख प्रयत्न आहे. जे चलन रद्द केले त्याच्या बदल्यात १०,५० आणि १०० च्या नोटा छापणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे आणि सोयीचे नाही. या नोटाच्या छपाईचा खर्च नोटाच्या मूल्याच्या १० टक्के पर्यंत आला असता. ५००- आणि २००० च्या नोटा छापण्याचा खर्च अत्यल्प असणार आहे. १० रुपयाची नोट छापण्याचा खर्च ९६ पैसे आहे आणि हजार रुपयाची नोट छापण्याचा खर्च फक्त ३ रुपये १७ पैसे आहे तर ५०० रुपये नोटेचा छपाई खर्च २ रुपये पन्नास पैसे आहे. त्यामुळे रद्द केलेल्या नोटांच्या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा चलनात आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय समर्थनीय आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत रोखीने जास्त व्यवहार होतात. बँके मार्फत व्यवहार होण्यासाठी फार मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे हे विसरून शहाणी, शिकली सवरलेली आणि सुखी माणसाचा सदरा घालणारी मंडळी कागदमुक्त चलन अंमलात आणण्याचा सल्ला देतात. क्रेडीट कार्ड , डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या आधी सर्वाना बँकिंग सेवेशी जोडणे जरुरीचे आहे. बँकेच्या सेवेशी लोकांना जोडण्याचा पहिला मोठा प्रयत्न मनमोहन काळात २०११ ते १४ दरम्यान झाला असे वर्ल्ड बँकेने नमूद केले. या काळात १७.५ कोटी खाती उघडली गेली. हेच काम मोदी काळात जनधन योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर झाले. अवघ्या दोन वर्षात २२ कोटी लोक जनधन योजनेतून बँकेशी जोडले गेले. अर्थात बँकेशी जोडले गेले म्हणजे बँक व्यवहार करायला लागलेत असे नाही. जनधन योजने अंतर्गत जी खाती उघडण्यात आलीत त्यातील ७२ टक्के खात्यात खाते उघडल्या पासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर ५८ टक्के लोक बँकेशी जोडले गेलेत. तरीही जगाच्या तुलनेत आणि दक्षिण आशियायी देशाच्या तुलनेत बँकेशी न जोडल्या गेलेल्याचे प्रमाण भारतात अधिक आहे. बँक खातेदाराची संख्या ५५ कोटीच्या पुढे गेली असली तरी त्यातील ४३ टक्के खात्यात व्यवहार होत नाहीत. जी खाती सक्रीय आहेत त्यातील ३९ टक्के खातेदार डेबिट - क्रेडीट कार्डचा वापर करतात. अवघे ७ टक्के खातेदार इंटरनेट बँकिंगचा वापर करतात. २००० पेक्षा कमी लोकसंख्येची ४ लाख ९० हजार गावे बँकिंग सोयी पासून वंचित आहे. अर्थक्रांती आणि आधुनिक अर्थव्यवहारापासून आपण अजून कोसो दूर आहोत. तरीही मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थक्रांती म्हणणे ही अर्थक्रांतीच्या जनकाची दिवाळखोरी आहे. बराच काळ आपली रोखीच्या व्यवहारा पासून सुटका नाही हे ओळखून आता ५०० आणि २००० च्या जोडीला १००० ची नोटही चलनात आणण्याचा व्यावहारिक निर्णय घेवून प्रधानमंत्र्यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या अर्थक्रांती वाल्यांना अस्मान दाखविले आहे. समजदार समजल्या जाणाऱ्या अर्थक्रांतीवाल्यांना मोदी सरकारचा निर्णय समजला नाही तेव्हा ढोल बडव्या मोदी भक्तांना निर्णयाचा अर्थ कळेल असे मानण्या इतका गाढवपणा दुसरा नाही !
-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------

Wednesday, November 2, 2016

तोंडी तलाक आणि समान नागरी कायदा

 इंग्रज राजवटीत १९३९ सालीच मुस्लिम स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार देणारा कायदा संमत झाला आणि फारसी खळखळ न करता मुस्लिम समाजाने तो स्वीकारला. हिंदूंच्या विरोधामुळे इंग्रज राजवटीत हिंदू स्त्रीला हा अधिकार मिळालाच नाही आणि या विरोधामुळेच स्वतंत्र भारतात देखील हा अधिकार मिळायला १९५६ साल उजाडावे लागले ! आज तलाक सुधारणेला याच पद्धतीचा विरोध मुस्लिम समाज - प्रामुख्याने पुरुषवर्ग- करू लागला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------



मुस्लिम स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या तोंडी तलाकचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे निर्णयासाठी आल्या नंतर आणि सरकारने या प्रथेविरुद्ध मत नोंदविल्या नंतर मुस्लिम समाजात खळबळ निर्माण झाली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात मुस्लिम विरोधी वातावरण तापविण्याचा सतत प्रयत्न सुरु असल्याने तोंडी तलाक देण्याचा प्रश्न त्याच अनुषंगाने उपस्थित करण्यात आल्याची भावना मुस्लिम समाजात निर्माण होणे स्वाभाविक आहे. मुल्ला-मौलवी सांगतील तो धर्म आणि सरकार या धर्मावर जाणूनबुजून हल्ला करीत असल्याची भावना यातून तलाक संबंधीच्या विरोधाला धार आली आहे. यामुळे मुस्लिम द्वेष्ट्या मंडळीना मुस्लिमांना झोडपण्यासाठी आणि त्यांच्या विषयी गैरसमज पसरविण्यासाठी आयते कोलीत मिळत आहे. हा धर्म कसा मागासलेला , रानटी आहे असे बोलण्याची संधी मिळत आहे. तलाक पद्धतीत सुधारणा म्हणजे समान नागरी कायदा लागू करणे असाही संभ्रम हितसंबंधीयांकडून निर्माण केल्या जात असल्याने सरकार आपल्या धर्मात हस्तक्षेप करीत असल्याचे सांगत भावना भडकाविण्याचा प्रयत्न सुरु आहे. भावनेच्या आहारी न जाता प्रश्न समजून घेवून त्याचे उत्तर स्विकारण्याची गरज आहे.

तोंडी तलाकावर बंदी आणणे किंवा तलाक पद्धतीत सुधारणा म्हणजे समान नागरी कायदा लागू करणे नव्हे. हा मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करण्याचा प्रश्न आहे. मुस्लिम स्त्रिया मोठ्या प्रमाणावर तोंडी तलाक पद्धतीला विरोध करून ती प्रथा बंद करण्याची मागणी करू लागल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तोंडी तलाक म्हणजे धर्म वाक्य नाही ज्यात बदल म्हणजे धर्मात हस्तक्षेप ठरेल. भारता बाहेरच्या मुस्लिम जगाने केव्हाच या प्रथेपासून फारकत घेतली आहे. समजा तोंडी तलाक हे धर्मवाक्य मानले तरी ज्या अर्थी जगातील बहुसंख्य मुस्लिमांनी ही प्रथा नाकारली त्याअर्थी धर्मवाक्यात बदल संभव आहे असा त्याचा अर्थ होतो. भारतातील मुस्लिमांनी गुन्हेगारी कृत्या संदर्भातील न्याय इस्लामी कायद्याने न होता देशात सर्वांसाठी लागू प्रस्थापित कायद्यानुसार व्हावा हे मान्य केले आहे. इस्लामी कायदा सोडून भारतीय दंड संहिता (क्रिमिनल प्रोसिजर कोड) मान्य करण्याने धर्मावर किंवा धर्माचरणावर कोणतीही आच आली नसेल आणि गुन्हेगारी कृत्या संबंधी इस्लामी कायदा सोडून देता येत असेल तर सध्याचा इस्लामी नागरी व्यक्तिगत कायदा  न सोडता त्यात बदल करण्याला विरोध असण्याचे कारणच नाही.   ही झाली या प्रश्नाची धार्मिक बाजू. या प्रश्नाला घटनात्मक बाजू देखील आहे. या देशाचे नागरिक म्हणून, मग ते कोणत्या का जाती धर्माचे असेना , राज्यघटना स्वीकारली आहे. त्या घटनेने मिळालेले अधिकार पदरात पाडून घेण्याचा जसा आपला अधिकार आहे तसेच घटनेनुसार येणारी जबाबदारी पार पाडणे आपले कर्तव्य ठरते. घटनेने स्त्री-पुरुष समानता स्वीकारली आहे आणि त्यामुळे याबाबतीत आपण विषम वर्तन करीत असू तर ते बदलणे आपले कर्तव्य ठरते. हे कर्तव्य बजावताना धर्म आड येण्याचे कारणच नाही. एक प्रश्न स्वत:लाच विचारा . इस्लाम समतावादी आहे की नाही ? उत्तर जर समतावादी आहे हे असेल तर इस्लामच्या आडून तोंडी तलाकच्या अन्यायकारक प्रथेला विरोध करणे केवळ घटना विरोधी नाही तर धर्म विरोधी आहे हे आपल्या लक्षात येईल.


मुस्लिम देशात तर तोंडी तलाक बंद झाला मग आपल्या इथे का सुरु आहे या प्रश्नाचे खरे उत्तर धर्म नसून अल्पसंख्यांक असणे हे आहे हे देशातील बहुसंख्य असणाऱ्या समाजाने हे समजून घेतले तर गोष्टी बऱ्याच सोप्या होवू शकतात. बहुसंख्य समाज अल्पसंख्यांक (मुस्लिमच नाही तर तो कोणताही असू दे) समाजावर आपले नीतीनियम आणि कायदे लादतील अशी सारखी भीती वाटत असते. बहुसंख्य समाजाची ही भीतीच त्यांना एकत्र आणते आणि एकत्रितपणे आपल्या रूढी परंपरेला बांधून ठेवायला भाग पाडते. त्यांच्या रूढी परंपरेतील कोणताही बदल फार संवेदनशील प्रश्न बनतो आणि संवेदनशीलतेनेच तो प्रश्न हाताळावा लागतो. यासाठी अल्पसंख्याकांच्या मनात बहुसंख्याकांनी विश्वास निर्माण केला तर रूढी परंपरा बदलायला वेळ लागत नाही. दोन समुदायामध्ये अविश्वासाचे वातावरण आणि धर्म प्रथे विषयी गैरसमज यातून बदलाचा मार्ग खडतर बनतो . हे भारतातील अल्पसंख्यांकाबद्दलच घडते असे नाही. भारतात मुस्लिम समुदाय जसा १८-१९ टक्के आहे , तसाच बांगलादेशात हिंदूसमूह १२ टक्के आहे. हा १२ टक्के समाज १९४७ ला ज्या रूढी परंपरेला चिकटून होता तसाच तो आजही आहे. भारतात हिंदू कोड बील लागू झाले तसे बदल तिथे झाले नाहीत. एखाद्या धर्माच्या धर्म प्रथेला मागासलेले , रानटी असे हिणवून किंवा डिवचून बदल करण्याचा प्रयत्न झाला तर बदलाला विरोध होईल. मुस्लिमांना असे डीवचण्यात आनंद मानणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी थोडे मागे वळून पाहण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.


सर्वसाधारणपणे इस्लाम कट्टर आहे आणि हिंदू धर्म उदार आहे असे मानले जाते. इस्लामची कट्टरता इतर धर्माच्या विरोधात आहे आणि हिंदूची उदारता इतर धर्माबद्दल आहे यात नक्कीच तथ्य आहे. पण स्वधर्मीयांबद्दल हिंदूधर्म जेवढा अनुदार आणि अन्याय करणारा आहे तितका अन्यायी आणि अनुदार स्वधर्मियांबद्दल इस्लाम नाही हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आता इस्लामी अतिरेकी स्वधर्मियाबद्दल अनुदार आणि अन्यायी वर्तन करीत आहेत आणि हिंदुत्ववादी मंडळी दुसऱ्या धर्मींयाबद्दलची आधीची उदारता संपविण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत. पण हे ताजे बदल आहेत आणि ते कितपत टिकणारे  ठरतील हे आज सांगता येणार नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की , ज्या धर्माला आपण कट्टर धर्म समजतो त्या इस्लाम धर्मात स्त्रीला हिंदूधर्मीय स्त्री पेक्षा अधिक अधिकार होते. स्त्री-शूद्रा बद्दल हिंदूपरंपरा  काय आहे याचा कोळसा इथे उगळण्याची गरज नाही. हिंदू कोड बील लागू झाले आणि हिंदू स्त्री बरीच मुक्त होवून पुढे गेली , मुस्लिम स्त्री आहे तिथेच राहून मागे पडली. ज्या हिंदू कोड बिलामुळे हिंदू स्त्रीच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला त्याचे श्रेय पंडीत जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना द्यावे लागेल. आज जी मंडळी समान नागरी कायद्याच्या नावाने उड्या मारीत आहेत आणि मुस्लिम न्याय्य बदलाला विरोध करीत आहेत असे चित्र रंगवीत आहेत ती मंडळी म्हणजे त्या विचारधारेची मंडळी हिंदूंच्या प्रचलित रूढी - परंपरेत बदल करण्याच्या प्रचंड विरोधात होती. आज मुस्लिमांचा त्यांच्यातील रूढी परंपरेच्या बदलाला जो विरोध दिसतो आहे त्यापेक्षा तीव्र विरोध या मंडळीनी केला होता. खरे तर हिंदू आणि मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यात बदल करून हक्कापासून वंचित स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न इंग्रजांनी आपल्या राजवटीतच सुरु केला होता. आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या पूर्वजांनी प्रखर विरोध करून इंग्रजांचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र मुस्लिम स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार देणारा कायदा मुस्लिमांचा फारसा विरोध न होता इंग्रज राजवटीत १९३९ सालीच संमत झाला. कायद्याने जो अधिकार मुस्लिम स्त्रीला १९३९ साली मिळाला तो अधिकार हिंदू स्त्रीला मिळायला १९५६ साल उजाडावे लागले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बील सादर केले तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला होता आणि विरोधाची तीव्रता लक्षात घेवून पंडीत जवाहरलाल नेहरू यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे नाराज झालेले डॉ. आंबेडकर राजीनामा देवून मंत्रीमंडळातून बाहेर पडले होते हा इतिहास आहे. शेवटी नेहरूंनी १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदू कोड बिलाचा मुद्दा मांडून लोकांचा कौल घेतला आणि टप्प्या टप्प्याने १९५६ पर्यंत ते बील संसदेत मंजूर करून घेतले. हिंदू कोड बिलाचे कायद्यात रुपांतर होवून तो अनेक वर्षापासून लागू असला तरी आजही त्या बद्दलचा सुप्त विरोध कायम आहे. स्त्रीचे कार्यक्षेत्र चूल आणि मुल आहे हे आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ठासून सांगतात ते या सुप्त विरोधातून !


एकीकडे मुक्त झालेल्या हिंदू स्त्रीला चूल आणि मुल यात मर्यादित करण्याची इच्छा आणि दुसरीकडे तोंडी तलाकातून मुस्लिम स्त्री वरील अन्याय दूर करण्याचा उत्साह आज हिंदुत्ववाद्यात पाहायला मिळतो. समान नागरी कायद्याबाबतचा उत्साह दाखविण्यात येतो त्या मागचे कारण हेच आहे की कायद्याने आम्हाला वेसण घातली आणि मुस्लिम पुरुषांना रान मोकळे. त्यांना केव्हाही तलाक देता येतो , चार-चार बायका करता येतात ही सल त्या पाठीमागे आहे. शिवाय हाही गैरसमज आहेच की हिंदू कोड बील सर्वाना लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा लागू करणे. पण ते तसे नाही. हिंदू धर्मातील अन्याय कारक रूढी , परंपरा आणि संकेत टाळून हिंदू धर्मियांना एका धाग्यात बांधणारा तो कायदा आहे. पण समान नागरी कायद्यासाठी हिंदू कोड बिलातील अनेक गोष्टी बदलतील हे हिंदूंच्या लक्षात येईल तेव्हा मुस्लिमांइतकाच हिंदू आणि अन्य धर्मियांचा विरोध होणार आहे.


 हा विरोध मावळण्यासाठी समान नागरी कायद्या संदर्भात दोन बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधण्याची गरज आहे.  एक म्हणजे असा कायदा आज गोवा राज्यात अस्तित्वात आहे . गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तेव्हा पोर्तुगीजांनी असा कायदा लागू केला. गोवा मुक्ती संग्रामा नंतर गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होवून भारतीय संघराज्यात सामील झाला तेव्हा तोच कायदा इथे चालू राहिला. गोव्यात हिंदू , ख्रिस्ती आणि मुस्लिम जनसंख्या लक्षणीय आहे आणि तरीही कोणतीच अडचण न येता गोव्यात सर्व धर्मियांसाठी एकच कायदा १४५ वर्षापासून अंमलात आहे. 'गोवा फैमिली ला' या नावाचा तो कायदा आहे. मुस्लिमांसाठी गोव्यात शरीयतचा कायदा लागू व्हावा यासाठी गोवा बाहेरील मुसलमानांनी प्रयत्न केले होते. पण गोव्यातील मुस्लीमानीच अशा बदलाला विरोध करून तो प्रयत्न हाणून पाडला होता. तेव्हा समान नागरी कायद्याचा आदर्श आज आपल्यासमोर गोवा राज्याने घालून दिलेला आहे.  दुसरी बाब म्हणजे ज्याला समान नागरी कायद्याचा गाभा म्हणता येईल असा  १९५४ चा विवाह विषयक विशेष कायदा (स्पेशल मैरेज ऐक्ट,१९५४) देश पातळीवर अस्तित्वात आहे. फक्त तो स्वैच्छिक आहे. . ज्यांना खरोखर समान नागरी कायदा पाहिजे त्यांनी आपल्या धर्म पद्धतीने होणारे विवाह बंद करून या कायद्या अंतर्गत विवाह केले पाहिजेत. १९५४ चा विवाह विषयक कायदा स्विकारण्यासाठी आणि सर्वाना लागू करण्यासाठी सर्व धर्मीयांचे मन वळविता आले तर समान नागरी कायद्याच्या दिशेने पडलेले ते मोठे पाउल असेल. पण ते होत नाही तो पर्यंत प्रत्येक धर्माने आपले व्यक्तिगत कायदे घटनेतील तरतुदींना छेद देणारे नसतील हे आवर्जून पाहिले पाहिजे. हिंदू कोड बील हा असाच प्रयत्न होता. त्यामुळे हिंदू ऐक्याच्या दिशेने बरीच प्रगती झाली हे लक्षात घेतले तर मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात अशाच सुधारणा झाल्या तर मुस्लिम ऐक्याच्या दिशेने पाउल पडेल. आज मुस्लिमांमध्ये शिया-सुन्नी , अहमदी-सुफी असे अनेक भेद आहेत. चालीरीती , पद्धती वेगळ्या आहेत.याच कारणाने एकाच धर्माचे असूनही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. तेव्हा या सर्वाना जोडणारा आणि घटना विरोधी नसणारा धार्मिक कायदा तयार करणे हे इस्लामच्या , मुस्लिमांच्या आणि देशाच्या हिताचे आहे. 

 तोंडी तलाक वर बंदी घालून स्त्री आणि पुरुष यांना समान न्याय देणारा तलाक कायदा मान्य करणे ही त्याची सुरुवात ठरणार आहे. ही सुधारणा मुस्लिम पर्सनल ला बोर्डाला करता येण्यासारखी आहे. पण केवळ पुरुषांची भरती असलेले हे बोर्ड स्त्रियांना न्याय देण्यास तयार नाही. त्यामुळे घटनात्मक न्यायालयाला यावर विचार करावा लागत आहे आणि सरकारला हस्तक्षेप करण्याची संधी मिळत आहे. हे नको असेल तर स्वत:हून सुधारणा करण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे आले पाहिजे.  तलाक कायद्यातील सुधारणेने मुस्लिम समाज मुल्ला-मौलवीच्या पकडीतून बऱ्याच अंशी मुक्त होईल आणि अशी मुक्ती ही काळाची गरज आहे.

-----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------. 

Wednesday, October 19, 2016

पाकिस्तानचा सापळा

सैनिकी शक्तीत भारताचा मुकाबला करणे केवळ अशक्य आहे याची जाणीव झाल्याने पाकिस्तानने आतंकवाद्याना हाताशी धरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न चालविला आहे आणि त्याला आपले प्रयत्न यशस्वी होताना दिसू लागल्याने त्याचा हुरूप आणि त्या सोबतच आतंकवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. पाकिस्तानचे हे प्रयत्न यशस्वी होत आहेत याचा अर्थ आपण कुठेतरी पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात अडकत आहोत आणि पाकिस्तानला अपेक्षित प्रतिक्रिया देत आहोत असा होतो. आणि असा अर्थ होणे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे !-----------------------------------------------------------------------------


उरी हल्ल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे ते बघता आपण पाकिस्तानच्या सापळ्यात तर अडकत नाही ना जाणार अशी चिंता करण्यासारखी  परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री या दोघांनीही जगापुढे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील फरक फार चांगल्या पद्धतीने समर्पक शब्दात अधोरेखित केला आहे. भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झालेत. स्वातंत्र्याच्या या ६५ वर्षात भारतातील लोकशाही तावून सुलाखून इथल्या लोकजीवनाचा भाग बनली. हिटलर विषयी प्रेम असणारी मंडळी देखील आपल्या देशात हुकुमशाहीचा पुरस्कार करीत नाही इतकी लोकशाही व्यवस्था आमच्या अंगवळणी पडली आहे. या उलट पाकिस्तानात लोकशाही रुजणे आणि अंगवळणी पडणे या स्वप्नवत गोष्टी आहेत. तिथे लोकशाही व्यवस्थे ऐवजी सैन्याची हुकुमशाही अधिक काळ चालली. त्यामुळे पाकिस्तानी जनतेच्या अंगवळणी सैनिकी शासनच पडले आहे. ते एवढे की लोकनियुक्त सरकार असले तरी तिथे खरी सत्ता लष्कराचीच चालते. अगदी आजच्या घडीला पाकिस्तानात अशीच अवस्था आहे. आमच्याकडे अत्यंत कमी संख्याबळ पाठीशी असलेल्या सरकारांना देखील लोकमान्यता असते. चंद्रशेखर यांचे सरकार याचे उत्तम उदाहरण आहे. पाकिस्तानला भारताच्या लोकशाहीधिष्टीत राज्यव्यवस्थे बाबत कायम असूया वाटत आली आहे. एक धर्मीय राष्ट्र असताना पाकिस्तानात सतत अनागोंदी राहिली आहे. एकाच धर्माच्या दोन पंथातील एकमेकांवरील हल्ल्याने पाकिस्तानला जर्जर केले आहे. भारतात तर विविध धर्म , भाषा , पंथ , जाती आणि आणखी भिन्नतेचे जे जे प्रकार जगात उपलब्ध आहेत ते सगळे भारतात आहेत आणि बऱ्याच प्रमाणात गुण्यागोविंदाने नांदतात. इथली जाती व्यवस्था आणि जाती संघर्ष हेच काय ते जगापुढे आमची मान खाली जाणारी बाब आहे. पण यात ही जातीय अस्मितेतून संघर्ष करणाऱ्यांपेक्षा या संघर्षाची लाज वाटणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीय असल्याची जगाला जाणीव आहे. ६५ वर्षात लाभलेल्या स्थिरते मुळे सतत आमचा देश प्रगती पथावर राहिला आहे. या ६५ वर्षात मंगळावर यान पाठविण्या इतकी प्रगती भारताने केली आणि या ६५ वर्षात पाकिस्तानच्या नेतृत्वाने पाकिस्तानला रसातळाला नेले. एकेकाळचा भुकेला देश भुकेवर मात करून अन्नधान्याच्याच नव्हे तर अनेक वस्तूंची निर्यात करणारा आघाडीचा देश बनला. भारत तिसरी आर्थिक सत्ता म्हणून वर आला आहे. याच काळात पाकिस्तान मध्ये कशाची निर्मिती झाली असेल तर ती धार्मिक कट्टरतेची आणि कुठले पीक आले असेल तर ते आतंकवाद्यांचे. आता पाकिस्तानची ओळख कोणती असेल तर त्याच्या भूमीवर दिवसागणिक वाढणारे आतंकवादी आणि त्यांच्या संघटना हीच आहे. दोन देशातील हेच वेगळेपण मोदीजी आणि सुषमा स्वराज यांनी जगापुढे ठेवले आहे. जगाच्या पाठीवर भारताचे हे वेगळेपण कोणाला खटकत असेल तर ते पाकिस्तानला. त्यामुळे पाकिस्तानचा सततचा प्रयत्न भारताला अस्थिर करण्याचा , भारतीय जनतेतील ऐक्य संपुष्टात येईल अशा कारवाया करण्याचा व अशा कारवायांना खतपाणी घालण्याचा राहिला आहे. भारताचे प्रगती वरचे , विकासावरचे लक्ष उडावे , किमानपक्षी विचलित व्हावे आणि सतत आपल्याशी वाद घालायला लावून भारताचा शक्तीक्षय व्हावा असाच पाकिस्तानचा प्रयत्न राहिला आहे. भारतावर दोन युद्धे लादून आणि भारताच्या हातून अपमानजनक पराभव ओढवून घेवूनही पाकिस्तानने आपले प्रयत्न थांबविले नाहीत. सैनिकी शक्ती
त भारताचा मुकाबला करणे केवळ अशक्य आहे याची जाणीव झाल्याने पाकिस्तानने आतंकवाद्याना हाताशी धरून भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न चालविला आहे आणि त्याला आपले प्रयत्न यशस्वी होताना दिसू लागल्याने त्याचा हुरूप आणि त्या सोबतच आतंकवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. पाकिस्तानचे हे प्रयत्न यशस्वी होत आहेत याचा अर्थ आपण कुठेतरी पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात अडकत आहोत आणि पाकिस्तानला अपेक्षित प्रतिक्रिया देत आहोत असा होतो. आणि असा अर्थ होणे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.


उरीचा दहशतवादी हल्ला आणि त्याला उत्तर देणारे 'सर्जीकल स्ट्राईक' या दरम्यान देशात ज्या प्रतिक्रिया उमटत होत्या आणि 'सर्जीकल स्ट्राईक' नंतर ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत. उरीचा हल्ला झाल्या नंतर देशात युद्धोन्माद निर्माण करण्याचे प्रयत्न न्यूज चैनेल आणि सोशल मेडियावर झाला. युद्धोन्मादी चर्चेत अनेकांनी आपणही आतंकवादी पथके तयार करून त्या पथकांमार्फत पाकिस्तानात हल्ले घडवून आणण्याच्या सूचना केल्या. या मूर्खपणाच्या सूचनेला अनेक मूर्खांचे अनुमोदन लाभले नसते तर नवल. पाकिस्तानला हेच हवे आहे. भारत आमच्या सारखाच आहे हेच त्याला जगाला दाखवायचे आहे आणि आपण पाकिस्तानच्या सापळ्यात अलगद अडकत आहोत . आतंकवादी कट्टर धर्मांधतेतून निर्माण होत आहेत. आपल्याकडे त्यांचे पीक घ्यायचे तर तशीच कट्टर धर्मांधतेची पेरणी करावी लागेल. मग पाकिस्तान आणि आपल्यात काय फरक राहणार आहे. आज मोदीजी आतंकवादा विरुद्ध जी भूमिका घेत आहेत आणि काही प्रमाणात का होईना पाकिस्तान विरुद्ध आंतरारष्ट्रीय जनमत बनत आहे ते भारताने पाकिस्तान सारख्या उचापती केल्या तर बनणार नाही. उरी हल्ल्या नंतर सर्जिकल स्ट्राईक होई पर्यंत एवढा युद्धोन्माद निर्माण झाला होता की तो काबूत आणण्यासाठी मोदी सरकारला सर्जीकल स्ट्राईक केल्याची बातमी जाहीर करावी लागली. पाकिस्तानने आपली विश्वासार्हता गमावली असल्याने आंतरारष्ट्रीय जगात भारताच्या सर्जीकल स्ट्राईक बद्दल विपरीत प्रतिक्रिया आली नाही. असे निर्णय सरकार आणि सैन्याला घेवू द्यायचे असतात. त्या बाबतीत लोकांचा दबाव पडणे ही अनिष्ट परंपरा पडली असेच म्हणावे लागेल. भावनिक उन्मादात आपण काय करतो आहोत याचे अनेकांचे भान सुटले. भावनिक उन्माद पाकिस्तानच्या कलाकारांवर काढला आणि त्यांना देश सोडायला भाग पाडले. पाकिस्ताननेही भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली. शांतपणे विचार केला तर कोणाचे काय नुकसान झाले हे कळेल. फायदा -तोटा कलाकार किंवा चित्रपट सृष्टीचा नाही तर देशाचा बघायला हवा. भारताचे चित्रपट पाकिस्तानात अतिशय लोकप्रिय आहेत. पाकिस्तान मध्ये पाठ्यपुस्तकातूनच भारता बद्दल चुकीची माहिती दिली जाते आणि घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. अशा वातावरणात पाकिस्तानात भारतीय चित्रपट लोकप्रिय होणे ही सोपी आणि साधी गोष्ट नाही. भारतीय चित्रपट हे भारत आणि पाकिस्तानच्या जनतेतील दुवा ठरले आहेत. भारतीय चित्रपटाच्या झंझावाता पुढे पाकिस्तानी चित्रपट सृष्टी कोलमडत असताना आपल्या अविवेकी आणि नादानपणा मुळे पाकिस्तानच्या चित्रपट सृष्टीला जीवदान देवून आपण आपले नुकसान आणि पाकिस्तानचे भले केले आहे. अशा अविवेकी आणि विचारशून्य लोकांच्या दबावामुळे सरकारवर पाकिस्तानशी युद्ध करायची वेळ आली तर कोणाचे काय नुकसान होईल याचाही विचार करायला हवा. युद्ध झाले तर पाकिस्तानची हार निश्चित आहे आणि याची पाकिस्तानला चांगलीच जाणीव आहे. तरीही पाकिस्तानला भारताशी संघर्ष करण्याची खुमखुमी आहे. कारण पाकिस्तान जवळ गमावण्यासारखे काही नाही. आधीच अमेरिका-चीन सारख्या महासत्तेच्या कुबड्यावर पाकिस्तान उभा आहे. या युद्धामुळे त्याचे कितीही नुकसान झाले तरी पुन्हा उभे राहायला त्याला या कुबड्या मिळणार आहे. युद्धात विजय ठरलेला असूनही भारताला मात्र युद्धाच्या झळा जास्त बसतील. पाकिस्तान कधीच आर्थिक महासत्ता बनणार नाही , पण युद्ध झाले तर आपली आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गात तो मोठा अडथळा ठरणार आहे. प्रगतीच्या आणि आर्थिक विकासाच्या रुळावरून भारताची गाडी घसरणार असेल तर पाकिस्तान युद्धातील पराभवाची नामुष्की पचवायला तयार असणार आहे. यापूर्वी दोनदा त्याने ती पचविलीच आहेत. चीन पाकिस्तानच्या बाजूने असण्याचे एक कारण त्याचे आर्थिक हितसंबंध आहे , पण दुसरे महत्वाचे कारण पाकिस्तानला बळ देवून भारताची आर्थिक घोडदौड रोखण्याचा हेतू देखील आहे. पाकिस्तान बरोबर युद्ध झाले आणि ते आपण जिंकणार असलो तरी आपली अर्थव्यवस्था १०-२० वर्षांनी मागे जाईल आणि जागतिक व्यापारात याचा सर्वात मोठा लाभ चीनला मिळेल. पाकिस्तान चीनच्या बाजूने झुकला आहे हे खरे असले तरी चीनने भारताच्या सर्जीकल स्ट्राईकचा निषेध केलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कारण अशा बाबतीत पाकिस्तानचे समर्थन करणे जगाचे नेतृत्व करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या चीनला परवडणारे नाही. तेव्हा भारतात चीन विरोधी वातावरण निर्माण करून चीनला पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूला उभे करण्याचा जनतेच्या पातळीवर सुरु असलेला नादानपणा तात्काळ थांबविला पाहिजे. तेव्हा पाकिस्तानने लादले तरच युद्धाला सामोरे गेले पाहिजे. युद्ध सुरु करणे आपल्या फायद्याचे नाही हे युद्धोन्माद पसरविणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भारताला पाकिस्तान बरोबरचे युद्ध विकत घ्यायचे नसल्याने सर्जीकल स्ट्राईकचे चित्रण प्रसारित न करण्याचा आणि चीनशी नवे व्यापार करार करीत संवाद कायम ठेवण्याचा भारत सरकारचा प्रयत्न स्तुत्य समजला पाहिजे.

याचा अर्थ पाकिस्तानच्या कुरापती आणि गमजा अशाच चालू द्याव्यात असे नाही. जगातील आपल्या स्थानाला आणि आपल्या वाटचालीला धोका निर्माण न होता पाकिस्तानला संकटात आणण्याचे अनेक उपाय भारताला योजता येतील. अनेक उपाय तर देशांतर्गतच करण्याची गरज आहे जेणेकरून पाकिस्तानची उपद्रव क्षमता कमी आणि क्षीण होईल. आधी तर आपल्याला आपले घर ठिक करण्याची गरज आहे. भारत-पाक सीमेवरून आणि विशेषत: काश्मिरातील नियंत्रण रेषेवरून भारतात येणाऱ्या आतंकवाद्यांना रोखणे सोपे नाही हे खरे. भारतात घुसणाऱ्या अशा आतंकवाद्यांनी गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी हल्ला केला तर तो रोखणे कठीण आहे हे पण मान्य. पण सुरक्षा दलाचे तळ आहेत अशा ठिकाणी घुसण्यापासून आपण आतंकवाद्यांना रोखू शकत नाही हे मान्य होण्यासारखे नाही. ज्या चार आतंकवाद्यांनी भारताला पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवले त्या आतंकवाद्यांना आपले काही नुकसान होण्या आधी मारणे अशक्य नव्हते. पण पठाणकोटच्या हल्ल्यानंतरही आपण गाफील राहिलो आणि हकनाक आमच्या १८ जवानांचा बळी गेला. पठाणकोट येथे वायुदलाच्या विमानतळ हे अतिशय सुरक्षित आणि संवेदनशील असे ठिकाण . अशा ठिकाणी आतंकवादी घुसतात ही आमच्या सुरक्षा व्यवस्थेतील कमजोरी आहे. आमची सुरक्षा व्यवस्था आम्ही चोख ठेवली तर पाकिस्तानच्या ५० टक्के पर्यंतच्या कुरापतीना सहज आळा घालता येण्या सारखा आहे. दुसरी आमची कमजोर नस काश्मीर आहे. जगात कोणतेही राष्ट्र - अगदी चीन सुद्धा - भारत-पाक विवादात उघडपणे पाकच्या बाजूने उभे राहण्याच्या स्थितीत नाही. कारण पाकिस्तानातील आतंकवादी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि पाकिस्तान त्यांना रोखत नाही हे जगाला दिसते. पण काश्मिर बाबतचा पाकिस्तानचा प्रचार इतर राष्ट्रांना भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहू देत नाही. गेल्या ३ महिन्या पेक्षा अधिक काळापासून काश्मीर मध्ये संचारबंदी सुरु आहे आणि ही बाब आंतराराष्ट्रीय राजकारणात भारताच्या विरुद्ध जाणारी आहे. काश्मीरची कोंडी फोडण्याचा केंद्र आणि राज्य सरकारकडून गंभीरपणे प्रयत्न होत नसल्याने आपण पाकिस्तानच्या हाती आयते कोलीत देत आहोत. गरज पाकव्याप्त काश्मिर मधील जनतेला पाकिस्तान विरुद्ध उभे करण्याची असताना आपण आपल्याच नागरिकांना आपल्या विरुद्ध उठाव करण्याची संधी देत आहोत. काश्मिर मध्ये अशी टोकाची परिस्थिती या आधीही उद्भवली होती . पण त्या त्या वेळी सरकारने जनतेशी संवाद साधत , स्थानिक नेतृत्वाशी संवाद साधत परिस्थिती पूर्वपदावर आणली होती. आता मात्र संवादाऐवजी सैन्य बळावर परिस्थिती नियंत्रणात आणण्याला प्राधान्य दिल्या गेल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अनुकूल वातावरण तयार होताना दिसत नाही. काश्मीरचे  जनजीवन सुरळीत करण्याला प्राधान्य दिले तर पाकिस्तानच्या प्रचारातील हवा निघून जाईल आणि बऱ्याच कुरापती थांबतील. भारत भूमीत आतंकवादी तयार होवू शकत नाही. इथल्या मातीत स्वातंत्र्यवादीच तयार होवू शकतात व इथली माती स्वातंत्र्यवादच जोपासू शकते . तेव्हा पाकिस्तानात आतंकवादी कारवायांना बळ देण्यापेक्षा स्वातंत्र्यवादी कारवायांना तन मन धनाने उघड समर्थन देणे ही भारतासाठी स्वाभाविक गोष्ट आहे. भारताने बलुची असो की इतर प्रांतातील स्वातंत्र्यवादी असोत त्यांना पाकिस्तान विरुद्ध आपली भूमी वापरू दिली पाहिजे. ज्या स्वातंत्र्यवादी नेत्यांना , विचारवंताना आणि कलाकारांना आश्रय पाहिजे त्यांना भारताने जाहीर आमंत्रण देवून आश्रय दिला पाहिजे. पाकिस्तान ही पाक भूमी नसून जगातला नरक कुठे असेल तर तो पाकिस्तान आहे हे जगाला दाखवून पाकिस्तानला खिळखिळे करण्याची प्रत्येक संधी भारताने शोधली पाहिजे.  अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्याची यापुढेही गरज पडेल आणि ते होतीलही. पण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यवादी चळवळींना बळ देवून पाकिस्तानची डोकेदुखी कायमची संपविण्याची लांबपल्ल्याची रणनिती तयार करण्याची या घडीला गरज आहे. पाकिस्तानने टाकलेल्या सापळ्यात न अडकता पाकिस्तानला कायमचा धडा याच मार्गाने शिकविता येणार आहे.
-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------

Thursday, September 29, 2016

गांधींचे पुनरावलोकन

स्वातंत्र्यापूर्वी आंबेडकर आणि गांधी दोहोनीही जाती निर्मूलनाचे प्रयत्न केलेत. बाबासाहेबांनी दलित समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मोठे यश मिळविले. सवर्ण मानसिकता बदलण्यात गांधीना म्हणावे तसे यश मिळाले नाही हे आजचे उच्च जातीचे उठाव सिद्ध करतात. जाती निर्मूलनाचा प्रश्न आता दलित समाजाचा राहिला नाही. सवर्ण समाजाचा तो प्रश्न आहे आणि त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी  गांधींचे अपुरे कार्य पुढे नेण्याची गरज आहे. ज्यांना जाती निर्मुलन हवे त्यांनी गांधीना आपले शत्रू मानणे सोडले पाहिजे . आजच्या गांधी जयंतीचा हाच संदेश आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

आपला समाज जेवढा जाती धर्मात विभागला आहे तेवढेच सकल मानव जातीच्या उध्दारासाठी काम केलेल्या महापुरुषांना देखील जाती-धर्मात विभागून टाकले आहे. जाती-धर्मात विभागला गेला नसेल तर तो कोणाचाच नसतो. कोणत्या जाती-धर्माने त्याला आपले मानले नाही तर वाळीत टाकलेल्यांची जशी अवस्था होते ते भोग त्याच्या वाट्याला येतात. स्वातंत्र्यलढ्याचे प्रदीर्घकाळ नेतृत्व केलेल्या महात्मा गांधींच्या बाबतीत असेच झाले आहे. देशातील कोणत्याच जाती-धर्माने त्यांना 'आपले' मानले नाही. आता या आधारे कोणाला त्यांना मोठे मानायचे असेल तर मानता येईल आणि छोटे मानायचे असेल तर तसेही करता येईल. प्रेषिताचे पाय मातीचे असतात हे आम्हाला मान्य नसते. त्यामुळे आम्हाला वाटणारी एखादी चूक खलनायक बनवून टाकते. जाती धर्मात विभागल्या गेलेल्या महनीय व्यक्ती बद्दल लिहितांना फार तोलून मापून लिहावे लागते. कोणाच्या कशा भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो. गांधी आवडण्याची आणि नावडण्याची अनेक कारणे लोक देत असतात. ज्या कारणासाठी गांधी कोणालाच आवडत किंवा नावडत नाहीत अशा वेगळ्या कारणासाठी गांधी मला आवडतात. ते कारण म्हणजे गांधीबद्दल तुम्हाला काहीही बोलता येते आणि लिहिता येते. आता काहीही लिहिण्यात वाईट अर्थच अनुस्यूत असतो. अर्थात या अर्थानेच गांधीजी बद्दल मुक्तपणे लिहिता येते. शेंबड्या पोरापासून ते बुकर पारितोषक मिळविणाऱ्या विदुषी पर्यंत असे लिहिण्या बोलण्याचे स्वातंत्र्य घेता येते आणि त्याबद्दल कोणाचेही शिव्याशाप ऐकावे लागत नाहीत. देशातील दुसऱ्या कोणत्याही महनीय व्यक्तीबद्दल तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळत नाही. उभी-आडवी किंवा आडवी-तिडवी चिरफाड आणि चिकित्सा करणे आपल्या देशात केवळ गांधींच्या बाबतीत शक्य आहे. गांधींच्या बाबतीत आपल्या देशात लिहितांना एक सावधानता मात्र बाळगावी लागते. गांधीची भलावण तुम्हाला गोत्यात आणू शकते. गांधींबद्दल कितीही वाईट बोलले तर तुमच्या अंगावर कोणीच येणार नाही, एखाद्या मुद्द्यावर तुम्ही त्यांची भलावण केली तर मात्र कोण कसे अंगावर येईल याचा नेम नसतो. इतर नेत्यांमध्ये आणि गांधींमध्ये हा एक फरक आहे. इतर नेत्यांच्या भलावणीने कोणीच तुमच्या अंगावर येणार नाही. नेत्यांबद्दल आम्ही भावनेने विचार करतो. त्याची चिकित्सा करता येत नाही आणि मग त्या नेत्यांबद्दल पूर्वी जशी राजा चुकूच शकत नाही अशी भावना असायची तशीच भावना आजकाल अनुयायांमध्ये ते ज्यांना आपला नेता मानतात त्यांच्या बद्दल असते. लोकशाही खरे तर लोकाधारित व्यवस्था आहे पण आमच्या अशा दुर्गुणामुळे ती नेताधारित व्यवस्था बनली आहे. गांधींची जशी चिकित्सा संभव आहे तशी इतर नेत्यांची संभव झाली तरच आपली वाटचाल खऱ्याखुऱ्या लोकाधारित लोकशाहीकडे होईल.


गुजरातमध्ये दलितांवर नुकतेच घडलेले अत्याचार आणि महाराष्ट्रात सुरु असलेले मराठा आंदोलन यामुळे पुन्हा एकदा देशातील जात वास्तव आणि जात निर्मूलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशावेळी गांधींच्या जाती निर्मुलन विषयक प्रयत्नांच्या यशापयशाची चिकित्सा समयोचित ठरेल. दलित समाजाची अशी भावना आहे की गांधीनी दलितांसाठी काहीही केले नाही. उलट त्यांना जे मिळू शकत होते ते मिळू दिले नाही ही भावना पुणे कराराने जास्तच तीव्र बनली. गोलमेज परिषदेतील गांधी-आंबेडकर मतभेदांनी आंबेडकरवाद्यात गांधी दलित विरोधी असल्याची भावना वाढीस लागली. सुरुवातीच्या काळात गांधीनी कर्माधारित चातुवर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कारही केला होता .  त्यावेळी हयात असलेल्या दलितांना नेमके काय वाटत होते हे सांगता येत नाही . कारण त्यावेळी दलितातील मोठा वर्ग जसा आंबेडकरा सोबत होता तसाच लक्षणीय संख्येत दलित गांधीजी सोबतही होते. आज मात्र ठामपणे सांगता येते की आजच्या दलितांमधील गांधी विरोधी भावनेचा आधार हेच मुद्दे आहेत आणि याचमुळे गांधींसाठी त्यांनी आपल्या मनाचे दरवाजे पक्के बंद केले आहेत. पण बऱ्याचदा त्या काळच्या परिस्थितीत केलेला विचार , घ्यावे लागलेले निर्णय यावर पुनर्विचार केला तर त्यावेळी चुकीचे वाटलेले निर्णय बरोबर वाटतात किंवा त्यावेळी बरोबर वाटलेले निर्णय आज चुकीचे वाटतात. म्हणून विचारासाठी नेहमी खुले असणे गरजेचे असते. कर्माधारित चातुर्वण्याचा पुरस्कार करणाऱ्या गांधीने उघड्या डोळ्याने परिस्थिती पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की चातुर्वण्य तर जन्माधारित आहे. आणि हे जन्माधारित चातुर्वण्य मोडीत काढण्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हाती घेतले. गांधींचा भंगीमुक्ती कार्यक्रम या दिशेने पडलेले एक पाउल होते. आपली घाण भंगी जमातीनेच का म्हणून स्वच्छ करावी , ती इतरांनीही केली पाहिजे हे त्यांनी मांडले. या कामात त्यांनी अनेक उच्चवर्णीयांना लावले. मेलेल्या जनावराचे कातडे विशिष्ट जमातीनेच का काढावेत हा प्रश्न उपस्थित करून ते थांबले नाहीत तर उच्चवर्णीयांना याकामी त्यांनी लावले. कातडे काढणे , चपला बूट तयार करणे ही कामे उच्चवर्णीयांना करायला लावणे त्याकाळी सोपे नव्हते. गांधींचे विचार पुस्तक वाचून बनले नव्हते. ते दांडगे वाचकही नव्हते आणि विद्वान तर अजिबात नव्हते. अनुभव घेत बदलत ते पुढे गेले. पण गांधीनी चातुर्वण्याचा पुरस्कार एकेकाळी केला होता म्हणून डोळे बंद करून घेतले तर गांधींचे चातुर्वण्य मोडीत काढण्याचे कार्य दृष्टीस पडत नाही. रोटी-बेटी व्यवहार झाले तरच जाती मोडतील या निष्कर्षाप्रत आल्यावर त्यांनी सजातीय विवाहाला उपस्थित राहणार नाही तर ज्या जोडप्यातील एक दलित आहे अशाच विवाहात उपस्थित राहण्याचे घोषित करून ते पाळले. अहमदाबाद आश्रम स्थापन करण्यासाठी मदत करणाऱ्या दात्यांचा दबाव आणि विरोध झुगारून त्यांनी आश्रमात दलित कुटुंबाना ठेवले. जाती निर्मूलनाबाबत गांधी-आंबेडकर यांच्यात मतभेद होते असे म्हणण्या पेक्षा या बाबतीतल्या दोघांच्या भूमिका आणि कार्यक्षेत्र वेगळे होते असे म्हणणे वस्तुस्थितीच्या जास्त जवळ आहे. दलितांना संघटीत करून , शिक्षित करून जात झुगारून द्यायला लावणे आणि माणूस म्हणून त्याला सन्मान मिळवून देणे हे आंबेडकरांचे कार्य होते. तर अस्पृश्यता पाळणाऱ्या , दलिताला हीन समजणाऱ्या सवर्ण हिंदूंच्या खांद्यावर बसलेले जातीचे भूत उतरविण्याचा गांधींचा प्रयत्न होता. दलितांना नीच समजणाऱ्या नीच प्रवृत्तीला दूर करून सवर्णातील माणूस जागा करण्याचा गांधींचा प्रयत्न होता. जाती निर्मुलनासाठी आंबेडकर आणि गांधी भिन्न क्षेत्रात भिन्न दिशेने करीत असलेले प्रयत्न एकमेकांना पूरक होते. जाती निर्मुलनासाठी दोघांचे प्रयत्न यशस्वी झाले असते तर आजचे जात वास्तव बदलले असते. पण आंबेडकर आपल्या कार्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेत आणि गांधीना पाहिजे तसे यश मिळाले नाही . त्याचा परिणाम आज वेगवेगळ्या रुपात पाहात आहोत. दलितांना जात सोडा म्हणून सांगायची गरजच राहिली नाही. त्याच्यातले माणूसपण जागे झाले आणि त्याने ते जोपासले आहे. पण जाती व्यवस्थे संदर्भात सवर्णातील माणूस जागा करण्याचे काम जे गांधीजी करत होते ते अपुरेच राहिले आहे. सवर्णातील माणूस जागा न झाल्याने त्याला दलितातील ताठ कण्याचा माणूस कुठे तरी त्याच्या नजरेला बेचैन करीत आहे. त्यामुळे गांधींचे जातीनिर्मुलनाचे कार्य आणि कार्यपद्धती तितकीच महत्वाची आहे याचे  जातीनिर्मूलनाच्या चळवळीतील प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. आज हे भान नसल्याने जाती निर्मूलनाच्या चळवळी समोर अंधार आहे.
इतिहासातील ओझी वागवत शक्तिपात करण्याऐवजी भविष्यावर नजर ठेवून काय उपयोगाचे आहे ते ठरविता आले आहे. दलित समाजाने विशेषत: त्या समाजातील शिक्षित तरुणाने १९३२ साली गांधी-आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणे कराराचे ओझे अजून उतरविले नाही आणि उतरविण्याची मानसिकताही दिसत नाही. गेल्या २४ सप्टेंबरला या कराराला ८४ वर्षे पूर्ण झालीत. इतक्या वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले . वाहून गेली नाही ती त्या कराराने आपल्यावर खूप मोठा अन्याय झाला आणि गांधीनी तो केला ही भावना. उलट दिवसेंदिवस त्या भावनेला खतपाणी घालण्याचाच प्रयत्न झाला. विशेष म्हणजे तो करार मागे टाकून बाबासाहेब त्यांच्या हयातीतच पुढे निघून गेले होते हे आजच्या दलित तरुणाला दिसत नाही कारण गांधी द्वेषाने त्याला काहीसे आंधळे केले आहे. बुद्ध आणि द्वेष एकत्र कसे नांदू शकतात हे न उलगडणारे कोडे आहे. पुणे करारा संबंधात गांधींची एक चूक आणि ती फार मोठी चूक आहे ती म्हणजे त्यांनी आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणाचा शस्त्र म्हणून केलेला वापर. गांधींच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांच्या हातून घडलेली ही सर्वात मोठी हिंसा आहे. पण त्यांची मागणीच चुकीची होती आणि त्यामुळे दलितांवर खूप मोठा अन्याय होवून काळाची चक्रे उलटी फिरली हे प्रतिपादन अतिरंजित आणि सत्यापासून दूर आहे. ज्यांना असे वाटते त्यांनी पुणे करार आणि या करारावर संविधान सभेत झालेली चर्चा समजून घेतली पाहिजे. पुणे करारातील सर्वात मोठी जमेची बाजू कोणती तर पहिल्यांदा जातीवरून दलितांविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि त्यावरून त्यांना कोणतीही संधी नाकारल्या जाणार नाही याला प्रथमच मान्यता देण्यात आली. पुढे हेच तत्व घटनेत समाविष्ट झाले. दुपटीपेक्षा अधिक राखीव जागा - ७१ ऐवजी १४८ - पदरात पडणे हा मोठा अनुषंगिक लाभ आहेच. दलित उमेदवार दलितांनीच निवडलेला असावा हे आंबेडकरांचे मत आणि दलित उमेदवार निवडीत सवर्ण समाजाची भूमिका राहिली तर दोन समाजातील व्यवहार आणि संबंध वाढतील हे गांधींचे मत या दोन्ही मतांचा संगम असलेले कलमच करारात मान्य करण्यात आले. दलितांनी मतदान करून निवडलेल्या पहिल्या चार उमेदवारांनाच निवडणुकीत उभे राहता येईल आणि त्यातून एकाची निवड करण्यासाठी दलित आणि सवर्ण दोघानाही मतदान करता येईल. बाबासाहेबांना त्यावेळी हा करार फारसा रुचला नव्हता आणि परिस्थितीच्या दडपणाखाली त्यांना मान्यता द्यावी लागली याची खंत होती. मी आधी म्हंटले तसे एखादा निर्णय त्यावेळी पटला नाही तरी नंतर मागे वळून तिकडे पाहताना तो पटू शकतो. आंबेडकरांचेही तसेच झाले. त्यांचा वेगळ्या मतदार संघाचा आग्रह नंतर राहिला नाही. तो त्यांचा आग्रह कायम राहिला असता तर नव्या संविधानात त्याची तरतूद करण्याचे त्यांनी शर्थीने प्रयत्न केले असते. पण तसे अजिबात झाले नाही. बाबासाहेब आणि संविधान सभेतील त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी वेगळ्या मतदार संघावरील चर्चेत वेगळा प्रस्ताव सादर केला होता हे खरे आहे. पण त्यांचा प्रस्ताव चर्चेला आला तेव्हा बाबासाहेब गैरहजर राहिले. मद्रास प्रांतातील खुल्या मतदार संघातून निवडून आलेले नागप्पा या बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी तो प्रस्ताव मांडला. प्रस्ताव मांडताना त्यांनी मान्य केले की वेगळे मतदार संघ हानिकारक आहेत आणि पुणे करारात दुसऱ्या स्वरुपात वेगळ्या मतदार संघालाच मान्यता देण्यात आली होती. ती चूक सुधारण्यासाठी आपण हा नवा प्रस्ताव ठेवत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. याच चर्चेत दुसरे एक दलित सदस्य खांडेकर बोलले तेव्हा त्यांनी ज्यांचा वेगळ्या मतदार संघा बाबत आग्रह होता ते बाबासाहेब या चर्चेत गैरहजर असल्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी पुढे जी माहिती संविधान सभेत दिली ज्याचा प्रतिवाद कोणीही केला नाही ती महत्वाची आहे. संविधान सभेच्या अल्पसंख्यांक उपसमितीत बाबासाहेबांनी वेगळ्या मतदार संघाची मागणी करण्यासाठी आपल्याकडे कारणे नाहीत असे सांगत तो प्रस्ताव पुढे रेटणार नसल्याचे सांगितल्याची माहिती खांडेकरांनी दिली. शेवटी प्रस्ताव सादर करणारे नागप्पा यांनी देखील आपल्या समाजाच्या लोकांना बहुसंख्येपुढे झुकलो असे वाटू नये म्हणून हा प्रस्ताव ठेवल्याचे सांगत तो प्रस्ताव मागे घेतला. ही सगळी चर्चा कोणालाही वाचता येईल आणि अर्थ काढता येईल. महत्वाचा मुद्दा हा आहे की , बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान लागू झाल्या नंतर पुणे करार निरर्थक झाला आणि वेगळ्या मतदार संघा बद्दलचा बाबासाहेबांचा आग्रह देखील संपला होता. तेव्हा इतिहासात ज्या मुद्द्यावरून कटुता निर्माण झाली तो मुद्दाच संपला मग कटुता देखील संपविली पाहिजे. जाती निर्मुलनासाठी ही कटुता संपणे आवश्यक आहे. कारण जाती निर्मूलनाचा पुढचा मार्ग सवर्ण वस्त्यातून जातो आणि सवर्णातील माणूसपण जागे करण्यासाठी आपल्याला गांधींची गरज आहे.
----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------------------

Thursday, September 22, 2016

मराठा मोर्चेकरी तरुणाईशी हितगुज

मराठा समाजाची कोंडी झाली आहे हे सत्य आहे. लाखोचा जनसागर आणि त्यातही सार्वजनिक ठिकाणी कधी न येणाऱ्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे ते कोंडीतून होत असणाऱ्या घुसमटीतून. पण संख्येचे विक्रम मोडत निघालेल्या मोर्च्याच्या मागण्या पाहिल्या की त्या मान्य झाल्या तरी डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे होईल. समाजाची कोंडी दूर करण्यासाठी काय करता येईल  याचा वेगळा विचार मोर्चात सामील तरुण-तरुणींनी केला पाहिजे आणि या कोंडीतून समाजाला बाहेर काढण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे.
--------------------------------------------------------------------------------------------


महाराष्ट्रात सध्या विक्रमी संख्येतील मराठा मोर्चाचे सत्र सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निघत असलेल्या या मोर्चामध्ये प्रत्येकवेळी आधीच्या मोर्चातील संख्येचा विक्रम मोडल्या जात आहे. मोडल्या जात नाही ती शिस्त, नियोजन आणि संयम. घाणीच्या रुपात मोर्चाचे अवशेष मागे राहणार नाहीत याची घेतली जाणारी काळजी पुढे निघणाऱ्या अनेकांच्या अनेक मोर्चासाठी आदर्श ठरणारी आहे. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनात , मेळाव्यात लोक आपली भाकरी बांधून येत तसेच या मोर्चातही येत आहेत. अशा वेळी दानशूर मंडळी मधील दानशूरता जागी होवून अन्नछत्राचे जे पेव फुटते तसे फुटलेले नाही हे आणखी एक वेगळेपण डोळ्यात भरते.  नेत्यांना दादासाहेब , काकासाहेब म्हणत त्यांच्या मागेपुढे करणारा समाज या नेत्यांना मोर्चामध्ये स्थान आणि महत्व देतांना दिसत नाही. मराठा समाजाची मोर्चातून दिसंणारी ताकद लक्षात घेवून आता नेतेही साधे मोर्चेकरी म्हणून मोर्चात सामील होण्यात धन्यता मानत आहे. नेत्यांची काहीच भूमिका नाही असे मानणे भाबडेपणाचे होईल. आपल्या कार्यकर्त्यांना मोर्चाच्या बाबतीत कानमंत्र देणे , मोर्चाला आर्थिक पाठबळ पुरविणे अशा गोष्टी नेते मंडळी पडद्याआडून करीत असणारच. पुढचे राजकारण लक्षात घेवून ते करण्यात काही गैर नाही. एकमात्र खरे नेते पडद्यामागे आहेत आणि लोक पुढे आहेत हा एक चांगला बदल या निमित्ताने घडून येतांना दिसत आहे.  पण या सगळ्या वैशिष्ट्यापेक्षा मोर्चाचे विलोभनीय वैशिष्ट्य कोणते असेल तर मोर्चात सामील तरुणाई. निवडणुकीच्या काळात हा तरुण नेहमीच सक्रीय राहात आला आहे. नेत्यांनी दिलेल्या गाड्यात बसून धूळ उडवत आणि घसा खरवडून जय हो म्हणत फिरणारा आणि या श्रमाचे परिहार करण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत धाब्या-धाब्या वर झिंगणारी तरुणाई एका वेगळ्या रुपात आपल्या समोर येत आहे. कोणताही कार्यक्रम म्हंटले की तरुण मंडळीचा उत्साह फसफसत असतोच. पण या मोर्चात  फसफसणाऱ्या उत्साहाला संयमाची जोड आहे. कदाचित या संयमी उत्साहामुळे मराठा समाजातील मुली आणि महिला मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने दिसत आहेत. मागच्या मोर्चाचा विक्रम मोडत पुढचा मोर्चा निघतो याचे कारण महिलांच्या आणि मुलींच्या वाढत्या संख्येतील सहभाग हे आहे. या आधी शेतकरी आंदोलनात मराठा समाजाच्या महिला मोठ्या संख्येत सामील झाल्या होत्या. पण मराठा समाजाच्या सामाजिक-राजकीय कार्यक्रमात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्या आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे मराठा पुरुष आपल्या स्त्रियांना मोर्चात केवळ सहभागीच होवू देत नाही तर मोर्चात त्यांना मान देतांना दिसत आहे. घरच्या बैठकीत पुरुषा सोबत बसायला जिथे बंदी असते तिथे रस्त्यावर यायला मोकळीक नवलाईच आहे. बैठकीत यायला बंदी असल्याने भिंतीच्या आडोशाला उभे राहून होणारी चर्चा ऐकताना तिने केलेल्या सूचनेवर 'गप्प बस . तुला काय कळतेय' असे हमखास पुरुषी खेकसणे ऐकण्याची सवय असलेल्या महिलांना मोर्चात पुढे येण्याची संधी मिळणे ही खरोखरीच क्रांती आहे. मोर्चाचे 'मराठा क्रांती मोर्चा' हे नामकरण या मुद्द्यावर कसोटीला उतरणारे आहे. महिलांचा सहभाग , महिलांचे नि मुलींचे पुढारपण , तरुणाईची सळसळ , सर्वसामान्यांचा हुंकार , शांतीमयता , शिस्तबद्धता या क्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक गोष्टी या मोर्चात नक्कीच आहेत. पण मोर्चाची क्रांती याच्या पुढे जाताना कुठे दिसत नाही हा खरा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे.   वाढत्या संख्येतील सहभागाने प्रत्येक ठिकाणच्या आयोजकांचा हुरूप वाढत आहे. वाढती संख्या वगळता हे मोर्चे मागच्या पानावरून पुढे चालू असल्या सारखे सुरु आहेत. प्रत्येक मोर्चागणिक आशयात , मागण्यात आणि दिशेत जी स्पष्टता यायला हवी तसे काही होताना दिसत नाही. असेच चालत राहिले तर हे मोर्चे मराठा समाजाच्या शक्तीप्रदर्शनाचे सोहळे तेवढे ठरतील. शक्तीप्रदर्शनाचे राजकीय उपयोग आणि परिणाम होतातच पण त्यातून अपेक्षित बदल आपोआप घडत नाही. त्यासाठी ती दिशा, दृष्टी आणि स्पष्टता असावी लागते. याबाबत मोर्चातील लोकांना , तरुण-तरुणींना जे प्रश्न विचारले जातात त्याच्या उत्तरातून दिशा आणि दृष्टीच्या स्पष्टतेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो आणि अण्णा हजारेच्या दिल्लीतील आंदोलनाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना असा प्रश्न पडतो.


फार जुनी गोष्ट नाही. ५ वर्षापूर्वी काय घडले ते आठवा. असेच शिस्तबद्ध मोर्चे देशभर निघत होते. दिल्लीच्या रामलीला मैदानातील ते १० दिवस रोज गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित करीत होते. दिवसागणिक गर्दी वाढत होती तशी आंदोलनाचे नेते असलेले हजारे-केजरीवाल-बेदी यांच्या डोक्यातही ती गर्दी जावू लागली होती. मनमोहन सरकार केव्हाच शरण आले होते. लोकपाल तत्वश: मान्य होवूनही अण्णा मैदानातून हटायला तयार नव्हते. गर्दी वाढली की अण्णांचा ताठरपणा वाढत होता. गर्दी डोक्यात गेल्याने नेमके काय साध्य करायचे याचा विसर पडल्या सारखी अवस्था झाली होती. साध्या बाबतची अस्पष्टता म्हणा किंवा मनात एक आणि ओठात दुसरे म्हणा त्यामुळे पुढे काय घडले हे सगळ्या समोर आहे. अगदी तेव्हा त्याक्षणी हवा असलेला लोकपाल आज ५ वर्षे उलटून गेली तरी त्याची नियुक्ती झालीच नाही. या आंदोलनाने निर्माण केलेल्या वातावरणाच्या परिणामी मोदी सरकार आले त्या सरकारला तर लोकपाल आणण्याची कोणतीच घाई दिसत नाही. कोणाची तशी मागणीही होत नाही. दस्तुरखुद्द अण्णांना अधूनमधून एखादे वक्तव्य करण्या पलीकडे आता त्या मागणीचे अप्रूप किंवा सोयरसुतक राहिले असे वाटत नाही. लोकपालसाठी त्यावेळी सारा देशच हातघाईवर आला होता. पण अण्णा आज रामलीला मैदानात तत्काळ लोकपाल आणा म्हणून उपोषणास बसले तर त्यांच्या अवतीभवती बोटावर मोजण्याइतके लोक असतील आणि मैदान ओस पडलेले असेल. ते आंदोलन सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते आणि हे आंदोलन एका जातीच्या लोकाचे असले तरी त्यात पुष्कळ साम्यस्थळे आहेत. त्या आंदोलनात अण्णा टोपी घातलेले लोक होते . या आंदोलनात मराठा क्रांतीची टोपी आहे. गर्दी हे दोन्ही आंदोलनाचा कणा आहे. मागणी बद्दलची अस्पष्टता आणि परिणामाचा भाबडा अंदाज दोन्हीकडे सारखाच दिसतो.त्या आंदोलनात लोकपालमुळे देशातील भ्रष्टाचार संपून सगळे सुजलाम सुफलाम होणार होते आणि या आंदोलनात मराठ्यांना आरक्षण मिळाले , अत्याचार प्रतिबंधक कायदा सौम्य झाला की मराठा समाजाची सर्व प्रश्ने सुटणार असल्याचा अविर्भाव आहे. इथेही सरकार बोलणी करायला तयार आहे तर मोर्चेकरांचा जोर गर्दीचे नवे नवे उच्चांक प्रस्थापित करण्यावर आहे. या आंदोलनाला अधिकृत नेता किंवा समिती नसल्याने अजून तरी नेत्याच्या डोक्यात गर्दी जाण्याचा प्रश्न आलेला नाही. चर्चा आहे त्याप्रमाणे मुंबई मोर्चा शेवटचा असेल तर पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे. त्यामुळे मुंबई मोर्चाच्या आधी मागण्यात नेमकेपणा आणि टोक आले पाहिजे. ते कोणाशी कोणी चर्चा करून साध्य करायचे की नवा आंदोलनाचा मार्ग निवडायचा हे ठरवावे लागणार आहे. असाच मोघमपणा राहिला तर हाती काही लागणार नाही आणि पदरी निराशाच येईल. कदाचित अण्णा आंदोलनाने झाला तसा तख्तापलट या आंदोलनाने होईल पण समस्या कायम राहतील. मराठा समाजाची कोंडी झाली आहे ती कायम राहील. 

मराठा समाजाची कोंडी झाली आहे आणि ती फोडण्याच्या उद्देश्यानेच एवढा मोठा जनसागर रस्त्यावर उतरला आहे याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. पण मोर्चातून पुढे येत असलेल्या मागण्या आणि समाजाची झालेली कोंडी याचा कुठे ताळमेळ बसताना दिसत नाही हे ही तितकेच खरे आहे. कोणी कोणाकडे अधिकृत मागण्या केलेल्या नसल्याने मोर्चेकरी काय बोलतात यावरून किंवा त्यांनी हातात धरलेल्या फलकावरून त्याबाबत अंदाज बांधावा लागतो. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी , अनुसूचित जाती आणि जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जाचक असल्याने त्याचा जाच कमी होईल इतपत कायद्यातील तरतुदी सौम्य कराव्यात ही दुसरी मागणी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही तिसरी मागणी. या तीन मागण्यांच्या  भोवती मोर्चा फिरताना दिसतो. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी आणि ती यथाशिघ्र व्हावी याबाबत कोणत्याही समाजगटांचे दुमत नाही. बलत्कार विषयक नव्या कायद्यात तशी तरतूद देखील आहे. तशी तरतूद नसती तर ती करावी म्हणून मोर्चाचे प्रयोजन समजू शकते. पण ते प्रयोजन राहिलेले नाही. अर्थात मोर्चा काढून घटनेबद्दलचा भावनिक संताप व्यक्त करण्यात काहीच चुकीचे नाही. पण त्याच बरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की आपल्या देशात मोर्चे काढून किंवा आंदोलन करून कोणाला फाशी होत नाही. अगदी पाकिस्तानातून येवून भारतात उत्पात करणाऱ्या क्रूरकर्मा आतंकवाद्याना सुद्धा कायद्यातील तरतुदीनुसारच फाशी होत असते. त्यामुळे पहिल्या मागणीचा संबंध भावना व्यक्त करण्यापुरता आहे . दुसरी मागणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची. तो कायदा रद्द व्हावा अशी आमची मागणी नसल्याचे मोर्चेकरीच सांगतात. पण असे सांगत असताना या कायद्या विरुद्ध एवढे वातावरण तापविले जात आहे की नेमके काय हवे आहे या बद्दल संभ्रम निर्माण व्हावा. कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर ते मांडण्याचा आणि त्यावर उपाय सुचविण्याचा , मागणी करण्याचा अधिकार कोणीच नाकारणार नाही. ज्या पद्धतीने कायद्याबद्दल बोलले जाते त्यावरून तर असा आभास होतो की या कायद्यानुसार तक्रार करण्याचा ज्याला अधिकार आहे ती प्रत्येक व्यक्ती उठते आणि कारण नसताना कोणाही विरुद्ध तक्रार करीत बसते. एवढी परिस्थिती नक्कीच बिघडलेली नाही. याचा दुरुपयोग होतो आणि त्याचा त्रासही काहीना भोगावा लागतो. असा दुरुपयोग जो करील त्याला शिक्षा व्हावी अशी तरतूद किंवा संशोधन व्हावे एवढी मर्यादित आणि स्पष्ट मागणी मोर्चातून का होत नाही हा प्रश्न पडतो. अशी नेमकी मागणी केली तर त्याला कोणाचा विरोध होण्याचे कारण नाही. त्यामुळे मोघम चर्चा सोडून नेमके काय हवे ते सांगितले तर त्यावर साधकबाधक चर्चा होवून मागणीची पूर्तता होईल. तिसरी आरक्षणाची मागणी आहे त्याला कोणाचा विरोध नाही तर त्यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागणार आहेत. त्या लवकर दूर व्हाव्यात यासाठी अशा मोर्चाची उपयुक्तता आहे. त्यासाठी सरकारशी चर्चा काढून मार्ग काढावा लागेल. मोर्चा मागून मोर्चे काढीत बसल्याने ते होणार नाही. आज ना उद्या ती मागणी पूर्ण होईल आणि मराठा समाजाच्या शक्ती प्रदर्शनातून ती मागणी पूर्ण झाली हे समाधानही मिळेल. खरा प्रश्न पुढेच आहे. यातून मराठा समाजाची झालेली कोंडी खरेच दूर होईल का. या तिन्ही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला तरी समाजाची कोंडी फुटावी असे या मागण्यात काहीही नाही. होत असलेले शक्ती प्रदर्शन पाहता डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे हे ठरणार आहे. म्हणून मोर्चात सामील तरुणांनी मुलभूत आणि वेगळा विचार करण्याची गरज आहे.

हा वेगळा कसा करता येईल. तरुण वर्गाला आरक्षणाचे जबरदस्त आकर्षण आहे. ते मिळत नाही म्हंटल्यावर आपल्यावर फार मोठा अन्याय होत असल्याची भावना होते. आपण काय पाप केले असे वाटायला लागते. तर आपण पाप केलेच आहे. आपली जात श्रेष्ठ ठरवून दुसऱ्याची हीन ठरवून आपण अन्याय केलाच आहे. हो पण आता ज्यांनी असा अन्याय केला त्या अनेक जातींना ओबीसीच्या नावावर आरक्षण मिळतेच आणि म्हणून ते तुम्हालाही मिळायला हरकत नाही. पण आपला जो सतत रोख त्यांना (म्हणजे दलित-आदिवासींना) मिळते मग आम्ही काय घोडे मारले असा असतो तो चुकीचा आहे. मराठ्यांनी म्हणावे ना कुनब्याला आरक्षण मिळते मग आम्हाला का नको. असे म्हंटले तर ते न्याय्य होईल. पण सतत दलितांवर रोख ठेवायचा आणि आता कुठे जातीचे एवढे राहिले का म्हणत जात मोर्चा काढायचा याचा आधुनिक काळात वावरणारे तरुण - तरुणी विचार करतील की नाही हा प्रश्न आहे. कुनब्याला मिळते , मराठ्यांना मिळत नाही हा अन्याय दूर होईल पण त्याने किती जणांना कितीसा फायदा होणार आहे. सरकारी नोकरीत जागा निघण्याचे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. १० जागांसाठी १० हजार अर्ज येतात आणि ज्या जागेसाठी ४ थी पास पात्रता आहे तिथे आचार्य पदवीधारक अर्ज करतात. अशावेळी आरक्षण मिळाल्यावर मराठ्याच्या वाट्याला किती जागा येतील आणि त्याने संपूर्ण समाजाचे कसे भले होईल याचा विचार कोण करणार. ४० टक्क्याला मिळते आणि ९० टक्क्याला मिळत नाहीत ही गोष्ट आता फार जुनी झाली. दलिताच्या घरी शिक्षणास अनुकूल वातावरण आहे , त्याच्या शैक्षणिक प्रेरणा बलवत्तर आहेत त्यामुळे त्याचा टक्का वाढ्लेलाच आहे. शेतीचे सगळे लचांड मागे असल्याने शेतकरी समाजातील तरुणांचा टक्का घसरतोय. मागणीच करायची असेल तर विपरीत परिस्थितीमुळे आमचा टक्का घसरतोय म्हणून कमी टक्क्यावर आम्हाला प्रवेश आणि नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी करण्यासारखी परिस्थिती आहे. "त्यांना आणि आम्हाला" या भाषेचा त्याग करून शेतीमुळे अधिकाधिक मागासलेला आणि गरीब होत चाललेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी काय केले पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. या कुटुंबातील मुलाला शैक्षणिक वातावरण मिळायचे असेल तर तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची पुरेशी सोय उपलब्ध करण्याची मागणी झाली पाहिजे. आज दलित समाजासाठी , आदिवासी समाजातील मुला-मुलीसाठी आणि काही प्रमाणात मागासवर्गीयांसाठी सुविधा उपलब्ध आहे. गंमत म्हणजे नोकरी-शिक्षणात आरक्षणाची मागणी करणारे वसतिगृहात  आम्हाला टक्का मिळाला पाहिजे असे म्हणत नाहीत. अर्थात त्यातील टक्का दुसऱ्यांना मिळूही नये पण शेतकरी कुटुंबातील मुलानाही वसतिगृहाची सुविधा मागितली पाहिजे. एवढेच काय निवासी शाळांची मागणी करता येईल. 'त्यांना' काय मिळते हे बघू नका.'तुम्हाला' काय गरजेचे आहे याचा विचार करून तशी मागणी केली पाहिजे. त्यांना कमी फी भरावी लागते. आम्हाला जास्त फी पडत असल्याने शिक्षण घेता येत नाही असा विचार का करता . तुम्हाला फी परवडत नाही ना. ती कमी करायची मागणी करा. कमी करत नसतील तर काढा ना लाखाचे मोर्चे. २०-३० वर्षापूर्वी फी वाढी विरुद्ध विद्यार्थ्यांनी मोठमोठी आंदोलने केली आहेत. आता तशी आंदोलने करायला काय हरकत आहे. सध्या निघणाऱ्या मोर्चाची ती मागणी का असू नये . मराठा समाजात कर्मवीर भाऊराव , पंजाबराव  निर्माण होणे थांबले आहे . पाटील-कदमासारखे शिक्षणाचे व्यापारी तयार झाले आहेत. त्यामुळेही शिक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकेकाळचा समर्थ आणि  सत्ताधारी समाज आज भिकेला का लागला याचे कारण आरक्षणात नाही. ते कशात आहे याचा मोर्चात सहभागी तरुण-तरुणी खोलात जावून विचार करणार नसतील तर लाखोंच्या मोर्चातून काहीही निष्पन्न होणार नाही.
--------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------------------

Thursday, September 15, 2016

कायद्याच्या खांद्यावर जाती निर्मूलनाचे ओझे

दलित - आदिवासींवरील वाढते अत्याचार लक्षात घेता या कायद्याची जरब असणे आवश्यक असल्याने कायदा सौम्य करणे  धोकादायक आहे आणि तितकेच धोकादायक या कायद्या बद्दल मोठ्या जनसमूहात असंतोष वाढू देणे आहे. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जरब कायम ठेवत अन्य जनसमूहात निर्माण भीती आणि असंतोष दूर करण्याचे खरे आव्हान आहे . 
--------------------------------------------------------------------                            


सध्या मराठा मोर्चाच्या निमित्ताने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या चर्चेने महाराष्ट्र ढवळून निघत आहे. हा कायदा संसदेने १९८९ साली संमत केला आणि १९९० सालापासून लागू झाला असला तरी कायद्याबाबतचे 'जागरण' एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच होत आहेत. दिल्लीतील निर्भया बलात्कार कांड घडल्या नंतर बलात्कार संबंधीचा  कायदा कडक करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते हा ताजा इतिहास आहे. त्या नंतर अनेक तरतुदी जाचक ठराव्यात इतपत बलत्कार प्रतिबंधक कायदा कडक करण्यात आला. मराठा मोर्चाच्या मागण्यांबाबत पुरेशी स्पष्टता नसली तरी अ.जा. व अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कडक तरतुदीमुळे होत असलेला दुरुपयोग थांबविण्याची एक ठळक मागणी या मोर्चाने समोर केली आहे. स्त्री वरील बलत्कार आणि दलितांवरील अत्याचार सारखेच गंभीर असल्याने एक कायदा कडक करावा आणि एक कायदा सौम्य करावा अशी मागणी पुढे येणे हे विरोधाभासी आहे. मुळात कायदा म्हंटला की दुरुपयोग आलाच. कायदा जितका कडक तितका दुरुपयोगाचा धोका मोठा असतो. दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा , टाडा किंवा पोटा या सारख्या कडक कायद्याच्या दुरुपयोगाची अनेक उदाहरणे समोर असताना बलात्कारा संबंधीचा कायदा अधिक कडक करण्याची मागणी होते कारण अशा घृणित अत्याचाराला सभ्य आणि सुसंस्कृत समाजात स्थान असू नये अशी त्या मागची भावना होती. नेमक्या याच भावनेतून दलित - आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक कडक करावा अशी मागणी होत आली आणि तो कायदाही अधिकाधिक कडक करण्याचा प्रयत्न झाला आहे. बलत्कार प्रतिबंधक कायदा असो वा जातीगत अत्याचार प्रतिबंधक कायदा असो तो अधिकाधिक कडक होत जाणे हे प्रशासtकीय आणि सामाजिक असे संयुक्त अपयश आहे. दोन्हीच्याही बाबतीत घटना घडली की तत्परतेने पोलिसात नोंद होईल , योग्य पद्धतीने आणि अल्पावधीत तपास पूर्ण होवून खटले दाखल होणे आणि आरोपींना लवकर शिक्षा होणे हे प्रशासकीय पातळीवर घडत गेले असते तर कायदा कडक करणे आणि कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणीच पुढे आली नसती. अशा अत्याचाराच्या घटना घडल्यावर सामाजिक जबाबदारी म्हणून घटना घडू नयेत असे प्रयत्न समाजात चालू असते तर अशा घटना कमी कमी होत गेल्या असत्या . सरकारी आणि सामाजिक पातळीवरील अपयशाने अशा घटना कमी होण्या ऐवजी घटनात वाढ होताना दिसते आणि अशी वाढ होवू लागली की हे कायदे अधिकाधिक कडक करून हे अपयश झाकण्याचा प्रयत्न होतो. कायदे कडक झालेत की त्यात निरपराधांचे भरडणे टाळणे शक्य नसते. यावरचा उपाय एकच आहे . कायदे कडक करण्यासारखी परिस्थिती समाजात निर्माण होणार नाही याची काळजी घेणे . अशी काळजी ही सरकारची नाही तर प्रामुख्याने समाजाची जबाबदारी आहे. सामाजिक जबाबदारीचे भान न ठेवता सगळ्या गोष्टी आपण सरकारवर सोडून मोकळे झालो आहोत आणि त्याची किंमत कडक कायद्यांच्या रूपाने होणारे परिणाम भोगून चुकवावी लागत आहे. 




दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिकाधिक कडक होत गेला हे खरे असले तरी तो कोणाला सताविण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी झालेला नाही. तो कडक होत जाण्याची कारणे समजून घेवून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला तर कडकपणा आणि कडवटपणा आपोआप निवारला जाईल. वंश , जात , धर्म , पंथ , लिंग अशा कारणावरून भेद्वाव होता कामा नये हे मुलभूत तत्व आम्ही राज्यघटना स्विकारून मान्य केले आहे. बाबासाहेबांनी जाती व्यवस्थे विरुद्ध दिलेल्या लढ्याच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईत सुद्धा प्रमुख कार्यक्रमापैकी एक असलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाच्या  विजयावर  शिक्कामोर्तब राज्यघटनेने केले. त्यावेळच्या भारलेल्या वातावरणात आता जातीव्यवस्थेचे समूळ उच्चाटन होणार असा मोठ्या प्रमाणावर समज होता. पण हा समजच ठरला आणि जातीनिर्मुलनासाठी कायद्याची गरज भासू लागली. स्वातंत्र्या नंतर तब्बल ८ वर्षाने १९५५ साली संसदेने अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा पारित करून लागू केला. या कायद्याने म्हणावा तसा फरक पडत नाही हे २० वर्षाच्या अनुभवातून लक्षात आल्यावर यात सुधारणा करून १९७६ साली हा कायदा अधिक कडक करण्यात आला आणि कायद्याचे मानवी हक्क संरक्षण कायदा असे नामकरण करण्यात आले. या कायद्याने देखील जाचक जाती व्यवस्थेतून होणाऱ्या अन्याय-अत्याचारात फरक पडताना दिसला नाही आणि या पेक्षा अधिक कडक तरतुदी असलेल्या कायद्याची गरज भासू लागली. या गरजेतून १९८९ साली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा संसदेने पारित केला. १९८९ साली पारित केलेल्या या कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही आणि अत्याचार करणारे गुन्हेगार मोकळे सुटतात हे लक्षात आल्यावर १९९५ साली कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी मोठी नियमावली तयार करण्यात आली. या नियमावलीनुसार या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. या अंमलबजावणीने काही वेळा काही निरपराध लोकांवर अन्याय होतो , ते विनाकारण भरडले जातात हे खरे असले तरी दुसरे प्रखर सत्य हेही आहे की एवढा कडक कायदा आणि अंमलबजावणीची कडक नियमावली असूनही दलित - आदिवासी वरील अत्याचारात कुठेही कमी आलेली नाही , उलट वाढच झाली आहे. संसदेत सरकार तर्फे सादर करण्यात आलेले आकडे दिशादर्शक आहेत. २०१० साली लोकसभेत दलित-आदिवासी यांचेवरील अत्याचाराच्या चर्चेला उत्तर देतांना तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी २००६,२००७ आणि २००८ साली या कायद्या अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर ठेवली जी चढत्या क्रमांकाची होती. या तीन वर्षाची आकडेवारी अनुक्रमे २६६६५, २९८२५ आणि ३३३६५ अशी होती. नोंद झालेल्यात काही खोट्या तक्रारी असूच शकतात पण बलात्कारा प्रमाणेच नोंद होत नसलेल्या अत्याचाराच्या घटना देखील दुर्लक्षणीय नाहीत. त्यामुळे कसाही विचार केला तरी दलित-आदिवासी वरील अत्याचारात वाढच होत आहे हे वास्तव स्वीकारावेच लागते. नोंद झालेल्या प्रकरणात शिक्षा झाल्याचे प्रमाण सरासरी ३० टक्के इतकेच असल्याचे  गृहमंत्र्यांनी सांगितले . महाराष्ट्रात तर हे प्रमाण बरेच कमी असल्याचे आकडेवारी सांगते. यावर उपाय म्हणून त्याच चर्चेत चिदंबरम यांनी १९८९ चा कायदा अधिक कठोर बनविण्याचे सुतोवाच केले होते. २०१४ साली अध्यादेश आणि २०१५ साली अध्यादेशातील तरतुदीचे कायद्यात रुपांतर करण्यास संसदेने मान्यता देवून अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक व्यापक आणि कठोर बनविला आहे. म्हणजे एकीकडे अत्याचारात वाढ होत आहे म्हणून कायदा कठोर करण्याची गरज भासत आहे आणि दुसरीकडे कठोर कायद्याने निरपराधही भरडले जात आहेत म्हणून या कायद्या बद्दल  भीती आणि असंतोष वाढताना दिसत आहे. वाढते अत्याचार लक्षात घेता या कायद्याची जरब असणे आवश्यक बनल्याने कायदा सौम्य बनविणे धोकादायक आहे आणि तितकेच धोकादायक या कायद्या बद्दल मोठ्या जनसमूहात असंतोष वाढू देणे आहे. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जरब कायम ठेवत अन्य जनसमूहात निर्माण भीती आणि असंतोष दूर करण्याचे आव्हान आमच्या समोर आहे आणि हे आव्हान आम्हाला पेलवले नाही तर समाजस्वास्थ्यासाठी ते घातक ठरेल. 


मतांच्या बेरीज-वजाबाकीचा विचार करणारे राजकीय नेतृत्व किंवा सरकार हे आव्हान पेलू शकेल असे वाटत नाही. किंबहुना आम्ही सामाजिक सुधारणा आणि बदलाचे काम सरकारवर सोपवून मोकळे झालोत त्यामुळेच आजची परिस्थिती उदभवली आहे. सरकार फक्त कायदे करू शकते . कायद्याला अभिप्रेत बदल घडवायचा असेल तर समाजाला पुढाकार घ्यावा लागतो. कडक कायदे करूनही जाती व्यवस्थेला सुरुंग लावता आला नाही याचे कारण सामाजिक  सहभागाचा आणि अभिक्रमाचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या एक दशकानंतर जाती निर्मूलनाची जबाबदारी सर्व समूहांनी सरकारवर ढकलून दिली. सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी कायदे कडक करण्याचे सोंग तेवढे केले. स्वातंत्र्या नंतर सुरुवातीच्या काळात सवर्ण आणि दलित एकत्र येतील असे प्रयत्न झाले होते. कार्यक्रम अगदी वरवरचे असले तरी थोड्या प्रमाणात का होईना दलित आणि सवर्ण यांच्यात संवाद व्हायचा. प्रौढ शिक्षण असो वा इतर राष्ट्रीय कार्यक्रम असो दलितांना त्यात सामील करण्याचा थोडा फार प्रयत्न व्हायचा. किंचित सुरु झालेले आदानप्रदान वाढण्या ऐवजी ५-१० वर्षात कमी कमी होत संपून गेले . त्या काळच्या सहभोजनाची आज खिल्ली उडविली जाते. पण तसे कार्यक्रम वाढत गेले असते तर चित्र वेगळे राहिले असते. बाबा आढाव यांनी सुरु केलेल्या एक गाव एक पाणवठा कार्यक्रम यशस्वी झाला असता तर दलित सवर्ण अंतर कमी होवून नामांतराला विरोध झाला नसता. पण दलित सवर्ण एकत्र येतील , त्यांच्यातील आदानप्रदान वाढेल , संवाद वाढेल असे छोटेखानी कार्यक्रम समाज पातळीवर घेण्यातील अपयश आले. स्वातंत्र्यापूर्वी जोमात आणि जोशात असलेली जाती निर्मूलनाची चळवळ स्वातंत्र्यानंतर पुढे नेता आली नाही . जाती निर्मूलनाचा सगळा भार कायद्यावर येवून पडला. जाती निर्मुलन ही सवर्णांची मुख्य जबाबदारी होती. त्यातून त्यांनी अंगच काढले नाही तर विद्यापीठाच्या नामांतरा सारख्या कार्यक्रमाला  विरोध करून जातीभेदाच्या भिंतीची नव्याने डागडुजी केली. कायद्यावरून दलित-सवर्णात तेढ निर्माण व्हायला या डागडुजी केलेल्या भिंती कारणीभूत आहेत. भांडण झाले तरी चार लोक एकत्र येवून समझौता करण्याचा प्रयत्न करतात . पण दलित -सवर्णात भांडण झाले तर दोन्ही समाजातून २-४ लोक एकत्र येवून मिटविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कारण गावगाड्यातील संबंध खेळीमेळीचे न राहता तुटलेले आहेत. हे तुटलेले संबंध पुन्हा जोडणे , त्यांच्यात अगदी प्राथमिक का होईना आदानप्रदान आणि संवाद होणे इथपासून नव्याने जातीनिर्मूलनाच्या कार्याला प्रारंभ करावा लागणार आहे. यात पुढाकार सवर्णांनीच घेतला पाहिजे . कारण सवर्ण मानसिकतेतून प्रश्न निर्माण झाला आहे. जाती निर्मूलनाचे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर दलितांनी सुद्धा आपला सन्मान कायम ठेवत सक्रीय सहकार्याची आणि संवादाची भूमिका घेतली पाहिजे. 

मराठा मोर्चाच्या निमित्ताने मी ' मराठा समाजाचे दुखणे ' लेख रूपाने मांडले तेव्हा त्यातील सरंजामी प्रवृत्तीच्या उल्लेखाने अनेकजण दुखावले. ती गोष्ट दुसऱ्या शब्दात मांडतो. सुरुवातीला मी तत्कालीन गृहमंत्री चिदम्बरम यांच्या लोकसभेतील भाषणाचा उल्लेख केला त्या भाषणात त्यांनी दलित अत्याचारात वाढ होण्या मागील कारणांपैकी एक महत्वाचे कारण दलितांची आर्थिकस्थिती सुधारण्याचे दिले आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात आरक्षणाचा हात आहे आणि आमची बिघडण्यास आरक्षणाचा अभाव आहे असा समज मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मराठा मोर्चातही ही भावना व्याप्त असल्याचे जाणवते. पण दलितांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि मराठ्यांची आर्थिक स्थिती बिघडणे यात सत्य असेलच तर ते आंशिक आहे. असे घडायला यापेक्षा दुसरी मोठी कारणे आहेत ती शोधली आणि समजून घेतली पाहिजे. मुळात जो शिव ओलांडतो तोच प्रगती करतो हे डोळे उघडून चौफेर पाहिले तर लक्षात येईल. शेतीत अडकून शिव ओलांडणे जमले नाही त्यांचे दैन्य वाढत आहे. शिव ओलांडणे नोकरीसाठीच नसते . उद्योगधंद्यासाठी ती ओलांडायची असते तरच प्रगती होते. मी ज्या खेड्यात जन्मलो , वाढलो तिथले दलित शेतीत काम करण्या ऐवजी शहरात रोजगार मिळवून किंवा गवताचे , लाकडाचे भारे विकून शेतकऱ्यापेक्षा सुखाने आणि मानाने जगताना पाहिले आहे. शेतीत काम करण्यापेक्षा ती कामे त्यांना जास्त सोयीची वाटली तर शेतीवर काम करीत नाहीत म्हणून चीड चीड आणि राग राग करण्यात अर्थ नाही. दुसरे कोणी आपल्या दु:खाला कारणीभूत नाहीत हे समजले तरी गावगाड्यातील संबंध सुरळीत होण्यास मदत होईल. दुसऱ्या बाजूने शेतीतून आणि परिस्थितीतून आलेल्या अगतिकतेतून या समाजाची चीड चीड होत आहे , एरवी ते आपले शत्रू नाहीत अशीच दलित समाजाची भावना असली पाहिजे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने दलित समाजात चलबिचल होताना दिसत आहे. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची  कवचकुंडले बोथट तर होणार नाहीत ना अशी भीती पसरविण्याचा प्रयत्न होतो आहे तो थांबविला पाहिजे. या मुद्द्यावर मराठा मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी काही मंडळी प्रतीमोर्चे काढण्याचा घाट घालत आहेत. त्याची काहीच गरज नाही.असे मोर्चे काढू नयेत हे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आवाहन प्रगल्भ आहे. खरे तर दलित समाजाने मराठा मोर्चाचे आभार मानायला हवेत.  अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा प्रचार आणि त्यातील बारकावे या मोर्चाच्या निमित्ताने गावागावात समजले आहेत. इतक्या वर्षात कायदा समजावून सांगण्याचे कार्य सरकारच्या अवाढव्य यंत्रणेला जमले नाही ते अल्पावधीत मराठा मोर्चामुळे झाले आहे. कायद्याबद्दल जरब निर्माण झाली आहे. याचा उपयोग अत्याचार रोखण्यासाठी नक्कीच होईल. त्याचमुळे मराठा मोर्चाचा विरोध न करता यापुढे जिथेकुठे असे मोर्चे निघतील त्या मोर्चाचे पानफुल देवून किंवा अन्य मार्गाने दलित समाजाने आणि दलित संघटनांनी स्वागत केले पाहिजे. आंबेडकरी तत्वज्ञान त्यांच्या पर्यंत पोचवून सौहार्द निर्माण करण्याचा  हा गांधी मार्ग आहे म्हंटले तर कदाचित ते अनेकांना पचणार नाही. कारण अनेकांसाठी आज गांधी अस्पृश्य आहेत. पण हाच बुद्धमार्ग असल्याने त्यावर चालून सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वांसाठी हितकारक ठरेल. 

---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------------------

Thursday, September 1, 2016

मराठा समाजाचे दुखणे

 कोपर्डी घटनेच्या वेदनेपेक्षा मराठा समाजाचा मानभंग होत असल्याची सल रस्त्यावर उतरविण्यास बाध्य करीत आहे. ही सल एका दिवसात किंवा एका घटनेने निर्माण झालेली नाही. स्वत:ला मर्द मराठा समजणाऱ्या या समाजाला मानभंगाच्या शल्याने एवढे हळवे केले आहे की क्षुल्लक आणि संबंधित नसलेल्या गोष्टीनी आणि घटनांनी त्याला अपमानित झाल्या सारखे वाटत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------


कोपर्डी घटनेनंतर मराठा (अर्थात कुणब्यासह) समाज जागा आणि संघटीत होताना दिसत आहे. औरंगाबादच्या अभूतपूर्व मोर्चाने याचे दर्शन घडविले.त्यानंतर असे मोर्चे आणखी काही ठिकाणी निघाले आहेत. सर्वात ताजा बीडचा मोर्चाही लक्षणीय आर्णि त्या समाजाची शक्ती दर्शविणारा होता. कोपर्डी घटनेवर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई केली आणि त्यांच्या गतीने आरोपींना पकडले . त्यामुळे कोपर्डी घटनेवर काही कारवाई झाली नाही म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला असे म्हणता येणार नाही. किशोरवयीन मुलीवर ज्या क्रूर पद्धतीने अत्याचार झालेत त्यामुळे कोणालाही वेदना झाल्या असत्या. त्या वेदनांनी समाजाला रस्त्यावर आणले हे पूर्ण सत्य नाही. त्या वेदनांनी समाजाला एकत्र आणले असे म्हणता येईल. कोपर्डीच्या वेदनेने एकत्र आलेला हा समाज रस्त्यावर उतरला आणि उतरत आहे ते केवळ त्या घटनेचा निषेध म्हणून नाही. कोपर्डी घटनेच्या वेदनेपेक्षा मराठा समाजाचा मानभंग होत असल्याची सल रस्त्यावर उतरविण्यास बाध्य करीत आहेत. ही सल एका दिवसात किंवा एका घटनेने निर्माण झालेली नाही. स्वत:ला मर्द मराठा समजणाऱ्या या समाजाला मानभंगाच्या शल्याने एवढे हळवे केले आहे की क्षुल्लक आणि संबंधित नसलेल्या गोष्टीनी आणि घटनांनी त्याला अपमानित झाल्या सारखे वाटते . मुद्दामहून आपल्याला डिवचण्यात येत आहे किंवा लक्ष्य करण्यात येत आहे अशा समजुतीने हा समाज क्रोधीत होवू लागला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर 'सैराट' चित्रपटाचे देता येईल. समाजात जे घडते तेच चित्रपटात दाखविले आहे. नायिका दुसऱ्या कोणत्याही वरच्या जातीतील असती तरी हेच घडले असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे यथार्थ चित्रण व्हावे या हेतून दिग्दर्शकाने नायिका मराठा समाजातील दाखविली असेल. नायिका ब्राम्हण समाजाची दाखविता येत नाही कारण हा समाज आता खेड्यात फारसा दिसत नाही.ब्राम्हण समाज आंतरजातीय विवाहाला इतर समाजाप्रमाणेच अनुकूल नसला तरी इतर समाजा इतका टोकाचा किंवा हिंसक विरोध कधीच करीत नाही. त्यामुळे कथानकाची गरज म्हणून दर्शविलेली मराठा समाजाची नायिका केवळ आपला मानभंग करण्यासाठीच निवडली आहे अशा समजुतीने देखील हा समाज दु:खी होण्या इतका हळवा झाला आहे. कोपर्डी घटनेच्या आधी त्याच म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात दलित स्त्रियांवर बलत्कार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांसाठी सगळ्या मराठा समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आल्याच्या भावनेने मनात राग साचलेला होताच. कोपर्डी घटनेने हा राग बाहेर काढण्याची आणि पलटवार करण्याची संधी मिळाली. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाच्या मोर्चातून ज्या मागण्या समोर येताना दिसताहेत त्या बघता कोपर्डी घटनेच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी समाजात व्याप्त खदखद , असंतोष आणि निराशा बाहेर येत आहे असे म्हणता येईल.

महाराष्ट्रात इतर कोणत्याही जाती-जमाती पेक्षा मराठा समाज संख्येने मोठा आहे आणि संख्येच्या तुलनेत त्याचे अधिकार क्षेत्र त्यापेक्षा मोठे आहे ! काही वर्षापूर्वी डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केलेला वाद आठवत असेल तर मी काय म्हणतो हे लक्षात येईल. ३५ टक्के समाजाने प्रदेशातील जवळपास सर्वच सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत असे बाबा आढाव यांनी दाखवून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विविध सामाजिक घटकात सत्ता जेवढी विभागली केली होती तेवढी देखील सत्तेची विभागणी आधुनिक महाराष्ट्रात झाली नव्हती. त्यामुळे दीर्घकाळ एकहाती सत्ताकेंद्रे ताब्यात ठेवणारा समाज असा रस्त्यावर येणे हे आश्चर्यच आहे. कमी संख्येने आणि अत्यल्प सत्ता केंद्रे हाती असलेल्या इतर समाजांनी किंवा जातींनी मोठ्या संख्येतील या समाजाची दुरावस्था केली असेल असे मानणे तर्काला आणि वस्तुस्थितीला धरून होणार नाही. एकमात्र खरे की आजवर संख्या, सत्ता आणि आर्थिक बळावर हुकुमत गाजविणाऱ्या या समाजाच्या हातातून सगळे निसटून चालले आहे. निसटून चालले आहे हे तर स्पष्ट दिसायला लागले आहे , पण या मागची कारणे या समाजातील तरुणांना लक्षात येत नसल्याने तो सैरभर झाला आहे. म्हणून ज्या मुद्द्यांवर व ज्या मागण्यांवर तो हिरीरीने आणि पोटतीडीकीने बोलतो ते वड्याचे तेल वांग्यावर काढण्या सारखे आहे हे त्याला कळत नाही. ज्यांच्या हाती नेतृत्व आहे त्यांना ते कळू द्यायचे नाही.  कारण नेतृत्वाने या संख्या बळावर जी सत्ता काबीज केली होती ती सत्ता या समाजाचे दु:ख आणि दैना दूर करण्यासाठी वापरलीच नाही. या समाजाच्या सगळ्या दु:ख आणि दैनेचे मूळ शेती आणि शेतीशी निगडीत सरंजामी आणि मागासलेली मानसिकता आहे हे सत्य मांडण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न होतच नाही. त्यामुळे आरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या सारखे प्रश्न या समाजाचे जीवन - मरणाचे प्रश्न बनतात. आपल्या समाजातील तरुणांचा रोष असा दुसऱ्या समाजाकडे वळवून दिला की नेतृत्व सुखाने झोपू शकते ! राजकीय दृष्ट्या दुसऱ्या समाजाचा रोष परवडणारा नसल्याने नेतृत्व पडद्यामागे राहणे पसंत करते. आणि मग यालाच स्वयंस्फूर्त उठाव वगैरे म्हणून मराठा तरुण आपली पाठ थोपटून घेतो. हा जर स्वयंस्फूर्त उठाव असता तर या उठावाचा पहिला बळी त्या समाजाचे आजचे प्रस्थापित नेतृत्व ठरले असते. पण तसे झाले नाही . नेतृत्व सुरक्षित आहे . एवढेच नाही तर समोर न येता तरुणांचा रोष भलतीकडे वळविण्यात देखील नेतृत्व यशस्वी झाले आहे. पुन्हा एकदा मराठा तरुणांची दिशाभूल होत आहे. आपली लढाई इतर समाज घटकाशी नाही , आपल्या नेतृत्वाशीही नाही तर आपल्याशीच आहे हे मराठा तरुण समजून घेत नाही तो पर्यंत त्याला उन्नतीचा आणि प्रगतीचा मार्ग सापडणार नाही. आरक्षण हा आपल्या प्रगतीचा मार्ग नाही हे ज्या दिवशी त्याला उमगेल त्या दिवशी त्याला प्रगतीपथावर जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 


 शेती करतात ते सगळेच मराठा नसतात, पण सगळे मराठा शेती करतात हे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. या शेतीनेच या समाजा समोर सगळे प्रश्न निर्माण केले आहेत. आर्थिक दुरावस्था आणि सरंजामी मानसिकता ही शेतीची पैदास आहे. एके काळी शेती शिवाय उत्पादनाची नि उत्पन्नाची दुसरी साधने नव्हती तेव्हा हा वर्ग समाजाचा पोशिंदा होता. बारा बलुतेदार त्याच्या दारी येत. त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर समाजाच्या तुलनेने तो सुखी होता. शेतीशिवाय उत्पादनाची अन्य साधने निर्माण झालीत तेव्हा शेती नसलेला समुदाय पटकन तिकडे वळला आणि शेतीतले तुलनात्मक सुख खरे मानून मराठा समाज शेतीतच अडकून पडला. शेती हे  त्याच्या पायातील आणि प्रगतीतील बेडी कधी बनली त्याला कळलेच नाही. शेतीच्या बळावर म्हणा की लुटीवर म्हणा समाजाची प्रगती झाली , देशाची प्रगती झाली . शेतीत राबणारा तिथेच राहिला. शेती पासून लांब गेल्याने बारा बलुतेदार देखील सुखाने आणि मानाने जगू लागले. जे आपले एकेकाळी आश्रित होते , आपल्यावर अवलंबून होते ते आपल्याकडे ढुंकून पाहत नाहीत . मजेत राहतात , आपण मात्र अधिकाधिक दु:खाच्या गर्तेत चाललो आहोत हे या समाजाचे मोठे दुखणे आहे. पण या दु:खाचे मूळ दुसरे समाज घटक नाहीत . त्याचे शेतीत अडकून पडणे आहे हे त्याला लवकर कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नसल्याने त्याची तडफड होत आहे. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसे शेती बाहेर पडण्यासाठी आरक्षणाच्या काडीचा आधार मराठा समाजातील तरुण घेवू पाहत आहेत. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य झाली तरी त्याचा फायदा किती टक्के लोकांना होणार आहे ? तुम्ही जर शालांत परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची समाजनिहाय संख्या काढायला गेलात तर लक्षात येईल की शेतीशी निगडीत जो समाज आहे त्या समाजात अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किती शेतकरी आपल्या मुलीना उच्च शिक्षण घेवू देतात ? मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असले तरी शेतकरी समाजातील मुलीना उच्चशिक्षण सुलभ आणि सोपे नाही. मग आरक्षण मिळाले तरी यांचा काय फायदा होणार याचा विचार कोणी करीत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मृगजळा मागे लागण्यापेक्षा शेती क्षेत्राचा कायापालट कसा होईल याचा विचार आणि त्यासाठीची कृती मराठा समाजासाठी निर्णायक ठरणार आहे. सर्वांगीण प्रगतीसाठी शेती बाहेर पडावेच लागणार आहे , पण शेती फायद्याची झाल्याशिवाय शेती बाहेर पडता येणार नाही असा हा चक्रव्यूह आहे. औरंगाबाद आणि बीडच्या मोर्चात सामील मराठा तरुणांमध्ये हा चक्रव्यूह भेदणारे अर्जुन असतील तरच या समाजासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होवू शकतील. अन्यथा भिक्षुक आमच्यावर राज्य करतात आणि ज्यांची जागा आमच्या पायाशी होती ते छाती पुढे करून डोळे वर करून आमच्याकडे बघतात या सरंजामी मानसिकतेने पिडीत  हा समाज शेतीत टाचा घासत संपून जाईल. 



----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------------------

Thursday, August 25, 2016

गोहत्या बंदी कायद्याने गायीचे हाल आणि माणूस हलाल !

 मुस्लिम गाय कापतात , गायीचे मांस खातात (भारतात आणि जगभर सर्व धर्मीय लोक गोमांस भक्षण करतात ) म्हणून या गोरक्षक वर्गाला त्यांचा खूप राग. त्यासाठी त्यांना ठार मारणे हे धर्मकार्य वाटते. पण इस्लाममध्ये जनावरांना मारताना किमान त्याचे हाल होणार नाहीत हे आवर्जून पाहिले आणि पाळले जाते . त्यालाच हलाल म्हणतात. सरकार व गोरक्षकाच्या गोरक्षण नीतीने जनावरे मात्र हाल हाल होवून मरत आहेत  आणि माणसे हलाल होत आहेत.
--------------------------------------------------------------------------------


मेलेल्या गायीचे कातडे काढणाऱ्या गुजरातेतील उना येथील अनुसूचित जातीच्या तरुणांना कथित गोरक्षकांनी केलेली मारहाण आणि काढलेली धिंड पाहून देशात संतापाची लाट आल्याने अशा घटनांवर सोयीस्कर मौन पाळण्याची परंपरा प्रधानमंत्री मोदी यांना तोडावी लागली. मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून कायदा हातात घेण्याच्या अनेक घटना घडूनही कोणा विरुद्ध काहीच कारवाई न झाल्याने त्याची परिणती उना येथील घटनेत झाली. दोन वर्षा नंतर का होईना पण अशा प्रकारच्या कथित गोरक्षकाच्या कारवायाची प्रधानमंत्री मोदी यांनी कडक शब्दात निर्भत्सना केली. प्रधानमंत्र्यांनीच अशी निर्भत्सना केली म्हंटल्यावर आजवर अशा कारवाया प्रती उदासीन असणाऱ्या गृहमंत्रालयाला जाग आली आणि कायदा हातात घेणाऱ्या व खंडणी बहाद्दर गोरक्षकावर कडक कारवाईचे निर्देश सर्व राज्यांना दिले. कारवाई कितपत होईल हा पुढचा प्रश्न आहे. पण प्रधानमंत्र्यांनी तोंड उघडल्यावर माध्यमांचे गाय प्रकरणाकडे विशेष लक्ष गेले. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या. गोरक्षक बनून दंडेलशाही करीत पैसे उकळण्याच्या घटना माध्यमांनी जनते समोर आणल्या. विकण्यासाठी आणताना किंवा विकत घेतलेले गाय बैल घरी नेताना देखील गोराक्षकाकडून अडवणूक व्हायची आणि वसुली व्हायची हे उजेडात आले. पंजाब-हरियाना सारख्या राज्यात तर वाहनाच्या आकारानुसार आणि जनावराच्या संख्येनुसार किती पैसे द्यायचे याचे दर ठरले असल्याचे उघड झाले. हा दर २५ ००० रुपयापासून लाखापर्यंत असल्याचे छापून आले आहे. आणखी एक गोष्ट उजेडात आली ती जास्त गंभीर आहे. मोदींच्या मुख्यमंत्री काळातील शेवटच्या दोन वर्षात अशा प्रकारे दंडेली करून कायदा हातात घेत वाहन अडविणाऱ्या गोरक्षकांना सरकारतर्फेच बक्षिशी वाटण्यात आली. २०१२ ते १४ दरम्यान तत्कालीन मोदी सरकारने गुजरातेत गोरक्षकांना ८० लाखाच्यावर रक्कम बक्षीस म्हणून दिली होती. हेच तेव्हाचे बक्षीसपात्र गोरक्षक आता केंद्रातील मोदी सरकारसाठी भस्मासुर बनले आहेत.

नुकत्याच उजेडात आलेल्या दोन राज्यातील दोन घटनांनी गाय प्रकारावर नवा प्रकाशझोत टाकला आहे. उत्तरप्रदेशातील बलियात गायीना घेवून जाणारे एक वाहन पोलिसांनी अडवले आणि जप्त केले. वाहनात गायींना घेवून जाणारा कार्यकर्ता भाजपाचा होता. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . गायीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई झाल्याने त्या भागातील संतप्त भाजप आमदाराने पोलीसठाण्या समोर धरणे धरले निदर्शने केलीत. दुसरी घटना कर्नाटकातील. तिथे अशाच प्रकारे गायीची वाहतूक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला भाजप आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनीच बेदम मारहाण करून ठार केले. पोलिसांना या प्रकरणात व्यावसायिक हिताचा संघर्ष असल्याचा संशय आहे. या दोन्ही घटनातून भाजप कार्यकर्ते गायीच्या व्यापारात उतरले असा अर्थ निघतो. गोहत्या बंदी कायदा आणि त्या कायद्याच्या आवरणाखाली गोरक्षकांनी चालविलेली दंडेली , होणारी मारहाण आणि द्यावी लागणारी खंडणी याचा धसकाच परंपरेने जनावरांचा व्यापार करणाऱ्यांनी घेतला. गायी-बैलाच्या खरेदी विक्रीत हात घालण्याचे ते टाळू लागलेत. भाकड जनावरे पोसणे परवडत नाही आणि विकलीही जात नाहीत त्यामुळे अशी जनावरे सोडून देण्याशिवाय गोपालक शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. बहुधा अशीच जनावरे ताब्यात घेवून त्याची वाहतूक करताना या दोन घडल्या असाव्यात. स्वघोषित गोभक्त आणि गोरक्षक अशी जनावरे ताब्यात घेवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का नेतात हे एक कोडेच आहे. कत्तलीसाठी नक्कीच नेत नसतील . मग काय करीत असतील अशा जनावरांचे ? याचे उत्तर भाजप शासित राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधराराजेनी दिले आहे. अशी बेवारस जनावरे जमा करून मोक्याच्या सरकारी जागेवर आणून ठेवायची आणि गोरक्षणासाठी ती जमीन सरकारने द्यावी असा आग्रह धरायचा. अशा हजारो घटना घडल्या असून जमिनीसाठी हजारो अर्ज आले असून सरकार व प्रशासना समोर ही नवी मोठी समस्या निर्माण झाल्याची जाहीर कबुली वसुंधराराजेनी दिली आहे. हा प्रकार एकट्या राजस्थानात नाही तर देशात सर्वत्र घडत आहे. एकाएकी गोरक्षकाचे एवढे पीक येण्याचे रहस्य यात दडले आहे, कर्नाटकातील संघपरिवाराच्या कार्यकर्त्यात गायीवरून झालेल्या जीवघेण्या मारामारीचा उलगडाही यातून होतो. गायी बद्दलच्या सर्वसामान्य भावनांचा राजकारणासाठी वापर करता करता त्याचा व्यवसाय व आर्थिक हितसंबंधांसाठी वापर सुरु झाला हे आता उघड होत आहे. यात भरडले जात आहेत गोपालन करणारे शेतकरी आणि जनावरांचा व्यापार करणारे व्यावसायिक . गोहत्या बंदीचा हा झाला मनुष्य प्राण्यावर होणारा परिणाम. गायीवर या कायद्याने झालेले परिणाम , त्यांचे होणारे हाल मन विचलित करणारे आहे .
बेवारस गायीसाठी राजस्थान सरकारने स्वत: गोशाळा सुरु केल्या आहेत. त्यापैकी हिंगोनिया येथील गोशाळा तर देशातील सर्वात मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत ८-९००० गायी सांभाळल्या जातात. त्या गायीची किती दैना आणि आबाळ होते याची वर्णने मन दु:खी करणारे आहे. गोहत्या बंदी कायद्याचा कट्टर विरोधकही गायीचे हाल पाहून अश्रू ढाळील . तिथे गोरक्षणाच्या नावाखाली त्यांची जी आबाळ होते त्यामुळे रोज गायी मरत आहेत. ८००० गायीच्या पालनाचे मासिक बजेट अडीच कोटी रुपयाचे आहे . आणि तरी आठवड्याला शेकड्याने गायी मरत आहेत. गायीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर मरण्याच्या बातमीने राज्यभर खळबळ उडाली. कोर्टाने स्वत:हून याची दखल घेई पर्यंत गायीला माता मानणाऱ्या भाजप सरकारला जाग आली नाही. कोर्टाच्या कडक खरडपट्टी नंतर गोभक्त सरकार जागे झाले. सरकारी गोशालेची जशी अवस्था तशीच खाजगी गोशाळेची . महाराष्ट्रात नागपूर जवळ एका गोरक्षकाकडून होत असलेल्या हेळसांडीच्या बातम्या आणि जीर्णजर्जर गायींची छायाचित्रे पाहण्यात - वाचण्यात आलीच आहेत. गोरक्षकाच्या तावडीतून सुटलेल्या बेवारस गायी-बैले उकिरड्यावर चरताना पॉलीथीन खातात आणि मरतात हे चित्र तर सर्वत्र दिसते. गोहत्या बंदी कायदा कडक करणे आणि त्यासाठी जीवे मारणे याचा परिणाम गायी वाचण्यावर झालाच नाही. उलट गायींना वेदनादायी मृत्युना सामोरे जावे लागत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे . गोहत्या बंदीचा कायदा गायीच्या प्रेमापोटी आणि भक्ती पोटी लागू करण्यात येत नसून त्यात सत्ताधारी भाजप आणि संघ परिवाराचा राजकीय आणि आर्थिक हित जोपासण्यासाठी हा कायदा आहे. ही मंडळी गोमुत्राच्या आणि शेणाच्या उपयुक्ततेवर खूप बोलत असतात. काहीना तर गोमुत्रात सोने सुद्धा सापडले म्हणे. गायीचे शेण आणि मुत्र एवढे मौल्यवान असेल तर त्याच्या येणाऱ्या मुल्यातून गोपालन तर सहज व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला गोमुत्र आणि शेणाचे फायदे सांगणाऱ्याना गोरक्षणाच्या कामासाठी सरकारी पैसा आणि सोयी-सुविधा पाहिजे असतात. मुस्लिम गाय कापतात , गायीचे मांस खातात (भारतात आणि जगभर सर्व धर्मीय लोक गोमांस भक्षण करतात ) म्हणून या गोरक्षक वर्गाला त्यांचा खूप राग. त्यासाठी त्यांना ठार मारणे हे धर्मकार्य वाटते. पण इस्लाममध्ये जनावरांना मारताना त्याचे हाल होणार नाहीत हे पाहतात. त्यालाच हलाल म्हणतात. आणि गोरक्षकाच्या गोरक्षण नीतीने जनावरे मात्र हाल हाल होवून मरतात आणि माणसे हलाल होतात.
गोपालनाचा विचार न करताच गोहत्या बंदी कायदा लागू करणे हे अव्यवहार्य आहे. देशात खरा गोपालक शेतकरी आहे. त्यामुळे हा कायदा लागू करताना त्याच्यावर होणाऱ्या परिणामाचा विचार आधी व्हायला पाहिजे होता. घटने मध्ये काही लोकांना गाय पूजनीय वाटते किंवा मातेसमान वाटते म्हणून गोहत्याबंदीचा निर्देश नाही. शेती आणि शेतकऱ्यासाठी उपयुक्त प्राणी म्हणून तसे निर्देश आहेत. त्यामुळे हा कायदा लागू करताना शेतकऱ्याचे मत आणि हित लक्षात घेणे गरजेचे होते. या कायद्याने सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे केले आहे. दुष्काळ आणि इतर प्रतिकुलतेत त्याच्या घरचे गाय-बैल हे त्याचे जगण्याचे आधारच त्याच्यापासून हिरावून घेण्यात आले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी शेतकरी आत्महत्या वाढल्या त्याचे कारण गोहत्या बंदीचा आतंक आणि अस्त्र म्हणून झालेला वापर आहे. ज्यांच्यावर राग काढण्यासाठी मोठ्या उत्साहाने या कायद्याचा अंमल झाला त्या समुदाया पेक्षा शेतकऱ्यांचे जास्त बळी या कायद्याने घेतले आहेत. गायीवर राजकारण न करता तिचे पालन आणि संवर्धन करायचे असेल तर ती जबाबदारी शेतकऱ्यावर सोपविली पाहिजे. गाय शेतकऱ्याकडे राहिली तरच सुरक्षित आणि सुखी राहील. गोरक्षकाच्या ताब्यात गाय गेली कि तिचे काय हाल होतात हे दिसून आलेच आहे. गोरक्षक गायी आणि माणसे याचा सारखाच छळ करतात हा अनुभव देशाने घेतला आहे. गायीप्रती ज्यांच्या नाजूक भावना आहेत त्या सांभाळण्याची जबाबदारी शेतकरीच समर्थपणे पेलू शकतो. कारण तो सांभाळत असलेल्या जनावरावर तो मनापासून प्रेम करतो. त्यामुळे वेगळ्या गोरक्षण संस्था काढणे , त्यांना जागा आणि पैसा पुरविणे हा उपद्व्याप करण्याची गरज नाही. यात प्रचंड भ्रष्टाचार तर होतोच पण गाय-बैल यांचा व्यवस्थित सांभाळपण होत नाही. तेव्हा तुम्हाला खरेच गाय-बैलाची हत्या होवू द्यायची नसेल तर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी शेतकऱ्यांना द्यावी. अशा जनावरांची कामाच्या दृष्टीने उपयुक्तता संपल्या नंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च सरकारने शेतकऱ्याला द्यावा. गाय-बैलाचे आधारकार्ड बनवणे काही राज्यात सुरु आहेच. या आधारकार्डच्या आधारे जनावराचे वय पाहून सरळ शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करावेत. गोरक्षणाचा हाच साधा ,सरळ, सोपा आणि व्यावहारिक मार्ग आहे. असे केले तर गायीचे हाल होणार नाहीत आणि माणसेही हलाल होणार नाहीत. अर्थात त्यासाठी भाजप आणि संघ परिवाराला गायीकडे सत्ताप्राप्तीचे आणि सुड्पुर्तीचे वाहन म्हणून पाहणे सोडावे लागेल.
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ.
मोबाईल- ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------